२०. आपुले जगणे… आपुली ओळख! (भाग – ४)

आपुले जगणे… आपुली ओळख! उपरे, अर्धे जोडु नको
दिवा होऊनि उजळ जगाला… चाकू होऊन कापु नको!
नित्य घडावे वाचन, लेखन… क्षण कार्याविण दवडु नको
नित्य परवचा, व्यायामाविण झोप घ्यावया पडु नको!
पावित्र्याची पांघर वस्त्रे, होऊन पटकुर पसरु नको
शोभेहुनही श्रेष्ठ स्वच्छता, आदिमंत्र हा विसरू नको!
नम्र रहावे, सौम्य पहावे; उगा कुणास्तव अढी नको
उगा कुणाला खिजवायला करू तयावर कडी नको!
नको फुकाची ‘हांजी हांजी’… लोचट, बुळचट काहि नको
परंतु दिसता उदात्त काही; ताठर माथा मुळि नको!
पेल शक्तीने गोवर्धन तू, कंस होऊनी छळु नको
नको उगाचच वाद परंतु कुणि धमकवता पळु नको!
अपुल्या अपुल्या दु:खासाठी नयनी अश्रु ठेवु नको
पण दुसऱ्यास्तव वाहो करुणा; व्यर्थ कोरडा राहु नको!
तुडवित राने खुशाल जावे, नव्या पथाला भिउ नको
ज्यावर श्रद्धा प्राणाआतुन ते केल्याविण राहु नको!
जेथे वाटा, तेथे काटा! उगा भेदरुन अडु नको
करता हिंमत, जगात किंमत ! भेकड, गुळमुळ रडु नको!
कर्तृत्वाचे घडवी वेरुळ, कर्तव्याला मुकु नको
मातेसह मातिचे देणे फेडायाला चुकु नको!