भौगोलिक स्पष्टीकरण
भारत :
आकृती ३.१ मध्ये भारताची प्राकृतिक रचना दिली आहे. भारताचे खालील पाच प्रमुख प्राकृतिक विभाग केले जातात.
l हिमालय l उत्तर भारतीय मैदान l द्वीपकल्प
l किनारपट्टीचा प्रदेश l द्वीपसमूह
हिमालय :
हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत आहे. Vm{ज{H$ñVmZ_Yrb पामीरच्या पठारापासून हिमालय पूर्वेकडे पसरला आहे. आशिया खंडातील ही प्रमुख पर्वतप्रणाली आहे. भारतात जम्मू-काश्मीरपासून अरुणाचल प्रदेशापर्यंत हिमालय पसरला आहे. हिमालय ही एकच पर्वतरांग नसून हिमालयात अनेक समांतर पर्वतरांगांचा समावेश होतो. शिवालिक ही सर्वांत दक्षिणेकडील पर्वतरांग आहे. ही सर्वांत नवीन (अर्वाचीन) पर्वतरांग आहे. शिवालिक पर्वतरांगेकडून उत्तरेकडे जाताना आपल्याला लघु हिमालय, बृहद् हिमालय (हिमाद्री) व हिमालयापलीकडील रांगा आढळतात. या रांगा अनुक्रमे अर्वाचीन तेप्राचीन अशा आहेत. याच पर्वतरांगांचे पश्चिम हिमालय (काश्मीर हिमालय), मध्य हिमालय (कुमाऊ हिमालय) व पूर्व हिमालय (आसाम हिमालय) असेही भाग केले जातात.
उत्तर भारतीय मैदान :
हा प्राकृतिक विभाग हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत पसरलेला आहे. तसेच तो पश्चिमेकडे राजस्थान-पंजाबपासून पूर्वेकडे आसामपर्यंत पसरला आहे. हा भाग बहुतांशी सखल व सपाट आहे. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे दोन विभाग केले जातात. अरवली पर्वताच्या पूर्वेकडील भाग गंगा नदीच्या खोऱ्याचा प्रदेश असून त्यातील मैदानी भाग गंगेचे मैदान म्हणून ओळखला जातो. या मैदानी प्रदेशाचा उतार पूर्वेकडे आहे. भारताच्या पश्चिम बंगाल राज्याचा बहुतांश भाग व बांग्लादेश मिळून गंगा-ब्रम्हपुत्रा प्रणालीचा त्रिभुज प्रदेश बनतो. या प्रदेशाचे नाव सुंदरबन आहे. आकृती ३.३ पहा. हा जगातील सर्वांत मोठा त्रिभुज प्रदेश आहे.
उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागात वाळवंट आहे. हे थरचे वाळवंट किंवा मरुस्थली या नावाने प्रसिद्ध आहे. राजस्थानचा बहुतांश भाग या वाळवंटाने व्यापला आहे. याच्या उत्तरेकडील भागास पंजाबचा मैदानी प्रदेश म्हणून ओळखतात. हा प्रदेश अरवली पर्वत व दिल्ली डोंगर रांगा यांच्या पश्चिमेकडे पसरलेला आहे. या मैदानाची निर्मिती सतलज व तिच्या उपनद्यांच्या संचयनकार्यातून झालेली आहे. पंजाब मैदानाचा सर्वसाधारण उतार पश्चिमेकडे आहे. या मैदानी प्रदेशातील मृदा सुपीक असल्याने येथे शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो.
द्वीपकल्प :
उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेकडे पसरलेला व हिंदी महासागराकडे निमुळता होत जाणारा प्रदेश भारतीय द्वीपकल्प म्हणून ओळखला जातो. यात अनेक लहान-मोठे पर्वत व पठारे आहेत. यांत उत्तरेकडील अरवलीहा सर्वांत प्राचीन वली पर्वत आहे. या भागात सपाट मैदाने सीमांकित करणारी पठारांची शृंखला, मध्यभागातील विंध्य-सातपुडा पर्वत, तर पश्चिम घाट व पूर्व घाट असे पर्वतीय प्रदेश आहेत.
