संसर्गजन्य रोग
आईचा हात भाजून तिला झालेली जखम किंवा आजोबांची पाठदुखी दुसऱ्यांना होत नाही, परंतु फ्ल्यू, पडसे, नायटा, खरूज, कांजिण्या, गोवर अशा काही आजारांच्या बाबतीत रोग्यांपासून दूर राहण्याची काळजी घ्यावी लागते. या रोगांची एकाची दुसऱ्याला लागण होऊ शकते. अशा रोगांना संसर्गजन्य रोग म्हणतात.
असे रोग कशामुळे होतात ?
हे रोग सूक्ष्मजीवांमुळे होतात. अशा रोगाला कारणीभूत ठरणाऱ्या सूक्ष्मजीवांना रोगजंतू म्हणतात. प्रत्येक रोगास एक विशिष्ट रोगजंतू कारणीभूत ठरतो. शरीरात एखादया रोगाच्या जंतूंना प्रवेश मिळाला आणि ते शरीरात वाढू लागले, की रोग होतो.
एखादयाला झालेला रोग दुसऱ्याला कसा होतो ? एखादयाला पडसे झाले असेल तर त्याचे रोगजंतू त्या व्यक्तीच्या शिंक व खोकण्यातून हवेत मिसळतात. ते रोगजंतू दुसऱ्यांच्या शरीरात गेले, की त्यांच्यापैकी अनेकांना पडसे होऊ शकते. याला रोगप्रसार म्हणतात. टायफॉइडग्रस्त व्यक्तीकडून टायफॉइडचे (विषमज्वराचे) रोगजंतू निरोगी व्यक्तीच्या शरीरात गेल्याने टायफॉइडचा प्रसार होऊ शकतो.
रोगप्रसार
रोगाचा प्रसार कोणकोणत्या पद्धतीने होतो ?
हवेमार्फत रोगप्रसार
फ्ल्यूसारख्या रोगाचे जंतू रोग्याच्या थुंकीत असतात. रोग्याने थुंकल्याने, खोकल्याने किंवा शिकल्याने ते हवेत पसरतात. आसपासच्या लोकांच्या शरीरात हे जंतू श्वासावाटे शिरतात.
हवेवाटे छातीच्या व घशाच्या रोगांचा प्रसार होतो. उदाहरणार्थ, क्षय, स्वाईन फ्ल्यू इत्यादी. म्हणूनच खोकताना किंवा शिंकताना तोंडावर, नाकावर रुमाल धरायला सांगितले जाते.
पाण्यामार्फत रोगप्रसार
टायफॉइड,कॉलरा, जुलाबासारख्या आतड्यांच्या रोगांचे जंतू, तसेच काविळीचे जंतू रोग्याच्या विष्ठेमध्ये असतात. ही विष्ठा पाण्यात मिसळली, की हे रोगजंतूही पाण्यात शिरकाव करतात. अशा रोगजंतूंनी दूषित झालेले पाणी प्यायल्यामुळे हे रोगजंतू पाणी पिणाऱ्यांच्या आतड्यात जातात आणि रोगाची लागण होते. असा रोगप्रसार टाळण्यासाठी पाणवठ्यावर अंघोळ करणे, कपडे धुणे, नदीकाठी शौचासाठी बसणे, इत्यादी गोष्टी नेहमी टाळाव्यात.
अन्नपदार्थांमार्फत
एखादया समारंभात दूषित अन्न खाल्ल्याने गॅस्ट्रो किंवा जुलाबासारख्या रोगांची लागण झाल्याचे तुम्ही ऐकले असेल, म्हणजेच अन्नपदार्थांवाटे रोगप्रसार होतो. यालाच अन्नातून विषबाधा असे म्हणतात.
माश्या घाणीवर बसतात. रोगग्रस्त माणसाच्या विष्ठेवर माश्या बसल्या, की त्यांच्या पायांना आणि शरीराला विष्ठेतील रोगजंतू चिकटतात. याच माश्या खादयपदार्थांवर बसतात आणि ते रोगजंतू त्या पदार्थांमध्ये जातात. असे खाद्यपदार्थ खाल्ले, की खाणाऱ्याच्या शरीरात रोगजंतू शिरतात आणि रोगाची लागण होते. म्हणूनच अन्न नेहमी झाकून ठेवणे महत्त्वाचे असते.
