कराडमधील कृष्णा नदीच्या काठावरील गोळेश्वर हे छोटेसे गाव. पुतळाबाई व दादासाहेब यांचा खाशाबा हा छोट्या चणीचा मुलगा. ‘अण्णा’ या टोपणनावाने ओळखला जाणारा हा मुलगा पुढे ऑलिंपिकवीर झाला. खाशाबांचे आजोबा उत्तम कुस्तीपटू होते, तर वडिलांनीही तरुणपणात आखाड्यातील कुस्त्या गाजवल्या होत्या. वडिलांच्या तालमीत खाशाबांच्या कुस्तीचा श्रीगणेशा झाला आणि त्यांचे नाते मातीशी जुळले. प्रतिस्पर्धी मल्लास चीत कसे करायचे, मान कशी पकडायची, पट कसा काढायचा याचे धडे खाशाबांनी वडिलांकडून आत्मसात केले. त्याकाळी गावागावांत उरूस भरायचे. या उरुसांत, जत्रेत आखाडे भरत. खाशाबांनी वयाच्या आठव्या वर्षी पहिल्यांदा जत्रेतील कुस्ती जिंकली होती.
शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी टिळक हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. गोळेश्वर गावापासून हायस्कूल पाच किलोमीटर दूर होते. सकाळी शाळेत लवकर पोहोचण्यासाठी खाशाबा रोज चालत न जाता पळत जायचे व अंधार पडण्यापूर्वी घरी परतता यावे म्हणून पळत यायचे. पळत जाण्या-येण्याच्या सवयीमुळे त्यांचा कुस्तीतला दम चांगलाच तयार होत गेला. अनवाणी पायाने धावल्यामुळे पाय काटक बनले. पावसाळ्यात झाडाझुडपांतून गुडघ्यापर्यंत चिखल तुडवत, पावसाची तमा न बाळगता खाशाबांनी शिक्षण व व्यायामाची साधना केली. जगातील सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या ऑलिंपिक क्रीडास्पर्धेचा पंधरावा महोत्सव फिनलँडची राजधानी हेलसिंकी येथे १९५२ साली पार पडला. तेथे खाशाबांनी भारताला कुस्ती या खेळप्रकारात कांस्यपदक मिळवून दिले. ऑलिंपिक क्रीडास्पर्धेत भारताला मिळालेले हे पहिले पदक होय.
तांदळाच्या अनेक जाती आहेत. त्यांपैकी एका जातीचे नाव आहे एचएमटी. तांदळाची ही नवी जात शोधून काढली एका शेतकऱ्याने. त्यांचे नाव दादाजी रामजी खोब्रागडे. ते चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील नांदेड या गावचे. दादाजींचे वडील रामजी. ते फार काळजीपूर्वक शेती करायचे. पेरणीच्या अगोदर बियाणे निवडायचे. खराब दाणे बाजूला काढायचे. दादाजींनी वडिलांना ‘असे का करता? तेव्हा वडील म्हणाले, ‘चांगले बी पेरले तर चांगली उगवण होते.’ दादाजींना तेव्हापासून बियाणे निवडण्याची सवय लागली, तशीच निरीक्षणाचीही लागली.
ते मोठे झाले आणि शेती करू लागले. एकदा शेतात फिरत असताना त्यांच्या लक्षात आले, की भाताच्या काही ओंब्या जास्त गडद पिवळ्या रंगाच्या आहेत. त्यांनी नेमक्या त्या हेरून ठेवल्या व त्या परिपक्व झाल्यानंतर बाजूला काढून एका वेगळ्या पिशवीत ठेवल्या. दुसऱ्या वर्षी त्यांनी ते बियाणे शेताच्या मधोमध पेरले. त्यांच्या लक्षात आले, की या बियाणांपासून आलेल्या ओंब्यांना इतरांपेक्षा अधिक दाणे आहेत. त्यांनी असे अनेक वर्षे केले. त्यांची खात्री पटली, की हे बियाणे अधिक उत्पादन देऊ शकते. त्यांनी गावातील लोकांना ते लावण्याची विनंती केली; पण कोणी तयार झाले नाही, शेवटी भीमराव शिंदे तयार झाले. त्यांनी चार एकरांवर पहिल्यांदा ते बियाणे वापरले आणि आश्चर्य असे, की अवघ्या चार एकरांमध्ये ९० क्विंटल तांदळाचे उत्पादन झाले. तळोधी बाळापूरच्या बाजारात हा तांदूळ गेला, तेव्हा त्यावर व्यापाऱ्यांच्या अक्षरश: उड्या पडल्या. तेथेच या तांदळाचे नाव पडले ‘एचएमटी’. वर्षभर मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या या संशोधक शेतकऱ्याने हंगामाच्या काळात मुलीच्या दीड एकर शेतीमध्ये अनेक प्रयोग केले. त्यांनी तांदळाच्या एकूण आठ जाती शोधून काढल्या आहेत. या शेतकरी शास्त्रज्ञाला कृषिभूषणसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. अवघ्या दीड एकर शेतावर प्रयोग करणारा असा हा शेतकरी.