(चक्रमादित्य महाराजांचा दरबार. महाराज प्रवेश करतात.)
समशेरबहाद्दर श्रीमंत चक्रमादित्य महाराजांचा जयजयकार असो’ (सर्वजण जयजयकार करतात.) आस्ते कदम महाराज. आस्ते कदम …..
महाराज : (सिंहासनावर बसून) बसा मंडळी, बसा. (प्रधानास) काय प्रधानजी, कशी काय आहे राज्याची हालहवाल ?
प्रधानजी : (हात जोडून) आपल्या कृपेने उत्तम आहे. गोरगरीब भरपूर कष्ट करत आहेत. श्रीमंत लोक सुखात आहेत.
महाराज : छान उत्कृष्ट “बरं, चोरीमारी वगैरे ?
प्रधानजी: कोणी चोरी करत नाही. फक्त चोर तेवढे चोऱ्या करत आहेत.
महाराज : फारच छान. बरं, रोगराई वगैरे ?
प्रधानजी : बिलकुल नाही’ चार-दोन साथीचे रोग आले. त्यांत शे-पाचशे माणसे गेली. बाकी सगळे जिवंत आहेत.
महाराज : वा वा प्रधानजी, आमच्या राज्याची हालहवाल एकूण उत्तम आहे म्हणायची! बर. आज करमणुकीचा कार्यक्रम कोणता?
प्रधानजी : एक उत्तम गाणारे वा आलेले आहेत. त्यांच गाण ऐकाव सरकार
महाराज : त्यांच नाव काय म्हणालात?
प्रधानजी : गानसेन.
महाराज : बरं बरं, बोलवा त्यांना
(गवईबुवा येतात. नमस्कार करतात.)
गवई : महाराजांचा विजय असो’
महाराज : गवईबुवा, तुम्हांला काय येत? तबल्यावर पेटी वाजवून दाखवता? नाहीतर असं करा, पेटीवर तबला वाजवा.
गवई : महाराज, मी वादक नाही. गवई आहे. संगीत गातो.
महाराज : बरं बरं म्हणा काहीतरी.
(गवईबुवा मांडी घालून बसतात. हातवारे करून बेसूर आवाजात एक गाणे म्हणतात. महाराज खूश होतात )
महाराज : वा’ गवईबुवा, तुमचा आवाज साखरेसारखा गोड आहे. बोला, तुम्हाला काय बक्षीस पाहिजे?
गवई : महाराज, मला स्वतःला काही एक नको. सध्या संगीताला वाईट दिवस आले आहेत. संगीतकलेसाठी काहीतरी करा.
महाराज : अवश्य, अवश्य! काय बरं करावं? (विचार करतात. मग टाळी वाजवून) हां, कल्पना सुचली, प्रधानजी-
प्रधानजी : आज्ञा महाराज.
महाराज : संगीताला उत्तेजन दिलं पाहिजे.आत्ताच्या आत्ता दवंडी पिटवा – आजपासून आमच्या राज्यात सगळ्यांनी गाण्यात बोलायचं. कुणीही साधं बोलायचं नाही. सगळं गातगातच बोललं पाहिजे.
प्रधानजी : ठीक आहे, सरकार.
महाराज : जो कुणी गाण्यात बोलणार नाही त्याला शिक्षा करा. पहिल्यांदा त्याला सुळावर चढवा. मग हत्तीच्या पायी देऊन नंतर त्याचा कडेलोट करा आणि पुन्हा असं करणार नाही हे त्याच्याकडून लिहून घ्या.
प्रधानजी : आत्ताच दवंडी दयायची व्यवस्था करतो.
(हळूहळू रंगमंचावर अंधार होतो. त्या अंधारातच प्रथम दवंडीचा आवाज व नंतर दवंडीवाल्याचे गाण्यात ओरडणे ऐकू येऊ लागते.)
वयंडीयाला : (गाण्याच्या चालीवर)
ऐका हो तुम्हि ऐका!
ऐका हो ऐका !!
आजपासुनी सर्व बोलणे,
व्हावे केवळ गाणे गाणे.
केवळ गाणे आणि तराणे,
चालणार नच इतर फलाणे.
राजाज्ञा जो मोडिल कोणी,
देउ सुळावर त्यास तत्क्षणी.
ऐका हो तुम्हि ऐका !!
(दवंडी संपते. रंगमंचावरील प्रकाशात दोन पहारेकरी हातांत भाले घेऊन एकमेकांशी बोलत येतात.)
पहिला : (हसत) छे छे ! हसून हसून आपलं तर पोट दुखायची वेळ आली बुवा ! जिकडे बघावं तिकडे लोक सुसतं गाताहेत. साध बोलणं नाहीच कुठे.
दुसर : महाराजांची आज्ञा आहे ना! कोण मोडणार ?
पहिला : काय एकेकाचे आवाज भसाडे आहेत रे । त्यांनीसुद्धा गायचं म्हणजे काय हे !
दुसरा : लोक अगदी त्रासून गेले आहेत.
पहिला : शू! कुणी गदय बोललं, तर त्याला पकडायचं हे आपलं काम आपणसुद्धा नाही बोलायचं, (गात) गद्य कोण बोलतो, त्यास मी पकडतो अन् सुळावर चढवतो.
दुसरा : ए, ते बघ, ती दोघ नवरा-बायको भाडत इकडेच येत आहेत. बाजूला उभं राहून ऐकूया. साधी भांडताहेत की गाण्यातच ?
पहिला : चल तर लवकर.
(दोघे बाजूला उभे राहतात. नवरा घाईघाईने येतो. मागून बायको येऊन त्याचा हात धरते. दोघेही गाण्यातच बोलतात.)
बायको : तेल संपले, तूप संपले, मीठ संपले; स्वयंपाक आता मी करू कशाचा?