खाद्यपदार्थ तयार करताना किंवा वाढताना ते हाताळले जातात. एखाद्या माणसाला आतड्याचा रोग झालेला असेल आणि शौचानंतर त्याने हात स्वच्छ धुतले नसतील, तर खाद्यपदार्थ हाताळताना त्याच्या हाताला चिकटलेले रोगजंतू अन्नपदार्थांत जातात. असे अन्नपदार्थ रोगप्रसारास कारणीभूत ठरतात. म्हणून असे खाद्यपदार्थ खाऊ नयेत. सर्व ठिकाणी स्वच्छता पाळणे, हे आरोग्यासाठी लाभदायक असते.
कीटकांमार्फत रोगप्रसार
विशिष्ट डास चावल्याने हिवतापाची म्हणजेच मलेरियाची लागण होते, हे तुम्हांला माहीत असेल. हिवताप झालेल्या रोग्यास विशिष्ट डास चावला, की रोग्याच्या रक्तातील हिवतापाचे जंतू डासाने शोषलेल्या रक्ताबरोबर डासाच्या शरीरात प्रवेश करतात. हा डास दुसऱ्या व्यक्तीला चावला की त्या व्यक्तीच्या शरीरात हिवतापाचे जंतू शिरतात आणि त्या व्यक्तीला हिवतापाची लागण होते. डास, पिसवांसारख्या कीटकांमुळे रोगप्रसार होतो, म्हणूनच अशा कीटकांची पैदास रोखली पाहिजे.
संपर्कामुळे रोगप्रसार
नायटा, खरूज त्वचेवर होणारे रोग आहेत. त्यांचे रोगजंतू त्वचेवर वाढतात. अशा रोग झालेल्या व्यक्तीच्या त्वचेशी स्पर्श झाला किंवा त्याचे कपडे दुसऱ्याने वापरले, तर त्यालाही तोच त्वचेचा रोग होऊ शकतो. म्हणूनच एकमेकांचे कपडे वापरणे टाळावे.
रोगाची साथ
फ्ल्यू, डोळे येणे अशा रोगांचे रोगजंतू हवेमार्फत झपाट्याने पसरतात. त्यामुळे एकाच वेळी अनेक लोकांना हे रोग होऊ शकतात. एखादया सामाईक स्रोताचे पाणी कॉलरासारख्या रोगाच्या जंतूंने दूषित झाले, तर ते पाणी पिणाऱ्या सर्व लोकांना कॉलरा होण्याचा धोका उद्भवतो. एखादया जागी मोठ्या प्रमाणावर डास होत असतील, तर तेथील अनेकांना हिवताप म्हणजेच मलेरिया होऊ शकतो.
एका ठिकाणच्या अनेक लोकांना एकाच वेळी एखादा संसर्गजन्य रोग झाला, तर या रोगाची साथ’ आली आहे, असे आपण म्हणतो. हवा, पाणी, अन्न व कीटक ही रोगप्रसाराची माध्यमे आहेत, म्हणून आपल्या अन्नात पाण्यात, हवेत रोगजंतू शिरणार नाहीत, याची सर्वांनी काळजी घेतली, तसेच रोगप्रसार करणाऱ्या कीटकांची पैदास रोखली तर रोगप्रसार टाळता येतो. रोगाची साथ टाळणे शक्य असते, म्हणूनच स्वच्छतेच्या सवयी लावून घेणे महत्त्वाचे असते.
रोग प्रतिबंध
रोग होऊ नये म्हणून केलेल्या उपायांना रोग प्रतिबंध म्हणतात.पाण्यावाटे होणारा रोगप्रसार टाळण्यासाठी जलशुध्दीकरण केंद्रात पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यात येते. गावांतील पाण्याच्या सार्वजनिक स्रोतांचे ब्लीचिंग पावडरचा वापर करून निर्जंतुकीकरण केले जाते. गॅस्ट्रो किंवा काविळीसारख्या रोगांची साथ पसरली, की पाणी उकळून पिण्याचा सल्ला दिला जातो.
साचलेल्या पाण्यावर डासांची पैदास होऊ नये, म्हणून शक्यतो पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. ते शक्य नसल्यास कीटकनाशकांचा वापर करतात. यामुळे मलेरियासारख्या रोगांच्या प्रसारास प्रतिबंध होतो.
