१.१ आपले समाजजीवन

१.१ माणसाला समाजाची गरज का वाटली ?
१.२ माणसातील समाजशीलता
१.३ आपला विकास
१.४ समाज म्हणजे काय ?

इयत्ता पाचवीच्या पाठ्यपुस्तकात माणसाची उत्क्रांती कशी झाली हे तुम्ही शिकलात. आजचे आपले सामाजिक जीवन हजारो वर्षांच्या उत्क्रांतीतून आकारास आले आहे. माणसाने भटक्या अवस्थेकडून स्थिर समाजजीवनाकडे वाटचाल केली आहे.

१.१ माणसाला समाजाची गरज का वाटली ?

 व्यक्तीच्या तसेच समाजाच्या विकासासाठी स्थिर व सुरक्षित समूहजीवन आवश्यक आहे. भटक्या अवस्थेतील माणसाला हे स्थैर्य व सुरक्षितता नव्हती. समूहात राहिल्याने सुरक्षितता मिळते याची जाणीव झाल्याने माणूस संघटितपणे जगू लागला. समाजाच्या निर्मितीमागील ही एक मुख्य प्रेरणा आहे. समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटली. त्यातून रूढी, परंपरा, नीतिमूल्ये, नियम आणि कायदे अस्तित्वात आले. त्यामुळे माणसाचे समाजजीवन अधिक संघटित व स्थिर झाले.

१.२ माणसातील समाजशीलता

माणूस स्वभावतः समाजशील आहे. आपणा सर्वांना एकमेकांसह, सर्वांच्या सोबतीने आणि माणसांत राहायला आवडते. सर्वांसमवेत राहणे ही जशी आनंदाची बाब आहे, तशीच ती आपली गरजही आहे.

आपल्या अनेक गरजा असतात. अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या शारीरिक गरजा आहेत. त्या पूरझाल्या की माणसाला स्थैर्य मिळते, परंतु माणसाला तेवढेच पुरेसे नसते. आपल्या काही भावनिक आणि मानसिक गरजाही असतात. उदाहरणार्थ, सुरक्षित वाटणे ही आपली भावनिक गरज आहे. आपल्याला आनंद झाला तर तो कोणाला तरी सांगावासा वाटतो. दुःख झाले तर आपल्यासोबत कोणीतरी असावे असे वाटते. आपल्या कुटुंबातील लोक, नातेवाईक आणि मित्र[1]मैैत्रिणी यांचा सहवास आपल्याला आवडतो. यातून आपली समाजशीलता दिसते.

अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या आपल्या मूलभूत गरजा आहेत हे तुम्हांला माहीत आहे. समाजातील व्यक्तींचे श्रम आणि त्यांच्या कौशल्यांमुळे वस्तू तयार होतात. शिक्षण आणि आरोग्यविषयक सेवा-सुविधांमुळे आपण सन्मानाने जगू शकतो. या सर्व बाबी आपल्याला समाजात उपलब्ध होतात. वेगवेगळे उद्योग व व्यवसायांतून आपल्या गरजा पूर्ण होतात. उदाहरणार्थ, आपल्याला अभ्यासासाठी पुस्तक लागते. पुस्तकासाठी कागद लागतो. त्यामुळे कागदनिर्मिती, छपाई आणि पुस्तक बांधणी इत्यादी व्यवसाय, उद्योगांचा विकास होतो. अनेक व्यक्ती त्यांत वाटा उचलतात. समाजातील अनेकविध व्यवसायांमुळे आपल्या गरजा भागतात. यांतूनच आपल्यातील क्षमता-कौशल्यांचा विकास होतो. समाजात मूलभूत गरजांची पूर्तता होते. सुरक्षितता, कौतुक, प्रशंसा, आधार इत्यादींसाठी आपण सर्व एकमेकांवर अवलंबून असतो. म्हणून आपले समाजजीवन परस्परावलंबी असते.

१.३ आपला विकास

प्रत्येक माणसात निसर्गत:च काही गुण आणि क्षमता असतात. त्या सुप्त अवस्थेत असतात. त्यांचा विकास समाजामुळे होतो. परस्परांशी बोलण्यासाठी आपण भाषेचा आधार घेतो, पण ती आपल्याला जन्मतः अवगत नसते. आपण ती हळूहळू शिकतो. घरात जी भाषा बोलली जाते ती भाषा आपण सुरुवातीला शिकतो. आपल्या शेजारी वेगळी भाषा बोलणारे लोक असतील तर त्याही भाषेचा आपल्याला परिचय होतो. शाळेत निरनिराळ्या भाषा शिकण्याची संधी मिळते. आपल्याजवळ स्वतंत्र विचार करण्याचीही क्षमता असते. उदाहरणार्थ, निबंधाचा विषय वर्गातल्या सर्व विद्यार्थ्यांना सारखाच दिलेला असला तरीही कोणतेही दोन निबंध सारखे का नसतात? कारण त्यांतील विचार वेगळा असतो. आपल्या भावनिक क्षमता आणि विचारशक्ती समाजामुळे वाढीस लागतात. विचार मांडण्याची आणि भावना व्यक्त करण्याची संधी समाजामुळे मिळते. माणसातील कलागुणांचा विकासही समाजामुळे होतो. गायक, चित्रकार, शास्त्रज्ञ, साहसवीर, समाजकार्य करणाऱ्या अनेक व्यक्ती समाजाच्या प्रोत्साहनामुळे व पाठिंब्यामुळे आपल्यातील गुणांचा विकास करतात. त्यांना मिळणारे प्रोत्साहनही तितकेच महत्त्वाचे असते.

१.४ समाज म्हणजे काय ?

समाजात सर्व स्त्री-पुरुष, प्रौढ, वृद्ध, लहान मुले-मुली यांचा समावेश असतो. आपली कुटुंबे समाजाचा घटक असतात. समाजात विविध गट, संस्था, संघटना असतात. लोकांमधील परस्परसंबंध, परस्पर व्यवहार, त्यांच्यातील देवाणघेवाण यांचाही समावेश समाजात होतो. माणसांच्या झुंडी किंवा गर्दी म्हणजे समाज नाही तर काही समान उद्‌दिष्टे साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्यांचा समाज बनतो.

अन्न, वस्त्र, निवारा, सुरक्षितता यांसारख्या गरजा भागवण्यासाठी समाजाला एक कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागते. अशा व्यवस्थेशिवाय समाजाचे दैनंदिन व्यवहार होऊ शकत नाहीत. समाजाचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी व्यवस्था आवश्यक आहे. उदाहरणार्थ, अन्नाची गरज पुरवण्यासाठी शेती करणे आवश्यक आहे. शेतीशी संबंधित सर्व कार्ये पार पाडण्यासाठी विविध संस्था निर्माण कराव्या लागतात. शेतीची अवजारे तयार करण्यासाठी कारखाने, शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी बँका, उत्पादित मालासाठी बाजारपेठा अशी मोठी व्यवस्था निर्माण करावी लागते.

अशा अनेक व्यवस्थांमधून समाज स्थिर होतो. पुढील पाठात आपण भारतीय समाजातील विविधतेची ओळख करून घेऊ.