माझ्या बालपणीच्या जगात पुस्तकं म्हणजे माझ्यासाठी एक दुर्मीळ वस्तू होती. आमच्या गावात एस.टी.आर. माणिकम नावाचे एक क्रांतिकारक राष्ट्रभक्त राहत होते. त्यांच्याकडे पुस्तकांचा बऱ्यापैकी संग्रह होता. त्यांनी मला पुस्तके वाचण्यासाठी सदैव उत्तेजन दिले. मीही मिळेल ते वाचत गेलो. पुस्तके मागण्यासाठी मी त्यांच्या घरी धाव घेत असे.
माझ्या लहानपणी शमसुद्दीन नावाच्या माझ्या एका दूरच्या भावाचा माझ्यावर बराच प्रभाव होता. रामेश्वरममध्येयेणाऱ्या वर्तमानपत्रांचा तो एकुलता एक वितरक होता. रोज सकाळच्या रेल्वेगाडीने ‘पंबन’ गावाहून वृत्तपत्रांचे गठ्ठे येत. गावातल्या हजारभर सुशिक्षितांच्या वाचनाची गरज भागवणाऱ्या शमसुद्दीनचा व्यवसाय म्हणजे एकखांबी तंबूहोता. स्वातंत्र्याच्या चळवळीची वाटचाल ग्रामस्थांना समजणे हे महत्त्वाचे कार्य त्यातून साधत असे. कुणाला भविष्य जाणून घेण्यात रस असे, तर कुणी चेन्नईच्या (मद्रास) बाजारपेठेतले सोन्याचांदीचे भाव समजण्यासाठी उत्सुक असत. थोडेजण जिज्ञासूवृत्तीने हिटलर, महात्मा गांधी आणि बॅरिस्टर जीनांबद्दल गांभीर्याने चर्चा करत; पण झाडून सर्वजणांना पेरियार ई. व्ही. रामस्वामी यांच्या चळवळीबद्दल जाणून घेण्यात रस होता. ‘दिनमणी’ हे त्या वेळचे सर्वांत लोकप्रिय ‘तमिळ’ वर्तमानपत्र होते. छापलेले शब्द त्यावेळी मला वाचायला येत नसत. त्यातील चित्रांकडे बघून मी समाधान मानत असे. शमसुद्दीन आपल्या गिऱ्हाइकांना पेपरचा अंक वाटण्यापूर्वी मी त्यातील चित्रे बघून घेत असे.
मी आठ वर्षांचा असताना सन १९३९ मध्ये दुसरे महायुद्ध पेटले. काय कारण असेल ठाऊक नाही; पण त्या सुमारास बाजारात चिंचोक्यांना अचानक भरपूर मागणी आली. मी चिंचोके गोळा करून मशिदीजवळच्या एका दुकानात देत असे आणि अख् एक आणा कमावत असे. माझ्या वडिलांनी लाकडी नौका बांधायचा व्यवसाय करायचे ठरवले. अहंमद जलालुद्दीन नावाच्या एका आमच्याच गावातल्या कंत्राटदाराबरोबर समुद्रकिनारी ते रोज काम करू लागले. पुढे जलालुद्दीन यांनी माझ्या बहिणीशी-जोहराशी विवाह केला आणि आमच्याशी नाते जोडले. जलालुद्दीन मला युद्धाच्या कथा सांगत असे आणि मग दिनमणीच्या शीर्षकातून मी त्या शोधत राही. आमच्या छोट्या दूरस्थ गावात युद्धाचे दृश्य परिणाम जाणवणे जवळजवळ अशक्य होते; पण हळूहळू भारताला सक्तीने युद्धात सामील व्हावे लागले आणि देशात आणीबाणी पुकारली गेली.
रोज सकाळी पंबनहून येणारी रेल्वेगाडी रामेश्वरमला थांबेनाशी झाली. हा युद्धाचा आमच्या गावावर पहिला ठळक परिणाम झाला होता. मग चालत्या रेल्वेगाडीतून वर्तमानपत्रांचे गठ्ठे रामेश्वरम ते धनुष्कोडीदरम्यान खाली फेकले जात. ते गठ्ठे गोळा करण्यासाठी शमसुद्दीनला कुणीतरी मदतनीस हवा होता. माझ्यापेक्षा दुसरा योग्य उमेदवार त्याला कुठून मिळणार? माझ्या आयुष्यातील पहिली कष्टाची कमाई करायला शमसुद्दीनचा असा हातभार लागला. आज अर्धशतकानंतर मी वळून त्या क्षणांकडे पाहतो आणि त्यावेळी स्वतःच्या कष्टाने मिळवलेल्या पहिल्या कमाईचा अभिमान आजही माझ्या मनातून ओसंडून वाहू लागतो.
