भौगोलिक स्पष्टीकरण
पृथ्वीवर पाणी आणि जमीन यांचे वितरण असमान आहे हे आपल्याला माहीत आहे. सुमारे ७१% पृथ्वीचे पृष्ठ पाण्याने व्यापलेले असले तरी या पाण्याखालीही जमीन आहे. मात्र ती पाण्याप्रमाणे समपातळीत नाही.
भूपृष्ठावर आपल्याला दिसणाऱ्या असमान उंचीच्या प्रदेशाचे आपण अनेक भूरूपांमध्येवर्गीकरण करतो. असेच वर्गीकरण जलमग्न जमिनीचे करता येते.
महासागराची तळरचना :
जलमग्न जमिनीच्या रचनेला सागरतळरचना म्हणून ओळखले जाते. सागरतळरचना समुद्रसपाटीपासून असलेल्या खोलीच्या आधारे व तेथील जमिनीच्या आकारानुसार विचारात घेतली जाते. महासागरांची सरासरी खोली सुमारे ३७०० मीटर आहे. महासागराचा तळ भूमीप्रमाणेच उंच-सखल आहे. जलमग्न भूरूपांनी मिळून सागराच्या तळाची रचना ठरते. सागरतळ रचना विविध महासागरांमध्येभिन्न आहे. या रचनेतील काही ठळक भूप्रकार व सर्वसाधारण क्रम आपण पाहूया. समुद्र किनाऱ्यापासून जसजसे आत जावे तसतसे जलमग्न भूरचनेत बदल होतात. आकृती ४.२ व पुढील स्पष्टीकरणाचा एकत्रित अभ्यास करा.
भूखंड मंच :
किनाऱ्यालगत असलेला व समुद्रात बुडालेला जमिनीचा भाग म्हणजे भूखंड मंच होय. हा सागरतळाचा सर्वांत उथळ भाग आहे. यालाच समुद्रबुड जमीन असेही म्हणतात. त्याचा उतार मंद असतो. भूखंड मंचाचा विस्तार सर्वत्र सारखा नसतो. काही खंडांच्या किनाऱ्याजवळ तो अरुंद, तर काही खंडांच्या किनाऱ्याजवळ तो शेकडो किलोमीटरपर्यंत रुंद आहे. याची खोली साधारणतः समुद्रसपाटीपासून सुमारे २०० मीटरपर्यंत असते.
मानवाच्या दृष्टीने भूखंडमंच महत्त्वाचा आहे. जगातील मासेमारीची विस्तृत क्षेत्रे भूखंडमंचावरच आढळतात. भूखंडमंच हा भाग उथळ असल्याने सूर्यकिरण तळापर्यंत पोहोचतात. तेथे शेवाळ, प्लवंक यांची निर्मिती होते. हे माशांचे खाद्य असते. खनिज तेल, नैसर्गिक वायू व विविध खनिजे भूखंडमंचावरून खनन करून मिळवता येतात. उदा., मुंबई हाय हे अरबी समुद्रातील खनिज तेल व नैसर्गिक वायू मिळणारे भूखंडमंचावरील एक क्षेत्र आहे.
खंडान्त उतार :
भूखंडमंचाचा भाग संपल्यावर समुद्रतळाचा उतार तीव्र होत जातो, त्यास खंडान्त उतार म्हणतात. समुद्रसपाटीपासून याची खोली सुमारे २०० मीटर ते ३६०० मीटरपर्यंत असते. काही ठिकाणी ही खोली त्यापेक्षाही अधिक आढळते. खंडान्त उताराचा विस्तार कमी असतो. सर्वसाधारणतः खंडान्त उताराची अधःसीमा ही भूखंडांची सीमा मानली जाते.
सागरी मैदान :
खंडान्त उताराला लागून विस्तीर्ण मैदान असते. सागरतळाचा सपाट भाग म्हणजे सागरी मैदान होय. सागरी मैदानावर लहान-मोठ्या आकारांचे जलमग्न उंचवटे, पर्वत, पठारे इत्यादी भूरूपे आढळतात.
सागरी पर्वतरांगा व पठारे :
सागरतळावरील पर्वतरांगा हे जलमग्न पर्वत म्हणून ओळखले जातात. या पर्वतरांगा शेकडो किमी रुंद तर हजारो किमी लांब असतात. जलमग्न पर्वतरांगांच्या शिखरांचे भाग काही ठिकाणी सागरपृष्ठाच्या वर आलेले असतात. त्यांना आपण सागरी बेटे म्हणून ओळखतो. उदा., आईसलँड-अटलांटिक महासागर, अंदमान-निकोबार बेटे, बंगालचा उपसागर. काही सागरी उंचवट्यांचे माथे सपाट व विस्तृत असतात त्यांना सागरी पठार म्हणतात. उदा., हिंदी महासागरातील छागोसचे पठार.
