माणसाला स्वप्नं बघता आली पाहिजेत. नुसतीच बघता आली पाहिजेत असं नाही, तर ती पूर्ण कशी होतील याचा विचार करता आला पाहिजे. असं आपणच नाही, तर अापल्यापेक्षा श्रेष्ठ असे सगळेच लोक म्हणत असतात. आता स्वप्नं ही निर्माण करावी लागतात, की ती उत्पन्न होतात हे आपल्याला माहीत नाही. स्वप्नांविषयी लोक काय काय बोलतात ! कुणी कुणी तर स्वप्नांना भलतंच तुच्छ लेखतात. ‘भलती- सलती स्वप्नं पाहू नकोस’, असा सल्लाही देतात.
माझं तर म्हणणं असं आहे, ज्याला स्वप्न बघता येत नाही तो माणूसच नाही! जे स्वप्न आपल्याला समृद्ध करतं, ते बघण्यासाठी संवेदनशील मन असावं लागतं. ज्यांच्याकडे असं तीव्र संवेदनशील मन असतं, ती माणसं आपल्या स्वप्नपूर्तीसाठी वाट्टेल ते करतात. इतरांपासून आपल्याला वेगळं करतात. स्वत: काहीतरी आदर्श बनून ते वावरतात, नाहीतर इतरांना आदर्श बनवतात; पण अशा संवेदनशीलतेचा अभाव असणारी माणसं अधांतरीच तरंगत राहतात. ना धड इकडे, ना धड तिकडे अशीच त्यांची अवस्था असते. लोक तिलाच स्वप्नाळू वृत्ती म्हणत असावेत ! बिना ध्यास नि बिना धडपडीशिवाय असलेली ही स्वप्नाळू वृत्ती तशी घातकच, नाही का? बालपणी आम्हांला स्वप्नांचा खरा अर्थही काही कळत नव्हता; पण स्वप्न या शब्दाशी आमचा परिचय झालेला होता. रात्री झोपलो म्हणज आपल्याला झोपेत जे दिसतं, ते स्वप्न असतं आणि ते काही खरंनसतं, असं आम्हांला माहीत झालंहोतं.
आमच्या लहानपणी कोण्या एका गावाकडून एक स्वप्नं विकणारा माणूस घोड्यावर बसून आमच्या गावाकडे यायचा. त्याच्या घोड्याचा ‘टबडक् टबडक्’ आवाज आला, की आम्ही आवाजाच्या दिशेनं धावत जायचो. आमचं आकर्षण ‘घोडा बघणं’ हे असायचं; पण घोड्यासोबत मिशीतल्या मिशीत हसणाऱ्या त्या माणसालाही बघणं व्हायचं. तलम रेशमी धोतर, त्यावर तसाच जरीचा सैलसर कुडता, डोक्याला लाल-पांढरा फेटा, डोळ्यांवर चश्मा, पायांत चामडी बूट, गव्हाळ रंगाचा, झुबकेदार मिश्या असलेला हा माणूस होताही तसाच धिप्पाड. या स्वप्नं विकणाऱ्या माणसाची आम्हांला गंमतच वाटायची, शिवाय कुतूहलपण. त्यानं घोड्याच्या पाठीवर ठेवलेल्या मखमली कापडातल्या गाठोड्याकडे आम्ही कुतूहलानं बघायचो.
हा माणूस आमच्या गावच्या पिंपळाच्या पारावर थांबायचा. पाराला असलेल्या लोखंडी कडीला आपला घोडा बांधायचा. घोड्याच्या पाठीवर आणलेलं मखमली कापडातलं गाठोडं जवळ घेऊन, चामडी पिशवीतलं पाणी घटाघटा प्यायचा आणि मग ऐटीत झाडाच्या पारावर बसायचा, तेव्हा त्याच्याभोवती माणसांचा गराडा पडे. त्यानं आजवर घोड्यावरून खूप प्रवास केलेला होता. कित्येक प्रदेश पाहिले होते, कित्येक डोंगरदऱ्या तुडवल्या होत्या, भिन्न स्वभावांची आणि भिन्न संस्कृतींची माणसं पाहिली होती, त्यामुळे त्याच्याकडे बोलण्यासारखं खूप काही असायचं. त्यानं अनुभवलेलं समृद्ध विश्व तो वेगवेगळ्या किश्शांनी रंगवून, फुलवून सांगायचा. लोक त्याच्या गप्पांमध्ये स्वत:ला विसरून जायचे. त्याचं ते भलतंच दिलखेच बडबडणं आणि स्वप्नात धुंद गुंगवणं लोकांना भारी आवडायचं. ऐकताना लोकांची मती कुंठित व्हायची. आपण ऐकतोय ते खरं की खोटं या संभ्रमात ते पडायचे.
