आंधळ्याची काठी । अडकली कवणें बेटीं ॥ १ ॥
माझिये हरणी । गुंतलीस कोणे रानीं ।। २ ।।
मुर्के मी पाडस । चुकलें भोवें पाहें वास ।। ३ ।।
तुजवीण काय करू । प्राण किती कठीं धरूं ॥। ४ ॥
आतां जीव जाऊं पाहे । धांव घालीं माझे आये । ।। ५ ।।
माझी भेटवा जननी। संता विनवी दासी जनी ।। ६ ।।
संत जनाबाई
धन कोणा कामा आलें । पहा विचारूनि भले ।। १ ।।
ऐसें सकळ जाणती । कळोनियां आंधळे होती ।। २ ।।
स्त्रिया पुत्र बंधु पाही । त्याचा तुझा संबंधु नाहीं ।। ३ ।।
सखा पांडुरंगावीण । सेना म्हणे दुजा कोण ।। ४ ।।
– संत सेनामहाराज
अभ्यासिले वेद झाला शास्त्रबोध ।
साधिल्या विविध नाना कळा ।। १ ।।
प्रेमाचा जिव्हाळा जंव नाहीं अंतरीं ।
तंव कैसा श्रीहरि करील कृपा ।। २ ।।
हित तें आचरा हित तें विचारा |
नाम भाव धरा जाणतेनो ।। ३ ।।
नामा म्हणे तरी विठो येऊनि भेटे ।
कायाच पालटे कैवल्य होय ॥। ४ ॥
संत नामदेव