४. नात्यांची घट्ट वीण (भाग – १)

जन्माला आलेला प्रत्येक माणूस जन्माबरोबरच किंवा नाळेबरोबरच ‘नातं’ नावाची एक भलीमोठी ‘माळ’ लेवून येतो. ज्या माळेत ‘नाते’ नामक मणी एकामागोमाग एक ओवलेले असतात. हे मोती मग एक सुंदर वीण गुंफत जातात. आपल्या सर्वांभोवती नकळत विणली जाणारी आणि भेटणाऱ्या प्रत्येक नात्याने अधिकाधिक मजबूत होत जाणारी ही नात्यांची वीण प्रत्येकाभोवती गुंफली जाते. नात्याला एक-एक नाव देत ती कधी जवळीक साधते, अगदी स्वकीय होऊन जाते, तर कधी कधी ‘परक्या’प्रमाणे वागते. नाती जन्माबरोबर आलेली असोत वा सहवासातून किंवा वातावरणातून निर्माण झालेली असू देत, त्यातही स्वकीय, परकीय असा भेदाभेद दिसतोच!

खरं तर माणूस जन्माला येतो तोच मुळी कुणाचा तरी मुलगा, कुणाची तरी मुलगी, कुणाचा तरी भाऊ, कुणाची तरी बहीण, कुणाचा तरी नातू म्हणूनच! नात्यांच्या विणीशी त्याची पहिली ओळख होते ती इथे आणि नंतरच्या प्रवासात भेटणारी अनेक नवी नाती त्या विणीला समृद्ध आणि सुंदर करून जातात.

रेशमाच्या धाग्यासारखी ही वीण एकाच वेळी नाजूकही असते आणि भक्कम, मुलायम आणि धारदारही. अशी ही बहुरंगी वीण अलगदपणे नात्यांचे एक-एक पदर आपल्यासमोर उलगडत जाते. नात्यांच्या आठवणीने कधी डोळ्यांत पाणी जमतं, तर कधी त्या आठवणीसह हृदयात नाती जपली जातात ती कायमचीच!

प्रत्येक आई मुलाच्या जन्मानंतरही त्याला घडवतच राहते. असे घडवताना कधी कुंचल्याच्या हळुवारपणे रंग रेखत तर कधी छिन्नीचे कठोरपणे घाव घालत तिचे काम चालूच असते. आईच्या घडवण्याने आपण जरी घडत गेलो तरी ती आपल्यासाठी कायमच एक गूढ बनून राहते. कधी ती आपल्यासाठी ऊबदार शाल असते, तर कधी कणखर ढाल असते, बालपणीच्या अंगाईला लागलेली सुंदर चाल असते.

आईनं जन्म दिल्यानंतर या जगाशी आपली ओळख होते. या ‘जग’ नावाच्या भवसागरात स्वत:चे माणूसपण जपण्याची तारेवरची कसरत प्रत्येकाला करावीच लागते. मुलाची जगण्याची वाट थोडी कमी खडतर व्हावी म्हणून ‘बाप’ नावाचं वल्हं हातात धरून भवसागर पार करण्याचा प्रयत्नही केला जातो. त्यासाठी मात्र ‘संवाद’ नामक सेतू बांधला जावा लागतो, मग या संवादातून बापाचं बाप असणं ठळकपणे जाणवत राहतं.

मायेचे आणि वात्सल्याचे पडदे भेदून हातात आलेलं मूल मोठं होऊन बघता बघता पंख पसरून कधी उडायला सुरुवात करतं कळतही नाही; पण त्याची झेप जेव्हा सातासमुद्रापलीकडे जायला लागते, तेव्हा मात्र पुन्हा एकदा तुटणाऱ्या नात्याची वेदना असह्य होते. आनंदाचा मुखवटा धारण केलेल्या आईवडिलांचं दु:ख मुलांना कळणार कसं अन्कधी? ही आई-वडिलांच्या जिवाची उलघाल कधीही न कळणारी असते मुलांसाठी! या विश्वात्मक जगात आपण मात्र पोरके होत जातो हे दु:ख उरी बाळगून, आशीर्वादासाठी उंचावलेला हात तसाच ठेवून मुलांच्या पाठीशी उभं राहण्यापलीकडे आई-वडील काय करू शकतात?

