१.२ समाजातील विविधता

२.१ विविधता हीच आपली ताकद
२.२ धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व
२.३ आपल्या जडणघडणीत समाजाचा सहभाग
२.४ समाजाचे नियमन

भारतीय समाजात अनेकविध भाषा, धर्म, संस्कृती, चालीरीती, परंपरा आहेत. ही विविधता आपले सांस्कृतिक वैभव आहे. मराठी, कन्नड, तेलुगु, बंगाली, हिंदी, गुजराती, उर्दू अशा अनेक भाषा बोलणारे लोक आपल्या आजूबाजूला असतात. ते वेगवेगळ्या पद्धतींनी सणवार, उत्सव साजरे करतात. त्यांच्या पूजा-उपासनेच्या चालीरीती वेगवेगळ्या आहेत. विविध ऐतिहासिक वारसा असलेले प्रदेश आपल्या देशात आहेत. त्यांच्यात विविधतेची देवाणघेवाण आहे. आपल्या देशातील हे विविध समूह वर्षानुवर्षे एकत्र राहत असल्यामुळे त्यांच्यात एकतेची भावना निर्माण झाली आहे. भारतीय समाजातील एकता यातून दिसून येते.

२.१ विविधता हीच आपली ताकद

विविध समूहांच्या बरोबर राहणे म्हणजे सहअस्तित्व अनुभवणे होय. अशा सहअस्तित्वामुळे आपल्यातील सामंजस्य वाढते. त्यामुळे परस्परांच्या चालीरीतींशी व जीवनपद्धतींशी आपली ओळख होते. आपण एकमेकांच्या जीवनपद्धतींचा आदर करायला शिकतो. इतरांच्या काही प्रथा-परंपरा आत्मसात करतो. यातून समाजात एकोपा वाढतो. सामाजिक एकोप्यामुळे आपण अनेक नैसर्गिक व सामाजिक आपत्तींचा सामना करू शकतो.

२.२ धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व

 भारतीय समाजात विविध धर्मांचे लोक राहतात. त्यांच्यातील परस्पर सामंजस्य वाढीस लागावे व सर्वांना आपापल्या श्रद्धेनुसार उपासना करण्याचे स्वातंत्र असावे यासाठी आपल्या संविधानात महत्त्वाच्या तरतुदी केलेल्या आहेत.

भारत हे जगातील एक महत्त्वाचे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. आपल्या देशात भाषिक आणि धार्मिक विविधता मोठ्या प्रमाणावर आहे. ही विविधता निकोपपणे जपण्यासाठी आपण धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व स्वीकारले आहे. त्यानुसार,

  • आपल्या देशात राज्यसंस्थेने कोणत्याही एका धर्माचा पुरस्कार केलेला नाही.
    ● प्रत्येक व्यक्तीला आपापल्या किंवा आपल्या पसंतीच्या धर्माची उपासना करण्याचे स्वातंत्र्य आहे.
    ● धर्माच्या आधारे व्यक्ती-व्यक्तींमध्ये भेदभाव करता येत नाही. सर्व धर्मांच्या लोकांना राज्यसंस्थेकडून समान वागणूक दिली जाते.
    ● शिक्षण, रोजगार, सरकारी नोकरीच्या संधी सर्वांना उपलब्ध करून दिल्या जातात. त्यात धर्माच्या आधारे भेदभाव केला जात नाही.
    ● धार्मिक व भाषिक अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यासाठी संविधानात विशेष तरतुदी केल्या आहेत. अल्पसंख्याकांना आपापली भाषिक आणि सांस्कृतिक ओळख जोपासण्याचे स्वातंत्र्य आहे. शिक्षणाद्वारे आपापल्या समाजाचा विकास करण्याचे स्वातंत्र्यही त्यांना आहे.
    ● धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वामुळे भारतीय समाजात धार्मिक सामंजस्य टिकून राहिले आहे.

२.३ आपल्या जडणघडणीत समाजाचा सहभाग

समाजात राहून आपण काय शिकतो? कोणते गुण आत्मसात करतो ? आपल्या जडणघडणीत समाज कशी मदत करतो ते आपण समजावून घेऊ.

सहकार्य : कोणताही समाज व्यक्ती आणि समूहातील परस्पर सहकार्यावर आधारलेला असतो.

व्यक्ती-व्यक्तींमध्ये सहकार्य असल्याशिवाय समाज अस्तित्वात राहू शकत नाही. परस्परांच्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी परस्परांना मदत करणे व देवाणघेवाण करणे म्हणजे सहकार्य होय. आपल्या घरातील व्यक्तींमध्ये अशी वृत्ती नसेल तर जसे आपले कुटुंब टिकू शकत नाही तसेच समाजाचे आहे. सहकार्याअभावी आपला विकास रखडेल, दैनंदिन जीवनही सुरळीत चालणार नाही. सहकार्यामुळे समाजातील परस्परावलंबन अधिक निकोप होते, समाजातील सर्वांना सामावून घेता येते. सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याची ती एक प्रक्रिया आहे.

सहिष्णुता आणि सामंजस्य : समाजात जसे सहकार्य असते तसेच कधी कधी मतभेद, वाद आणि संघर्षही निर्माण होतात. व्यक्ती-व्यक्तींमधील मते, विचार आणि दृष्टिकोन जुळले नाहीत तर वाद, संघर्ष निर्माण होऊ शकतात. एकमेकांविषयी असणारे पूर्वग्रह किंवा गैरसमज हेही संघर्षाचे कारण असू शकते. दीर्घकाळ संघर्ष चालू ठेवणे हे कोणाच्याच हिताचे नसते. तडजोड आणि समझोता यांच्याद्वारे व्यक्ती संघर्षाचे निराकरण करायला शिकतात. एकमेकांना समजून घेतले आणि सहिष्णुवृत्ती दाखवली तर संघर्ष मिटू शकतात.

सामंजस्यातून नकळतपणे आपण अनेक नव्गोष्टी शिकतो. नवा विचार आत्मसात करतो. आपले सामाजिक जीवन अधिकाधिक समृद्ध बनायला त्याची मदत होते. आपल्यातील सहिष्णुता वाढते. सामाजिक स्वास्थ्य आणि शांतता टिकवण्यासाठी ही एक सोपी पद्धत शिकण्याची संधी समाजामुळे मिळते.

विविध भूमिका पार पाडण्याची संधी :

समाजात आपल्या वाट्याला अनेक भूमिका येतात. एकच व्यक्ती अनेक भूमिका पार पाडत असते. प्रत्येक भूमिकेच्या काही जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये ठरलेली असतात. कुटुंबात आणि बाहेर आपण या भूमिकांमुळे अनेकांशी जोडले जातो. आपल्या भूमिकांमध्ये अनेकदा बदल होत असतात.

२.४ समाजाचे नियमन

समाजाचे व्यवहार सुरळीतपणे चालावेत म्हणून काही नियमांची आवश्यकता असते. पूर्वी समाजाचे नियमन बहुतांशी रूढी-परंपरा यांच्याद्वारे होत असे. परंतु आधुनिक समाजाचे नियमन रूढी-परंपरेबरोबरच कायद्यानेही करावे लागते. रूढी-परंपरा, संकेतइत्यादींपेक्षा कायद्याचे स्वरूप वेगळे असते. या सर्व बाबींच्या आधारे आपल्या समाजाचे नियमन अनेक संस्था व संघटना करतात. स्थानिक पातळीवर असणाऱ्या शासन संस्थाही समाजनियमनाच्या कार्यात महत्त्वाची भूमिका पार पाडतात.