२. स्थान-विस्तार

पुढे दोन देशांचे ध्वज व काही सूचक विधानेदिली आहेत. त्यांचा वापर करा. त्या आधारेहे देश कोणते ते ओळखा. त्यांपैकी एक देश तर तुम्ही सहज ओळखू शकाल आणि दुसरा देशही तुम्हांला ओळखता येईल.

सूचक विधाने

 l जागतिक लोकसंख्येत दुसऱ्या क्रमांकावरील देश

l मसाल्याच्या पदार्थांसाठी हा देश जगप्रसिद्ध आहे-

l क्रिकेट हा खेळ या देशात लोकप्रिय आहे-

 

l सांबा नृत्यप्रकारासाठी हा देश प्रसिद्ध आहे-

l ‘जगाचा कॉफी पॉट’ असे या देशाला संबोधले जाते-

l फुटबॉल हा खेळ या देशात लोकप्रिय आहे

देशाचे नाव – भारतीय प्रजासत्ताक

राजधानीचे नाव – नवी दिल्ली

स्थान, विस्तार व सीमा – भारताचे स्थान पृथ्वीवर उत्तर व पूर्व गोलार्धात आहे. आशिया खंडाच्या दक्षिण भागात हा देश आहे.

आकृती २.१ च्या साहाय्याने भारताच्या मुख्य भूमीचा विस्तार शोधा. अंशाचे मूल्य गाळलेल्या जागांमध्येलिहा. ……° ४’ उ. ते ….° ६’ उ. अक्षवृत्त व ……° ७’ पू. ते ……° २५’ पू. रेखावृत्त. भारताचे सर्वांत दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉइंट हे आहे. ते ६°४५’ उत्तर अक्षवृत्तावर आहे. आकृती २.१ चे निरीक्षण करा.

देशाचे नाव – ब्राझील प्रजासत्ताक संघराज्य

राजधानीचे नाव – ब्राझीलिया

स्थान, विस्तार व सीमा – पृथ्वीवर ब्राझील देशाचा काही भाग उत्तर गोलार्धात व बहुतांश भाग दक्षिण गोलार्धात आहे. तसेच या देशाचे स्थान पश्चिम गोलार्धात दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आह

आकृती २.२ च्या साहाय्याने या देशाच्या मुख्य भूमीच्या विस्ताराचे अंशमूल्य शोधा व गाळलेल्या जागेत भरा. ……° १५’ उ. ते ……° ४५’ द. अक्षवृत्त व ……° ४७’ प. ते ……° ४८’ प. रेखावृत्त. आकृती २.२ चे निरीक्षण करा. ब्राझीलच्या शेजारील देश व महासागर शोधा. ब्राझीलच्या संदर्भात या देशांची व महासागरांची नावे योग्य स्थानी तक्त्याच्या आधारे वहीत लिहा.

भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी :

सुमारे दीड शतक भारत देश ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या वीस वर्षांत तीन युद्धांना सामोरे जाणे, अनेक भागांतील दुष्काळी परिस्थितीला तोंड देणे अशा अनेक समस्या असूनही भारत हा जगातील प्रमुख विकसनशील देश आहे. भारतही आज एक प्रमुख जागतिक बाजारपेठ म्हणून ओळखला जातो. विविध टप्प्यांवर झालेल्या आर्थिक सुधारणांमुळे भारताच्या आर्थिक विकासाला वेग आला आहे. भारतातील लोकसंख्येत तरुणाईचे प्रमाण जास्त आहे. हा कार्यशील वयोगट असल्याने भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिले जाते.

ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी :

ब्राझील हा देश तीन शतकांपेक्षा अधिक काळ पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता. ब्राझीलला १८२२ साली स्वातंत्र्य मिळाले. १९३० पासून १९८५ पर्यंत अर्ध्या शतकापेक्षा जास्त काळ हा देश लोकप्रिय लष्करी राजवटीखाली होता. विसाव्या शतकाच्या शेवटच्या कालखंडात जागतिक वित्तीय समस्यांमधून हा देश सावरला आहे. जगाच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारा देश व भविष्यातील एक प्रमुख बाजारपेठ या दृष्टीने ब्राझीलकडे पाहिले जाते.

माहीत आहे का तुम्हांला ?

आपला स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट रोजी असतो, तर ब्राझीलचा स्वातंत्र्य दिन ७ सप्टेंबरला असतो.

 भारतात संसदीय प्रजासत्ताक शासनप्रणाली आहे, तर ब्राझीलमध्ये राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक शासनप्रणाली आहे.

ब्राझील देशाचे नाव ‘पाऊ ब्रासील’ या स्थानिक वृक्षाच्या नावावरून पडले आहे.