मैदानात उभे राहून वर पाहिले असता आपल्याला आकाश दिसते. रात्रीच्या निरभ्र आकाशात अनेक चांदण्या दिसतात. त्या पृथ्वीपासून खूप दूरवर आहेत.
काही चांदण्या मोठ्या व ठळक दिसतात, तर काही चांदण्या लहान व अंधूक दिसतात. आपण चांदण्यांकडे जरा निरखून पाहिल्यास बऱ्याचशा चांदण्या लुकलुकताना दिसतात; पण काही चांदण्या लुकलुकत नाहीत.
आकाशातील सर्व वस्तूंना ‘खगोलीय वस्तू’ असे म्हणतात. चंद्र, सूर्य हे तुलनेने पृथ्वीच्या जवळ आहेत, म्हणून त्यांचा गोल आकार आपण सहज पाहू शकतो. याशिवाय इतर तारे, ग्रह हेदेखील आपण पाहतो. या सर्व खगोलीय वस्तू आहेत.
साधारण एका आठवड्याच्या अंतराने दोन वेळा आकाशाचे निरीक्षण करा. हे निरीक्षण रात्रीच्या वेळी खालील मुद्द्यांच्या आधारे करा.
•खगोलीय वस्तूंचे रंग.
• त्यांचे आकार.त्यांच्या प्रकाशाची प्रखरता / लुकलुकणे.
• त्यांच्या स्थानातील बदल.
- दोन्ही निरीक्षणांच्या वेळी चंद्राच्या प्रकाशित भागाचे चित्र काढा आणि चंद्राचा प्रकाशित भाग रोज कसा बदलतो हे लक्षात घ्या.
शिक्षकांसाठी : आकाश निरीक्षण करण्यासाठी पालकांसह विदयार्थ्याना सभोवताली कमी प्रकाश, मोकळी जागा व निरभ्र आकाश असेल अशा ठिकाणी बोलवावे.
तारे : ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात. त्यांचा प्रकाश कमी-जास्त होताना दिसतो. तारे स्वयंप्रकाशित असतात.
सूर्य हा एक तारा आहे. इतर ताऱ्यांच्या मानाने तो आपल्यापासून जवळ आहे, म्हणून तो मोठा व तेजस्वी दिसतो. त्याच्या प्रखर प्रकाशामुळे आपल्याला दिवसा चांदण्या दिसत नाहीत.
ग्रह : ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना ग्रह म्हणतात. ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो. त्यांना ताऱ्यांकडून प्रकाश मिळतो. ग्रह स्वतःभोवती फिरता फिरता ताऱ्याभोवती फिरतात.
सूर्यमाला : आपली पृथ्वी हा एक ग्रह आहे. सूर्यापासून तिला प्रकाश मिळतो. ती सूर्याभोवती फिरते. त्याला पृथ्वीचे परिभ्रमण म्हणतात.
पृथ्वीशिवाय सूर्याभोवती परिभ्रमण करणारे आणखी सात ग्रह आहेत. बुध, शुक्र, मंगळ, गुरू, शनि, युरेनस, नेपच्यून अशी त्यांची नावे आहेत.
सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू
उपग्रह : काही खगोलीय वस्तू ग्रहांभोवती परिभ्रमण करतात, त्यांना उपग्रह म्हणतात. उपग्रहांनाही सूर्यापासूनच प्रकाश मिळतो. रात्री आकाशात आपल्याला चंद्र दिसतो. तो स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवतीही फिरतो, म्हणून त्याला पृथ्वीचा उपग्रह म्हणतात.
सूर्यमालेत बहुतेक ग्रहांना उपग्रह आहेत. ग्रह आपापल्या उपग्रहांसह सूर्याभोवती परिभ्रमण करतात.
बटुग्रह : सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या काही लहान आकाराच्या खगोलीय वस्तू आहेत. त्यांना बटुग्रह म्हणतात. यामध्ये प्रामुख्याने प्लुटो सारख्या खगोलीय वस्तूचा समावेश होतो. बटुग्रह सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात. बटुग्रहांना स्वतःची कक्षा असते.
लघुग्रह : मंगळ व गुरू या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलीय वस्तूंचा एक पट्टा आहे. या पट्ट्यातील खगोलीय वस्तूंना लघुग्रह म्हणतात. लघुग्रह देखील सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात.
सूर्याच्या तुलनेत सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू आकाराने खूपच लहान आहेत. चंद्र पृथ्वीच्या सगळ्यांत जवळ आहे, म्हणून तो सूर्यापेक्षा आकाराने खूप लहान असूनसुद्धा आपल्याला मोठा दिसतो.