आईच्या डोळ्यांतून झरणाऱ्या अश्रूंची कथा साऱ्यांनाच माहिती आहे; पण ‘बाप’ नावाच्या पुरुषाच्या चेहऱ्यावरचा जबाबदारीचा मुखवटा दूर केलात, तर त्यामागे चेहऱ्यावरून ओघळणारे देखील अश्रूच असतात. ते फक्त जबाबदारीच्या मुखवट्यामागे दडवले जातात किंवा त्याच्याच गळ्यातल्या उपरण्याने पुसले जातात, एवढे मात्र खरे! नवीन नाती जुळणं ही दोन्ही बाजूंकडून घडणारी प्रक्रिया असते. तिची सुरुवात दोन्हींकडून व्हावी लागते. असं घडलं तरच नाती जुळून येतात, नाही तर अनेक दुवे नात्यातून निखळून जातात.

‘मैत्री’ हे एक असंच नातं आहे. अतिशय तरल असं हे नातं जपताना दोघांनाही एकाच वेळी एकच स्वप्न पडावं लागतं, तेव्हाच ते नातं ‘अनादि अनंताचं, नव्या अभिनव सृजनाचं’ होतं हे मात्र निर्विवाद सत्य! मैत्रीसारखी भावना खूप सूक्ष्म व तरल असते म्हणूनच म्हटलं जातं, ‘मित्र जरी समोर दिसला तरी मैत्री कधी दिसत नसते’. जगण्यासाठी अशी अनेक नाती आवश्यक असतात, त्यासाठी गरज भासते ती एका हितचिंतकाची, मार्गदर्शकाची, गुरूची! भारतीय परंपरेत गुरूकडून शिक्षण घेतल्यानंतर शिष्याला गुरुदक्षिणा द्यायची असते व गुरूने त्याला कानमंत्र द्यायचा असतो. जो पुढील कसोटीच्या काळात परिस्थितीवर मात कशी करायची ते शिकवून जातो.

शेजारधर्म हे पण एक असंच नातं असतं. शेजारधर्माचा एक धागा जुळला असेल तर स्नेहाच्या मर्यादा ओलांडतो आणि तुटला असेल तर वैराच्या मर्यादा ओलांडतो. कौटुंबिक वातावरणात आपल्या अवतीभवती रेंगाळणारी काही नाती अशी असतात, की ती विसरू म्हटलं तरी विसरली जात नाहीत. असंच एक नातं ‘आजी’चं असतं. झोपताना रोज नवी गोष्ट सांगणारी आजी आता फक्त आठवणीत जपावी लागते. तिला शोधण्यासाठी पाय आपोआप ‘वृद्धाश्रमा’कडे वळतात. असे प्रसंग मग मनं दु:खी करून जातात.

जन्मापासून सुरू झालेला हा नात्यांचा प्रवास! तारुण्याचे क्षण संपून वार्धक्याकडे वाटचाल करू लागताे, तेव्हा मागे वळून पाहावेच लागते. किंबहुना ते अपरिहार्यच आहे. मागे वळून पाहिल्यानंतर आजपर्यंतचा प्रवास एका वेगळ्या स्वरूपात समोर येतो. पूर्वीचे मुखवटे गळून पडतात, अहंगंड, मान-अपमान, प्रतिष्ठा या साऱ्यांची कात टाकून एक निखळ, निकोप मन समोर येतं आणि आपण साऱ्या गोष्टी मान्य करतो, कारण उंबरठा ओलांडून पलीकडच्या जगात केव्हा जावं लागेल हे सांगता येत नाही. पिकलं पान गळलं तरी नवी पालवी फुटणार आहे हा निसर्गाचा नियम, यातून कोण सुटणार आहे? हे शाश्वत सत्य मान्य करावंच लागतं आणि मग जन्मापासून सुरू झालेला नात्यांचा हा प्रवास निर्णायक उंबरठ्यावर येऊन थांबतो आणि आपलं एक अभिन्न असं नातं तयार होतं, साऱ्या नात्यांच्याही पलीकडे जाणारं! ज्याला शब्दांचं क्षितिजच काय; पण शब्दांचं आभाळही अपुरं पडेल. आपल्या हातून काही निसटत चालल्याची ही हुरहूर असली तरी त्याच शेवटामध्ये एक सुरुवातही असते, आपल्याला पुढे नेणारी! नात्यांची वीण ही अशीच असते, घट्ट पकडून ठेवणारी!