१. इतिहासाची साधन

प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या इतिहासाच्या साधनांचा अभ्यास आपण केलेला आहे. यावर्षी आपण आधुनिक भारताच्या इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करणार आहोत. इतिहासाच्या साधनांमध्ये भौतिक, लिखित आणि मौखिक साधनांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित दृक्, श्राव्य आणि दृक्-श्राव्य अशा साधनांचाही समावेश होतो.

भौतिक साधने : इतिहासाच्या भौतिक साधनांमध्येविविध वस्तू, वास्तू, नाणी, पुतळे आणि पदके इत्यादी साधनांचा समावेश करता येईल.

इमारती व वास्तू : आधुनिक भारताच्या इतिहासातील कालखंड हा युरोपीय विशेषतः ब्रिटिश सत्ताधीश आणि संस्थानिकांच्या राज्यकारभाराचा काळ मानला जातो. या काळात विविध इमारती, पूल, रस्ते, पाणपोया, कारंजे यांसारख्या वास्तू बांधल्या गेल्या. या इमारतींमध्येप्रशासकीय कचेऱ्या, अधिकाऱ्यांची तसेच नेत्यांची व क्रांतिकारकांची निवासस्थाने, संस्थानिकांचे राजवाडे, किल्ले, तुरुंग यांसारख्या इमारतींचा समावेश होतो. या वास्तूंपैकी अनेक वास्तू आज सुस्थितीत पाहावयास मिळतात. काही वास्तू या राष्ट्रीय स्मारके म्हणून घोषित केलेल्या आहेत, तर काही इमारतींमध्ये संग्रहालये उभारण्यात आली. उदा., अंदमान येथील सेल्युलर जेल.

 या वास्तूंना भेटी दिल्यानंतर आपणांस तत्कालीन इतिहास, स्थापत्यशास्त्र, वास्तूच्या स्वरूपावरून त्या वेळची आर्थिक संपन्नता याविषयी माहिती मिळते. जसे अंदमान येथील सेल्युलर जेलला भेट दिल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या क्रांतिकार्याविषयी, मुंबईतील मणिभवनला किंवा वर्धा येथील सेवाग्राम आश्रमास भेट दिल्यावर गांधीयुगाच्या इतिहासाविषयी माहिती मिळते.

माहीत आहे का तुम्हांला ?

वस्तुसंग्रहालये आणि इतिहास : इतिहासाच्या अभ्यासासाठी वस्तुसंग्रहालयांमधन ू विविध वस्तू, चित्रे, छायाचित्रे यांसारख्या विविध गोष्टींचे जतन केलेले असते. पुण्यातील आगाखान पॅलेस येथील गांधी स्मारक संग्रहालयात आपणांस महात्मा गांधींच्या वापरातील अनेक वस्तू, कागदपत्रे पहावयास मिळतात.

पुतळे आणि स्मारके : स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात अनेक व्यक्तींची स्मारके पुतळ्यांच्या रूपात उभारली गेली. हे पुतळेदेखील आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. विविध पुतळ्यांवरून आपणांस त्या काळातील राज्यकर्ते, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती यांच्याविषयी माहिती मिळते. पुतळ्याच्या दर्शनी पाटीवर संबंधित व्यक्तीचे पूर्ण नाव, जन्म-मृत्यूची नोंद, त्या व्यक्तीचे थोडक्यात कार्य, जीवनपट यांविषयीची माहिती मिळते. महात्मा जोतीराव फुले, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांप्रमाणे विविध घटनांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारलेली स्मारकेसुद्धा संबंधित घटना, घटनाकाळ, त्या घटनेशी निगडित व्यक्ती इत्यादी माहिती देतात. उदा., विविध ठिकाणची हुतात्मा स्मारके.

लिखित साधने : आधुनिक भारताच्या इतिहासाच्या लिखित साधनांमध्ये खालील बाबींचा समावेश होतो.

