४. शिवपूर्वकालीन महाराष्ट्र

सतराव्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रातील बहुतांश प्रदेश अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह यांच्या ताब्यात होता. मुघलांचा खानदेशामध्ये शिरकाव झालेला होता. दक्षिणेमध्ये आपला सत्ताविस्तार घडवून आणणे हे त्यांचे उद्‌दिष्ट होते. कोकणच्या किनारपट्टीवर आफ्रिकेतून आलेल्या सिद्दी लोकांच्या वस्त्या होत्या. याच काळात युरोपातून आलेल्या पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच व डच इत्यादी सत्तांमधील सागरी स्पर्धा आणि संघर्ष तीव्र होत होता. त्यांच्यात व्यापारासाठी बाजारपेठा काबीज करण्याची चढाओढ लागली होती. पश्चिम किनारपट्टीवरील गोव्यात आणि वसईत पोर्तुगिजांनी अगोदरच राज्य स्थापन केले होते; तर इंग्रज, डच, फ्रेंच यांनी व्यापारी कंपन्यांच्या माध्यमांतून वखारींच्या रूपात चंचुप्रवेश केला होता. या सर्व सत्ता एकमेकांना आजमावत व स्वतःला सुरक्षित ठेवत. तसेच जमेल तेवढे वर्चस्व करण्याच्या बेतात होत्या. या संघर्षामुळे महाराष्ट्रात अस्थिरता व असुरक्षितता निर्माण झाली होती. युरोपातील या वेगवेगळ्या लोकांना त्यांच्या शिरस्त्राणावरून ‘टोपकर’ म्हणत.

शिवपूर्वकाळातील लोकवस्ती, प्रजा आणि राज्यकर्ते यांच्यामधील दुवा म्हणून कार्य करणारे अधिकारी, बाजारपेठा, कारागीर वगैरेंचे स्वरूप समजण्यासाठी गाव (मौजा), कसबा आणि परगणा या भौगोलिक स्थानांची ओळख होणे आवश्यक आहे. अनेक गावांचा परगणा होत असे. सामान्यतः परगण्याच्या मुख्य ठिकाणाला कसबा म्हणत असत. कसब्यापेक्षा लहान असलेल्या गावाला मौजा म्हणत असत. आपण आता गाव, कसबा आणि परगणा यांची क्रमशः संक्षिप्त ओळख करून घेऊ.

 गाव (मौजा) : बहुतेक लोक गावामध्येच राहत. गावाला मौजा असेही म्हणत. पाटील हा गावाचा प्रमुख असे. लोकांनी गावातील जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणावी, यासाठी तो प्रयत्न करी. गावामध्ये तंटाबखेडा होत असे, तेव्हा शांतता निर्माण करण्याचे काम पाटील करत असे. त्याच्या कामात कुलकर्णी मदत करत. जमा झालेल्या महसुलाची नोंद करणे हे काम कुलकर्णी करत असे. गावामध्ये निरनिराळे कारागीर असत. त्यांच्याकडे व्यवसायासंबंधीचे हक्क वंशपरंपरेने चालत आलेले असत. गावात कारागीर जी सेवा देत असत, त्याबद्दल शेतकऱ्यांकडून त्यांना शेतीतील उत्पन्नाचा काही वाटा मिळे. त्यास बलुतं असे म्हणत.

कसबा : कसबा हे एक मोठे खेडेगावच असे. सामान्यतः ते परगण्याचे मुख्य ठिकाण असे. उदा., इंदापूर परगण्याचे मुख्य ठिकाण इंदापूर कसबा, वाई परगण्याचे मुख्य ठिकाण वाई कसबा. गावाप्रमाणेच कसब्यामध्ये मुख्य व्यवसाय शेतीचा असे. तेथे सुतार, लोहार इत्यादी कुशल कारागीरही असत. कसब्याला जोडूनच बाजारपेठ असे. शेटे व महाजन हे पेठेचे वतनदार कारभारी असत. प्रत्येक गावात पेठ होतीच असे नाही. मात्र गावात पेठ वसवण्याचे काम शेटे- महाजनांचे असे. त्यासाठी त्यांना सरकारातून जमीन आणि गावकऱ्यांकडून काही हक्क मिळत. पेठेचे हिशोब ठेवण्याचे काम महाजन पाहत असे.