किनारपट्टीचा प्रदेश :
भारताला सुमारे ७५०० किमी लांबीची किनारपट्टी लाभली आहे. द्वीपकल्पाच्या पूर्वेकडे व पश्चिमेकडेही किनारपट्टी आहे. या दोन्ही किनारपट्टींमध्ये बराच फरक आहे. पश्चिम किनारा अरबी समुद्राला लागून आहे. हा किनारा खडकाळ आहे. पश्चिम घाटातून अनेक डोंगरांच्या शाखा या किनाऱ्यापर्यंत आल्या आहेत. या किनारपट्टीची रुंदीही कमी आहे. पश्चिम घाटातून वेगाने वाहणाऱ्या अनेक लहान नद्या या किनाऱ्यावर उतरतात, त्यामुळे या नद्यांच्या मुखाशी खाड्या तयार झाल्या असून त्रिभुज प्रदेश आढळत नाहीत. पूर्वकिनारा बंगालच्या उपसागराला लागून आहे. हा किनारा नद्यांच्या संचयनाने बनला आहे. या किनाऱ्याला अनेक पूर्व वाहिनी नद्या पश्चिम घाटातून व पूर्व घाटातून येऊन मिळतात. दूरवरून येणाऱ्या अनेक नद्या पूर्व किनाऱ्यावर आल्यावर जमिनीच्या मंद उतारामुळे कमी वेगाने वाहतात, त्यामुळेत्यांनी वाहून आणलेल्या गाळाचे संचयन या किनारपट्टीच्या प्रदेशात होते. या नद्यांच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश आढळतात.
द्वीपसमूह :
भारताच्या मुख्य भूमीच्या किनाऱ्याजवळ अनेक लहान-मोठी बेटे आहेत. त्यांचा समावेश किनारी बेटे या गटात केला जातो. त्याशिवाय अरबी समुद्र व बंगालचा उपसागर यांत प्रत्येकी एक मोठा द्वीपसमूह आहे. अरबी समुद्रातील समूहास लक्षद्वीप बेटे असे संबोधतात, तर बंगालच्या उपसागरातील बेटे अंदमान-निकोबार द्वीपसमूह या नावाने ओळखली जातात. बहुतांशी लक्षद्वीप बेटे प्रवाळाची कंकणद्वीपे आहेत. ही विस्ताराने लहान असून त्यांची उंची कमी आहे. अंदमान समूहातील बेटेही प्रामुख्याने ज्वालामुखीय बेटे आहेत. ती विस्ताराने मोठी असून त्यांच्या अंतर्गत भागात उंच डोंगर आहे. या समूहातील बॅरन बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे. निकोबार समूहातही काही बेटे कंकणद्वीपाच्या स्वरूपात आहेत.
ब्राझील :
ब्राझीलच्या नकाशाकडे सहज दृष्टिक्षेप टाकला तरी तुमच्या लक्षात येईल, की ब्राझीलचा बराचसा भाग हा उच्चभूमी, पठारे आणि लहान लहान पर्वतांनी व्यापलेला आहे. ब्राझीलमध्ये लांबवर पसरलेले व अतिउंच पर्वत नाहीत. उत्तरेकडील अॅमेझॉनचे खोरे व नैऋत्येकडील पॅराग्वे नदीच्या उगमाकडील प्रदेश सोडल्यास ब्राझीलमध्ये विस्तीर्ण मैदाने अभावानेच आढळतात. किनारी भागातही मैदाने विस्तीर्ण नाहीत. ब्राझीलचे प्राकृतिक भाग पुढीलप्रमाणे आहेत.
l उच्चभूमी l अजस्र कडा l किनारी प्रदेश
l मैदानी प्रदेश l द्वीपसमूह
उच्चभूमी :
दक्षिण ब्राझील विस्तीर्ण अशा पठाराने व्यापलेला आहे. याचे वर्णन ब्राझीलचे पठार, ब्राझीलची उच्चभूमी किंवा ब्राझीलचे ढालक्षेत्र अशा वेगवेगळ्या नावांनी केले जाते. ब्राझील व गियाना ढालक्षेत्रे एकत्रितरीत्या दक्षिण अमेरिका खंडातील गाभाक्षेत्रे मानली जातात. गियाना उच्चभूमीचा मुख्य भाग व्हेनेझुएला देशात असून ही उच्चभूमी पूर्वेकडे फ्रेंच गियानापर्यंत विस्तारलेली आहे. गियाना उच्चभूमी ही ब्राझीलच्या उत्तरेकडील रोराईमा, पारा आणि आमापा या राज्यांत विस्तारलेली आहे. ब्राझीलमध्ये या उच्चभूमीचा कमी उंचीचाच भाग येतो, मात्र ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर पिको दी नेब्लीना हे ब्राझील व व्हेनेझुएला यांच्या सीमेवर असून त्याची उंची ३०१४ मी. आहे.
ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण व पूर्वेकडील भागांत उंची १००० मी. पेक्षा जास्त आहे. परंतु इतर भागात उंची ५०० ते १००० मी. दरम्यान आहे. उच्चभूमीची उंची उत्तरेकडे टप्प्याटप्प्याने कमी होत जाते व या दिशेकडील उतार फारसे तीव्र नाहीत. या उतारावरून वाहणाऱ्या अॅमेझॉनच्या उपनद्यांमध्ये धावत्या व धबधबेदिसून येतात. उत्तरेकडे उतार काहीसे तीव्र असले तरी ते अकस्मात नाहीत. अनेक नद्या उच्चभूमीच्या उत्तर भागात उगम पावतात व अटलांटिक महासागरास मिळतात. उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून पॅराग्वे, पॅराना, उरुग्वे इत्यादी नद्या उगम पावतात व पुढेत्या अर्जेंटिना देशाकडे वाहत जातात. उच्चभूमीचा पूर्वेकडील उतार अतिशय तीव्र असून तो कड्याच्या स्वरूपात दिसून येतो.
अजस्र कडा :
हा प्राकृतिक भाग क्षेत्रविस्ताराच्या दृष्टीने सर्वांत लहान असला, तरी तेथील उताराचे स्वरूप व त्याचा हवामानावर होणारा परिणाम यांमुळे तो स्वतंत्र विभाग मानला जातो. उच्चभूमीची पूर्वेकडील बाजू या कड्यामुळे अंकित होते. या भागात उच्चभूमीची उंची ७९० मी इतकी आहे. काही भागांत ही उंची टप्प्याटप्प्याने कमी होते. सावो पावलो ते पोर्तो ॲलेग्रेच्या भागात ही उंची सरळ एकाच उतारात संपते. अजस्र कड्यामुळे आग्नेय व्यापारी वारे अडवले जातात, त्यामुळे अजस्र कड्याच्या पलीकडे (वातविन्मुख प्रदेश) पर्जन्यछायेचा प्रदेश तयार होतो. या प्रदेशाच्या उत्तरेकडील भागाचे वर्णन अवर्षणाचा चतुष्कोन असे केले जाते.
किनारी प्रदेश :
ब्राझीलला सुमारे ७४०० किमी लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे. या किनाऱ्याचे उत्तर व पूर्व असे दोन विभाग केले जातात. उत्तरेकडील आमापापासून पूर्वेकडील रिओ ग्रांडे दो नॉर्तेपर्यंतच्या किनाऱ्यास उत्तर अटलांटिकचा किनारा असे म्हणता येईल, तेथून पुढे दक्षिण दिशेने पसरलेल्या किनाऱ्यास पूर्वकिनारा म्हणता येईल.
उत्तर किनाऱ्यावर अॅमेझॉनसह अनेक नद्या येऊन मिळतात, त्यामुळेहा किनारा सखल बनला आहे. या किनाऱ्यावर माराजाॅ बेट, माराजाॅ उपसागर व सावो मारकोस उपसागर आहेत. माराजाॅ हे मोठेकिनारी बेट आहे. ते अॅमेझॉन व टोकँटिन्स नद्यांच्या मुखांदरम्यान तयार झाले आहे. पूर्वेकडील किनाऱ्यावर अनेक लहान नद्या येऊन मिळतात. या भागात सावो फ्रान्सिस्को ही एक मोठी नदी अटलांटिक महासागरास मिळते. या किनाऱ्यावर लांबवरपसरलेल्या पुळणी व तटीय वालुकागिरी ठिकठिकाणी दिसतात. काही भागांत या किनाऱ्याचे रक्षण प्रवाळकट्टे आणि प्रवाळबेटे यांमुळेहोते.
