निंबा कडूपण देत असे कोण । युक्षा गोडपण कवण करी ।।१।।
बीज तैसे फळ गोडीचा निवाडा । हा अर्थ उघडा दिसतसे ।।२।।
इंद्रवनामुळी कोण घाली विष । अमृत आम्रास देत कवण ।।३।।
बचनागाआंगी विष कोण लावी । सुगंधता द्यावी नलगे पुष्पा ।।४।।
तीक्ष्ण मोइरी करितसे कोण । खारीक निर्माण मधुर का हो ।।५।।
बहेणि म्हणे बीजाऐसे येते फळ । उत्तम वोंगळ परीक्षावे ।।६।।
– संत बहिणाबाई
रात्रंदिवस मन करी तळमळ । बहु हळहळ वाटे जीवा ।।१।।
काय करूं आतां पाउलें न दिसती । पडिलीसे गुंती न सुटे गळें ।।२।।
बहु हा उबग आला संसाराचा । तोडा फांसा याचा मायबापा ।।३।।
निर्मळा म्हणे आतां दुजेपण । चोखियाची आण तुम्हां असे ।।४।।
– संत निर्मळा
जैसी हरळांमाजि रत्नकिळा । कि रत्नांमाजि हिरा निळा ।
तैसी भासांमाजि चोखळा । भासा मराठी ॥१॥
जैसी पुस्पांमाजि पुस्प मोगरी । कि परिमळांमाजि कस्तुरि ।
तैसी भासांमाजि साजिरी । मराठिया ॥२॥
पखिआंमधें मयोरु । व्रुखिआंमधें कल्पतरु ।
भासांमधें मानु थोरु । मराठियेसि ॥३॥
तारांमधें बारा रासी । सप्त वारांमाजि रवी ससी ।
यां दीपिचेआं भासांमधें तैसी । बोली मराठिया ॥४॥
– फादर थॉमस स्टीफन्