१.४ मूलभूत हक्क भाग-१

वर्तमानपत्रात अथवा अन्यत्र तुम्ही अशा स्वरूपाचे फलक पाहिले असतील. एखादया मोर्च्यात कशाची तरी मागणी केलेली असते व तो त्यांचा हक्क असल्याचे सांगितले जाते.

आपल्याला जन्मतःच हक्क प्राप्त होतात. जन्मलेल्या प्रत्येक बालकाला जगण्याचा हक्क असतो. त्याला उत्तम आरोग्य मिळावे म्हणून संपूर्ण समाज आणि शासन प्रयत्न करते. अन्याय, शोषण, भेदभाव, वंचितता यांपासून जर सर्व व्यक्तींना संरक्षण मिळाले तरच व्यक्ती आपल्यातील गुणांचा आणि कौशल्यांचा विकास करू शकतील. स्वतःच्या आणि संपूर्ण लोकसमूहाच्या विकासासाठी पोषक परिस्थितीची मागणी करणे, त्यासाठी आग्रह धरणे म्हणजे हक्क मागणे होय.

संविधानाने अशी पोषक परिस्थिती निर्माण करण्यासाठी भारतातील सर्व नागरिकांना समान हक्क

दिले आहेत. हे हक्क मूलभूत आहेत. ते संविधानात नमूद केलेले असल्याने त्यांना कायदयाचा दर्जा आहे. या हक्कांचे पालन सर्वांना बंधनकारक आहे.

कल्पना करा आणि लिहा.

कुत्रा, मांजर, गाय, म्हैस, शेळी यांसारखे प्राणी तुम्ही पाळत असाल. तुम्ही त्यांची खूप काळजी घेता, त्यांच्यावर खूप प्रेम करता.

या प्राण्यांना बोलता आले असते, तर त्यांनी तुमच्याकडून कोणते हक्क मागितले असते ?

संविधानात नमूद केलेले आपले हक्क : संविधानात भारतीय नागरिकांच्या हक्कांची नोंद आहे. हे हक्क कोणते आहेत ते पाहूया.

समानतेचा हक्क : समानतेच्या हक्कानुसार राज्याला भारतीय नागरिकांमध्ये उच्च-नीच, श्रेष्ठ कनिष्ठ, स्त्री-पुरुष असा भेद करून कोणालाच वेगळी वागणूक देता येत नाही. कायदा सर्वांसाठी सारखाच असतो. अनेक कायदे असे असतात, की जे आपल्याला संरक्षण देतात. उदा., विनाचौकशी अटक करण्यापासून आपल्याला संरक्षण असते. असे संरक्षण देतानाही शासनाला भेदभाव करता येत नाही.

समानतेच्या हक्कात आणखी कोणत्या बाबी येतात ? सरकारी नोकऱ्या देताना शासनाला जात, धर्म, लिंग, जन्मस्थान यांवर भेदभाव करता येत नाही. आपल्या देशातील अस्पृश्यता पाळण्याच्या अमानवी प्रथेला कायदयाने नष्ट करण्यात आले आहे. अस्पृश्यतेचे पालन हा दखलपात्र गुन्हा मानला जातो. भारतीय समाजात समता निर्माण करण्यासाठी या प्रथेचे निर्मूलन केले आहे. लोकांमध्ये श्रेष्ठ वकनिष्ठ असा भेद दाखवणाऱ्या पदव्या देण्यास संविधानाने बंदी घातली आहे. उदा., राजा, महाराजा, रावबहाद्दूर इत्यादी.

स्वातंत्र्याचा हक्क : संविधानाने दिलेला हा एक अत्यंत महत्त्वाचा हक्क असून त्यात व्यक्तीच्या दृष्टीने आवश्यक अशा सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याची हमी दिली आहे.

नागरिक म्हणून आपल्याला

* भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे.

* शांततापूर्वक एकत्र येण्याचे आणि सभा घेण्याचे स्वातंत्र्य आहे.

* संस्था व संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य आहे.

* भारताच्या प्रदेशात कोठेही फिरण्याचे स्वातंत्र्य आहे.

* भारताच्या प्रदेशात कोठेही वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य आहे.

* आपल्या आवडीचा उद्योग, व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य आहे.

संविधानातील स्वातंत्र्याच्या हक्काने केवळ हिंडण्या-फिरण्याचे किंवा बोलण्याचेच नाही तर आपण सुरक्षित राहावे यासाठी आपल्याला संरक्षण उपलब्ध करून दिले आहे. कायदयाचे हे संरक्षण सर्वांना समान रीतीने दिलेले आहे. ते कोणालाही नाकारले जात नाही. उदा., आपणा सर्वांना जगण्याचा हक्क आहे. वरकरणी हा हक्क सोपा वाटतो परंतु त्यात खूप अर्थ दडलेला आहे. जगण्याची हमी मिळणे, जगण्यासाठी पोषक परिस्थिती असणे असा याचा अर्थ आहे. कोणत्याही व्यक्तीचे जीवित कोणालाही हिरावून घेता येत नाही. कारणाशिवाय

कोणत्याही व्यक्तीला अटक करून स्थानबद्ध करता येत नाही. स्वातंत्र्याच्या हक्कात आता शिक्षणाच्या हक्काचाही समावेश करण्यात आला आहे. ६ ते १४ या वयोगटातील सर्व मुलामुलींना शिक्षण घेण्याचा मूलभूत हक्क आहे. या हक्कामुळे शिक्षणापासून कोणीही वंचित राहणार नाही.

शोषणाविरुद्धचा हक्क : शोषण थांबण्यासाठी शोषणाला बळी न पडण्याचा, आपले शोषण किंवा पिळवणूक होऊ न देण्याचा हक्क म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्क होय.

संविधानाने एकीकडे शोषणाविरुद्धच्या हक्कातून पिळवणुकीच्या सर्व प्रकारांवर बंदी घातली आहे, तर त्याच वेळी दुसरीकडे बालकांचे शोषण थांबवण्यासाठी विशेष तरतूद केली आहे. त्यानुसार १४ वर्षांखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मज्जाव केला आहे. कारखाने, खाणी यांसारख्या ठिकाणी बालकांची नेमणूक करून त्यांच्याकडून काम करून घेता येत नाही.

वेठबिगारी किंवा सक्तीने एखाद्या व्यक्तीकडून तिची इच्छा नसताना काम करून घेणे, काही व्यक्तींना एखाद्या गुलामासारखे वागवणे, त्यांना कामाचा योग्य मोबदला न देणे, त्यांच्याकडून अतिशय कष्ट करून घेणे, त्यांची उपासमार करणे किंवा त्यांच्यावर जुलूम-जबरदस्ती करणे हे शोषणाचे प्रकार आहेत. शोषण साधारणतः महिला, बालके, दुर्बल समाजघटक आणि सत्ताहीन लोकांचे होते. कोणत्याही प्रकारचे शोषण असो, त्याविरुद्ध उभे राहण्याचा हा हक्‍क आहे.

भारताच्या संविधानातील समानतेच्या, स्वातंत्र्याच्या आणि शोषणाविरुद्धच्या हक्कांचा आपण येथे अभ्यास केला. पुढील पाठात आपण आणखी काही मूलभूत हक्कांचा अभ्यास करणार आहोत.