मैदानी प्रदेश :
ब्राझीलमधील मैदानी प्रदेश दोन विभागात दिसून येतो. उत्तरेकडील अॅमेझॉन खोऱ्याचा भाग आणि नैऋत्येकडील पॅराग्वे-पॅराना नद्यांचा भाग. अॅमेझॉन हा ब्राझीलमधील सर्वांत विस्तीर्ण मैदानी प्रदेश आहे. अॅमेझॉनच्या मैदानाचा सर्वसाधारण उतार पूर्वेकडे आहे. अॅमेझॉन खोरे ब्राझीलच्या पश्चिम भागात खूप रुंद (१३०० किमी) असून, दोन उच्चभूमी जेथे खूप जवळ येतात तेथे ही रुंदी २४० किमी इतकी कमी होते. जसजशी अॅमेझॉन नदी अटलांटिक महासागराकडे जाते तसतशी मैदानाची रुंदी वाढत जाते. हा मैदानी भाग पूर्णपणे वनांनी व्यापलेला आहे. वारंवार येणारे पूर आणि वनांच्या तळाकडील भागात जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पती यांमुळेहा मैदानी प्रदेश खूपच दुर्गम बनला आहे. अॅमेझॉनच्या खोऱ्यातील वने उष्णकटिबंधीय वर्षावने आहेत.
ब्राझीलमधील दुसरा मैदानी भाग म्हणजे ब्राझील उच्चभूमीच्या नैऋत्येकडील पॅराग्वे-पॅराना या नद्यांच्या उगमाकडील भाग. पॅराग्वेच्या उगमक्षेत्राचा उतार दक्षिणेकडे आहे, तर पॅराना नदीचा उतार नैऋत्येकडे आहे. पॅँटानल हा जगातील उष्णकटिबंधीय पाणथळ भूमींपैकी एक प्रदेश आहे. हा प्रदेश ब्राझील उच्चभूमीच्या नैऋत्य भागात पसरला आहे. पॅँटानल हा एक दलदलीचा प्रदेश असून तो ब्राझीलमधील माटो ग्रासो दो सुल राज्यात आहे. पॅँटानलचा विस्तार ब्राझीलप्रमाणे अर्जेंटिना देशातही दिसून येतो.
द्वीपसमूह :
मुख्य भूमीशिवाय ब्राझील देशात काही बेटांचा समावेश होतो. त्यांचे वर्गीकरण किनारी बेट व सागरी बेट असे केले जाते. बहुतेक किनारी बेटेही संचयनातून निर्माण झालेली आहेत. सागरी बेटेही मुख्य भूमीतून निर्माण झालेली आहेत. सागरी बेटेही मुख्य भूमीपासून ३०० किमीपेक्षा दूर अटलांटिक महासागरात आहेत. ही बेटे बहुतेक खडकाळ असून ते जलमग्न डोंगराच्या माथ्याचे भाग आहेत. दक्षिण अटलांटिक महासागराच्या किनारी भागांतील बेटे प्रवाळबेटे असून त्यांना कंकणद्वीप म्हणतात.
जलप्रणाली :
नद्यांच्या खोऱ्यांना नावे द्या. गंगा नदी व अॅमेझॉन नदी यांच्या खोऱ्यांबद्दल तुलनात्मक टीप लिहा. त्यासाठी खालील मुद्द्यांचा वापर करा. l पाणलोट क्षेत्राचे आकारमान. (नकाशाप्रमाणे विचारात घ्या.)
भौगोलिक स्पष्टीकरण
ब्राझील :
ब्राझील जलप्रणाली : ब्राझीलच्या जलप्रणालीचा विचार करताना असे लक्षात येते, की या देशात तीन प्रमुख नद्यांची खोरी आहेत.
l ॲमेझॉनचे खोरे. l नैॠत्येकडील पॅराग्वे-पॅराना जलप्रणाली. l ब्राझील उच्चभूमीच्या पूर्वेकडील सावो फ्रािन्सस्को व किनारपट्टीवरील इतर नद्या.