वृत्तपत्रे व नियतकालिके : वृत्तपत्रांमधून आपणांस समकालीन घटनांविषयी माहिती मिळते. त्याचबरोबर एखाद्या घटनेचे सखोल विश्लेषण, मान्यवरांची मतमतांतरे, अग्रलेख प्रसिद्ध होत असतात. आपल्याला त्या काळातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक घडामोडींची माहिती मिळते. स्वातंत्र्यपूर्व काळात ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, केसरी, दीनबंधु, अमृतबझार पत्रिका यांसारखी वृत्तपत्रे लोकजागृतीची महत्त्वपूर्ण साधने होती. या वृत्तपत्रांद्वारे आपल्याला ब्रिटिश सरकारची भारताविषयीची धोरणे, त्यांचे भारतावरील परिणाम यांविषयीचा अभ्यास करता येतो. ब्रिटिश काळात वृत्तपत्रे केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणूनही काम करत होती. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी ‘निबंधमाला’ य मासिकातून, लोकहितवादी उर्फ गोपाळ हरी देशमुख यांनी ‘प्रभाकर’ या साप्ताहिकातून लिहिलेली शतपत्रे यांतून विविध सामाजिक व सांस्कृतिक विषयांवर भाष्य केले.

नकाशे व आराखडे : नकाशा हे देखील इतिहासाचे महत्त्वाचे साधन मानले जाते. नकाशावरून आपणांस शहरांचे किंवा एखाद्या ठिकाणाचे बदलणारे स्वरूप अभ्यासता येते. ब्रिटिश काळात स्थापन झालेल्या सर्व्हे ऑफ इंडिया या स्वतंत्र विभागाने भारताचे, भारताच्या विविध प्रांतांचे, शहरांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून नकाशे तयार केलेले आहेत. नकाशांप्रमाणे वास्तुविशारदांनी तयार केलेले आराखडे हेदेखील इमारत स्थापत्यशास्त्राच्या तसेच एखाद्या भागाच्या विकासाचे टप्

अभ्यासण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात. उदा., मुंबई पोर्ट ट्रस्ट या विभागाकडे मुंबई बंदराचे मूळ आराखडे आहेत. हे बंदर पुढे विकसित करताना वास्तुविशारद आणि अभियंत्यांनी केलेल्या आराखड्यांवरून आपणांस मुंबईच्या नागरी विकासाची माहिती मिळू शकते.

मौखिक साधने : आधुनिक भारताच्या इतिहासाच्या मौखिक साधनांमध्ये खाली दिलेल्या साधनांचा समावेश होतो.

स्फूर्तिगीते : स्वातंत्र्यचळवळीच्या काळात अनेक स्फूर्तिगीतांची रचना केली गेली. त्यांपैकी अनेक गीते आज लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत. परंतु अनेक अप्रकाशित स्फूर्तिगीते स्वातंत्र्यसैनिकांना मुखोद्गत आहेत. या स्फूर्तिगीतांमधून आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळातील परिस्थिती, स्वातंत्र्य आंदोलनामागील प्रेणा यांविषयी माहिती मिळते.

पोवाडे : पोवाड्यांमधून ऐतिहासिक घटनेविषयी तसेच व्यक्तींच्या कार्याविषयी माहिती मिळते. ब्रिटिश अमदानीत १८५७ चा स्वातंत्र्यलढा, विविध क्रांतिकारकांनी केलेले पराक्रम यांवर आधारित पोवाडे रचले गेले. लोकांमध्ये प्रेणा, चैतन्य निर्माण करण्यासाठी या पोवाड्यांचा उपयोग करण्यात येत असे. स्वातंत्र्यलढ्याप्रमाणेच सत्यशोधक समाजाने पोवाड्यांच्या माध्यमातून केलेली शोषित वर्गाची जागृती, संयुक्त महाराष्ट्राचा लढा यांसारख्या घटनांवर आधारित पोवाड्यांची रचना केलेली आहे.

