२२.वडिलांस पत्र

तीर्थरूप बाबांना, साष्टांग नमस्कार.

समीर. दि. २२ नोव्हेंबर, २०२१

बाबा, कालच मी सहलीहून परतलो. सहल खूपच आनंददायी आणि अभ्यासपूर्ण झाली. खरंच बाबा, या सहलीमुळेच मला महाराष्ट्रात खूप किल्ले आहेत हे कळले. महाराष्ट्र किल्ल्यांचे राज्य आहे हेही मला उमगले.

बाबा, मावळातल्या सह्याद्रीच्या अत्युच्च शिखरावर वसलेला ‘राजगड’ आम्ही बघितला. अहो! या राजगडाला ‘गडांचा राजा आणि राजांचा गड’ असे म्हणतात. सहलीला जाण्यापूर्वीच शाळेत शिक्षकांनी आम्हांला राजगडाची प्रतिकृती दाखवली होती. त्यांनी सांगितले, ‘१६४६ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड ताब्यात घेतला. हा किल्ला जुना, दुर्लक्षित, ओसाड पण बळकट आहे. इतकेच नव्हे तर तो अतिउंच असून अवघड अशा डोंगरावर आहे.’

बरं का बाबा, रायगडाप्रमाणेच राजगडसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचे ठिकाण. किती प्रचंड आणि भव्य किल्ला हा! या राजगडाचे भौगोलिक स्थान आणखीनच आगळेवेगळे. उत्तरेला गुंजवणी नदी, दक्षिणेला वेळखंड नदीवर भाटघर धरण, पूर्वेला पुणे-सातारा रस्ता तर पश्‍चिमेला सह्याद्रीचा घाटमाथा. भाटघर धरणाचे अथांग जलाशय आणि सृष्टिसौंदर्य बघून मला तिथून परतावंसंच वाटतं नव्हतं. बाबा, आमच्यासोबत अत्यंत बोलका आणि तज्ज्ञ मार्गदर्शक होता. तुम्ही मला नेहमीच किल्ल्यांबाबत सांगता तशी त्या मार्गदर्शकान आम्हांला किल्ल्याबाबत खूप छान माहिती पुरवली. त्याने सांगितले, ‘या किल्ल्याची उंची सर्वांत जास्त आहे. याचा घेर बारा कोसांचा आहे. शिवाजी महाराजांनी त्याचा विस्तार केला. त्याला राजधानीचे ठिकाण बनवले. राजधानीला आवश्यक असलेले सर्व बांधकाम इथे करून घेतले.’ बाबा, मी त्या किल्ल्याचे दुरून निरीक्षण केले. मला या किल्ल्याचा आकार उपड्या ठेवलेल्या सिलिंग फॅनसारखा जाणवला. मध्यभागी पंख्याचा उंचवटा म्हणजे बालेकिल्ला. पंख्याची तीन पाती म्हणजे पद्मावती, सुवेळा आणि संजीवनी या तीन माच्या.

किल्ल्याला देखणा व प्रसन्न परिसर लाभला आहे. परिसरात पर्यटकांसाठी अनेक फलक लावलेले आहेत. मी सर्वफलक वाचले. मला एक फलक खूप आवडला. त्यावर लिहिले होते, ‘या गडावर नेताजी पालकर, तानाजी मालुसरे, येसाजी कंक, शिळीमकर या थोर व्यक्तींचे वास्तव्य होते. राजगडाने शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेचे कार्यपाहिले. अंधाऱ्या रात्रीतील गुप्त खलबते ऐकली. महाराजांच्या अनेक नव्या मोहिमांची तयारी राजगडाने बघितली. अफझलखानाशी लढण्याचे बेत राजगडावर ठरले. पुरंदर पायथ्याशी तह करण्यास महाराज राजगडावरून गेले होते. महाराज आग्र्‍याहून सुटून बैराग्याच्या वेशात परत आले ते या राजगडावरच.’ बाबा, आमच्या सरांनी सांगितले, ‘जगातील सर्वोत्कृष्ट अशा चौदा किल्ल्यांच्या प्रतिकृती स्वित्झर्लंडमधील म्युझियममध्येठेवल्या आहेत. आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट अशी, की भारतातील एका किल्ल्याचा त्यात समावेश आहे आणि तो म्हणजे राजगड.’

या भव्य आणि ऐतिहासिक किल्ल्याचे दर्शन घेताना माझा ऊर अभिमानाने भरून आला. त्याचे वैभव मी डोळे भरून बघितले. आपल्या पुरातन वास्तूंत देशाचा गौरवशाली इतिहास दडलेला आहे. बाबा, आपण प्रत्येक मोठ्या सुट्टीत एक किल्ला बघण्याचे ठरवूया का? आई कशी आहे? इकडे आल्यापासून आजीच्या रात्री गुणगुणत असणाऱ्या भजनांना मी मुकलो आहे असे वाटते. वसतिगृहातले जेवण बरे आहे. तरीही आईच्याहातच्या जेवणाची खूप आठवण येते. अरे हो, मी निघालो, तेव्हा माझा मित्र महंमदची तब्येत बरी नव्हती. आता कशी आहे ते जरूर कळवा.

तुमचा, समीर.