१.५ जिल्हा प्रशासन

५.१ जिल्हाधिकारी
५.२ जिल्हा पोलीस प्रमुख
५.३ जिल्हा न्यायालय

५.१ जिल्हाधिकारी

जिल्हा प्रशासनाचा प्रमुख जिल्हाधिकारी असतो. त्याची नेमणूक राज्यशासन करते. जिल्हाधिकाऱ्याला शेतसारा गोळा करण्यापासून ते जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यापर्यंत अनेक कामे करावी लागतात. खालील तक्त्याच्या आधारे ती आपण समजावून घेऊ.

तहसीलदार ः प्रत्येक तालुक्यासाठी एक तहसीलदार असतो. तहसीलदार तालुका दंडाधिकारी या नात्याने तंट्यामध्ये निवाडाही करतो. तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तहसीलदारावर असते.

५.२ जिल्हा पोलीस प्रमुख

महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक पोलीस अधीक्षक असतो. त्या जिल्ह्याचा तो प्रमुख पोलीस अधिकारी असतो. जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा पोलीसप्रमुख जिल्हाधिकाऱ्यांना मदत करतात. शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस आयुक्तांवर असते.

५.३ जिल्हा न्यायालय

आपल्या अधिकार क्षेत्रातील तंटे सोडवणे, तंट्यात न्यायनिवाडा करणे आणि संघर्षाचे वेळीच निराकरण करणे ही कामे जिल्हा पातळीवरील न्यायालयाला करावी लागतात. भारताच्या संविधानाने स्वतंत्र न्यायव्यवस्थेची निर्मिती केली आहे. न्यायव्यवस्थेच्या िशरोभागी भारताचे सर्वोच्च न्यायालय असते. त्याखालोखाल उच्च न्यायालये असतात. त्याखालोखाल कनिष्ठ न्यायालये असतात. त्यात जिल्हा न्यायालय, तालुका न्यायालय आणि महसूल न्यायालय यांचा समावेश होतो.

जिल्हा पातळीवर असणाऱ्या न्यायालयाला ‘जिल्हा न्यायालय’ असे म्हणतात. त्यात एक मुख्य जिल्हा न्यायाधीश व अन्य काही न्यायाधीश असतात. जिल्ह्यातील वेगवेगळ्या खटल्यांची सुनावणी व नंतर अंतिम निकाल देण्याचे काम जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश करतात. तालुका न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयात अपील करता येते.

आपत्ती व्यवस्थापन

आपल्याला वेगवेगळ्या आपत्तींचा सामना करावा लागतो. पूर, आग, चक्रीवादळ, ढगफुटी, गारपीट, भूकंप, भूस्खलन यांसारख्या नैसर्गिक आपत्तींबरोबरच दंगली, धरण फुटणे, बाँबस्फोट, साथीचे आजार यांसारख्या आपत्तींना सामोरे जावे लागते. अशा प्रकारच्या आपत्तींमुळे लोकांचे फार मोठ्या प्रमाणावर विस्थापन तसेच जीवित व वित्तहानी होते. त्यामुळे पुनर्वसनाचे प्रश्नही महत्त्वाचे ठरतात. आपत्तींचा सुव्यवस्थित व शास्त्रीय पद्धतीने सामना करण्याच्या पद्धतीला ‘आपत्ती व्यवस्थापन’ असे म्हणतात. आपत्ती व्यवस्थापनात संपूर्णजिल्हा प्रशासन यंत्रणा गुंतलेली असते. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे अनेक आपत्तींची आता पूर्वसूचना मिळू शकते. उदाहरणार्थ, पुराची, वादळाची पूर्वसूचना देणारी प्रणाली विकसित झाली आहे. या प्रणालीमुळे धोक्याची सूचना मिळते.