नवरा : (रागावून) ए माझे आई, नकोस खिकाळू।
हा चाललो बाजाराला,
आणून देतो माल तुला.
बायको : (हातात पिशवी देत) अन् येताना शेर-दोन
शेर, तुम्ही वांगी आणा छान सुरेख.
नवरा : (बायको गेल्यावर स्वतःशीच गुणगुणत) आणितो मी तेल, तूप, मीठ, वांगी.
आणखी ती काय सांगी ?
(आठवत आठवत नवरा जातो. दोघेही पहारेकरी हसत हसत पुढे येतात.)
पहिला : कमाल आहे बुवा ! भांडणसुद्धा गाण्यात करायचं !
दुसरा : आता है नवरोजी गेले बाजारात. तिथे ही गर्दी माणसांची ! प्रत्येकजण गाण्यातच बोलतोय!
पहिला : खरच, बाजारात तर मोठी गंमत उडाली असेल नाही ?
दुसरा : अरे, गमत म्हणजे काय? नुसती मजा चाललीय मजा ! समज तू दुकानदार अन मी गिन्हाईक. मग मी विचारायच – (गात) दुकानदारदादा, अहो दुकानदारदादा, तुम्ही कसा दिला कांदा ?
पहिला : (दुकानदाराची नक्कल करत, गात) रुपयास चार शेर रावसाहेब, रुपयास चार शेर..
दुसरा : (गात) दया तर आम्हा एकच शेर, घालू नका हो कचराकेर.
पहिला : (गात) माल अमुचा पांढराफेक, कांदे किती हे स्वच्छ सुरेख !
दुसरा : (गात) चार आणे नाहीत फार, मांडून ठेवा आज उधार.
पहिला : (गात) नाही नाही, नाही चालणार, आज रोख उद्या उधार.
(दोघेही खूप हसतात. मग नेहमीच्या आवाजात बोलतात.)
पहिला : कारे, बाजारात ही गंमत! मग राजवाड्यात किती मौज उडाली असेल ?
दुसरा : राजवाड्यात? अरे, तिथे तर साधं गाणं नाही, शास्त्रीय संगीत! सगळं रागदारीत चाललंय.
पहिला : चल, तिथली गंमत प्रत्यक्षच बघितली पाहिजे. चल, चल लवकर
(‘गद्य कोण बोलतो’ हे गाणे म्हणत दोघेही जातात. रंगभूमीवर थोडा वेळ अंधार. मग राजवाडा दिसतो. लोक महाराजांचा गाण्यात जयजयकार करत आहेत- जयजयकार महान, आपुला जयजयकार महान.)
महाराज : (गाणे म्हणत प्रवेश करतात.) आलो आलो मी. राणी कुठे आमची ?
राणी : (गात) ही इथे महाराज मी.
महाराज : (गात) आज तुझे तोंड सुकले कशाने ?
राणी : (गात) या पडशाने मज गांजियले.
(सटासट शिंकते.)
महाराज : (गात गात आज्ञा करतात.) जा जा जा झणी घेऊन या वैदया.
(एक सेवक ‘महाराज, महाराज’ अशा गाण्यातील हाका ऐकू येतात.)
महाराज : (घाबरून गातात) अरेऽऽ काय झालेSS ?
सेवक : (गडबडीने प्रवेश करून गातो.) महाराजऽऽऽ प्रधानजी
महाराज : (गात) अरेऽऽ, काय झालं ? बोल लवकरी.
सेवक : (गात व ताना घेत) महाराजSSS
महाराज : (गात) अरे बोल ना झडकरी
सेवक : (गात) महाराज, आपुला प्रिय राजवाडाऽऽ
महाराज : (गात) पुढे बोल गयाss
सेवक : (ताना घेत तीच ती ओळ घोळून घोळून म्हणतो) महाराज, आपुला प्रिय राजवाडाऽऽ
महाराज : (विहून नेहमीच्या सुरात) आता बोलतोस लवकर का मुंडकं उडवू तुझे ?
सेवक : (गातगातच) आपुला प्रिय राजवाडा, जळुनि खाक झाला.
महाराज : (घाबरून) काय ? माझा राजवाडा जळला? मेलो, ठार मेलो भी, अन् मूर्खा, तू हे आता सांगतोस?
सेवक : (नेहमीच्या आवाजात) क्षमा करावी महाराज, पण आपलीच आज्ञा होती ना सगळं गाण्यात सांगायचं म्हणून
महाराज : खड्ड्यात गेली ती आज्ञा. प्रधानजी (प्रधानजी समोर येतात.) प्रधानजी, लोकांना म्हणावं नेहमीप्रमाणे बोला.
प्रधानजी : जशी आज्ञा सरकार राजवाडा सुखरूप आहे आपला. थोडक्यात वाचला. आग विझवली.
महाराज : फारच छान, उत्कृष्ट! आमच्या आज्ञेनं हा सगळा घोटाळा झाला. हे पाहा, आता जो कोणी गाईल त्याला सुळावर चढवण्यात येईल, अशी दवंडी लगेच पिटवा.
प्रधानजी : हां हां महाराज, मी लहान तोंडी मोठा घास घेतोय खरा । क्षमा असावी. महाराज, आपण ही आज्ञा परत घेतलीत तर उपकार होतील. नाहीतर अति तिथं माती होईल.
महाराज : शाबास प्रधानजी, पटल आम्हांला रद्द केली आम्ही आमची आज्ञा, खरं आहे तुमचं, अति तिथं माती आहे… कुणी बरं म्हटलंय ?
प्रधानजी : पण आज्ञा रद्द झाली ना ?
महाराज : झाली म्हणजे काय? झालीच
– द. मा. मिरासदार