ॲमेझॉनची जलप्रणाली : ॲमेझॉन नदीचा उगम पेरू देशातील अँडीज पर्वतरांगेच्या पूर्व उतारावर होतो. ॲमेझॉनमधील पाण्याच्या विसर्गाचे प्रमाण प्रचंड आहे. हे सुमारे २ लाख घनमीटर प्रति सेकंद एवढे आहे. त्यामुळे नदीच्या उगमापासून नदीच्या पात्रात जमा झालेला गाळ वेगाने वाहून नेला जातो. यामुळेच नदीच्या मुखाकडेही गाळाचे संचयन फार मोठ्या प्रमाणावर होत नाही. साधारणतः नद्यांच्या मुखांशी अनेक वितरिका आढळतात; पण अशा प्रकारच्या वितरिका ॲमेझॉनच्या मुखाशी आढळत नाहीत. त्याऐवजी ॲमेझॉनच्या मुखाजवळ अटलांटिक महासागरात किनाऱ्याच्या जवळ अनेक बेटे तयार झालेली आढळतात. ॲमेझॉन नदीच्या पात्राची मुखाजवळील रुंदी सुमारे १५० किमी आहे. (तुमच्या गावापासून १५० किमी अंतरावरील एखादे गाव विचारात घ्या, म्हणजे या अंतराचा अंदाज तुम्हांला येईल.)ॲमेझॉन नदीचे बहुतांश पात्र जलवाहतुकीस योग्य आहे.
पॅराग्वे-पॅराना जलप्रणाली : या दोन नद्या ब्राझीलच्या नैॠत्य भागात आढळतात. या दोन्ही नद्या ब्राझीलच्या दक्षिणेकडील अर्जंटिना देशातील प्लाटा नदीला मिळतात. या दोन्ही नद्या व दक्षिण टोकाला असलेली उरुग्वे नदी यांना ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरून पाण्याचा पुरवठा होतो.
सावो फ्रान्सिस्को : ही ब्राझीलमधील तिसरी महत्त्वाची नदी आहे. या नदीचे संपूर्ण पाणलोट क्षेत्र ब्राझीलच्या हद्दीत येते. ब्राझील उच्चभूमीच्या पूर्वभागात हे पाणलोट क्षेत्र आहे. या भागात सुमारे १००० किमी अंतरापर्यंत ही नदी उत्तरेकडे वाहते व त्यानंतर पूर्वेकडे वळून अटलांटिक महासागरास मिळते. सावो फ्रान्सिस्को नदीमुखाजवळील सुमारे २५० किमी लांबीचा भाग हा जलवाहतुकीस योग्य आहे.
किनारी प्रदेशातील नद्या : ब्राझीलच्या किनारी प्रदेशात अनेक कमी लांबीच्या नद्या आढळतात. किनाऱ्यावरील प्रदेशात दाट लोकवस्ती असल्यामुळे या नद्याही महत्त्वाच्या आहेत. त्यांपैकी परानिबा, इटापेकुरू या नद्या उत्तरेकडे वाहतात व उत्तर अटलांटिक महासागराला मिळतात.
दक्षिण अटलांटिक महासागराला मिळणाऱ्या नद्यांना पाण्याचा पुरवठा ब्राझील उच्चभूमीतून होतो. पुरागुआकु नदी साल्वाडोरजवळ अटलांटिक महासागराला मिळते.
भारत :
भारत जलप्रणाली : उगमक्षेत्रानुसार भारतातील नद्यांचेहिमालयातील नद्या व द्वीपकल्पावरील नद्या आकृती ३.५ : भारत जलप्रणाली नकाशाशी मैत्री असे वर्गीकरण केले जाते.
हिमालयातील नद्या : हिमालयातील बहुतेक प्रमुख नद्या विविध हिमनद्यांतून उगम पावतात, त्यामुळे उन्हाळ्यातही त्यांमधून मोठा विसर्ग होतो. पावसाळ्यात त्यांना पूर येतो. या बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. या गटात सिंधू व तिच्या उपनद्या आणि गंगा व
तिच्या उपनद्या अशा दोन समूहांचा समावेश केला जातो. सिंधू व तिच्या उपनद्या (झेलम, चिनाब, रावी व बियास) पश्चिम हिमालयात म्हणजेच जम्मू आणि काश्मीर व लडाखमधून वाहतात. त्या एकमेकींना बऱ्याचशा समांतर आहेत.
सिंधूची एक प्रमुख उपनदी सतलज ही मान सरोवराजवळ उगम पावते व पश्चिम दिशेने वाहते. सतलज व तिच्या उपनद्यांमधील गाळाच्या संचयनातून भारतातील पंजाबचे मैदान तयार झाले आहे. सिंधू नदी पुढे पाकिस्तानात वाहत जाते व अरबी समुद्रास मिळते.
