३. धार्मिक समन्वय

भाषा आणि धर्म यांची विविधता हे भारतीय समाजाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. या वैशिष्ट्याची दखल घेऊन भारतीय संविधानाने सर्वधर्मसमभावाचे तत्त्व स्वीकारले आहे. मध्ययुगीन भारतातील समाजजीवनामध्येही या तत्त्वाच्या आधारे धार्मिक समन्वयाचे प्रयत्न झाले होते. या प्रयत्नांपैकी भक्ती चळवळ, शीख धर्म आणि सुफी पंथ यांचे आपल्या समाजात एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. भारताच्या निरनिराळ्या प्रदेशांमध्ये या विविध विचारधारा निर्माण झाल्या. त्यांनी ईश्‍वरभक्तीबरोबरच धार्मिक आणि सांप्रदायिक समन्वयावर भर दिला. यासंबंधीची माहिती आपण या पाठात घेणार आहोत.

भारतीय धर्मजीवनात प्रारंभी कर्मकांड आणि ब्रह्मज्ञान यांच्यावर विशेष भर होता. मध्ययुगात हे दोन्ही मार्ग मागे पडून भक्तिमार्गास महत्त्व आले. या मार्गात अधिकारभेदांचे फाजील महत्त्व नसल्याने धार्मिक समन्वयाला आणखी चालना मिळाली. भारतातील वेगवेगळ्या प्रांतांमध्ये स्थानिक परिस्थितीला अनुसरून भक्तिपंथाचे वेगवेगळे आविष्कार आढळून येतात. या पंथाने संस्कृत भाषेएेवजी सर्वसामान्यांच्या भाषांचा अवलंब केला. त्यामुळे अशा प्रादेशिक भाषांच्या विकासासाठी या धार्मिक चळवळींचा हातभार लागला.

 भक्ती चळवळ : भक्ती चळवळीचा उगम दक्षिण भारतात झाल्याचे मानण्यात येते. या भागात नायनार आणि अळवार या भक्ती चळवळी उदयास आल्या. नायनार हे शिवभक्‍त तर अळवार हे विष्णुभक्‍त होते. शिव आणि विष्णू एकच आहेत, असे मानून त्यांच्यामध्ये समन्वय करण्याचे प्रयत्नही झाले. अर्धा भाग विष्णूचा आणि अर्धा भाग शिवाचा दाखवून ‘हरिहर’ या स्वरूपातील मूर्तीही मोठ्या प्रमाणात निर्माण करण्यात आल्या. या भक्ती चळवळींमध्ये समाजाच्या सर्व स्तरांमधील लोक सहभागी झाले होते. ईश्‍वरप्रेम, माणुसकी, भूतदया, करुणा इत्यादी मूल्यांची शिकवण त्यांनी दिली. दक्षिण भारतात रामानुज आणि इतर आचार्यांनी भक्ती चळवळीचा पाया भक्कम केला. ईश्वर सर्वांसाठी आहे, ईश्‍वर भेदभाव करत नाही, असे त्यांनी सांगितले. उत्तर भारतातही रामानुजांच्या शिकवणुकीचा मोठा प्रभाव पडला.

उत्तर भारतात संत रामानंद यांनी भक्तीचे महत्त्व सांगितले. संत कबीर हे भक्ती चळवळीतील एक विख्यात संत होत. त्यांनी तीर्थक्षेत्रे, व्रते, मूर्तिपूजा यांना महत्त्व दिले नाही. सत्यालाच ईश्‍वर मानले. सर्व मानव एक आहेत, अशी शिकवण दिली. जातिभेद, पंथभेद, धर्मभेद मानले नाहीत. त्यांना हिंदू-मुस्लिमांचे ऐक्य साधायचे होते. त्यांनी हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही धर्मांतील कट्टर लोकांना कडक शब्दांत फटकारले.

 बंगालमध्ये चैतन्य महाप्रभू यांनी कृष्णभक्तीचे महत्त्व सांगितले. त्यांच्या उपदेशामुळे लोक जातीची आणि पंथांची बंधने ओलांडून भक्ती चळवळीत सहभागी झाले. चैतन्य महाप्रभूंच्या प्रभावाने शंकरदेव यांनी आसाममध्ये कृष्णभक्तीचा प्रसार केला. गुजरातमध्ये संत नरसी मेहता हे प्रसिद्ध वैष्णव संत होऊन गेले. ते निस्सीम कृष्णभक्त होते. त्यांनी समतेचा संदेश दिला. त्यांना गुजराती भाषेचे आद्य कवी मानतात.

 संत मीराबाईंनी कृष्णभक्तीचा महिमा सांगितला. त्या मेवाडच्या राजघराण्यातील होत्या. राजघराण्यातील सुखांचा त्याग करून त्या कृष्णभक्तीत तल्लीन झाल्या. राजस्थानी व गुजराती भाषांमध्ये त्यांनी भक्तिरचना केल्या. त्यांची भक्तिगीते भक्ती, सहिष्णुता व मानवता यांचा संदेश देणारी आहेत. संत रोहिदास हे एक महान संत होते. त्यांनी समतेचा व मानवतेचा संदेश दिला. संत सेना हे एक प्रभावी संत होऊन गेले. हिंदी साहित्यातील महाकवी सूरदास यांनी ‘सूरसागर’ हे काव्य लिहिले. कृष्णभक्ती हा त्यांच्या काव्याचा विषय आहे. मुस्लिम संत रसखान यांनी लिहिलेली कृष्णभक्तीची गीते रसाळ आहेत. संत तुलसीदासांच्या ‘रामचरितमानस’ या ग्रंथात रामभक्तीचा सुंदर आविष्कार झालेला आढळतो.

