१ इतिहासाची साधने

आतापर्यंत आपण प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासला. यावर्षी आपणांस स्वातंत्र्योत्तर कालखंडातील भारताचा इतिहास अभ्यासायचा आहे. आधुनिक काळातील इतिहासाची साधने प्राचीन व मध्ययुगीन साधनांपेक्षा वेगळी आहेत. लिखित साधने, भौतिक साधने, मौखिक साधने, दृक्-श्राव्य माध्यमातील साधने यांच्या आधारे इतिहास अभ्यासता येतो. आधुनिक काळात आपणांस प्रादेशिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील साधनांची दखल घ्यावी लागते. या साधनांच्या मदतीने आपणांस इतिहासाचे लेखन करता येते.

लिखित साधने : खालील साधनांचा लिखित साधनांमध्ये समावेश होतो. आधुनिक कालखंडातील वृत्तपत्रे ही जशी लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत, तशी ती माहिती देणारी प्रमुख साधनेही आहेत. १९६१ ते २००० या कालखंडाचा विचार केल्यास सुरुवातीला छापील माध्यमांना विशेषतः वृत्तपत्रांना पर्याय नाही असेच दिसते. भारतात उदारीकरण सुरू झाले आणि इंटरनेटचा (आंतरजाल) सार्वत्रिक प्रसार सुरू झाल्यावर छापील माध्यमांना पर्याय उपलब्ध झाला. अर्थात असे झाले तरी छापील प्रसारमाध्यमांचे सामर्थ्य अजूनही कायम आहे.

वृत्तपत्रे : वृत्तपत्रांमधून आपणांस राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी, राजकारण, कला, क्रीडा, साहित्य, समाजकारण आणि सांस्कृतिक घडामोडी कळतात. मानवी जीवनाशी संबंधित असणाऱ्या गोष्टी वृत्तपत्रांत येतात. राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या वृत्तपत्रांनी आपल्या प्रादेशिक आवृत्या सुरू केलेल्या आहेत. त्यांच्या विविध विषयांची माहिती देणाऱ्या पुरवण्या असतात. छापील माध्यमांत चळवळीची मुखपत्रे, राजकीय पक्षांची दैनिके वा साप्ताहिके, मासिके, वार्षिके महत्त्वाची असतात.

काही वृत्तपत्रे वर्षाच्या शेवटी वर्षभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेणाऱ्या पुरवण्या काढतात. त्यातून आपणांस वर्षभरातील प्रमुख घटना समजण्यास मदत होते.

प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (PTI) : १९५३ नंतर भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी सर्व महत्त्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील, महत्त्वाच्या विषयांवरील लेख यांसाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हा महत्त्वाचा स्रोत आहे. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने वृत्तलेख, छायाचित्रे, आर्थिक, वैज्ञानिक विषयांवरील लेख वृत्तपत्रांना पुरवलेले आहेत. आता पीटीआयने ऑनलाइन सेवा सुरू केली आहे. १९९०च्या दशकात पीटीआयने टेलिप्रिंटर्सऐवजी ‘उपग्रह प्रसारण’ तंत्राद्वारे देशभर बातम्या पाठवायला सुरुवात केली. आधुनिक भारताच्या इतिहासलेखनासाठी हा मजकूर महत्त्वाचा आहे.

टपाल तिकिटे : टपाल तिकिटे स्वतः काहीही बोलत नसली तरी इतिहासकार त्यांना बोलके करतो. भारत स्वतंत्र झाल्यापासून ते आजतागायत टपाल तिकिटांमध्ये विविध बदल घडून आलेले आहेत. तिकिटांच्या आकारांतील वैविध्य, विषयांतील नावीन्य, रंगसंगती यांमुळे टपाल तिकिटे आपणांस बदलत्या काळाविषयी सांगत असतात.

टपाल खाते राजकीय नेत्यांवर, फुलांवर, प्राणी-पक्ष्यांवर, एखाद्या घटनेवर, एखाद्या घटनेच्या राैप्य, सुवर्ण, अमृतमहोत्सव, शतक, द्‌विशतक, त्रिशतकपूर्ती निमित्त तिकिट काढते. तो इतिहासाचा मौल्यवान ठेवा असतो.

