चला, थोडी उजळणी करूया!
यामागील इयत्तांच्या नागरिकशास्त्राच्या पाठ्यपुस्तकांमधून आपण स्थानिक शासनसंस्था, भारताचे संविधान आणि आपल्या देशातील राज्यपद्धती किंवा शासनाची रचना यांचा अभ्यास केला. या इयत्तेत आपण आता भारताचे जगाशी असणारे संबंध पाहणार आहोत. भूगोलाच्या अभ्यासातून तुम्हांला जगाची भौगोलिक रचना समजली असेल. इतिहासाच्या अभ्यासातून ऐतिहासिक काळातील जागतिक घडामोडी समजल्या असतील. राज्यशास्त्राच्या अभ्यासातून आपण आता भारताचे जगाशी असणारे संबंध व महत्त्वाच्या जागतिक समस्या समजून घेणार आहोत.
आपण सर्वजण वेगवेगळ्या कारणांसाठी, सोई[1]सुविधांसाठी समाजातील व्यक्ती, संस्था व संघटनांवर अवलंबून असतो. आपले सामाजिक जीवन परस्परावलंबी असते व त्यात परस्पर सहकार्य खूप महत्त्वाचे असते, हे आपण पाहिले. हे जसे व्यक्ती आणि समाजाबाबत आहे, तसेच ते विविध राष्ट्रांबाबतही आहे. भारताप्रमाणे जगात अनेक स्वतंत्र देश आहेत. त्यांच्यात सातत्याने काही देवाण-घेवाण चाललेली असते, व्यवहार होत असतात. ही स्वतंत्र राज्ये परस्परांशी करारही करत असतात. या सर्व स्वतंत्र व सार्वभौम देशांची मिळून एक व्यवस्था तयार होते. तिला आपण आंतरराष्ट्रीय व्यवस्था म्हणतो. या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेची काही वैशिष्ट्ये आपण जाणून घेऊ.
परस्परावलंबन : जगातले सर्व देश कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी परस्परांवर अवलंबून असतात. राष्ट्र कितीही मोठे, समृद्ध आणि विकसित असो, ते कधीच सर्व बाबतींत स्वयंपूर्ण असू शकत नाही. मोठ्या राष्ट्रांनाही अन्य त्यांच्यासारख्याच मोठ्या आणि छोट्या राष्ट्रांवर अवलंबून राहावे लागते. म्हणून परस्परावलंबन हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचम्हणजेच आजच्या जागतिक व्यवस्थेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
परराष्ट्र धोरणांच्याद्वारे आंतरराष्ट्रीय संबंध : प्रत्येक राष्ट्र आपल्या अंतर्गत व्यवहारांसाठी त्याचप्रमाणे अन्य राष्ट्रांशी कसे व्यवहार करावेत, याविषयी निश्चित धोरण ठरवते. अशा धोरणाला परराष्ट्र धोरण असे म्हणतात. भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आपण अधिक विस्ताराने पुढील प्रकरणात अभ्यास करणार आहोत.
पार्श्वभूमी : आपण आज ज्या जगात राहात आहाेत ते अनेक घटना, घडामोडींमधून आकारास आले आहे. म्हणूनच आपले आजचे जग समजून घेण्यासाठी आपल्याला थोडे इतिहासात जावे लागेल. मागच्या शतकात दोन महायुद्धे झाल्याचे आपणांस माहीत आहे. ही दोन महायुद्धे मागच्या शतकातील सर्वांत महत्त्वाच्या घटना होत्या. त्यांच्यामुळे जग बदलले. जगात नवीन प्रवाह आले, विचार आला. या महायुद्धांमुळे आणखी काय झाले हे समजून घेऊ.
पहिले महायुद्ध : १९१४ ते १९१८ या कालावधीत पहिले महायुद्ध झाले. युरोप खंडातील महत्त्वाचे देश यात सामील होते. एकूणच आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक व्यवस्थेत युरोपला या काळात फार महत्त्व होते. पहिल्या महायुद्धामुळे खूप मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली. युद्धात सहभागी झालेल्या राष्ट्रांना खूप आर्थिक नुकसान सोसावे लागले. युद्धात सहभागी नसलेल्यांनाही युद्धाची झळ लागली. जिंकलेल्या व हरलेल्या राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था कोसळल्या.
अशा प्रकारचे युद्ध पुन्हा होऊ नये, त्यासाठी काहीतरी उपाययोजना करायला हवी असे सर्व राष्ट्रांना वाटू लागले व त्यातून राष्ट्रसंघ या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना झाली. आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी चर्चा व वाटाघाटी करण्याचे ते एक महत्त्वाचे व्यासपीठ बनले. युद्ध टाळणे ही राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी मानण्यात आली.
