रंगरंगुल्या, सानसानुल्या, गवतफुला रे गवतफुला!
असा कसा रे मला लागला, सांग तुझा रे तुझा लळा!
मित्रासंगे माळावरती, पतंग उडवित फिरताना
तुला पाहिले गवतावरती, झुलता झुलता हसताना,
विसरून गेलो पतंग नभिचा, विसरून गेलो मित्राला
पाहुन तुजला हरखून गेलो, अशा तुझ्या रे रंगकळा!
हिरवी नाजुक रेशिम-पाती, दोन बाजूंला सळसळती
नीळनिळूली एक पाकळी, पराग पिवळे झगमगती,
तळी पुन्हा अन् गोजिरवाणी, लाल पाकळी खुलली रे
उन्हामधे हे रंग पाहता, भान हरपुनी गेले रे!
वारा घेउन रूप सानुले, खेळ खेळतो झोपाळा
रात्रहि इवली होउन म्हणते, अंगाईचे गीत तुला,
मलाहि वाटे लहान होऊन, तुझ्याहूनही लहान रे
तुझ्यासंगती सदा रहावे, विसरूनि शाळा, घर सारे!
तुझी गाेजिरी शिकून भाषा, गोष्टी तुजला सांगाव्या
तुझे शिकावे खेळ आणखी, जादू तुजला शिकवाव्या,
आभाळाशी हट्ट करावा, खाऊ खावा तुझ्यासवे
तुझे घालुनी रंगित कपडे, फूलपाखरां फसवावे!