२०. सर्व विश्वचि व्हावे सुखी

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत म्हणजे सत्पुरुष. ‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति । देह कष्टविती परउपकारें ।’ ही संतांची खरी भूमिका आहे. संतांच्या साहित्याचा आत्मा भक्तीबरोबरच समाजप्रबोधन, समाजकल्याण हा आहे. संत परमेश्वराकडे स्वत:साठी काहीही मागत नाहीत; परंतु ‘बुडतां हे जन न देखवे डोळां । येतो कळवळा म्हणउनि ।।’ यासाठी श्री चक्रधर स्वामी, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, वारकरी संप्रदायातील सर्व संत, संत कबीर, गुरुनानक, संत महात्मा बसवेश्वर अशा सर्वच संतांनी आपल्या साहित्यातून विश्वकल्याणासाठी परमेश्वराकडे, गुरूंकडे साकडे घातले आहे.

संत ज्ञानेश्वरांपासून अगदी आधुनिक काळातील संत गाडगेबाबा यांच्यापर्यंत सर्वच संतांच्या प्रार्थना म्हणजे मानवतेचा आविष्कार आहेत. त्यांच्या प्रार्थनेमध्येविश्वकल्याण, माणुसकी व सहृदयता यांचे प्रतिबिंब दिसते. माणसाच्या मनातील माणुसकीचा झरा जिवंत असेल तरच विश्वकल्याण शक्य आहे, कारण ‘मी’ पासून ‘आम्ही’ या संकल्पनेप्रमाणे ‘अवघे विश्वचि माझे घर’, ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या संकल्पना संतांच्या साहित्यातून प्रकट झाल्या आहेत. सर्व संतांच्या प्रार्थनेतील साधर्म्याचा धागा ‘विश्वकल्याण’ याचा परिचय या पाठातून करून घेऊया.

संत ज्ञानेश्वरांच्या ‘ज्ञानेश्वरी’ या ग्रंथात पसायदान आहे. पसायदान म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी विश्वात्मक देवाला केलेली प्रार्थना. आपली वैयक्तिक इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण नेहमीच प्रार्थना करतो. अशी प्रार्थना आपल्यापुरती मर्यादित असते; परंतु संत ज्ञानेश्वरांनी विश्वात्मक देवाला सारे जग सुखी करण्याची प्रार्थना केली.

संत ज्ञानेश्वर ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ सांगून पूर्ण करण्याच्या तयारीत होते, तेव्हा संत निवृत्तीनाथ त्यांना म्हणाले, ‘‘आपण ग्रंथ पूर्ण करत आला आहात. तेव्हा सगळ्यांसाठी देवाजवळ काहीतरी मागा’’, यावर संत ज्ञानेश्वर म्हणाले, ‘‘मी देवापाशी आधी मागितले आहे. ते, म्हणजे देवाने आम्हा सर्वांना चांगली बुद्धी द्यावी.’’ संत निवृत्तीनाथ म्हणाले, ‘‘ग्रंथाचा समारोप करताना प्रार्थना येणे आवश्यक आहे. तुम्ही सुरुवातीला मंगलाचरणात जे म्हटले आहे ते आता विस्ताराने सांगा.’’ यातून पसायदान निर्माण झाले.

संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेली ही प्रार्थना मराठी मनाच्या स्मरणात कायम आहे. पसायदान याचा अर्थविनम्र मनाने परमेश्वराला हात जोडून केलेली प्रार्थना. निसर्गातील फुले, फळे, वृक्ष, नद्या, निर्झर, समुद्र, सूर्य, चंद्र, तारे एकोप्याने राहतात. त्यांचा दाखला देत, ‘आपणही गुण्यागोविंदाने राहावे’, हे संत ज्ञानेश्वरांनी सांगितले. संत ज्ञानेश्वरांनी पसायदानात म्हटले आहे,