खाली आपल्या सूर्यमालेची आकृती दिली आहे. त्यात मध्यभागी सूर्य आणि त्याभोवती परिभ्रमण करणाऱ्या खगोलीय वस्तू व त्यांच्या कक्षा दाखवल्या आहेत. सूर्यमालेत ग्रह, उपग्रह, लघुग्रह, बटुग्रह यांचा समावेश होतो.
गुरुत्वाकर्षण
खगोलीय वस्तूंमध्ये एकमेकांना स्वतःकडे खेचण्याची, म्हणजेच आकर्षित करण्याची शक्ती असते. या शक्तीला गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणतात. सूर्याची ग्रहांवर कार्य करणारी गुरुत्वाकर्षण शक्ती तसेच ग्रहांची सूर्यापासून दूर जाण्याची प्रवृत्ती यांच्या एकत्रित परिणामामुळे ग्रह सूर्याभोवती ठरावीक अंतरावरून, ठरावीक कक्षेत परिभ्रमण करत असतात. याच पद्धतीने उपग्रहही ग्रहांभोवती परिभ्रमण करतात.
पुढील गोष्टी कोणत्या दिशेने पडतात ?
(१) झाडावरून गळलेली पाने, फुले, फळे.
(२) डोंगरावरून सुटे झालेले खडक.
(३) आकाशातून येणारा पाऊस.
पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील सर्व वस्तू पृथ्वीवरच राहतात. एखादी वस्तू जोरात वर फेकली, की ती शेवटी जमिनीवरच येऊन पडते.
• नवीन शब्द शिका अवकाश ग्रह, तारे यांच्या दरम्यान असणारी रिकामी जागा म्हणजे अवकाश. यालाच अंतराळ असेही म्हणतात.
पृथ्वीपासून दूर आकाशात दिसणाऱ्या खगोलीय वस्तूंविषयी मानवाला नेहमीच कुतूहल राहिले आहे. त्यासंबंधी संशोधन करण्यासाठी तेथपर्यंत जायला हवे, असे त्याला वाटे; परंतु पृथ्वीवरून एखादी वस्तू अवकाशात पाठवण्यासाठी तिला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध शक्ती दयावी लागते. त्यासाठी वापरात येणाऱ्या तंत्रास ‘अवकाश प्रक्षेपण तंत्र’ म्हणतात.
दिवाळीच्या फटाक्यांमध्ये रॉकेट नावाचा फटाका असतो. त्यात विस्फोटक पदार्थ ठासून भरलेले असतात. त्यांचे झपाट्याने ज्वलन होऊन खूप ऊर्जा निर्माण होते. रॉकेटच्या रचनेमुळे फटाका ठरावीक दिशेत वेगाने ढकलला जातो.
अवकाशयानाचे अवकाशात प्रक्षेपण करण्यासाठी शक्तिशाली अग्निबाणांचा म्हणजेच रॉकेटचा उपयोग करतात. रॉकेटमध्ये प्रचंड प्रमाणावर इंधन जाळले जाते आणि त्यामुळे हजारो टन वजनाचे अवकाशयान अंतराळात नेले जाते. विसाव्या शतकात जगातील काही देशांनी अवकाश प्रक्षेपण तसेच अवकाशयानांसंबंधी तंत्रज्ञान विकसित केले. शेकडो अवकाशयाने अंतराळात पाठवली. आपला देश अवकाश प्रक्षेपण तंत्रज्ञानाच्या विकासासाठी प्रसिद्ध आहे. काही अवकाशयाने कायमची अंतराळातच राहतात. काही पृथ्वीवर परत येतात, तर काही दुसऱ्या ग्रहांवर किंवा उपग्रहांवर उतरवली जातात. काही मोहिमांमध्ये वैज्ञानिकसुद्धा अवकाशयानातून जातात त्यांना अंतराळवीर म्हणतात.
राकेश शर्मा : १९८४ साली अवकाशात जाणारे हे पहिले भारतीय अंतराळवीर होत. इस्रो व सोव्हिएत इंटरकॉसमॉस यांच्या संयुक्त अंतराळ मोहिमेसाठी अवकाश स्थानकात त्यांनी आठ दिवस वास्तव्य केले. अवकाशातून भारताकडे पाहताना त्यांनी भारतीयांना ‘सारे जहाँसे अच्छा, हिंदोस्ताँ हमारा’ हा संदेश पाठवला.