(शाळेच्या मधल्या सुट्टीत नेहा व सायली या दोन मैत्रिणींमध्ये झालेला हा संवाद)
नेहा : सायली, स्वातंत्र्यदिन-प्रजासत्ताक दिन या शब्दांमधील ‘दिन’ शब्दाचा अर्थ ‘दिवस’ असा आहे, हो ना ग?
सायली : हो….असाच आहे. का गं?
नेहा : अगं, मागच्या धड्यात हा शब्द आला होता, तेव्हा बाईंनी या शब्दाचा अर्थ सांगितला होता ‘गरीब’!
सायली : दोन्ही शब्द नीट बघितलेस का तू? कसे लिहिले आहेत ते?
नेहा : आपण आता पुस्तकातच बघूया. शब्द कसा लिहिलाय ते….
सायली : हं. हा बघ मागचा धडा….आणि हा शब्द ‘दीन’!
नेहा : अरे हो, दोन्ही शब्द लिहिण्यात फरक आहे.
सायली : बरोबर! ‘दीन’ शब्दात ‘दी’ दीर्घ आहे. ‘दीन’ म्हणजे गरीब. ‘दिन’ शब्दात ‘दि’ ऱ्हस्व आहे. ‘दिन’ म्हणजे दिवस.
नेहा : शब्दांची किती गंमत अाहे ना! अक्षरांत वरवर साम्य आहे; पण लेखनातल्या फरकामुळे अर्थात केवढा फरक!
सायली : आपण दोघीजणी असे नवीन शब्द आणि त्यांचे विविध अर्थ रोज समजून घेऊया.
नेहा : अगं पण कसे? आपल्याला सारखे आपल्या बाईंकडे जावे लागेल अर्थ विचारायला!
सायली : अगं नाही. मला माहीत आहे त्याची गंमत. शब्दांचे अर्थ आपले आपण कसे शोधायचे ते मी तुला दाखवते. सायली आणि नेहा यांच्याप्रमाणेच शब्दांचे अर्थ शोधण्याचा आनंद तुम्हीही घ्यायला हवा आहे. त्यासाठी तुम्ही या पाठातून शब्दकोश म्हणजे काय, त्याची रचना, तो कसा पाहावा याबाबत माहिती करून घेणार आहात.
शब्दकोश म्हणजे काय, त्याची उद्दिष्टे, तो कसा पाहावा हे आपण समजून घेऊया.
मुलांनो, ज्या एका अक्षराने किंवा अक्षरसमूहाने एखादी वस्तू, विचार, कल्पना, भाव, गुण किंवा क्रिया इत्यादींचा अर्थ व्यक्त केला जातो, त्या अक्षरास किंवा अक्षरसमूहास ‘शब्द’ असे म्हणतात.
कोश म्हणजे ‘संग्रह’ तर शब्दकोश म्हणजे ‘शब्दसंग्रह’ होय. हा झाला शब्दकोश शब्दाचा वाच्यार्थ; पण विकसित भाषांत शब्दसंग्रह आणि शब्दकोश यांच्या स्वरूपात थोडा फरक असतो.
एखाद्या भाषेच्या विशिष्ट क्षेत्रातील मर्यादित शब्दांच्या संग्रहाला ‘शब्दसंग्रह’ (Glossary) असे म्हणतात; तर त्या भाषेतील बहुतेक सर्व शब्दांचा संग्रह, विशिष्ट रचनापद्धतीचा अवलंब करून दिला असल्यास त्याला ‘शब्दकोश’ (Dictionary) असे म्हणतात.
कोशात समाविष्ट केलेल्या शब्दांची रचना पद्धतशीरपणे केलेली असते. संग्रहित केलेल्या शब्दांचा क्रम कोणत्या पद्धतीने लावला आहे ते कळले तर कोणताही शब्द कोठे सहजतेने सापडेल हे नक्की कळते.
अलीकडे सर्व भाषांतील कोशातील शब्दांची योजना त्या भाषेच्या व्यवहारासाठी वापरल्या जाणाऱ्या लिपीतील वर्णांच्या क्रमाने केलेली असते. अशी योजना करताना शब्दांचे आद्य अक्षर किंवा वर्णविचारात घेतलेला असतो. या पद्धतीमुळे कोशात शब्द कोठे सापडेल हे चटकन ठरवता येते.