पहिले महायुद्ध संपल्यानंतर युरोपमध्ये व युरोपबाहेरही अनेक महत्त्वाचे बदल घडून आले. उदा., युरोपमधील पूर्वीची साम्राज्ये कोसळली व त्यातून नवीन राष्ट्रे अस्तित्वात आली. युरोपमधील अनेक देशांच्या आफ्रिका आणि आशिया खंडात वसाहती हाेत्या. या वसाहतींमध् स्वातंत्र्यासाठी चळवळी सुरू झाल्या. युरोपीय राष्ट्रांच्या वर्चस्वाला या चळवळींनी मोठ्या प्रमाणावर आव्हान दिले.
पहिल्या महायुद्धानंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रसंघ निर्माण झाला. परंतु राष्ट्रसंघाला युद्ध थोपवण्यात यश आले नाही. जर्मनी, इटली, स्पेन इत्यादी देशांमध्ये तर हुकूमशाही राजवटी अस्तित्वात आल्या. या सर्व घडामोडींची परिणिती दुसऱ्या महायुद्धात झाली.
दुसरे महायुद्ध : १९३९ ते १९४५ या कालावधीत दुसरे महायुद्ध झाले. पहिल्या महायुद्धापेक्षा दुसरे महायुद्ध अधिक संहारक ठरले. पहिल्या महायुद्धाच्या तुलनेत ते अधिक व्यापक तर होतेच; परंतु या युद्धात अधिक प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला. युद्धात सहभागी असलेल राष्ट्रांवर पुन्हा एकदा आर्थिक संकट कोसळले.
दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेचा महत्त्वाचा सहभाग होता. अमेरिकेने अणुबॉम्बची निर्मिती केली होती. युद्ध संपवण्यासाठी जपानमधील हिरोशिमा व नागासाकी या दोन शहरांवर अनुक्रमे ६ ऑगस्ट व ९ ऑगस्ट १९४५ रोजी अमेरिकेने अणुबॉम्ब टाकले. युरोपमध्ये जर्मनीच्या पराभवानंतर व आशियामध्ये जपानच्या पराभवानंतर दुसरे महायुद्ध संपले. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात जागतिक पातळीवर ज्या अनेक घडामोडी झाल्या त्यांतील एक महत्त्वाची घटना म्हणजे शीतयुद्धाची सुरुवात होय. १९४५ ते १९९१ हा प्रदीर्घ काळ शीतयुद्धाने व्यापला होता. या काळातील काही बदलांचा आता आपण आढावा घेऊ.
शीतयुद्ध : दुसऱ्या महायुद्धात मित्र असणारे अमेरिका व सोव्हिएत रशिया युद्ध संपताच परस्परांचे स्पर्धक बनले. त्यांच्यातील सहकार्याची जागा स्पर्धेने घेतली. या स्पर्धेने जागतिक राजकारणाचा ४०-४५ वर्षांचा कालखंड व्यापला. या दोन्ही देशांमध्ये उघड युद्ध झाले नाही; परंतु युद्धाचा भडका कधीही उडू शकेल असा तणाव त्यांच्या संबंधांमध्ये होता. प्रत्यक्ष युद्ध नाही पण युद्धाला पूरक अशा तणावपूर्ण परिस्थितीचे वर्णन शीतयुद्ध या संज्ञेद्वारे केले जाते.
या काळात अमेरिका तर महासत्ता होतीच पण सोव्हिएत रशियानेही अण्वस्त्रांची निर्मिती करून व आपले लष्करी सामर्थ्य वाढवून महासत्ता बनण्याचा प्रयत्न केला. अमेरिका व सोव्हिएत रशिया या दोन महासत्तांमधील संघर्ष, सत्ता स्पर्धा, शस्त्रस्पर्धा, विचारप्रणालीतील भेद, परस्परांना शह-काटशह देण्याची वृत्ती या सर्व बाबींमुळेच शीतयुद्ध सुरू झाले होते.
शीतयुद्धाचे परिणाम
लष्करी संघटनांची निर्मिती : शीतयुद्ध काळात दोन्ही महासत्तांनी लष्करी संघटना निर्माण केल्या. त्यात सामील होणाऱ्या राष्ट्रांच्या संरक्षणाची जबाबदारी त्या त्या महासत्तांनी घेतली. नाटो (NATO : North Atlantic Treaty Organization) ही अमेरिकेच्या प्रभुत्वाखालील लष्करी संघटना होती, तर वॉर्सा करार ही सोव्हिएत रशियाच्या प्रभुत्वाखालील लष्करी संघटना होती.
जगाचे द्विध्रुवीकरण : शीतयुद्धकाळात जगातील बहुतेक देश दोन महासत्तांच्या गटात सामील झाले होते. राष्ट्रांची अशी दोन गटांत विभागणी होणे म्हणजे द्विध्रुवीकरण होय. शीतयुद्धाचा आवाका त्यामुळे वाढला. तणावाचे क्षेत्र व्यापक झाले.