क्षयासारख्या संसर्गजन्य रोगाची लागण झालेल्या रुग्णांना स्वतंत्र जागी ठेवण्यात येते. हॉस्पिटलमध्येही संसर्गजन्य रोग झालेल्यांसाठी खास विभाग असतात. रुग्णांनी वापरलेली भांडी, कपडे जंतुनाशकाने धुतले जातात. क्षयरोग्याची थुंकी एका भांड्यात जमा केली जाते. तिच्यावर फिनाइलसारखे जंतुनाशक टाकले जाते. या उपायांनी रोगप्रसार टळतो.
हवेतून पसरणाऱ्या रोगांचा प्रसार टाळण्यासाठी खोकताना, शिंकताना तोंडावर रुमाल धरावा. मोकळ्या जागी थुंकण्याचे टाळावे. असा रोग झालेल्या व्यक्तीजवळ राहावे लागत असेल, तर नाक व तोंड झाकले जाईल असा ‘मास्क’ वापरतात.
एखादया संसर्गजन्य रोगाची लागण घरात झाली, तर त्यासंबंधीची माहिती आरोग्यखात्यास देणे हिताचे असते. असे केल्याने रोगाची लागण इतरांना होऊ नये यासाठी योग्य ती काळजी घेणे शक्य होते.
लसीकरण
एखादया रोगाची साथ येते तेव्हा प्रत्येकाला तो रोग होतोच का? शरीरात रोगजंतू शिरतात, तेव्हा आपले शरीर
त्या जंतूंविरुद्ध लढा देते, म्हणजेच रोगाचा प्रतिकार करते. त्यामुळे बहुसंख्यवेळा शरीरात रोगजंतू शिरल्यावरही रोग होत नाही.
रोगप्रतिबंधाचा आणखी एक उपाय म्हणजे लसीकरण होय. लसीकरणामुळे शरीरात ठरावीक रोगाविरुध्द रोगप्रतिकार क्षमता विकसित होते.
मूल जन्माला आल्याबरोबर लगेच त्याला क्षयप्रतिबंधक लस टोचण्यात येते. मूल दीड महिन्यांचे झाले, की घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात आणि पोलिओ प्रतिबंधक लसींचे तीन डोस एक-एक महिन्याच्या अंतराने त्याला देण्यात येतात.
घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात प्रतिबंधक लस एकत्र बनवलेली असल्याने ती त्रिगुणी या नावाने ओळखली जाते. त्रिगुणी लस टोचली जाते, तर पोलिओ प्रतिबंधक लस तोंडावाटे दिली जाते.
सार्वजनिक आरोग्य सेवा सुविधा
साथीच्या व संसर्गजन्य रोगांस आळा बसावा, म्हणून राष्ट्रीय स्तरावर आरोग्य आणि समाजकल्याण कार्यक्रम हाती घेतले जातात.
सामुदायिक लसीकरणाचे कार्यक्रम राष्ट्रीय आरोग्य योजनेखाली राबवण्यात येतात. बालकांना तज्ज्ञ लोकांकरवी लस टोचण्याची व्यवस्था केली जाते. यासाठी खास शिबिरे आयोजित करण्यात येतात.
गावोगावी प्राथमिक आरोग्य केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. फिरता दवाखाना, अपंग कल्याणनिधी तसेच रुग्णवाहिका अशा सेवा तसेच आरोग्य संस्था आहेत. आरोग्यसंस्थांमध्येही रक्त व लघवी तपासणी तसेच एक्स-रे, स्कॅन, सोनोग्राफीच्या सुविधाही उपलब्ध आहेत. यांमुळे रुग्णांना तत्काळ आरोग्यसेवा मिळू शकते.
पिण्याच्या पाण्याची, तसेच अन्नपदार्थांची हाताळणी कशी करावी याबाबतचे शिक्षण लोकांना देण्यात येते. परिसर स्वच्छ ठेवण्यासंबंधीचा आग्रह धरला जातो. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास आता कायदयाने मनाई केलेली आहे. रोगप्रसार होऊ नये, हे या मनाईमागचे मुख्य कारण आहे. प्रसारमाध्यमांद्वारे आरोग्यासंबंधी जनजागृती करण्यात येते.