गंगा नदी हिमालयातील गंगोत्री हिमनदीतून उगम पावते. हिमालय ओलांडून मैदानी प्रदेशात आल्यानंतर ती पूर्ववाहिनी बनते. हिमालयात उगम पावणाऱ्या गंगेच्या अनेक उपनद्यादेखील अशाच मार्गाने वाहतात. यमुनोत्री येथे उगम पावणारी यमुना ही गंगेची एक प्रमुख उपनदी आहे.
गंगेची एक मोठी उपनदी बृहद्हिमालयाच्या उत्तर भागातून वाहते व हिमालय ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश करते. हिमालयातून वाहते तेव्हा ती त्सांग पो नावाने ओळखली जाते. हिमालय ओलांडणाऱ्या तिच्या प्रवाहास दिहांग असे नाव आहे. पूर्वेकडे वाहणाऱ्या नदीस ब्रम्हपुत्रा असे संबोधतात. गंगा नदीला अनेक उपनद्या ठरावीक अंतरानेमिळत गेल्यानेविसर्ग वाढत जातो. ब्रम्हपुत्रा नदी बांग्लादेशात गंगेस मिळते. तेथे पाणी आणि अवसाद यांचा मोठा विसर्ग होऊन विस्तीर्ण असा त्रिभुज प्रदेश निर्माण झाला आहे. द्वीपकल्पीय नद्यांपैकी सुद्धा काही नद्या गंगेच्या खोऱ्यात येऊन मिळतात. त्यांपैकी महत्त्वाच्या नद्या म्हणजे चंबळ, केन, बेटवा आणि शोण या आहेत.
द्वीपकल्पीय नद्या : द्वीपकल्पीय नद्यांचे वर्गीकरण पश्चिमवाहिनी व पूर्ववाहिनी असे केले जाते. द्वीपकल्पाच्या पश्चिम भागात पश्चिम घाट हा महत्त्वाचा जलविभाजक आहे. द्वीपकल्पीय नद्यांतील विसर्ग हा पावसावर अवलंबून असतो. यामुळे या नद्यांच्या खोऱ्यात पुराच्या आपत्तीचा धोका सहसा नसतो. या नद्या हंगामी स्वरूपाच्या आहेत.
पश्चिम घाट आणि अरबी समुद्र यांदरम्यान वाहणाऱ्या नद्यांची लांबी कमी असते, पण प्रवेग जास्त असतो. केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र व दक्षिण गुजरातमधील किनारी प्रदेशातील नद्यांचे गुणधर्म सर्वसाधारणपणे सारखेच आहेत.
उत्तर गुजरातमधील खंभातच्या आखातात किनाऱ्यावर येऊन मिळणाऱ्या नद्या. हा एक वेगळा गट आहे. यात तापी, नर्मदा, मही व साबरमती या नद्यांचा समावेश होतो. तापी व नर्मदा या खचदरीतून वाहतात असे मानले जाते. मही नदी ईशान्य-नैऋत्य दिशेने वाहते, तर अरवलीच्या दक्षिण उतारावर उगम पावणारी साबरमती उत्तर-दक्षिण दिशेने वाहते. यांशिवाय अरबी समुद्रास मिळणारी नदी म्हणजे अरवलीच्या पश्चिम उतारावर उगम पावणारी लुनी नदी होय. ही नदी अरबी समुद्रास कच्छच्या आखातात मिळते.
बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या नद्या : द्वीपकल्पाचा बराचसा प्रदेश बंगालच्या उपसागराच्या पाणलोट क्षेत्राचा भाग आहे. यात गंगेशिवाय महानदी, गोदावरी, कृष्णा व कावेरी या प्रमुख नद्यांचा समावेश होतो. गोदावरी, कृष्णा व कावेरी या तीनही नद्यांचा उगम पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावर होतो. गोदावरी ही पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे. कृष्णा नदीचे खोरे गोदावरीच्या दक्षिणेस आहे. भीमा व तुंगभद्रा या कृष्णा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. कावेरी नदी कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांतून वाहते. या नदीचा फार पूर्वीपासून जलसिंचनासाठी उपयोग केला गेला आहे.