३ भारताची सुरक्षा व्यवस्था

चला, थोडी उजळणी करूया!

मागील प्रकरणात आपण भारताच्या परराष्ट्र धोरणासंबंधी अभ्यास केला. परकीय आक्रमण आणि अंतर्गत अव्यवस्थेपासून संरक्षण करणे, सीमारेषा सुरक्षित ठेवणे हे राष्ट्राचे प्राथमिक हितसंबंध असतात हेही आपल्याला समजले. त्यासाठी प्रत्येक राष्ट्र, राष्ट्रीय पातळीवर एक भक्कम सुरक्षा व्यवस्था निर्माण करते. भारतानेही अशी राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्था निर्माण केली असून या प्रकरणात आपण तिचे स्वरूप आणि सुरक्षा व्यवस्थेसमोरील आव्हाने विचारात घेणार आहोत.

राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय ? आंतरराष्ट्रीय व्यवस्था सार्वभौम राष्ट्रांची बनलेली आहे. ही सार्वभौम राष्ट्रे जरी एकमेकांना सहकार्य करत असली तरी त्यांच्यात काही वेळेस संघर्षही होतात. राष्ट्राराष्ट्रांमध्ये सीमारेषेसंबंधी वाद असतात, तर काही वेळेस पाणीवाटपावरून त्यांच्यात संघर्ष निर्माण होतात. आंतरराष्ट्रीय करारांचे पालन न करणे, परस्परांशी सतत स्पर्धा करणे, शेजारी देशांतून निर्वासितांचे लोंढे येणे ही संघर्षाची काही अन्य कारणे असू शकतात. राष्ट्रांमध्ये अशा प्रकारे परस्परविरोधी हितसंबंध निर्माण झाल्यास त्यांचे निराकारण तडजोडी, चर्चा यांच्या आधारे केले जाते; परंतु असे प्रयत्न जेव्हा अपुरे ठरतात तेव्हा एखादे राष्ट्र युद्धाचाही विचार करते. एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावर आक्रमण करणे, राष्ट्राच्या सार्वभौमत्वाला आव्हान देणे यांमुळे राष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण होतो. आक्रमक राष्ट्रांच्या लष्करी सामर्थ्यामुळे अशा प्रकारचे आव्हान निर्माण होते. कोणत्याही परिस्थितीत राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचे आणि अस्तित्वाचे रक्षण करणे हे राज्याचे पहिले कर्तव्य आणि जबाबदारी असल्याने राज्याला आपली सुरक्षा व्यवस्था कायम सज्ज आणि अद्ययावत ठेवावी लागते. याला राष्ट्रीय सुरक्षा असे म्हणतात.

राष्ट्रीय सुरक्षेचे जतन करण्याचे मार्ग राष्ट्राच्या सुरक्षेचा संबंध भौगोलिकतेशी जोडलेला आहे. कारण भौगोलिकदृष्ट्या अधिक निकट असणाऱ्या राष्ट्रांकडून राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. आपल्या भौगोलिक सीमारेषांना असलेला धोका कोणता अाहे व तो कोणाकडून आहे हे ओळखणे महत्त्वाचे असते.

हा धोका दूर ठेवायचा असेल तर त्यासाठी राष्ट्राला आपली लष्करी ताकद वाढवावी लागते. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून धोक्याविषयी अंदाज बांधणे, शस्त्रास्त्रनिर्मिती, संरक्षण दलांचे आधुनिकीकरण व ती अद्ययावत करणे इत्यादी मार्ग अवलंबले जातात. युद्धाच्या मार्गाने संघर्ष निराकरण करणे व राष्ट्रीय सुरक्षेची जपणूक करणे अधिक तणावाचे आणि आंतरराष्ट्रीय शांतता धोक्यात आणणारे असते म्हणून काही राष्ट्रे अन्य राष्ट्रांचा पाठिंबा मिळवून राष्ट्रीय सुरक्षेला असणारा धोका कमी करण्याचा प्रयत्न करतात.

भारताची सुरक्षा यंत्रणा : भूदल, नौदल आणि वायुदल या संरक्षण करणाऱ्या तीन दलांचा भारताच्या सुरक्षा यंत्रणेत समावेश आहे. भारताच्या भौगोलिक सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी भूदलावर असते, तर नौदल भारताच्या सागरी सीमांचे रक्षण करते. भारताच्या हवाई सीमा व अवकाशाचे रक्षण करण्याची जबाबदारी वायुदलाची असते. या तीनही दलांवर संरक्षण मंत्रालयाचेनियंत्रण असते. भारतातील भूदल खूप मोठे असून ते जगातील सातव्या क्रमांकाचे मानले जाते. भूदलाच्या प्रमुखाला ‘जनरल’ अस म्हणतात. नौदलाचे प्रमुख ‘ॲडमिरल’ असतात, तर वायुदलाच्या प्रमुखाला ‘एअर चीफ मार्शल’ असे म्हणतात. तीनही दलांमध्ये समन्वय राखण्यासाठी २०१९ मध्ये संरक्षण प्रमुख (Chief of Defence Staff) हे पद निर्माण केले आहे. या प्रमुखांची नेमणूक भारताचे राष्ट्रपती करतात.

