२५.नवा पैलू

आजी आपल्या चार-पाच वर्षांच्या नातवाला घेऊन बसमधून उतरल्या. आभाळ अगदी गच्च भरून आलेले हाेते. क्षणभरातच पाऊस कोसळणार असे दिसत होते. स्टँडपासून दवाखाना अगदी जवळ असल्याने आजी नातवाला घेऊन चालत निघाली. आजीचा नातू दिगू आजूबाजूला पाहत हळूहळू चालत होता.

 ‘‘चल रे बाबा लवकर लवकर. पाऊस सुरू व्हायच्या आत पोहोचलं पाहिजे दवाखान्यात.’’ आजी दिगूला म्हणाली. पण…. ! ‘त्याला सांगून काय उपयोग ? एेकू कुठं येतंय त्याला ? आजी खंत करत पुटपुटली आणि स्वतःशीच पुटपुटत पुढे चालू लागली.

दवाखान्याच्या बंद दाराकडे आजीचे लक्ष गेले. आता कुठे थांबणार ? आजी विचारात पडली. एवढ्यात रिक्षाचा जोराचा आवाज ऐकू आला. तिने मागे वळून पाहिले, तर रिक्षाच्या समोर दिगू उभा होता आणि रिक्षावाला त्याला काहीतरी बोलत होता, ‘‘अरे पोरा, केव्हाचा आवाज देताेय; पण ढिम्म हालत नाही ! बहिरा आहे की काय?’’ रिक्षावाल्याचे बोलणे एेकून आजीच्या डोळ्यांत चटकन पाणी आले.

ज्या दिवशी दिगू बहिरा आहे असे लक्षात आले, त्या दिवसापासून त्याचे घरदार सर्व काळजीत पडले आहे. आता गावातल्या लोकांच्या सांगण्यावरून आजी त्याला घेऊन वेड्या आशेने शहराच्या डॉक्टरकडे आली होती. दवाखाना बंद होता. बाहेर मुसळधार पाऊस. तशीच दिङ्मूढ होऊन ती भिंतीच्या आडोशाला थांबून राहिली. इतक्यात एक तरुण मुलगी ‘वत्सला’ आजीच्या शेजारी येऊन उभी राहिली. आजी शहराच्या डॉक्टरबद्दल स्वतःशीच बोलत होती. ते सारे वत्सलेने एेकले होते. रिक्षावाल्याने दिगूला हटकले होते, तेही तिने पाहिले होते. काहीतरी मनाशी ठरवून ती आजींना म्हणाली,

 ‘‘कोणत्या गावाला जायचं आजी? पाऊस तर फार पडतोय.’’

‘‘कोण ग बाई तू ?’’

‘‘माझं नाव वत्सला आहे. शिक्षिका आहे मी.’’ वत्सला म्हणाली.

 ‘‘अस्संहोय ? मला वाटलं, तू एखादी डॉक्टरच आहेस. ज्याच्यासाठी मी शहराला आले होते, तो दवाखाना बंद आहे. काय करावं कळेनासं झालंय बघ.’’ आजी बोलली.

‘‘एवढ्या पावसात कुठे जाता ? या वादळात झाडंबिडं रस्त्यात पडतात. आजी, त्यापेक्षा माझ्या घरी चला.’’

 ‘‘नको, घरी या पोराची आई वाट पाहील.’’

‘‘पाहू द्या. आजची रात्र माझ्याकडे राहा. उद्या मी तुम्हांला जे काय दाखवीन ते पाहून हसत घरी जाल.’’ वत्सलाने आजीला मोहात पाडले.

आजी थोडीशी विचारात पडली आणि मनाशी काहीतरी ठरवून म्हणाली, ‘‘अस्सं होय ? हसणं मिळणार असेल तर तुझ्या घरी येते मी. गेली पाच वर्षे झालीत, हसणंविसरलो आम्ही !’’

पाऊस ओसरल्यावर आजी, दिगू वत्सलाच्या घरी गेले. जेवणे झाली. गप्पा मारणे सुरू झाले.

वत्सला ही मूक-बधिर मुलांच्या शाळेत शिक्षिका होती. अत्यंत आनंदी, हसऱ्या स्वभावाची.

 तिने विचार केला, की बोलकी मुले शिकतात, हसतात, खेळतात, आनंदी जीवन जगतात. त्यांना कोणीही शिकवील; पण ज्यांच्या वाट्याला बहिरेपणाचे, मुकेपणाचे दुःख आले आहे, त्यांना कोण शिकवणार, कोण सुखावणार, त्या मूक कळ्या कोण उमलवणार ?

त्यांच्यातील स्वत्व जागवून त्यांच्या चेहऱ्यावर अभिमानाचे, विश्वासाचे हास्य फुलवायचे, हा पक्का निर्धार करूनच ती मूक-बधिर मुलांच्या शाळेत शिक्षिकेचे काम करत होती.

