२. पृथ्वीचे फिरणे

भोवरा स्वतःभोवती फिरतो. स्वतःभोवती फिरणारी कोणतीही वस्तू प्रत्यक्षात एका अदृश्य रेषेभोवती फिरत असते. वस्तूच्या स्वतःभोवती फिरण्याला ‘परिवलन’ म्हणतात, तर ती वस्तू ज्या अदृश्य रेषेभोवती फिरते तिला त्या वस्तूच्या परिवलनाचा ‘अक्ष’ किंवा ‘आस’ म्हणतात.

पृथ्वीचे परिवलन

ओळंबा आणि पृथ्वीचा अक्ष या दोन रेषा एकमेकांशी कोन करतात हे तुमच्या लक्षात येईल, म्हणजेच पृथ्वीचा अक्ष कललेला आहे. अशा

अक्ष कललेल्या स्थितीमध्येच पृथ्वी परिवलन करत असते. चित्रात पृथ्वीचा अक्ष NS या रेषेने दाखवला आहे. ही रेषा पृथ्वीच्या मध्यबिंदूतून जाते. N व S या बिंदूंना पृथ्वीचे ध्रुव म्हणतात. हा पृथ्वीचा उत्तर ध्रुव आहे, तर S हा पृथ्वीचा दक्षिण ध्रुव आहे.उत्तर आणि दक्षिण ध्रुवांच्या मध्यावर पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक वर्तुळ काढल्यास पृथ्वीचे दोन समान भाग होतात. पृथ्वीवरील या काल्पनिक वर्तुळाला ‘विषुववृत्त’ म्हणतात. वरील पृथ्वीगोल पहा. विषुववृत्तामुळे होणाऱ्या पृथ्वीच्या दोन समान भागांना उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध म्हणतात.

पौर्णिमा आणि अमावास्या

        चंद्र पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो आणि पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करते; परंतु या दोन भ्रमणकक्षा एकमेकांना छेदतात, म्हणून सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे एकाच सरळ रेषेत नेहमीच असतात असे नाही.
आपल्याला चंद्राच्या पृष्ठभागाचा पृथ्वीकडील अर्धा भाग दिसतो, म्हणजे पृथ्वीवरून आपल्याला चंद्राची नेहमी एकच बाजू दिसते.
चंद्र स्वयंप्रकाशित नाही. सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडल्यामुळे तो आपल्याला पृथ्वीवरून दिसतो. पौर्णिमेच्या रात्री आपल्याला चंद्राचा पृथ्वीकडील पूर्ण भाग दिसतो. अमावास्येच्या रात्री चंद्राचा कुठलाच भाग दिसत नाही.
पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत चंद्राचा पृथ्वीवरून दिसणारा प्रकाशित भाग कमी कमी होत जातो. अमावास्येपासून पौर्णिमेपर्यंत तो पुन्हा वाढत वाढत जातो. यालाच आपण ‘चंद्राच्या कला’ म्हणतो.

चांद्रमास आणि तिथी
पौर्णिमेनंतर चंद्राचा पृथ्वीकडील प्रकाशित भाग कमी कमी होऊ लागतो. १४-१५ दिवसांनी पुन्हा अमावास्या येते. या पंधरवड्याला ‘कृष्णपक्ष’ म्हणतात. अशा प्रकारे एका अमावास्येपासून पुढच्या अमावास्येचा काळ सुमारे २८ ते ३० दिवसांचा असतो. या काळाला ‘चांद्रमास’ म्हणतात. चांद्रमासातील प्रत्येक दिवसाला ‘तिथी’ म्हणतात.