२. सजीव सृष्टी

सजीवांची लक्षणे

आपल्या सभोवताली अनेक प्रकारचे प्राणी आणि वनस्पती आढळतात. त्यांमध्ये काही बाबतींत साम्य, तर काही बाबतींत भेद दिसून येतात. तरीही ते सर्व सजीव आहेत हे आपण काही ठराविक वैशिष्ट्यांच्या आधारे ओळखतो. निर्जीवांमध्ये ही वैशिष्ट्ये दिसून येत नाहीत. ही वैशिष्ट्ये म्हणजेच सजीवांची लक्षणे आहेत. या लक्षणांचा आपण अभ्यास करूया.

बाळाची वाढ होऊन त्याचे प्रौढ स्त्री किंवा पुरुषात रूपांतर होते. वाढीच्या काळात उंची, वजन, ताकद इत्यादींमध्ये वाढ होत असते. सर्व प्राण्यांची अशी वाढ होऊन ते प्रौढ होण्यास ठराविक कालावधी लागतो. मानवाच्या अशा वाढीस सर्वसाधारणपणे १८ ते २१ वर्षे लागतात.

कोंबडी, गाय, कुत्रा यांची पिल्ले प्रौढ होण्यास किती कालावधी लागतो याबाबत माहिती मिळवा.

करून पहा.

कुंडीमध्ये लावलेल्या एखादया रोपट्याच्या टोकाशी दोरा बांधा व तो सरळ वरती एका खुंटी किंवा खिळ्याला ताणून बांधा. दहा ते पंधरा दिवसांनी निरीक्षण करा. काय दिसते?

वनस्पतीची झालेली वाढ कशामुळे आपल्या लक्षात येते ? सर्व वनस्पतींमध्ये प्रामुख्याने खोडाची जाडी आणि उंची वाढत असते. वाढ होत असताना काही वनस्पतींना फांदया फुटतात तर काहींना फांदया फुटत नाहीत.

सर्व सजीवांची वाढ होत असली तरी प्राण्यांची वाढ ठराविक काळापर्यंतच होत असते. वनस्पतींची वाढ मात्र त्या जिवंत असेपर्यंत होत राहते. सजीवांची वाढ शरीराच्या अंतर्भागातून होत असते म्हणजे शरीराच्या सर्व भागांची वाढ होत असते.

वाढीसाठी अन्नाची आवश्यकता

वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. जमिनीतील पाणी, आणि हवेतील कार्बन डायॉक्साइड यांच्या साहाय्याने अन्ननिर्मिती करतात. ही प्रक्रिया वनस्पतींच्या पानांमध्ये होत असते. पानांमधील हरितद्रव्याच्या मदतीने सूर्यप्रकाशात ही प्रक्रिया होत असल्याने या अन्ननिर्मितीच्या प्रक्रियेला ‘प्रकाशसंश्लेषण’ म्हणतात. या क्रियेमध्ये वनस्पती ऑक्सिजन वायू बाहेर टाकतात. वनस्पतींमधील हरितद्रव्यामुळे त्या प्रामुख्याने पोषक हिरव्या रंगाच्या दिसतात.

प्राण्यामध्ये मात्र हरितद्रव्य नसते. प्राणी स्वत चे अन्न तयार करत नाहीत. ते त्यांच्या अन्नाचा शोध घेतात. शेळी, मेंढी, घोडा यासारखे प्राणी गवत खातात, तर वाघ, सिंहासारखे जंगली प्राणी वनस्पतींवर जगणाऱ्या प्राण्यांची शिकार करून अन्नाची गरज भागवतात.

उत्सर्जन

प्राण्यांच्या शरीरात होणाऱ्या अनेक क्रियांमधून निरुपयोगी, टाकाऊ पदार्थ तयार होतात. त्यांना ‘उत्सर्ग’ म्हणतात. हे उत्सर्ग शरीराबाहेर टाकण्याच्या क्रियेला ‘उत्सर्जन’ म्हणतात. प्राण्यांमध्ये उत्सर्जनाचे विविध अवयव असतात.

