२ सायकल म्हणते, मी आहे ना!

मी आहे सायकल! काही लोक मला दुचाकीही म्हणतात. तसं म्हटलं तर माझा जन्म १६९० चा. फ्रान्स देशातील एम्. डी. सिव्हर्क हे माझे जन्मदाते. १८७६ साली एच्. जे. लॉसन यांनी मला गती यावी, म्हणून ेडलला साखळीची दंततबकडी बसवली; पण मला खरा वेग आला तो रबरी टायरमुळे. १८८७ साली जॉन बॉइड डनलॉप यांनी ते शोधून काढले होते. पहिली दोनशे वर्षे मी रखडत चालले; पण पुढची शंभर-दीडशे वर्षे मी कधी थांबले नाही.

माझा प्रचार-प्रसार आणि वापर खूप मोठ्या प्रमाणात झाला. जगातील असा एकही देश नाही, की जेथे माझा वापर होत नाही. लहान मुलांचे पहिले वाहन खेळण्यातला लाकडी घोडा असेल; पण दुसरे वाहन मीच आहे. आई-वडील आपल्या मुलांना सायकल हमखास आणून देतात. का माहीत आहे? एक तर किंमत माफक आणि अपघाताची शक्यता एकदम कमी! तुम्ही त्यावरून पडलात तरी खरचटेल, थोडीशी दुखापत होईल, अन् ती लगेच बरी होईल, मात्र तुम्ही त्यातून धडा शिकाल. एकदा का तुम्हांला आत्मविश्‍वास आला, की मग तुमची माझी संगत कायमची जुळते.

आई तुम्हांला म्हणते, ‘जा दुकानातून साबण घेऊन ये.’ तुम्ही कंटाळा करत नाही. मला बाहेर काढता अन् ट्रिंग ट्रिंग करत माझ्यावर स्वार होऊन दुकानात जाता. साबण आणता, कधी भाजीपाला, कधी आजोबांच्या औषधांच्या गोळ्या तर कधी दूध आणता. घरात मी असले, की अशी छोटी-मोठी कामे कशी पटापट होतात, नाही का?

कार-बाइक चालवायची असेल, तर त्यासाठी खास चालक परवाना काढावा लागतो. माझ्यासाठी त्याची मुळीच गरज नाही. लहान मुला-मुलींपासून आजी-आजोबांपर्यंत कोणीही मला चालवू शकतं अन् कधी आडरस्त्याला पंक्चर झालेच, तर मला हातांत धरून आणायला काही अवघड नाही, कारण मी आहे सडपातळ आणि हलकीफुलकी. कार आणि बाइकचा वेग माझ्यापेक्षा जास्त आहे हे मान्य. खूप लांब जायचं असेल किंवा काही तातडीचे काम असेल, तर त्यांचा वापर जरूर करावा; पण शाळेला, बाजाराला, ऑफिसला जायचं असेल तर एवढ्या वेगाची काय गरज? सरळ माझ्यावर स्वार व्हा आणि कमी अंतरावरचा प्रवास सुखद करा.

मी तुमच्यासाठी दोन दृष्टींनी लाभदायक आहे, वैयक्तिक आणि सामाजिक! कसे ते सांगते. हे पाहा, तुम्ही रोज मला नियमितपणे चालवलं तर तुम्हांला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही. घाम येईपर्यंत मला चालवल्यानं तुमची फुप्फुसे अधिक कार्यक्षम होतात, मांसपेशी तंदुरुस्त राहतात. घाम निघाल्याने जादा मेद जळून जातो व प्रतिकारशक्ती वाढते आणि तुमच्या पायांचे स्नायू बळकट होतात. हा झाला आरोग्याचा फायदा. माझी किंमत तशी माफकच, त्यामुळे तुमचे पैसे वाचतात. माझ्या दुरुस्तीचा खर्चही फार होत नाही. मला पेट्रोल, डिझेल लागत नाही. त्यातूनही पैसे वाचतात. शिवाय इंधन बचतही होते. माझ्यासाठी पार्किंगला फारशी अडचण येत नाही. या वैयक्तिक लाभांबरोबर मी सामाजिक व राष्ट्रीय लाभांनाही हातभार लावते. तो कसा हे ऐकायचंय? आपल्या देशाला पेट्रोल, डिझेल, रॉकेल परदेशातून विकत घ्यावे लागते, त्यामुळे आपले चलन परदेशात जाते. ते वाचवायला हवे.

वाहनांची संख्या वाढली, की वायू प्रदूषण वाढते. वाहतूक कोंडी होते. मोठ्या शहरात ह्या समस्या आता जीवघेण्या ठरत आहेत. तुम्ही सगळ्यांनी सावध व्हायला पाहिजे. पर्याय नसता तर गोष्ट वेगळी; पण मी आहे ना त्याला पर्याय! प्रदूषण टाळण्यासाठी वाहतूक क्षेत्रात माझा वापर जगभर होत आहे. पॅरिससारख्या अनेक शहरांत आज हजारो लोक आनंदाने माझा वापर करतात. अरे हो, मी आता बरीच आधुनिक झालेय बरं. वेगवेगळ्या रूपांत मी तुम्हांला भेटू शकते. मुळातली मी बिनगिअरची. आता मला गिअरपण लागले. शर्यतीसाठी माझी बांधणी वेगळी असते अन् पर्यटनासाठी वेगळी. तुमची जशी आवड तशी करा माझी निवड! चला तर मग धूम ठोकूया!