१.६ मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये.

मागील पाठात संविधानाने दिलेल्या हक्कांचा आपण अभ्यास केला. त्यातून भारतीय नागरिकांना कोणते हक्क असतात हे समजले. एवढेच नव्हे तर हक्कांना न्यायालयाचे संरक्षण असते हेही आपण शिकलो. मूलभूत हक्कांचे आपल्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनातील महत्त्वही लक्षात आले. या पार्श्वभूमीवर आपण मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे काय हे समजून घेऊ.

मूलभूत हक्क शासनाच्या अधिकारावर निबंध घालतात. खालील सूची वाचा म्हणजे शासनावर कोणते निर्बंध असतात हे लक्षात येईल. उदा.,

शासनाने नागरिकांमध्ये जात, धर्म, वंश, भाषा व लिंग यांवर आधारित भेद करू नये.

कोणालाही कायदयापुढील समानता कायदयाचे समान संरक्षण नाकारू नये.

कोणत्याही व्यक्तीचे जीवित हिरावून घेऊ नये.

धार्मिक कर लादू नयेत.

शासनाने काय करावे याविषयीच्या काही सूचना संविधानाने स्पष्ट केल्या आहेत. या सूचनांचा हेतू म्हणजे संविधानाच्या उद्देशिकेत जी उद्दिष्टे स्पष्ट केली आहेत ती प्राप्त करण्यासाठीचे मार्गदर्शन होय. म्हणूनच या सूचनांना ‘मार्गदर्शक तत्त्वे’ असे म्हटले जाते.

मार्गदर्शक तत्त्वाचा समावेश का केला?

भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा या देशात सुव्यवस्था निर्माण करण्याचे, सुरळीत राज्यकारभार करण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर होते. दारिद्र्य, मागासलेपणा, निरक्षरता दूर करून देशाची घडी नीट बसवायची होती. राष्ट्रबांधणीचे कार्य करायचे होते. त्यासाठी नवनवीन धोरणे आखणे, त्यांची अंमलबजावणी करणे आवश्यक होते. लोकांच्या कल्याणाचे उद्दिष्ट साध्य करायचे होते. थोडक्यात, भारताचे एका नव्या विकसित व प्रागतिक देशात

रूपांतर करायचे होते. त्यासाठी केंद्रशासन व राज्यशासनाने कोणत्या विषयांना प्राधान्य दयावे, लोककल्याणासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात हे संविधानाने मार्गदर्शक तत्त्वादवारे स्पष्ट केले आहे. राज्यांच्या धोरणाचे ते आधार बनवले. प्रत्येक मार्गदर्शक तत्त्वात राज्याच्या धोरणासाठी एक विषय आहे. त्या विषयाच्या अनुषंगाने नवीन धोरण आखावे अशी अपेक्षा संविधानकारांनी व्यक्त केली आहे. ही सर्व धोरणे एकदम व एकाच वेळी राबवायची झाल्यास त्यासाठी खूप आर्थिक पाठबळ लागेल, हे संविधानकारांनी जाणले होते. म्हणूनच त्यांनी मार्गदर्शक तत्त्वे शासनावर मूलभूत हक्कांप्रमाणे बंधनकारक केली नाहीत. राज्यांनी हळूहळू पण ठामपणे त्यांची अमलबजावणी करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

काही महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वे :

  • शासनाने उपजीविकेचे साधन सर्वांना उपलब्ध करून दयावे. स्त्री व पुरुष असा भेद त्याबाबत करू नये.
  • स्त्री व पुरुषांना समान कामासाठी समान वेतन द्यावे.
  • लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
  • पर्यावरणाचे रक्षण करावे.
  • राष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणाचे म्हणजेच स्मारके, वास्तू यांचे संरक्षण करावे.
  • समाजातील दुर्बल घटकांना विशेष संरक्षण देऊन त्यांना विकासाच्या संधी उपलब्ध करून दयाव्यात.
  • वृद्धापकाळ, अपंगत्व, बेकारी यांपासून नागरिकांचे संरक्षण करावे.
  • भारतातील सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा करावा.

मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत हक्क या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मूलभूत हक्कांमुळे नागरिकांना अत्यावश्यक असे स्वातंत्र्य मिळते, तर मार्गदर्शक तत्त्वे लोकशाही रुजावी म्हणून पोषक वातावरण निर्माण करतात. अर्थात एखादे मार्गदर्शक तत्त्व शासनाने राबवले नाही तर त्या विरोधात आपल्याला न्यायालयात जाता येत नाही, परंतु विविध मार्गांनी शासनावर दबाव आणून धोरण आखण्याचा आग्रह आपण धरू शकतो:

कर्तव्ये

लोकशाहीत नागरिकांवर दुहेरी जबाबदारी असते. एकीकडे त्यांना संविधानाने दिलेल्या हक्कांबाबत जागरूक राहावे लागते. हक्कांवर अयोग्य मर्यादा येणार नाहीत याबाबत दक्ष असावे लागते, तर दुसरीकडे काही कर्तव्ये आणि जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागतात. सर्व भारतीयांचे कल्याण व्हावे म्हणून संविधानाने मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वे यांतून अनेक तरतुदी केल्या आहेत, परंतु नागरिक त्यांची मूलभूत कर्तव्ये जोपर्यंत पार पाडत नाहीत, तोपर्यंत शासनाने केलेल्या सुधारणांचे लाभ सर्वांना मिळत नाहीत. उदा., ‘स्वच्छ भारत’ अभियानाखाली शासनाने स्वच्छतेचे अनेक उपक्रम राबवले, परंतु सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता निर्माण करण्याच्या सवयी लोकांनी बदलल्या पाहिजेत. भारतीय नागरिकांना आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव व्हावी म्हणून संविधानात मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्ये पुढीलप्रमाणे :

  • प्रत्येक नागरिकाने संविधानाचे पालन करावे. संविधानातील आदर्शाचा, राष्ट्रगीताचा आदर करावा. राष्ट्रध्वज व • स्वातंत्र्याच्या चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आदर्शाचे पालन करावे.

देशाचे सार्वभौमत्व, एकता व अखंडत्व सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असावे.

  • आपल्या देशाचे रक्षण करावे, देशाची सेवा करावी.
  • सर्व प्रकारचे भेद विसरून एकोपा वाढवावा व बंधुत्वाची भावना जोपासावी. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणतील अशा प्रथांचा त्याग करावा.
  • आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे जतन करावे.
  • नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करावे. सजीव प्राण्यांबद्दल दयाबुद्धी बाळगावी.
  • वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद आणि जिज्ञासूवृत्ती अंगी बाळगावी.
  • सार्वजनिक मालमत्तेचे जतन करावे. हिंसेचा त्याग करावा.
  • देशाची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक कार्यात उच्चत्वाची पातळी गाठण्याचा प्रयत्न करावा.
  • ६ ते १४ वयोगटातील आपल्या पाल्यांना पालकांनी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात.

भारतीय संविधानाच्या उद्दिष्टांची आणि वैशिष्ट्यांची ओळख आपल्याला या पाठ्यपुस्तकातील सुरुवातीच्या प्रकरणांमध्ये झाली. भारतीय नागरिकांचे हक्क, त्या हक्कांना असणारेसंरक्षण यांचाही विचार आपण केला. आपली मूलभूत कर्तव्ये कोणती आहेत, हे आपल्याला समजले. पुढील वर्षी आपण आपल्या देशातील राज्यकारभार कसा चालवला जातो, याचा अभ्यास करणार आहोत.