कर्नाटकात महात्‍मा बसवेश्‍वरांनी लिंगायत विचारधारेचा प्रसार केला. त्यांनी जातिभेदाला विरोध केला. श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व सांगितले. त्यांचे ‘कायकवे कैलास’ हे प्रसिद्ध वचन आहे. त्याचा अर्थ श्रम हाच कैलास होय, असा आहे. आपल्या चळवळीमध्ये स्त्रियांनाही सहभागी करून घेतले. ‘अनुभवमंटप’ या सभागृहामध्ये होणाऱ्या धर्मचर्चेत सर्व जातींचे स्त्री- पुरुष सहभागी होऊ लागले. त्यांनी आपली शिकवण कन्नड या लोकभाषेमध्ये वचनसाहित्याच्या माध्यमातून दिली. त्यांच्या कार्याचा समाजावर मोठा परिणाम झाला. महात्‍मा बसवेश्वरांच्या अनुयायांनी मराठी भाषेतही रचना केल्या आहेत. त्यांपैकी मन्मथ स्वामी यांनी लिहिलेला ‘परमरहस्य’ हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. कर्नाटकमध्ये पंप, पुरंदरदास इत्यादी थोर संत होऊन गेले. त्यांनी कन्नड भाषेत अनेक भक्तिकवने रचली.

महानुभाव पंथ : तेराव्या शतकात चक्रधरस्वामींनी महाराष्ट्रात ‘महानुभाव’ पंथ प्रवर्तित केला. हा कृष्णभक्तीचा उपदेश करणारा पंथ आहे. श्रीगोविंदप्रभू हे चक्रधर स्वामींचे गुरू होते. चक्रधरांच्या शिष्यांमध्ये सर्व जाती-जमातींमधील स्त्री-पुरुषांचा समावेश होता. ते समतेचे पुरस्कर्ते होते. त्यांनी महाराष्ट्रभर भ्रमंती करत मराठीतून उपदेश केला. संस्कृतऐवजी मराठी भाषेला प्राधान्य दिले. त्यामुळे मराठी भाषेचा विकास झाला. मराठी भाषेमध्ये विपुल ग्रंथनिर्मिती झाली. या पंथाचा प्रसार महाराष्ट्रात प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाडा या भागांत झाला. विदर्भातील ॠद्‌धिपूर हे या पंथाचे महत्त्वाचे स्थान होय. तसेच हा पंथ पंजाब, अफगाणिस्तान अशा दूरवरच्या प्रदेशापर्यंत पोहचला होता.

गुरुनानक : गुरुनानक हे शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू होत. धार्मिक समन्वयाचा एक मोठा प्रयत्न म्हणून त्यांच्या कार्याचा उल्लेख करावा लागेल. त्यांनी हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मांच्या विविध तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. ते मक्केलाही गेले होते. भक्तिभावना सगळीकडे सारखीच आहे, ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली. सर्वांशी सारखेपणाने वागावे, अशी त्यांची शिकवण होती. हिंदू आणि मुस्लिम यांचे ऐक्य साधावे, यासाठी त्यांनी उपदेश केला. शुद्ध आचरणावर भर दिला.

 गुरुनानकांच्या उपदेशाने अनेक लोक प्रभावित झाले. त्यांच्या शिष्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. गुरुनानकांच्या अनुयायांना शिष्य म्हणजे ‘शीख’ असे म्हणतात. ‘गुरुग्रंथसाहिब’ हा शिखांचा पवित्र ग्रंथ आहे. या ग्रंथामध्येस्वतः गुरुनानक, संत नामदेव, संत कबीर इत्यादी संतांच्या रचनांचा समावेश आहे. गुरुनानकानंतर शिखांचे नऊ गुरू झाले. गुरुगोविंदसिंग हे शिखांचे दहावे गुरू होत. त्यांच्यानंतर सर्व शीख गुरुगोविंदसिंगांच्या आज्ञेप्रमाणे ‘गुरुग्रंथसाहिब’ या धर्मग्रंथालाच गुरू मानू लागले.

सुफी पंथ : सुफी हा इस्लाममधील एक पंथ होय. परमेश्वर प्रेममय आहे. प्रेम व भक्ती या मार्गांनीच परमेश्वरापर्यंत पोहचता येते. अशी सुफी साधूंची श्रद्धा होती. सर्व प्राणिमात्रांवर प्रेम करावे, परमेश्वराचे चिंतन करावे, साधेपणाने राहावे, अशी त्यांची शिकवण होती. ख्वाजा मोइनुद्दीन चिस्ती, शेख निझामुद्दीन अवलिया हे थोर सुफी संत होत. सुफी संतांच्या उपदेशामुळे हिंदू-मुसलमान समाजात ऐक्य निर्माण झाले. भारतीय संगीतात सुफी संगीत परंपरेने मोलाची भर घातली आहे.

 संतांनी सांगितलेला भक्तिमार्ग सर्वसामान्यांना आचरण्यास सोपा होता. सर्व स्त्री-पुरुषांना भक्ती चळवळीमध्ये प्रवेश होता. संतांनी आपले विचार लोकभाषेतून मांडले. सर्वसामान्य लोकांना ते अधिक जवळचे वाटले. भारतीय संस्कृतीची जी जडणघडण झाली आहे, तिच्यामध्ये भक्तिमार्गाचा फार मोठा वाटा आहे.