दृक्, श्राव्य आणि दृक्-श्राव्य साधने : आधुनिक काळात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे छायाचित्रण, ध्वनिमुद्रण, चित्रपट इत्यादी कलांचा विकास झाला. अर्थात त्यातून निर्माण झालेली छायाचित्रे, ध्वनिमुद्रिते (रेकॉरस), ्ड्‌चित्रपट यांचा वापर इतिहासाची साधने म्हणून करता येतो.

छायाचित्रे : छायाचित्रे ही आधुनिक भारताच्या इतिहासाची दृक्स्वरूपाची साधने आहेत. छायाचित्रण कलेचा शोध लागल्यानंतर विविध व्यक्ती, घटना त्याचप्रमाणे वस्तू व वास्तू यांची छायाचित्रे काढण्यात येऊ लागली. या छायाचित्रांमधून आपणांस व्यक्ती तसेच प्रसंग जसे होते किंवा घडले, त्याची दृश्य स्वरूपात माहिती मिळते. मध्ययुगीन काळातील व्यक्ती कशा दिसत होत्या किंवा घटना कशा घडल्या यांची चित्रे उपलब्ध आहेत; परंतु सदर चित्रे किती विश्वसनीय आहेत याबाबत प्रश्न उपस्थित केले जातात. त्या तुलनेत छायाचित्रे ही अधिक विश्वसनीय मानली जातात. व्यक्तींच्या छायाचित्रांवरून ती व्यक्ती कशी दिसत होती, तिचा पेहराव कसा होता याविषयी माहिती मिळते. प्रसंगाच्या छायाचित्रांमधून संबंधित प्रसंग नजरेसमोर उभा राहतो तर वास्तू किंवा वस्तूच्या छायाचित्रांमधून त्यांचे स्वरूप लक्षात येते.

ध्वनिमुद्रिते (रेकॉरस) ्ड् : छायाचित्रण कलेप्रमाणे ध्वनिमुद्रण तंत्राचा शोधही महत्त्वाचा आहे. ध्वनिमुद्रिते किंवा रेकॉरस ्ड्‌ही इतिहासाची श्राव्य स्वरूपाची साधने आहेत. आधुनिक काळात नेत्यांनी किंवा महत्त्वाच्या व्यक्तींनी केलेली भाषणे, गीते ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध आहेत. त्यांचा वापर इतिहासाची साधने म्हणून केला जाऊ शकतो. उदा., स्वतः रवींद्रनाथ टागोरांनी गायलेले ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत किंवा सुभाषचंद्र बोस यांचे भाषण यांचा वापर आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात श्राव्य साधने म्हणून करता येतो.

चित्रपट : चित्रपट हा आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार मानला जातो. विसाव्या शतकात चित्रपट तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली. दादासाहेब फाळकेंनी इ.स.१९१३ मध्ये भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह, चलेजाव आंदोलन यांसारख्या ऐतिहासिक प्रसंगांच्या ध्वनी चित्रफिती उपलब्ध आहेत. या चित्रफितींमुळे घडलेली घटना आपल्याला जशीच्या तशी पाहायला मिळते.

प्राचीन आणि मध्ययुगीन काळाच्या तुलनेत आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी विपुल प्रमाणात आणि विविध प्रकारची साधने उपलब्ध आहेत. या कालखंडातील भौतिक साधने बऱ्याच प्रमाणात सुस्थितीत आहेत. अभिलेखागारात जतन करून ठेवलेली अनेक लिखित साधनेही उपलब्ध आहेत. लिखित साधनांचा वापर करताना मात्र, ते विचार कोणत्या विचारांनी प्रेरित आहेत, एखाद्या घटनेकडे पाहण्याचा साधनकर्त्याचा दृष्टिकोन काय आहे, हे तपासून घ्यावे लागते. अशा साधनांचे जतन करणे आवश्यक आहे. ऐतिहासिक साधनांचे जतन केल्यामुळे इतिहासाचा हा समृद्ध वारसा आपल्याला भावी पिढ्यांकडे सोपवता येईल.