शस्त्रास्त्र स्पर्धा : महासत्ता एकमेकांना शह[1]काटशह देण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर शस्त्रांची निर्मिती करू लागल्या. अधिकाधिक संहारक अस्त्रे बनवण्याच्या संदर्भात व त्यास लागणारे तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी स्पर्धा सुरू झाली. परंतु शस्त्रास्त्र स्पर्धेमुळे जागतिक शांतता धोक्यात येईल याची जाणीव दोन्ही महासत्तांना झाल्यामुळे शस्त्रास्त्र नियंत्रणाचे आणि निःशस्त्रीकरणाचे प्रयत्नही याच काळात झाले.
प्रादेशिक संघटनांची निर्मिती : महासत्तांच्या स्पर्धेत विकसनशील राष्ट्रांनी परस्परांना मदत करण्यासाठी आपापल्या प्रादेशिक पातळ्यांवर संघटना निर्माण केल्या. त्यांना आर्थिक विकास महत्त्वाचा वाटत होता. युरोपमधील देशांनी युरोपीय आर्थिक संघ निर्माण केला तर आग्नेय आशियाई देशांनी (सिंगापूर, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपिन्स, इत्यादी) असियान (ASEAN) संघटना निर्माण केली.
अलिप्ततावाद : शीतयुद्ध सुरू झाल्यानंतरच्या काळात एकीकडे जगाचे द्विध्रुवीकरण होत होते पण त्याचबरोबर काही देशांना महासत्तांच्या स्पर्धेत सामील व्हायचे नव्हते. अशा राष्ट्रांनी महासत्तांच्या स्पर्धेपासून अलिप्त राहण्याचे जे धोरण स्वीकारले, त्याला अलिप्ततावाद असे म्हणतात. अलिप्ततावाद ही शीतयुद्धकाळातील एक महत्त्वाची चळवळ होती.
अलिप्ततावादी चळवळ : दुसऱ्या महायुद्धानंतर आशिया व आफ्रिका खंडांतील नव्याने स्वतंत्र झालेल्या देशांनी अलिप्ततेच्या विचाराला पाठिंबा दिला व ती एक महत्त्वपूर्ण चळवळ झाली. भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू, युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष मार्शल टिटो, इजिप्तचे अध्यक्ष गमाल अब्दूल नासेर, इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष डॉ.अहमद सुकार्नो आणि घानाचे राष्ट्राध्यक्ष क्वामे नक्रुमा यांच्या नेतृत्वाखाली या चळवळीची सुरुवात सन १९६१ पासून झाली.
अलिप्ततावादी चळवळीचे मूल्यमापन : अलिप्ततावादी चळवळीने वसाहतवाद, साम्राज्यवाद आणि वंशवाद याला विरोध केला आहे. आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततामय मार्गाने सोडवण्यास या चळवळीने प्रोत्साहन दिले आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मार्गदर्शनाखाली भारताने या चळवळीचे नेतृत्व केले. नंतरच्या काळातही या चळवळीला भारताने सक्रीय पाठिंबा दिला आहे. शीतयुद्ध संपुष्टात आले तरीही या चळवळीचे महत्त्व कमी झाले नाही.
मानवतावाद, जागतिक शांतता व समानता या शाश्वत मूल्यांवर अलिप्ततावादी चळवळ आधारलेली आहे. या चळवळीने अल्पविकसित राष्ट्रांना एकत्र येण्यास प्रेरित केले आहे. आंतरराष्ट्रीय प्रश्न शांततामय मार्गाने सोडवण्यास या चळवळीने प्रोत्साहन दिले. निःशस्त्रीकरण, मानवी हक्कांचे संवर्धन, यांबाबत आग्रही भूमिका घेतानाच अलिप्ततावादी चळवळीने गरीब व अविकसित राष्ट्रांच्या समस्या ठामपणे मांडल्या. एका नव्या आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची (NIEO) मागणी या चळवळीने केली.
थोडक्यात सांगायचे झाल्यास, शीतयुद्ध संपले असले तरीही अलिप्ततावादी चळवळीचे महत्त्व कमी झाले नाही. या चळवळीने अल्पविकसित राष्ट्रांना एकत्र येण्यास प्रेरित केले. या चळवळीने आर्थिक आणि सामाजिक बदलांचे अनेक प्रवाह आंतरराष्ट्रीय राजकारणात आणले. या राष्ट्रांना आंतरराष्ट्रीय राजकारणात सन्मानाने उभे राहण्याचा एक नवा विश्वास दिला.