वनस्पतीदेखील उत्सर्जन करतात. उदाहरणार्थ, काही वनस्पतींची विशिष्ट ऋतूत पानगळ होते. वनस्पतींच्या पानांमध्ये साठलेले उत्सर्ग त्या पानांबरोबर गळून पडतात.

करून पहा.

एक प्लॅस्टिकची पारदर्शक पिशवी घ्या. चित्रात दाखवल्याप्रमाणे वनस्पतीच्या एका पानावर ती बांधा. सहा ते सात तासांनंतर निरीक्षण करा. काय दिसते?

पिशवीच्या आतील बाजूस पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात म्हणजेच वनस्पती बाष्परूपात पाण्याचे उत्सर्जन करतात.

उत्सर्जन हे सजीवांचे लक्षण आहे.

 श्वसन

१. स्वतःच्या नाकासमोर हात धरा किंवा छातीवर हात ठेवा. काय जाणवते ?

२. झोपलेल्या कुत्र्यामध्ये पोटाची कोणती हालचाल दिसून येते?

सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. ऑक्सिजन शरीरात घेणे व त्याच्या वापरातून शरीरात तयार होणारा कार्बन डायॉक्साइड वायू शरीराबाहेर सोडणे यालाच ‘श्वसन’ म्हणतात. मासा, साप, उंदीर, अळी, झुरळ अशा प्राण्यामध्ये श्वसनासाठी ठराविक इंद्रिये असतात, तर वनस्पती त्यांच्या खोड व पानांवरील सूक्ष्म छिद्रावाटे श्वसन करतात.

श्वसन हे सजीवांचे लक्षण आहे..

अन्नग्रहण आणि त्यामुळे होणारी वाढ हे सजीवांचे लक्षण आहे.

तुम्ही हे अनुभवले आहे का? या क्रिया घडल्यानंतर काय बदल जाणवतात ?

१. डोळ्यांवर अचानक प्रकाश पडला.

२. हाताला अचानक कोणी चिमटा काढला किंवा टाचणी टोचली.

३. लाजाळूच्या पानांना हात लावला.

४. दिवस मावळल्यावर अंगणातील अथवा रस्त्यावरील विजेचे दिवे लागले व भोवती कीटक जमा झाले.

चेतनाक्षमता व हालचाल

चेतनेला प्रतिसाद देताना सजीवांमध्ये विविध क्रिया होतात. तुम्ही गाई, म्हशींच्या गोठ्यात अचानक प्रवेश केल्यावर त्यांचे उभे राहणे, इकडून तिकडे फिरणे, एखाद्या गाईचे हंबरणे या सर्व त्यांच्या हालचाली आहेत.

अंगणात लावलेली वेलसुद्धा आधाराच्या दिशेने झुकते. कुंडीमध्ये लावलेली वनस्पती खिडकीत ठेवली तर सूर्यप्रकाशाकडे | झुकलेली दिसते. म्हणजेच तिची हालचाल होते. सजीवांमध्ये हालचाल ही स्वयंप्रेरणेने होते.

सभोवताली घडलेली घटना म्हणजे चेतना व त्यामुळे सजीवांनी केलेली हालचाल म्हणजे प्रतिसाद होय. चेतनेला प्रतिसाद देण्याच्या २. क्षमतेला चेतनाक्षमता म्हणतात

चेतनाक्षमता हे सजीवांचे लक्षण आहे.

प्रजनन किंवा पुनरुत्पादन

सजीव स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करतात. काही सजीव पिलांना जन्म देतात, तर काही अंडी घालतात. त्यांतून पिलांचा जन्म होतो. वनस्पतींच्या बिया, खोडे, पाने यांपासून वनस्पतींची नवीन रोपे तयार होतात.सजीवांच्या स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करण्याच्या क्रियेला प्रजनन किंवा पुनरुत्पादन म्हणतात. प्रजनन हे सजीवांचे लक्षण आहे.