भारताचे राष्ट्रपती सर्व संरक्षण दलांचे सरसेनापती (Supreme Commander of the Defence Forces) असतात. राष्ट्रपतींच्या संमतीशिवाय संरक्षण दलांना युद्ध अथवा शांततेसंबंधी निर्णय घेता येत नाहीत. कारण राष्ट्रपती नागरी सत्तेचेप्रतिनिधित्व करतात. लोकशाहीत नागरी नेतृत्व लष्करी नेतृत्वापेक्षा श्रेष्ठ मानले जाते. भारताच्या सुरक्षा यंत्रणेतील तीनही संरक्षण दले अद्ययावत असावीत, यासाठी अनेक उपाययोजना केल्या जातात. त्यासाठी काही संशोधन संस्थाही स्थापन केल्या आहेत. संरक्षण दलातील सर्व श्रेणींच्या व्यक्तींना आपले काम उत्तम प्रकारे पार पाडता यावे यासाठी आपल्या देशात अनेक प्रशिक्षण संस्थाही आहेत. उदा., पुणे येथील नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी, दिल्ली येथील नॅशनल डिफेन्स कॉलेज इत्यादी.

 निमलष्करी दले : भारतातील संरक्षण दलांना मदत करण्यासाठी निमलष्करी दले असतात. ती पूर्णतः लष्करीही नसतात व नागरीही नसतात. म्हणून त्यांना ‘निमलष्करी दले’ असे म्हटले जाते. संरक्षण दलांना साहाय्य करणे हे त्यांचे प्रमुख काम असते. सीमा सुरक्षा दल (Border Security Force), तटरक्षक दल (Coast Guard), केंद्रीय राखीव पोलीस दल (Central Reserve Police Force), जलद कृतिदल (Rapid Action Force) यांचा निमलष्करी दलात समावेश होतो. रेल्वेस्थानके, तेलसाठे, पाणीसाठे इत्यादी महत्त्वाच्या ठिकाणांचे संरक्षण करण्याची जबाबदारी निमलष्करी दलांची असते. तसेच नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींचे व्यवस्थापन करण्यात त्यांचा सहभाग असतो. शांततेच्या काळात देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी निमलष्करी दलांवर असते.

सीमेजवळच्या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, तस्करी रोखणे, सीमेवर गस्त घालणे ही कामे सीमा सुरक्षा दल करते. भारताच्या सागरी किनाऱ्यांचे रक्षण करण्यासाठी तटरक्षक दलाची निर्मिती करण्यात आली आहे. भारताच्या सागरी हद्दीतील मच्छीमारी व्यवसायास संरक्षण देणे, सागरी मार्गावरील चोरटा व्यापार थांबवणे इत्यादी कामे तटरक्षक दल पार पाडते. कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या कामी विविध राज्यांतील प्रशासनास मदत करण्याचे काम केंद्रीय राखीव पोलीस दल करते.

बाँबस्फोट, दंगे यांमुळे देशाच्या सुरक्षेस धोका निर्माण झाल्यास वेगवान हालचाली करून जनजीवन सुरळीत करण्याचे काम जलद कृती दल करते. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त व लष्करी शिक्षणाची आवड निर्माण व्हावी या हेतूने राष्ट्रीय छात्रसेना म्हणजे एन.सी.सी.ची स्थापना करण्यात आली आहे. यात शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी- विद्यार्थिनींना सहभागी होता येते.

गृहरक्षक दल : स्वातंत्र्यपूर्व काळात गृहरक्षक दल (होमगार्ड) ही संघटना स्थापन करण्यात आली. गृहरक्षक दलात सहभागी होऊन नागरिक देशाच्या संरक्षणास साहाय्यभूत ठरू शकतात. वीस ते पस्तीस वर्षे वयोगटातील कोणत्याही स्त्री-पुरुष नागरिकांस या दलात भरती होता येते.

पोलिसांच्या बरोबरीने सार्वजनिक सुरक्षितता राखणे, दंगल व बंद या काळात दूध, पाणी, इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे, वाहतुकीची व्यवस्था करणे, भूकंप, पूर अशा नैसर्गिक आपत्तींच्या वेळी लोकांना मदत करणे इत्यादी कामे या दलास पार पाडावी लागतात.