परगणा : अनेक गावे मिळून परगणा होत असला तरी सर्व परगण्यांतील गावांची संख्या समान नसे. उदा., पुणे परगणा. हा मोठा परगणा होता. त्यात २९० गावे होती. चाकण परगण्यात ६४ गावे होती. शिरवळ परगणा लहान होता. त्यात ४० गावे होती. देशमुख व देशपांडे हे परगण्याचे वतनदार अधिकारी असत. देशमुख हा परगण्यातील पाटलांचा प्रमुख असे. गावपातळीवर जे काम पाटील करत असे तेच काम परगणा पातळीवर देशमुख करत असे. तसेच परगण्यातील सर्व कुलकर्ण्यांचा प्रमुख देशपांडे असे. गावपातळीवर कुलकर्णी जे काम करत असे, ते काम परगणा पातळीवर देशपांडे करत असे. हे वतनदार अधिकारी रयत आणि सरकार यांच्यामधील दुवा होते.

परगण्यातील गावांवरती कधी परचक्र आले किंवा दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली, तर रयतेचे म्हणणे सरकारकडे मांडण्याचे काम वतनदार करत. काही वेळेला हे अधिकारी आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करत. ते कधी रयतेकडून अधिक पैसा जमा करत, तर कधी रयतेकडून गोळा केलेली रक्कम सरकारकडे जमा करण्यास विलंब लावत. अशा वेळी प्रजा त्रासली जात असे.

दुष्काळाचे संकट : शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असे. पाऊस पडला नाही तर शेतात पीक येत नसे. मग अन्नधान्याचे भाव वाढत. लोकांना अन्नधान्य मिळणे मुश्कील होई. जनावरांना चारा मिळत नसे. पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होई. लोकांना गावात राहणे कठीण होई. लोक गाव सोडत. लोकांवर परागंदा होण्याची वेळ येई. दुष्काळ हे रयतेला सर्वांत मोठे संकट वाटे.

 महाराष्ट्रामध्ये असाच एक मोठा दुष्काळ इ.स.१६३० मध्ये पडलेला होता. या दुष्काळाने लोक हवालदिल झाले. धान्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. भाकरीच्या तुकड्यासाठी लोक स्वतःला विकून घेण्यास तयार होते, पण विकत घेणाराच कोणी नव्हता, असे वर्णन वाचायला मिळते. कुटुंबे उद्ध्वस्त झाली, गुरे-ढोरे मेली. शेती व्यवसाय खचला. उद्योगधंदे संपुष्टात आले. आर्थिक व्यवहार खुंटले. लोक देशोधडीला लागले. अशा उद्ध्वस्त झालेल्या लोकजीवनाची घडी बसवणे हे एक मोठे आव्हान होते.

वारकरी पंथाचे कार्य : अंधश्रद्धा व कर्मकांड यांचा समाजावर जबरदस्त पगडा होता. लोक दैववादाच्या आहारी गेले होते. त्यांची प्रयत्नशीलता थंडावली होती. रयतेची स्थिती फारच हलाखीची होती. अशा परिस्थितीत समाजात चैतन्य निर्माण करण्याचे प्रयत्न महाराष्ट्रातील वारकरी पंथाने केले.

महाराष्ट्रात संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांच्यापासून सुरू झालेली संतपरंपरा समाजाच्या विविध स्तरांतून आलेल्या संतांनी पुढे चालवली. या संत परंपरेमध्ये समाजातील सर्वस्तरांतील लोक होते. उदा., संत चोखामेळा, संत गोराेबा, संत सावता, संत नरहरी, संत सेना, संत शेख महंमद इत्यादी. त्याचप्रमाणे संत मंडळींत संत चोखोबांची पत्नी संत सोयराबाई आणि बहीण संत निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत बहिणाबाई सिऊरकर यांसारख्या स्त्रियाही होत्या. या संत चळवळीचे पंढरपूर हे केंद्र होते. विठ्ठल हे त्यांचे दैवत होते. पंढरपुरात चंद्रभागेच्या काठी ही सर्व संतमंडळी आणि वारकरी भक्तिसागरात न्हाऊन निघत. तेथे भजन, कीर्तन आणि सहभोजन (काला) या माध्यमातून समतेचा प्रसार होई.

संत नामदेव : हे वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत होते. ते कुशल संघटक होते. ते उत्तम कीर्तनकारही होते. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी सर्व जाती-जमातींमधील स्त्री- पुरुषांना एकत्र करून त्यांच्यात समतेची भावना जागवली. ‘नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी।।’ ही त्यांची प्रतिज्ञा होती. त्यांची अभंगरचना प्रसिद्ध आहे. अनेक संतांवर आणि सर्वसामान्य लोकांवर त्यांच्या शिकवणुकीचा प्रभाव पडला. ते आपल्या विचारांचा प्रसार करत पंजाबपर्यंत गेले होते. त्यांनी लिहिलेली पदे शिखांच्या ‘गुरुग्रंथसाहिब’ या ग्रंथात समाविष्ट आहेत. त्यांनी भागवत धर्माचा संदेश गावोगावी पोचवण्याचे कार्य केले. त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या महाद्वारासमोर संत चोखामेळा यांची समाधी बांधली. हे त्यांचे कार्य अविस्मरणीय आहे.

