२३.परिवर्तन विचारांचे

अजय आठवीत शिकणारा मुलगा. अत्यंत साधा, सरळ आणि सहकार्यवृत्तीचा. अभ्यासात जेवढा हुशार, तेवढाच खेळातही प्रवीण. जसा मैदानं गाजवायचा, तसा वर्गातल्या मुलांच्या अभ्यासातल्या अडचणी सोडवायला एका पायावर तयार असायचा. त्यामुळे सगळ्यांना तो आपला वाटायचा. अगदी शिक्षकांचाही तो आवडता विद्यार्थी होता.

 शाळेत सहलीचे वारे वाहू लागले, तसा अजय हिरमुसला, कारण त्याला माहीत होते, सहलीची फी आई भरू शकत नाही. घरातली ओढाताण त्याला जाणवत होती. त्यामुळे त्याने सहलीचा विषय घरात काढला नाही; पण आईला कुठून तरी सहलीचे समजले. तिने अजयला सहलीची फी दिली. त्याचा आनंद गगनात मावेना. तो पहिल्यांदाच सहलीला जात होता, त्यामुळे त्याच्या डोक्यात सतत सहलीचा विचार डोकावत होता. कधी एकदाचा सहलीचा दिवस उजाडतो असे त्याला झाले होते. सहलीचा दिवस निश्चित झाला. त्याची सहल शनिवारी जाणार होती. हे ऐकूनच अजयच्या कपाळावर आठ्या पसरल्या.

उद्या अजयची सहल जाणार होती. त्याने आईला बजावून बजावून सांगितले, ‘अाई, मला सकाळी लवकर उठव, नाहीतर मला उशीर हाेईल.’ रात्री त्याला झोप येईना. कधी एकदाची सकाळ होते असे त्याला झाले होते. सकाळ झाली. अजय उठला. स्वत:चे पटपट आवरू लागला. तेवढ्यात भिंतीवरची पाल चुकचुकली. अजयने पालीकडे पाहिले. त्याला कसेतरीच झाले. स्वत:चे आवरून आईने दिलेला डबा घेऊन तो निघाला. घराबाहेर आला अन् त्याला मांजर आडवे गेले. परत एकदा त्याचे मन खट् झाले. आ टू पली सहल नीट पार पडेल का? या विचारात अजय शाळेत पोहोचला. बस आली होती. मुलांमधला उत्साह ओसंडून वाहत होता. सहलीच्या प्रवासाला सुरुवात झाली. पाच-सहा किलोमीटर प्रवास झाला अन् बसचा टायर पंक्चर झाला.

मुले नाराज झाली. सगळी मुले बसखाली उतरू लागली. अजयच्या मित्राचा पाय बसमधून उतरताना मुरगळला. तो वेदनेने रडू लागला. अजय अस्वस्थ झाला. सकाळपासून हे काय होते आहे? असे त्याला वाटू लागले. पाल चुकचुकणे, मांजर आडवे जाणे या गोष्टींला आई अपशकुन मानते. खरंच असतील का हे शकुन-अपशकुन?

अजय बसखाली उतरला. त्याने बसकडे पाहिले व जवळच्या एका खडकावर जाऊन बसला. पाय मुरगळलेल्या मित्राला एका सरांनी दवाखान्यात नेले होते. अजय उदास दिसत होता. त्याच्या वर्गशिक्षकांचे त्याच्याकडे लक्ष गेले. ते अजयजवळ आले. त्यांनी अजयच्या पाठीवर हात ठेवला तसा अजय दचकला. सर अजयला म्हणाले, ‘काय झाले अजय ? असा का बसलास?’ अजयने सरांना त्याच्या मनात चाललेले विचार व अस्वस्थता सांगितली. शेवटी तो सरांना म्हणाला, ‘सर, सकाळपासून हे असे अपशकुन. त्यात आज शनिवार. शनिवार म्हणजे ना कर्त्याचा वार; वाईट वार. सर, आपली सहल नीट पार पडेल ना?’ सर हसले व म्हणाले, ‘चल, बस सुरू झाली आहे.’

तेवढ्यात डॉक्टरांकडे गेलेला अजयचा मित्र व शिक्षक आले. जाताना रडत गेलेला मित्र, हसत आलेला पाहून अजयला बरे वाटले. डॉक्टरांनी त्याच्या पायाचा मुरगळा काढला अन् त्याला औषधही दिले होते. दिवसभर मुलांनी सहलीत धमाल केली. मजा केली. कविता गायल्या. गाण्याच्या भेंड्या खेळल्या. खूप गप्पा मारल्या. नाच केला. एकमेकांना कोडी घातली. विनोद सांगून व ऐकून पोट धरून हसले. निसर्गाचे निरीक्षण केले. निसर्गात फिरले. खूप गमतीजमती केल्या.

 संध्याकाळी सहल परतली. सगळे एकमेकांना टाटा करून घरी निघाले. सरांनी अजयला हाक मारली अन् म्हणाले, ‘अजय, कशी झाली सहल? कसा गेला आजचा दिवस?’ अजय आनंदाने म्हणाला, ‘सर, खूप मस्त, खूप मजा आली. धमाल केली सर सहलीत. आजचा दिवस खूपच आनंदात गेला.’ सर खळखळून हसले. अजयच्या खांद्यावर हात ठेवत सर म्हणाले, ‘अजय, कोणताही वार हा वाईट नसतो. तू तर विज्ञानाचा अभ्यास करणारा विद्यार्थी आहेस अन् असल्या अशास्त्रीय गोष्टींवर विश्वास ठेवतोस?’ अजयची चलबिचल झाली. तो कावराबावरा होऊन सरांकडे पाहू लागला. सर पुढे म्हणाले, ‘अरे, विज्ञानाने किती प्रगती केली आहे. जग किती पुढे गेले आहे. रोज नवे नवे शोध लागताहेत आणि आपण असल्या खुळचट, बिनबुडाच्या कल्पना धरून बसायचे? बाळा, आपण काही खात असू, तर आवाज होतोच ना! स्वाभाविक नाही का हे? आणि मांजर सजीव आहे म्हटल्यावर ते इकडून तिकडे फिरणारच. एका जागेवर बसून तर राहू शकत नाही ना. तिच्या येण्या-जाण्याने आपल्याला कसला अडथळा येऊ शकतो? बसच्या टायरला काही अणकुचीदार रुतले तर बस पंक्चर होते. हो की नाही? अपशकुन वगैरे काही नसते. आणि बरं का बाळा, सगळे दिवस, वार चांगलेच असतात. मी तर म्हणेन, ज्या दिवशी आपण वाईट काम करू, दुसऱ्याला त्रास होईल असे वर्तन करू किंवा दुसऱ्याची मने दुखवू तो दिवस, तो वार वाईट म्हटला पाहिजे. समजले का?’

 अजयच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. आपण किती अशास्त्रीय विचार करतो हे त्याला जाणवले. त्याचे मत परिवर्तन झाले आणि स्वच्छ मनाने व विचाराने तो घरी निघाला.