 ठराविक आयुर्मान

जीवनकालाच्या ठराविक टप्प्यावर सजीव प्रजननक्षम होतात. काही काळानंतर पुढे त्यांचे अवयव क्षीण होत जातात आणि कालांतराने त्यांचा जीवनकाल संपतो म्हणजेच सजीव मृत्यू पावतात. विविध प्राणी आणि वनस्पतींचे आयुर्मान म्हणजेच जीवनकाल वेगवेगळे आहेत. उदाहरणार्थ कुत्रा या प्राण्याचे आयुर्मान साधारणपणे १२ ते १८ वर्षे असते तर शहामृग हा पक्षी सुमारे ५० वर्षे जगतो.

सजीव नेमके कसे आहेत, ते कसे तयार झाले आहेत, कशापासून तयार झाले आहेत, असे प्रश्न तुम्हांला पडले असतील.

मधमाश्यांचे पोळे, एखादी भिंत यांचे निरीक्षण करा. ते कशाचे बनलेले असतात ?

मधाच्या पोळ्याचे लहान लहान भाग म्हणजे खण किंवा कप्पे तुम्हांला दिसले असतील. हे खण एकमेकांना जोडले गेल्याने मधाचे पोळे तयार होते… घराच्या भिंतीसुद्धा विटांनी बांधलेल्या असतात. या सर्व विटा एकमेकांशी जोडल्या की भिंत तयार होते.

पेशीमय रचना

सजीव ज्या लहान लहान घटकांनी बनलेले असतात. त्यांना पेशी म्हणतात. सजीवांच्या शरीरातील सर्व क्रिया या सूक्ष्म पेशींच्या साहाय्यानेच पार पडतात.

काही सजीव एकाच पेशीपासून बनलेले असतात. त्यांना एकपेशीय सजीव म्हणतात, तर जे सजीव अनेक पेशींचे बनलेले असतात त्यांना बहुपेशीय सजीव असे म्हणतात. अमिबा व काही सूक्ष्मजीव हे एकपेशीय सजीव आहेत, तर मानव, गाय, उंदीर, झुरळ, हत्ती, वडाचे झाड, कांदयाचे रोप हे सर्व बहुपेशीय सजीव आहेत. सजीव एकपेशीय असो अथवा बहुपेशीय, सजीवांतील सर्व लक्षणे प्रत्येक पेशीमध्ये दिसतात.

 उपयुक्त सजीव

घरगुती तसेच औदयोगिक उपयोगासाठी वनस्पती वापरण्यात येतात. जसे मेथी, बटाटा, भेंडी, सफरचंद, केळी यांचा वापर अन्नासाठी, तर अडुळसा, हिरडा, बेहडा, शतावरी यांचा वापर औषधासाठी केला जातो. प्राणीही आपल्याला असेच उपयोगी पडतात. कुत्रा, मांजर, गाय, म्हैस असे प्राणी घरगुती उपयोगासाठी पाळले जातात. मासे, मेंढी, कोंबड्यांचा उपयोग अन्नासाठी करतात, तर घोडा, बैल, उंट यांसारखे प्राणी विविध व्यवसायांसाठी उपयोगी पडतात. गांडूळ हा प्राणी शेतीसाठी अत्यंत उपयोगी आहे.

अपायकारक सजीव

आपल्या सभोवताली असणाऱ्या काही वनस्पती व प्राणी मानवाला अपायकारक असतात. उदाहरणार्थ डास, माशी यांच्यामुळे रोगांचा प्रसार होतो. झुरळे, उंदीर, घुशी हे अन्नाची नासाडी करतात. उवा, गोचिड यांमुळे अनेक रोग पसरतात तर काही प्रकारच्या विषारी पाली, कोळी, साप, विंचू चावल्यास मृत्यूही उद्भवू …

 हिंस्र सजीव

जंगलात राहणारे जे प्राणी इतर प्राण्यांची शिकार करून खातात त्यांना हिंस्र प्राणी म्हणतात. उदाहरणार्थ वाघ, सिंह, लांडगे, बिबट्या. असे प्राणी काही वेळेस जंगलतोडीमुळे अन्न मिळवण्यासाठी मानववस्तीत शिरतात आणि मोठ्या प्रमाणात पाळीव प्राणी, मानव यांचे बळी घेतात.