ऐकताना लोक तल्लीन होऊन जायचे. त्याच्या त्या अनुभवी बोलांतून लोकांना निरनिराळ्या प्रांतांची, रीतीरिवाजांची माहिती व्हायची. त्यानं वर्णन केलेल्या प्रांतात ते मनानंच भटकून येत. जणू काही आपण स्वप्नातच आहोत, असं त्यांना वाटत राहायचं. मग बऱ्याच वेळानं तो, ते मखमली कापडात बांधलेलं गाठोडं हळूच साेडायचा. त्यात काजू, बदाम, किसमिस, वेलदोडे, सुपारी, खारीक, खोबरं वगैरे असायचं. नाही म्हटलं, तरी लोक घासाघीस करून छटाक[1]पावशेर विकत घ्यायचेच! कधीकधी तो गाठोड्यातला खाऊ सगळ्या टिंगू मुलांना मूठमूठ वाटून द्यायचा. आम्हीही त्याच्यावर भलतेच खूश व्हायचो. तो निघून गेल्यावर मग लोक म्हणत,
‘हा बडबड्या आला, की आपल्यात तरतरी पेरून जातो. त्याच्या बोलण्यानं जगाची ओळख झाल्यासारखं वाटतं. आपलं दु:ख काही काळापुरतं का होईना विसरल्यासारखं होतं. गोडगोड बाेलून तो जसं त्याचं स्वप्नच आपल्या डोळ्यांत उतरवून जातो…’ पुढे मग लोक त्याला ‘सपनविक्या’च म्हणू लागले. त्यालाही त्याचं काहीच वाटेना. तोही मग गमतीनं ‘सपन घ्या, सपन’ म्हणतच गावात शिरायचा आणि लोकांना रिझवून सुकामेवा विकायचा.
काय झालं कळलंच नाही; पण अचानकच सपनविक्या गावात यायचा बंद झाला. आम्ही रोज त्याची आतुरतेनं वाट पाहायचो; पण तो यायचाच नाही. कधीतरी त्याचा विषय निघायचा अन् गावातले सगळे लोक त्याच्याविषयी भरभरून बोलायचे. महिने, वर्षं उलटून गेली.
एके दिवशी अचानक, एक तरुण गावात आला. गावातल्या पारावर बसला. गावातील पारावर बसलेले लोक त्याच्याकडे टकामका पाहू लागले. तो तरुण सपनविक्यासारखाच दिसत होता. तोच चेहरा, तीच अंगकाठी, जणू सपनविक्याच गावात आला होता.
आम्ही सगळी मुलं पाराजवळ जमलो. आमच्या गावातल्या सगळ्यांत वृद्ध तात्यांनी त्याला विचारलं, ‘‘कोण रे बाबा तू? कुठून आलास?’’ तो म्हणाला, ‘‘मी तुमच्या सपनविक्याचा मुलगा. गुडघेदुखीच्या त्रासामुळे बाबा बऱ्याच वर्षांपासून गावोगावी जाऊ शकत नाहीत; पण खरं सांगू का? गावांत जाणं, तिथल्या लोकांना एकत्र जमवणं, त्यांच्याशी बोलण्यासाठी सुकामेवा विकणं हे केवळ बाबांचं एक निमित्त होतं. त्यातून त्यांना खूप आनंद मिळत असे. ‘आपले अनुभव, आपल्याजवळचं ज्ञान इतरांना सांगावं, दुसऱ्यांना आनंद द्यावा’ असं माझ्या वडिलांचं स्वप्न होतं. लोकांची सेवा करण्याचा त्यांचा हा मार्ग मला खूप खूप आवडला. नुकतंच माझं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालं आहे. गावोगावी जाऊन वृद्ध, आजारी लाेकांची सेवा करायची, असं मी मनोमन ठरवलं आहे. बाबांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच मी तुमच्या गावात आलो आहे.’’
त्याचा आवाज, बोलण्याची ढब, हसणं आम्हांला सपनविक्याची तीव्र आठवण देऊन गेलं. आम्ही सगळे गहिवरून गेलो. काय बोलावं हे काेणालाच समजेना. असंही स्वप्न असतं, एखादा माणूस असंही स्वप्न पाहू शकतो, हे नव्यानंच आम्हांला उमगलं होतं.