 संत ज्ञानेश्‍वर : हे वारकरी संप्रदायातील एक विख्यात संत होत. त्यांनी ‘भगवद्गीता’ या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा ‘भावार्थदीपिका’ अर्थात ‘ज्ञानेश्‍वरी’ हा ग्रंथ रचला. तसेच त्यांनी ‘अमृतानुभव’ या ग्रंथाची रचना केली. त्यांनी आपल्या ग्रंथांतून व अभंगांतून भक्तिमार्गाचे महत्त्व सांगितले. सामान्यांना आचरता येईल, असा आचारधर्म सांगितला. वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून दिली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन जगावे लागलेले असूनही त्यांनी आपल्या मनाचे संतुलन ढळू दिले नाही आणि कटुताही बाळगली नाही. ज्ञानेश्वरीतील ‘पसायदान’ उदात्त संस्कार करणारे आहे. ज्ञानेश्वरांचे बंधू संत निवृत्तिनाथ व संत सोपानदेव आणि भगिनी मुक्ताबाई यांच्याही काव्यरचना प्रसिद्ध आहेत.

 संत एकनाथ : हे महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील एक महान संत होत. त्यांचे साहित्य विपुल व विविध प्रकारचे आहे. त्यात अभंग, गौळणी, भारुडे इत्यादींचा समावेश होतो. त्यांनी भागवत धर्माची मांडणी सोपी व सविस्तर केलेली आहे. भावार्थ रामायणात रामकथेच्या निमित्ताने लोकजीवनाचे चित्र रेखाटले आहे. त्यांनी भागवत या संस्कृत ग्रंथाच्या भक्तीविषयक भागाचा अर्थ मराठीत विशद केला. त्यांच्या अभंगात जिव्हाळा आहे. परमार्थप्राप्तीसाठी प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाही, हे त्यांनी स्वतःच्या आचरणाने दाखवून दिले. ते खऱ्या अर्थाने लोकशिक्षक होते. आपली मराठी भाषा कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही असे ते मानत. ‘संस्कृत वाणी देवे केली । तरी प्राकृत काय चोरापासुनि झाली ?’ असे त्यांनी संस्कृत पंडितांना ठणकावून विचारले. त्यांनी इतर धर्मांचा तिरस्कार करणारांवर कडक टीका केली आहे.

संत तुकाराम : हे पुण्याजवळील देहू गावचे. त्यांची अभंगरचना प्रसन्न आणि प्रासादिक आहे. त्यांच्या अभंगांना श्रेष्ठ कवित्वाची उंची लाभली आहे. संत तुकारामांची ‘गाथा’ ही मराठी भाषेचा अमोल ठेवा आहे.

ते रंजल्यागांजल्यांमध्ये देवत्व पाहण्यास सांगताना म्हणतात, ‘जे का रंजले गांजले । त्यांसी म्हणे जो आपुले । तोचि साधु ओळखावा । देव तेथेचि जाणावा ।।’ आपल्या या दृष्टिकोनामुळेच त्यांनी आपल्याकडे असलेली लोकांना दिलेल्या कर्जांची कागदपत्रे इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवली आणि कित्येक कुटुंबांना कर्जमुक्त केले. त्यांनी समाजातील दांभिकतेवर व अंधश्रद्धांवर अत्यंत कडक शब्दांत टीका केली. भक्तीला नीतीची जोड देण्यावर त्यांचा भर होता. ‘जोडोनिया धन उत्तम व्यवहारे । उदास विचारे वेच करी ।।’ असे त्यांच्या शिकवणुकीचे सार सांगता येईल. समाजातील काही कर्मठ लोकांनी ते करत असलेल्या लोकजागृतीला विरोध केला. त्यांना मुळात अभंग रचण्याचा अधिकारच नाही, असा दावा करून त्यांनी त्यांच्या वह्या इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवल्या. त्यांनी या सर्व विरोधाला धीरोदात्तपणे तोंड दिले.