माझ्या वडिलांकडून मी प्रामाणिकपणा आणि स्वयंशिस्त शिकलो, तर आईने मला चांगल्यावर विश्वास ठेवायची आंतरिक शक्ती दिली, दयाळू वृत्ती दिली. अर्थात माझ्या तिन्ही भावांनी आणि एका बहिणीनेदेखील हा ठेवा त्यांच्याकडून उचलला; पण मला जो जलालुद्दीन आणि शमसुद्दीन यांचा निकट सहवास घडला, त्याने मी स्वतंत्र, वेगळा असा बनत गेलाे. शाळेत शिकायला न मिळालेले शहाणपण मी जलालुद्दीनकडून शिकलो, तर शमसुद्दीनकडून मी चेहऱ्यावरून दुसऱ्याच्या मनातले, शरीराची व डोळ्यांची भाषा ओळखायला शिकलो. माझ्यामध्ये जो सर्जनशीलतेचा स्रोत उगम पावत, फुलत, खळाळत गेला, त्याचे श्रेय मी नि:संशय त्या दोघांच्या सहवासात माझ्यावर पडलेल्या प्रभावाला देतो.
रामेश्वरम सोडून जिल्ह्याच्या ठिकाणी रामनाथपुरमला शिक्षण घेण्यासाठी मी माझ्या वडिलांकडे परवानगी विचारली. विचारात पडल्यासारखे ते क्षणभर गप्प झाले. विचार करता करता त्यांना शब्द लाभावेत आणि ते ओठातून बाहेर पडावेत तसे वडील बोलू लागले. ते मला म्हणाले, ‘अबुल, तुला मोठे व्हायचे असेल, तर गाव सोडून शिक्षणासाठी बाहेर जायलाच हवे. सीगल पक्षी घरटे सोडून, एकटे दूरवर उडत जातात आणि नवे प्रदेश शोधतात. तसे या मातीचा आणि इथल्या स्मृतींचा मोह सोडून तुझ्या इच्छा- आकांक्षा जिथे पूर्णहोतील, तिथे तुला जायला हवे. आम्ही आमच्या प्रेमाने तुला बांधून ठेवणार नाही, आमच्या गरजा तुझा रस्ता अडवणार नाहीत.’ माझी आई मला दूर पाठवायला काळजीने आढेवेढे घेत होती.
शमसुद्दीन आणि जलालुद्दीन माझ्यासोबत रामनाथपुरमला आले. त्यांनी माझे नाव शाळेत घातले, माझी राहण्याची नीट व्यवस्था केली; पण श्र्वार्झ हायस्कूल अन् या नव्या वातावरणात माझा जीव रमेना. पन्नास हजारांवर वस्ती असलेल्या या शहरात सदैव गजबज असायची; पण रामेश्वरमला जसा एकजिनसीपणा होता तसा इथे माझ्या अनुभवाला आला नाही. मला घराची ओढ अस्वस्थ करायची आणि म्हणून रामेश्वरमला जायची प्रत्येक संधी मी उडी मारून साधायचो. इथे असलेल्या शिक्षणाच्या उदंड संधींपेक्षा आईच्या हाताच्या गोड पोळ्यांची ओढ मला मोलाची वाटत असे. हळूहळू माझे घरापासून दूर जाणे मी स्वीकारत गेलो. नव्या वातावरणाशी जुळवून घ्यायचे मी मनाशी ठरवले. कारण माझ्या वडिलांच्या माझ्याकडून विशेष अपेक्षा आहेत हे मला ठाऊक होते. मी कलेक्टर व्हावे अशी त्यांची इच्छा होती. त्यांचे स्वप्न पुरे करणे माझे कर्तव्य होते. त्यासाठी रामेश्वरममध्ये वाटणारी सुरक्षितता, तिथले प्रेमळ वातावरण यांचा त्याग करणे मला भाग होते.