‘जे खळांची व्यंकटी सांडो । तयां सत्कर्मीं रती वाढो ।
भूतां परस्परें पडो । मैत्र जीवाचें ।
दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्यें पाहो ।
जो जें वांछील तो तें लाहो । प्राणिजात ।

माणसाने आपल्या मनातील दुष्टावा नाहीसा केला पाहिजे. संत ज्ञानेश्वरांनी याला ‘खळांची व्यंकटी सांडो’ असे म्हटले आहे किंवा ‘दुरिताचें तिमिर जावो’ असे म्हटले आहे. दुरित म्हणजे दुष्कर्म. या जगातून दुष्कर्माचा अंधार नाहीसा होवो, ज्याला जे जे हवे ते ते मिळो अशी विश्वकल्याणाची प्रार्थना त्यांनी केली. असेच मागणे संत नामदेवांनीही परमेश्वराकडे मागितले. एका अभंगात ते म्हणतात,

 ‘अहंकाराचा वारा न लागो राजसां ।

 माझ्या विष्णुदासां भाविकांसी ।।’

 संत नामदेवांनी देवाला अशी विनंती केली आहे, की देवा मला सतत नम्र राहू दे. मला कधीही अहंकारी होऊ देऊ नकोस. माणसात उर्मटपणा आला तर तो कधीही यशस्वी होत नाही. आपल्याला आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर नम्र राहायला हवे. विनम्रता केव्हाही जगाला आपलेसे करते. थोरांची चरित्रे आपल्याला हेच शिकवतात.

संत एकनाथांनी ‘सर्वांभूती भगवद्भावो । हा चि निजभक्तीचा ठावो ।’ असे म्हटले आहे. प्राणिमात्रात मैत्री असली, की विश्व आनंदाने राहू शकते. मैत्री म्हणजे नुसते देणे घेणे नव्हे. मानवी सुखदु:खाशी सहृदय मनाने समरस होणे, दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणे, दुसऱ्याच्या दु:खात त्याला आधार देणे, हा आपला आणि तो परका असे मनात कधीही न आणणे; असे झाले तरच जीवाचे मैत्र होते. संत एकनाथ ‘सर्वांभूती भगवद्भावो ।’ असे म्हणतात तर संत ज्ञानेश्वर यासाठी ‘भूतां परस्परें पडो, मैत्रं जीवाचें’ असे म्हणतात.

संत तुकारामांनी देवापाशी ‘संतसंग देईं सदा’ असे मागणे मागितले आहे.

संतांच्या संगतीमुळे चार माणसे एकत्र आली, तर चांगल्या प्रकारचे काम उभे राहते. परस्पर सहकार्यातूनच मानवी जीवनाचे कल्याण होते. त्यासाठी संत तुकाराम महाराज सांगतात, ‘एक एका साह्य करूं । अवघे धरूं सुपंथ ।’ संत स्वत:साठी काहीही मागत नाहीत. जगाच्या कल्याणासाठीच ते प्रार्थना करत असतात.

संत रामदास यांनीही विश्वकल्याणासाठी प्रार्थना केली आहे.

‘कल्याण करीं देवराया, जनहेत विवरीं ।

तळमळ तळमळ होतचि आहे, हे जन हातीं धरीं ।

संत रामदास यांना जनहिताची तळमळ वाटते, म्हणून ते परमेश्वराजवळ सर्वांचे कल्याण कर, असे मागणे मागतात. संत गाडगे महाराजांनी सामाजिक प्रबोधन करताना प्रत्यक्ष कृतीवर भर दिला आहे. वेळ वाया घालवणे, व्यर्थ गप्पा मारत बसणे हे संत गाडगे महाराजांना मान्य नव्हते. त्यापेक्षा सर्वांनी शिक्षित व्हावे यावर त्यांचा कटाक्ष होता. शिक्षणाचे महत्त्व सांगताना संत गाडगे महाराज म्हणतात-

 ‘नको धर्मकृत्ये पैसा खर्चूनिया घेण्यासाठी विद्या तोच खर्चा ।।

स्वत:चा उद्धार करा प्रयत्नाने शक्तीने, मुक्तीने सुखी व्हावे ।।’

शिक्षणामुळे माणूस सुसंस्कृत व्हावा, माणूस जोडला जावा, त्यातून मानवाचे कल्याण व्हावे, हेच संत गाडगेबाबांना अभिप्रेत आहे.