शीतयुद्धाची अखेर : १९४५ पासून जागतिक राजकारणात प्रभावी असलेले शीतयुद्ध नंतर संपुष्टात आले. शीतयुद्धाची अखेर ही एक मागील शतकाच्या शेवटी झालेली अत्यंत महत्त्वाची घटना होती. शीतयुद्धाची अखेर होण्यास अनेक बाबी कारणीभूत होत्या. उदा.,
(१) सोव्हिएत रशियाने आर्थिक खुलेपणाचे धोरण स्वीकारले. राज्याचे अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण शिथिल केले.
(२) सोव्हिएत रशियाचे तत्कालीन अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी ‘पेरेस्त्रोईका’ (पुनर्रचना) आणि ग्लासनोस्त (खुलेपणा) ही धोरणे अमलात आणली. या धोरणांमुळे माध्यमांवरील नियंत्रण कमी झाले. राजकीय व आर्थिक क्षेत्रांत महत्त्वपूर्ण बदल झाले. म्हणजेच या क्षेत्रात पुनर्रचना करण्यात आली. त्यामुळे लोकशाहीकरणाला चालना मिळाली.
(३) पूर्व युरोपमधील सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखालील देशांनी भांडवलशाही व लोकशाही मार्गांचा स्वीकार केल्यामुळे तेथील राजवटी बदलल्या.
(४) सोव्हिएत रशियाचे विघटन झाले व त्यातून अनेक नवी स्वतंत्र राष्ट्रे निर्माण झाली. रशिया हा सोव्हिएत रशियामधील सर्वांत मोठा देश होत
शीतयुद्धानंतरचे जग
सोव्हिएत रशियाच्या विघटनाबरोबर शीतयुद्ध संपले. एकेकाळच्या या महासत्तेचे विघटन झाल्याने जागतिक राजकारणात महत्त्वाचे बदल घडून आले. उदा., जागतिक राजकारणात अमेरिका ही एकमेव महासत्ता उरली. राष्ट्राराष्ट्रांमधील व्यापार व आर्थिक संबंध वाढण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले. भांडवल, श्रम, बाजारपेठ, माहिती यांचा जगभर प्रसार झाला. लोकांमधील विचार-कल्पनांचाही मुक्त संचार होऊ लागला. सर्वच राष्ट्रांनी व्यापारी संबंधांना प्राधान्य देण्याचे ठरवल्याने अन्य राष्ट्रांना ‘मदत’ करण्याची कल्पना मागे पडली. त्याएेवजी आर्थिक संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न होऊ लागले. म्हणजेच पूर्वी आपल्या विरोधातील एखाद्या देशाला ‘शत्रुराष्ट्र’ म्हणून संबोधण्याऐवजी ‘स्पर्धक राष्ट्र’ ही संकल्पना पुढे आली. संयुक्त राष्ट्रे या संघटनेच्या जबाबदारीत वाढ झाली. जागतिक शांतता व सुरक्षितता टिकवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांना अधिक ठोस प्रयत्न करावे लागत आहेत. पर्यावरण रक्षण, मानवी हक्कांची जोपासना, स्त्री-पुरुष समानता, नैसर्गिक आपत्तींचा सामना या बाबींना जागतिक स्वरूप प्राप्त झाले.
जागतिकीकरण म्हणजे काय ? :
शीतयुद्धानंतर व्यापार व आर्थिक संबंधांमध्ये खुलेपणा आला. यापूर्वीच म्हटल्याप्रमाणे भांडवल, श्रम, बाजारपेठा आणि माहितीचे जगभर संचरण होऊ लागले. जगभरच्या लोकांमध्येविचार, कल्पनांची देवाणघेवाण वाढली. माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीने जगातल्या घटना व घडामोडी सर्वत्र कळू लागल्या. देशांच्या सीमारेषांना पूर्वीइतके महत्त्व राहिले नाही. या सर्व प्रक्रियांना जागतिकीकरण असे म्हणतात. जागतिकीकरणाचे जसे काही फायदे झाले तसेच काही तोटेही झाले आहेत. उदा., विविध राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था परस्परांशी जोडल्या गेल्याने व्यापार वाढला, आर्थिक एकत्रीकरण वाढले, बाजारपेठांमध्ये मुबलकता आली; परंतु त्याचबरोबर गरीब व श्रीमंत राष्ट्रांमधील दरी कमी झाली नाही.
या प्रकरणात आपण १९४५ पासूनच्या जागतिक घडामोडींचा अभ्यास केला. शीतयुद्धकालीन जग, त्यातील शस्त्रस्पर्धा व निःशस्त्रीकरणाचे प्रयत्न समजून घेतले. जागतिकीकरणाचा अर्थही अभ्यासला. पुढील प्रकरणात आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाचा अभ्यास करणार आहोत.