३. पृथ्वीवरील सजीव

३.१ पृथ्वीची उत्पत्ती
३.२ पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती
३.३ पृथ्वीवरील प्राणिसृष्टी

३.१ पृथ्वीची उत्पत्ती
आपणा सगळ्यांनाच काही प्रश्न पडतात. उदा., आपण सर्व ज्या पृथ्वीवर राहतो, ती पृथ्वी कशी घडली, केव्हा घडली? ती आता जशी आहे, तशी पहिल्यापासून होती की बदलली ? ती बदलली असेल, तर तिच्यामध्ये नेमके कोणते बदल झाले ?

शास्त्रीय संशोधनाच्या आधारे असे मानले जाते, की सुमारे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी अत्यंत तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला, एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला. त्याच्या अत्यंत वेगवान, चक्राकार गतीमुळे त्याचे विभाजन होऊन सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत : १. बुध २. शुक्र ३. पृथ्वी ४. मंगळ ५. गुरू ६. शनी ७. युरेनस ८. नेपच्यून.

३.२ पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती
या सर्व ग्रहांपैकी पृथ्वीवर सजीव सृष्टी आहे. पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर तिचा पृष्ठभाग थंड होऊन तिच्यावर जलाशयांची निर्मिती होण्यासाठी जवळजवळ ८० कोटी वर्षे लागली. असे मानले जाते, की पाण्यामध्ये प्रथम अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले. ‘आदिजीव’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या एकपेशीय सजीवांपासून हळूहळू बहुपेशीय सजीव निर्माण झाले. एकपेशीय सजीव अत्यंत सूक्ष्म असतात. ते नुसत्या डोळ्यांनी दिसत नाहीत. त्यांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाची गरज असते.

३. ३ पृथ्वीवरील प्राणिसृष्टी
पृथ्वीवरील सजीव सृष्टीमध्ये प्राणी आणि वनस्पती असतात. त्यापैकी प्राणिसृष्टीचा विचार आपण येथे करणार आहोत. प्राण्यांची काही वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.

१. प्राणी श्वासोच्छ्वास करतात.
२. प्राणी अन्न मिळवण्यासाठी किंवा इतर
कारणांसाठी हालचाल करतात.

३. काही प्राणिजातींमधील प्राणी अंडी घालतात. त्यातून पिल्ले जन्माला येतात. काही प्राणिजातींमधील प्राणी अपत्याला जन्म देतात.