सागरी डोह व सागरी गर्ता :
सागरतळावर काही ठिकाणी खोल, अरुंद आणि तीव्र उतारांची विवर सदृश सागरी भूरूपे आढळतात. त्यांना सागरी डोह किंवा गर्ता असे म्हणतात. साधारणतः कमी खोली असलेली भूरूपे हे सागरी डोह असतात, तर जास्त खोलीच्या लांबवर पसरलेल्या भूरूपास सागरी गर्ता म्हणतात. समुद्रसपाटीपासून गर्तांची खोली हजारो मीटरपर्यंत खोल असते. पॅसिफिक महासागरातील मरियाना गर्ता ही जगातील सर्वांत खोल गर्ता असून तिची खोली ११०३४ मीटर आहे. मध्य महासागरीय जलमग्न पर्वत व सागरी गर्ता हे सागरतळाचे भूगर्भशास्त्राच्या दृष्टीने सर्वांत सक्रिय भाग अाहेत. या भागात अनेक जागृत ज्वालामुखी असतात. हे प्रदेश अतिशय संवेदनशील भूकंपप्रवण क्षेत्रे म्हणून ओळखली जातात. सागरतळावर होणाऱ्या भूकंप व ज्वालामुखींचे उद्रेक यामुळे किनारी प्रदेशात त्सुनामी निर्मितीचा धोका संभवतो.
सागरी संचयन :
सागराचा तळ हा जगातील त्या त्या ठिकाणी असलेला सखल भाग आहे. त्यामुळे या भागात वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांचे संचयन होते. त्याचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.
(१) लहान-मोठ्या आकारांचे दगडगोटे, जाडीभरडी वाळू, मातीचे सूक्ष्मकण इत्यादी पदार्थ नद्या, हिमनद्या इत्यादींमार्फत खंडांवरून वाहून आणले जातात व त्यांचे संचयन मुख्यतः भूखंड मंचावर होते. अशा पदार्थांना सागरी अवसाद असे म्हणतात.
(२) ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेली राख व लाव्हारस यांचे संचयनसुद्धा येथे आढळते. खूप खोलवर, विशेषतः सागरी मैदानाच्या भागात अतिसूक्ष्म मातीचे कण मोठ्या प्रमाणात साचतात. यात सागरी वनस्पती व प्राणी यांचे अवशेष मिसळलेले असतात. हे सर्वमिश्रण अतिसूक्ष्म कणांचे बनलेले असते व ते मृदू चिखलाच्या स्वरूपात असते. यामध्ये सागरी प्राण्यांच्या व वनस्पतींच्या अवशेषांचे प्रमाण साधारणतः ३०% असते. या मृदू चिखलास सागरी निक्षेप असे म्हणतात.
(३) याशिवाय काही मानवनिर्मित घटकांचे संचयन सागरात होते. त्यांपैकी शहरातील सांडपाणी, घनकचरा, किरणोत्सर्गी पदार्थ, टाकाऊ रसायने, प्लॅस्टिक इत्यादी पदार्थांमुळे जलावरणास प्रदूषणाचा धोका निर्माण होतो. हे पदार्थ सागरी जीवसृष्टी व तेथील पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत हानिकारक आहेत. यातील प्रदूषणकारी घटकांचे प्रमाण कमी असूनही त्यांचे उपद्रवमूल्य अधिक आहे.
महासागरातील जीवसृष्टीचे स्वरूप समजण्यासाठी तसेच सागरतळावरील खनिजांची माहिती मिळवण्यासाठी अवसाद महत्त्वाचे ठरतात. अवसादांच्या एकमेकांवर साचणाऱ्या थरांचा व सागरजलाचा दाब यांमुळे या संचयनातून स्तरित खडकांची निर्मिती होते.
हे नेहमी लक्षात ठेवा.
सागर – महासागर यांमध्ये जमिनीवरून येणाऱ्या अनेक बाबींचे संचयन होत असते. हे संचयन नैसर्गिक निक्षेप व अवसाद या स्वरूपात असते. तसेच मानव स्वतः देखील नको असलेल्या अनेक गोष्टी सागरात टाकून देतो. यामुळे सागरतळ आणि सागराचे पाणी प्रदषिू त होण्याचा धोका संभवतो. येथील सजीवसृष्टीस ते हानिकारक आहे. जमिनीवर असणाऱ्या सजीवसृष्टीपेक्षा जास्त प्रजाती सागरात राहतात हे आपण नेहमीच लक्षात ठेवले पाहिज