३. कीर्ती कठीयाचा दृष्टान् (भाग – १)

डोमग्रामी गोसावीयांचा ठायी उदयाचे मातीकाम होत होते: ते सी बाजत होते: तेणे भक्तीजनासी व्यापार होववे ना: आन भट व्यापार करु लागले: नाथोबाए म्हणीतलें: ‘‘नागदेया: तू कैसा काही हींवसी ना?’’ तवं भटी म्हणीतलें: ‘‘आम्ही वैरागी: काइसीया हीवु:’’ यावरी सर्वज्ञें म्हणीतलें: ‘‘वानरेया: पोरा जीवासी वैराग्य मिरवु आवडे: हाही एकू विकारुचि कीं गा:’’ यावरि भटी म्हणीतलें: ‘‘जी जी: निर्वीकार तो कवण:’’ सर्वज्ञें म्हणीतलें: ‘‘वानरेया: पोर जीव वीकारावेगळा केव्हेळाही जालाचि नाही: मा तु काइ वेगळा अससि:’’ ‘‘हो कां जी:’’ यावरि गोसावी कीर्ती कठीयाचा दृष्टान्त निरोपीला: ‘‘कव्हणी एकू कठीया असे: तो भोगस्थानाची सुश्रुषा करी: झाडी: सडा संमार्जन करी: तेदेखौनि गावीचे म्हणति: ‘कठीयेहो नीके करीत असा: बरवे करीत असा:’ ते आइकौनि दीसवडीचा दीसवडी हात हात चढवी: तयासि देवता आपुले फळ नेदी: तयासि कीर्तीचेचि फळ झाले:’’

[लीळाचरित्र उत्तरार्ध : एकांक लीळा क्र. १२०]
संपादक-प्रा. पुरुषोत्तम नागपुरे.