आजीशी गप्पा मारत तिने त्यांची सर्व माहिती काढून घेतली. आजीपण कितीतरी दिवसांनी असे मनमोकळे बोलायला मिळाल्यागत बोलत होती. ‘‘आमच्याकडे कोणीच असं मूक-बधिर नाही पोरी. त्यामुळे आम्हांला फार धक्का बसला.’’ आजी हळहळली. वत्सलाला खूप वाईट वाटले.

‘‘ऐकू येत नाही म्हणजे सारे संपले असे नाही. शहरात त्याच्या कानांची तपासणी करून त्याचा श्रवणऱ्हास वेळीच पाहिला असता, त्यानुसार श्रवणयंत्र दिले असते, तर आतापर्यंत तो ऐकू-बोलू शकला असता. किती लवकर हे व्हायला पाहिजे होते. मुलांची पहिली पाच वर्षे म्हणजे भाषा शिकण्याचे वय.’’ वत्सला म्हणाली.

दुसऱ्या दिवशी आजीबाईंना घेऊन वत्सला शाळेत आली. मुक्या मुलांची शाळा असते, हे पाहून आजीला आश्चर्य वाटले. हेडफोन्स लावून बसलेली मुले, माईकमधून शिकवणाऱ्या बाई, हे सगळे आजीला नवलच वाटत होते.

शाळेतील एक बाई एका छोट्या मुलाला यंत्राच्या साहाय्याने गोष्ट शिकवत होत्या, हे वत्सलाने आजीला दाखवले. आजी उत्सुकतेने बघत होत्या. बहिऱ्या मुलाच्या तोंडून बाहेर पडलेले उच्चार टिपायला त्यांचे कान सावध झाले होते आणि मूल बाईंसारखेच हसत हसत बोलले तेव्हातर आजींच्या अंगभर आनंदलहरी उसळल्या.

 आजी खूपच उल्हसित झाल्या. वत्सला त्यांना यंत्राची माहिती करून देत होती, ‘‘यंत्रामुळे बहिऱ्या मुलाला आवाज ऐकू येतो. आवाज आल्याच्या आनंदाने ते मूल आपल्या चेहऱ्याकडे पाहते, आपल्या ओठांच्या हालचाली पाहते व तसे बोलण्याचा प्रयत्न करते.’’ तिने त्यांना हिअरिंग एड्स दाखवले. इंडक्शन लूप सिस्टीमची खोली दाखवली अन् हळूच आजीला विचारले, ‘‘काय आजी, मग दिगूला ठेवायचं का आमच्या शाळेत ?’’

 आजी खुदकन हसली अन्म्हणाली, ‘‘होय गं,

माझा दिगूयेऊ दे तुमच्या शाळेत.’’

 ‘‘पण….’’ असे पुटपुटत आजी एका वेगळ्या स्वप्नात हरवली.

आजीला नातवाच्या दुःखावरून सर्वच मुक्यांच्या दुःखाची जाणीव झाली होती. तिच्या मनात विचार आला, ‘आपल्याही खेड्यात अशी मूक-बधिर शाळा काढली तर…. !’

 मनाशी काहीतरी ठरवून आजी म्हणाली, ‘‘पोरी, माझ्या गावी अशी शाळा काढून देशील ?’’

‘‘आजी, शाळा काढायची म्हणजे जागा पाहिजे, पैसा पाहिजे. यंत्रेकिती महाग ?’’ वत्सला म्हणाली. ‘‘वत्सलाबाई, आम्ही खेड्यातले लोक शिक्षणानं अडाणी राहिलो; पण कष्टानं आम्ही शेती खूप जमवली. एक शेत विकलं, तर लाखाला जाईल.’’ आजी म्हणाली.

 आता मात्र वत्सला थक्क होऊन ऐकत होती. ‘‘म्हणजे शेत विकून एवढा पैसा देणार तुम्ही मुक्यांच्या शाळेला ?’’ ‘‘हो देणार ! अगंबाई, माझ्या गावची मुलं शाळेत जातील, शिकतील, त्यांना वळण लागेल. स्वतःच्या पायांवर उभी राहतील.’’

आजीने या मूक-बधिरांसाठी काही करण्याचे ठरवले आणि तिने तसे बोलून दाखवले. आजीच्या विचारातील या नव्या पैलूचे दर्शन होताच वत्सलाचे अंतःकरण भरून आले. ती म्हणाली, ‘‘आजी, मी म्हटलंहोतं ना, उद्या मी जे दाखवीन. ते पाहून तुम्ही हसत घरी जाल म्हणून !’’

 ‘‘होय गं वत्सला, त्या कालच्या पावसाने माझ्यावर फार उपकार केले. मी शहरातल्या डॉक्टरकडे निघाले होते. तुझ्या रूपात मला डॉक्टरच भेटला बघ.’’ आजी हसू लागल्या. आजीच्या उत्तराने वत्सलाही आनंदित झाली. तिलाही हसू आले.

कालपासून ही आपल्या आईसारखी दिसणारी बाई हसतेय, आजी हसतेय हे पाहून कसे का होईना दिगूच्या चेहऱ्यावर हसू उमटले !