भारताच्या सुरक्षिततेपुढील आव्हाने स्वातंत्र्यापासून आजपर्यंत भारताच्या सुरक्षिततेला पाकिस्तान आणि चीन या राष्ट्रांनी धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक वादग्रस्त प्रश्न आहेत. उदा., काश्मीरची समस्या, पाणीवाटपाविषयीचे तंटे, घुसखोरीची समस्या, सीमावाद, इत्यादी. हे प्रश्न चर्चा आणि वाटाघाटीच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न भारत सातत्याने करत आहे. (भारत-पाकिस्तान संबंधांविषयी तुम्हांला प्रकरण ६ मध्ये अधिक अभ्यासायला मिळणार आहे.) आशिया खंडात भारत आणि चीन हे महत्त्वाचे देश आहेत. १९६२ मध्ये चीनबरोबर आपले युद्धही झाले आहे. भारताच्या शेजारी असणाऱ् राष्ट्रांवर आपले प्रभुत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न चीन करत असल्यामुळे भारत-चीन संबंधांत तणाव आहे. सीमारेषेबाबत भारत-चीन यांमध्ये वाद आहे. भारताच्या सुरक्षिततेला केवळ बाहेरच्या राष्ट्रांकडूनच धोका आहे असे नाही तर अंतर्गत क्षेत्रातूनही सुरक्षितता धोक्यात आणण्याचा प्रयत्न होत आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भात आता बाह्य सुरक्षितता व अंतर्गत सुरक्षितता असा फरक महत्त्वाचा राहिला नाही. धर्म, प्रादेशिकता, वैचारिक, वांशिक, आर्थिक यांवर आधारित अनेक बंडखोर चळवळी, अंतर्गत क्षेत्रात अस्थिरता निर्माण करत आहेत. उदा., नक्षलवादी चळवळ. दहशतवाद हे भारताच्या अंतर्गत सुरक्षेच्या संदर्भातील सर्वांत मोठे आव्हान आहे. दहशतवाद ही एक जागतिक समस्या असून दहशतवाद नष्ट व्हावा म्हणून भारत प्रयत्नशील आहे.

मानवी सुरक्षा

राष्ट्रीय सुरक्षेच्या कल्पनेत शीतयुद्धानंतरच्या काळात बदल झाला असून ती अधिक व्यापक झाली आहे. राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे केवळ देशाची सुरक्षा नाही तर त्यात राहणाऱ्या माणसांचीही सुरक्षा असा नवा विचार त्यात आला आहे. कारण देशाची सुरक्षा ही अंतिमतः माणसांसाठीच असते. म्हणूनच माणूस केंद्रस्थानी ठेवून नव्याने केलेला सुरक्षेचा विचार म्हणजे मानवी सुरक्षा होय. मानवी सुरक्षेत माणसांचे सर्व प्रकारच्या धोक्यांपासून संरक्षण करून त्यांना शिक्षण, आरोग्य व विकासाच्या संधी प्राप्त करून देणे अपेक्षित आहे.

निरक्षरता, दारिद्र्य, अंधश्रद्धा, मागासलेपणा दूर करून सर्वांना सन्मानाने जगण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण करणे याचाही समावेश मानवी सुरक्षेत होतो. अल्पसंख्य व दुर्बल गटांच्या हक्कांचे संरक्षणही मानवी सुरक्षेसाठी आवश्यक आहे.

मानवी सुरक्षेला असणारी आव्हाने

  • मानवी सुरक्षेला असणारे सर्वांत मोठे आव्हान म्हणजे दहशतवाद. दहशतवादाचे लक्ष्यच सामान्य, निरपराध माणसे असतात. त्यांच्या मनात दहशत किंवा भीती निर्माण करून त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करणे हा दहशतवादाचा हेतू असतो. त्यामुळे मानवी सुरक्षेसाठी दहशतवाद नष्ट करणे आवश्यक आहे.
  • पर्यावरणातील बदलांमुळे व प्रदूषणामुळेही मानवी जीवनाला धोका निर्माण झाला आहे. एड्स, डेंग्यू, चिकनगुनिया, स्वाईन फ्लू, इबोला, कोरोना यांसारख्या रोगांनी मोठेच आव्हान निर्माण केले आहे. अशा रोगांपासून मानवाचे संरक्षण हाही मानवी सुरक्षेचा घटक मानला जातो.

भारताच्या सुरक्षा व्यवस्थेचे स्वरूप आपण या प्रकरणात अभ्यासले. राष्ट्रीय सुरक्षा ते मानवी सुरक्षा असा सुरक्षेसंबंधीच्या कल्पनेत झालेला बदलही आपण या प्रकरणात समजून घेतला. पुढील प्रकरणात आपण संयुक्त राष्ट्रे या आंतरराष्ट्रीय संघटनेचा अभ्यास करणार आहोत. मानवी सुरक्षेसाठी ती कोणत्या उपाययोजना करते, ते समजून घेऊ.