 

भौतिक साधने : खाली दिलेल्या साधनांचा समावेश भौतिक साधनांत होतो.

 

नाणी : नाण्यांच्या माध्यमातून आणि बदलत गेलेल्या नोटांच्या छपाईमधून आपणांस इतिहास समजतो. नोटा छापण्याचे काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते. तिचे मुख्यालय मुंबई येथे आहे.

१९५० पासून ते आजतागायतची नाणी, त्यांत वापरलेले धातू, त्यांचे आकार, त्यांवरील विषयवैविध्य यांवरून आपणांस समकालीन भारतातील महत्त्वाचे प्रश्न समजतात. उदा., लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्याचा संदेश देणारी नाणी, शेती व शेतकऱ्यांचे महत्त्व सांगणारी नाणी.

संग्रहालये : भारतातील सर्वच राज्यांमध्ये त्या त्या राज्यांची वैशिष्ट्य सांगणारी वस्तुसंग्रहालये आहेत. त्यावरून आपणांस इतिहास समजण्यास मदत होते. (उदा., मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय) सरकारी संग्रहालयांखेरीज काही संग्राहक स्वतःची काही संग्रहालये उभारतात. ती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असतात. उदा., नाणी, नोटा, विविध आकारांतील दिवे, अडकित्ते, क्रिकेटचे साहित्य.

मौखिक साधने : या साधनांमध्ये लोककथा, लोकगीते, म्हणी, ओव्या इत्यादींचा समावेश होतो. उदा., संयुक्त महाराष्ट्र चळवळीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख यांच्या पोवाड्यांतून कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळत असे.

दृक्-श्राव्य साधने : दूरदर्शन, चित्रपट, आंतरजाल इत्यादी साधनांना ‘दृक्-श्राव्य साधने’ असे म्हणतात. विविध देशी व परदेशी वाहिन्या उदा., हिस्ट्री चॅनेल, डिस्कव्हरी.

फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) : भारत सरकारने पुणे येथे १९६० साली लोकशिक्षण देण्याच्या हेतूने फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना केली. राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा आणि संस्कृती या विविध क्षेत्रांतील महत्त्वाच्या घटनांवर आधारित वृत्तपट इंडियन न्यूज रिव्ह्यूया संस्थेने तयार केले. समाजाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती, देशासाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि महत्त्वाच्या स्थळांची माहिती देणारे अनुबोधपट (डॉक्युमेंटरीज) या विभागाने तयार केले आहेत. आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासण्यासाठी हे वृत्तपट व अनुबोधपट उपयोगी आहेत.

आतापर्यंत आपण आधुनिक भारताच्या इतिहासलेखनासाठी उपयुक्त असणारी काही साधने बघितली. एकविसाव्या शतकात काळ इतक्या वेगाने बदलत आहे की ही साधने सुद्धा अपुरी पडतील. त्यामुळे आता स्वाभाविकपणे नवी साधने पुढे येत आहेत. उदा., घरगुती टेलिफोन ते मोबाइल. या प्रवासात ‘पेजर’ नावाचे साधन संपर्कासाठी आले होते. ते जेवढ्या वेगात आले तेवढ्याच वेगात ते संपुष्टात आले. आंतरजालावर (इंटरनेट) उपलब्ध असलेल्या प्रचंड माहितीचाही उपयोग इतिहासाच्या अभ्यासासाठी केला जातो; परंतु माहितीची सत्यता, यथार्थता तपासून घ्यावी लागते.

इतिहासाचा सर्व साधनांच्या आधारे अभ्यास करणे सहजसाध्य झाले आहे. तसेच ही सर्व साधने आधुनिक काळातील असल्याने त्यांची उपलब्धता होणे शक्य झाले आहे. इतिहास हा जीवनातील सर्व अंगांना स्पर्श करणारा असल्याने साधनांच्या जतनाचेही प्रयत्न सर्व स्तरांवर होताना दिसतात. ते आपणही करूयात.