संत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीतेत स्वच्छतेचे महत्त्व सांगितले. आपले गाव हे देवाचे मंदिर आहे. अशा मंदिरात ‘मानव देवमूर्ति सुंदर’ असे ते म्हणतात. समभावाने सेवा केली पाहिजे, अज्ञान नाहीसे व्हावे यासाठी ज्ञानविज्ञानाची कास धरावी, सर्वांनी ग्रंथ वाचावे, सत्य बोलावे असे तुकडोजी महाराज म्हणतात. संत तुकडोजी महाराज अशी प्रार्थना करतात, की

‘सर्व विश्वचि व्हावे सुखी । ही धर्माची दृष्टि नेटकी ।

ती आणावी सर्व गावलोकी । तरीच लाभ ।।

सर्व संतांनी मागितलेले मागणे म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी केलेली चिरंजीव प्रार्थना आहे. ही प्रार्थना मानवतेची पूजा करणारी आहे. संतांनी माणसाला महत्त्व दिले. माणूस आदर्श व्हावा, त्याने सुसंस्कारांची जोपासना करावी. कुणालाही त्रास देऊ नये, एकोप्याने राहावे. माणूस कधीही एकाकी राहू शकत नाही. त्याला संवादाची नितांत गरज असते, म्हणून माणसाने कुणालाही दुखवता कामा नये. शक्यतो दुसऱ्याच्या उपयोगी पडणे, ही खरी मानवता आहे. संतांनी ही मानवता आवर्जून शिकवली. तशी त्यांनी आचरणातही आणली.

आजच्या विज्ञानयुगात विज्ञान-तंत्रज्ञानातील संशोधनामुळे विश्व जवळ आले आहे. संत ज्ञानेश्वरांनी तेराव्या शतकात ‘हे विश्वचि माझे घर आहे,’ ही कल्पना केली होती याचे प्रत्यंतर आज आपण घेत आहोत. आज आपण जगात कुठेही जाऊ शकतो; पण संत ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असलेला माणसामाणसांना जोडणारा जिव्हाळा आज हरवला आहे. तो जपण्यासाठी मन सुसंस्कृत असायला हवे. नाहीतर, राक्षसी वृत्ती निर्माण होते. ती संतांना नको आहे. चांगल्या मनाने निर्माण केलेल्या कृती जगात महत्त्वपूर्ण ठरतात. विज्ञानातील चांगले प्रकल्प समृद्धी आणतात; पण सुंदर मने ही राष्ट्राची श्रीमंती वाढवतात. संतांनी याकडे लक्ष वेधले आहे.

 वडाचे झाड कायम नम्र असते. ते सगळ्यांना सावली देते. त्याची सावली सर्वांना हवीहवीशी वाटते. झाडे स्वत: ऊन सोसतात. लोकांना सावली देतात. पर्वताच्या कुशीत जन्मलेल्या नद्या मोकळ्या मनाने पुढे वाहतात. पर्वत आपल्या जागी स्थिर राहून हे आनंदाने पाहतात. आपण कोणत्याही कामात मन आनंदी ठेवून जर काम केले, तर त्याच्यासारखा दुसरा आनंद नसतो. हे जगण्याचे खरे सूत्र आहे. स्वत: चांगले जगावे आणि स्वार्थापलीकडे जाऊन दुसऱ्याचाही विचार करावा; असे झाले तरच सुंदर समाज निर्माण होईल, सुखी होईल. हेच सर्व संतांच्या प्रार्थना करण्यामागील मर्म आहे.