संत तुकारामांचे शिष्य आणि सहकारी विविध जाती-जमातींचे होते. नावजी माळी, गवनरशेट वाणी, संताजी जगनाडे, शिवबा कासार, बहिणाबाई सिऊरकर, महादजीपंत कुलकर्णी ही त्यांतली काही नावे. गंगारामपंत मवाळ आणि संताजी जगनाडे यांनी संत तुकारामांचे अभंग लिहून ठेवले ही त्यांची महत्त्वाची कामगिरी होय.

संतकार्याची फलश्रुती : संतांनी लोकांना समतेचा संदेश दिला. माणुसकी व मानवताधर्म शिकवला. एकमेकांवर प्रेम करावे, एकत्र यावे व एकजुटीने राहावे, ही त्यांची शिकवण होती. त्यांच्या कार्यामुळे लोकजागृती झाली. परचक्र, दुष्काळजन्य परिस्थिती किंवा निरनिराळ्या प्रकारची इतर निसर्गसंकटे आली असता, त्यांची पर्वा न करता कसे जगावे, याविषयी त्यांनी केलेला उपदेश हा लोकांचा मोठा आधार ठरला. त्यांच्या या कार्यामुळे महाराष्ट्रातील लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला.

समाजात धर्माची अवनती झाली होती. अशा वेळी संतांनी पुढे येऊन समाजाचे रक्षण केले. ते धर्माचा खरा अर्थ सांगू लागले. लोकांमध्ये राहून त्यांची सुखदुःखे समजावून घेत भक्तिमार्गाचा पुरस्कार करू लागले. अशा वेळी समाजातील काही कर्मठ लोक त्यांना विरोध करू लागले. हा विरोध सहन करणे म्हणजे आपल्या कर्तव्याचाच एक भाग आहे, असे संत मानत असत. ‘तुका म्हणे तोचि संत । सोशी जगाचे ।।’ या शब्दांत संत तुकारामांनी खऱ्या संताचे लक्षण सांगितले आहे.

शास्त्री – पंडितांच्या अवघड भाषेतील धर्माला संतांनी सर्वसामान्यांच्या भाषेत आणले. दैनंदिन व्यवहारातील भाषेत त्यांनी परमेश्वराची आळवणी केली. परमेश्वरापुढे सर्व समान आहेत अशी भूमिका घेतली. वर्ण आणि जातीचा अहंकार बाजूला सारून आपण एकमेकांना ‘परमेश्वराची लेकरे’ या स्वरूपात पहायला हवे, ही शिकवण समाजाला दिली. या सर्व संतांचे वैशिष्ट्य म्हणजे भक्ती करत असताना त्यांनी आपापली कर्तव्यकर्मे सोडली नाहीत. त्यांनी आपापल्या कामात परमेश्वर पाहिला. ‘कांदा मुळा भाजी | अवघी विठाई माझी ।।’ असे संत सावता महाराज म्हणाले. त्यांचे हे विधान शेतीच्या कामासंदर्भात असले तरी ते संतांच्या दैनंदिन जीवनातल्या अन्य प्रकारच्या कामांनाही लागू आहे. संत आपापले व्यवसाय सांभाळून भक्ती, उपदेश, कवित्व करत त्यांनी समाजाच्या नैतिक जाणिवा विकसित केल्या.

रामदास स्वामी : रामदास स्वामी मराठवाड्यातील जांब गावचे. त्यांनी बलोपासनेचे महत्त्व स्पष्ट केले.

‘मराठा तितुका मेळवावा । महाराष्ट्र धर्म वाढवावा ।’ हा त्यांचा संदेश प्रसिद्ध आहे. त्यांनी दासबोध, करुणाष्टके, मनाचे श्लोक या साहित्याच्या माध्यमातून जनतेला व्यावहारिक लोकसंघटनेचे महत्त्व सांगितले. समर्थ संप्रदाय स्थापन केला. चाफळ हे या संप्रदायाचे केंद्र होते. रामाच्या आणि हनुमानाच्या उपासनेचा प्रसार केला.

आपल्या विचारांच्या प्रसारार्थ त्यांनी भरपूर प्रवासकेला.

पारतंत्र्यातील स्वातंत्र्याच्या प्रेरणा:

शिवपूर्वकालीन महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इत्यादी प्रकारची स्थिती ही सामान्यतः अशी होती. या काळात महाराष्ट्र आदिलशाही वगैरे सत्तांच्या नियंत्रणाखाली होता. त्यामुळे तो स्वतंत्र नव्हता. असे असले तरी काही व्यक्ती आणि विचारधारा स्वातंत्र्याची स्वप्ने पाहत होत्या. अशा घटकांमध्ये स्वराज्य संकल्पक मानल्या जाणाऱ्या शहाजी राजांचे स्थान अग्रभागी होते.