५. एक होती समई (भाग – १)

काही माणसं वादळं झेलतात आणि पचवतात, पुढं विशाल सागराचं रूप धारण करतात, काही माणसं वादळामुळे कोलमडून पडतात, तर काही माणसं वादळ पचवण्याचे धडे दुसऱ्यांकडून घेतात. आयुष्यभर आदिवासींसाठी डहाणूजवळील कोसबाडच्या टेकडीवर ज्ञानयज्ञ तेवत ठेवणाऱ्या थोर समाजसेविका आणि शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ यांचा समावेश यांपैकी पहिल्या श्रेणीत करावा लागेल. त्यांच्या निधनानं कोसबाडची टेकडी हळहळली आणि परिसरातील सर्व आदिवासींना हुंदके फुटले. अनुताईंच्या निधनानं एका व्रतस्थ जीवनाची अखेर झाली. थोर शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक यांच्या सहवासात वाढलेल्या अनुताईंचं एकूण जीवनच त्याग, कष्ट आणि निःस्वार्थी सेवा यांचा सुरेख मिलाफ होता. वयाच्या केवळ तेराव्या वर्षी त्यांचा विवाह झाला. विवाह असतो तरी काय हे समजण्यापूर्वीच, म्हणजे केवळ सहा महिन्यांतच त्यांच्या इवल्याशा कपाळावरील कुंकू नियतीनं कायमचंच पुसून टाकलं. भातुकलीचा खेळ मोडला; पण छोट्या अनूनं आभाळाएवढं दुःख पचवलं. कोलमडून टाकणारं वादळ पचवलं. ताराबाईंनी त्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसले. दुःखाचा डोंगर टाचेखाली चिरडत अनुताई मोठ्या जिद्दीनं उभ्या राहिल्या, त्या कधीही पराभूत न होण्यासाठी. त्यांनी स्वतः शिक्षण घेणं सुरू केलं. बाहेरून अभ्यास करून त्यांनी पदवी मिळवली. समाजव्यवस्थेत पिचलेल्या असंख्य आदिवासींच्या घरोघरी ज्ञानगंगा नेण्याचं व्रत स्वीकारलं. ग्राम बाल शिक्षा केंद्रानं सुरू केलेल्या पूर्वप्राथमिक शाळेत कार्यकर्ती म्हणून कामास प्रारंभ केला आणि ताराबाईंच्या निधनानंतर त्या संस्थेच्या संचालक झाल्या. ताराबाईंच्या रोपट्याचं त्यांनी पुढे वटवृक्षात रूपांतर केलं. वेगवेगळ्या कल्पना, शिक्षणासाठी वेगवेगळी क्षेत्रं आणि सातत्यानं नवनवे प्रयोग ही त्यांच्या कामाची त्रिसूत्री होती. भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणाऱ्या आणि दारिद्र्याचा शाप कपाळावर घेऊन फिरणाऱ्या असंख्य आदिवासी बालकांना अनुताईंनी आपल्या कर्तृत्वाच्या पंखाखाली आश्रय दिला. मायेची ऊब दिली आणि असंख्य मनांमध्येज्ञानाची ज्योत पेटवली. शिक्षक, मार्गदर्शक, कार्यकर्त्या, विचारवंत, लेखिका अशी विविध रूपं व्यक्त करत त्यांनी आदिवासींमध्ये चांगलं स्थान मिळवलं.

रानावनात भटकणाऱ्या आदिवासींना व्यावहारिक शिक्षण देणं तसं खूप सोपं; पण जाणीवपूर्वक आणि आयुष्यात उपयुक्त ठरणारं औपचारिक शिक्षण देणं खूप अवघड. त्यासाठी आवश्यक असते भविष्याचा वेध घेणारी दूरदृष्टी आणि धडपड, या दोन्हीही गोष्टी अनुताईंकडे होत्या. त्यामुळे त्यांना वेगवेगळे प्रयोग करताना कसलीच अडचण भासली नाही, की पाश्चिमात्यांचा अभ्यासक्रम भाषांतरित करावा लागला नाही. प्राथमिक शिक्षण म्हणजे एकूणच शिक्षणाचा आणि आयुष्याचा भक्कम पाया असावा लागतो, याचं भान त्या कधीच विसरल्या नाहीत, की शिक्षणाच्या दिशाहीन प्रसाराचा ध्यास त्यांनी धरला नाही. आपल्या मंद प्रकाशात मंदिर उजळून टाकणाऱ्या समईप्रमाणं अनुताईंनी काम केलं. प्रसिद्धीचा झगमगाट मिळवण्याचा हव्यास त्यांनी धरला नाही, कारण त्या आणि त्यांचं कार्यच स्वयंप्रकाशित होतं. अनेकांनी या लोभस उजेडात आपल्या आयुष्यातील अंधार संपवण्याचा प्रयत्न केला. प्रसिद्धी आणि मानसन्मान त्यांच्यापर्यंत चालत आले आणि त्यांनी स्वतःचंही भाग्य उजळून घेतलं. त्यांनी केलेल्या अजोड कामाला कोणाच्या शिफारसपत्राची गरज नव्हती किंवा एखाद्या पुरस्काराची आवश्यकता नव्हती. पुरस्काराला छेद देऊन पुढं जाणारं त्यांचं कार्य होतं, म्हणूनच आदर्श शिक्षक, पद्मश्री, दलित मित्र यांसारखे मानसन्मान नेहमीच अनुताईंच्या शोधात भटकत राहिले.

शिक्षणाच्या अनुषंगानं अन्य क्षेत्रांतही अनुताईंनी फार मोठं काम केलं आहे. शिक्षणाबरोबरच त्यांनी बालकल्याण, मूकबधिरांसाठी शिक्षण, महिला विकास कार्यक्रम, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्‍छता, कुटुंबकल्याण, आरोग्य आदी विषयांवरही खूप कष्ट घेतले. एक चांगला नागरिक निर्माण होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्या सर्व त्यांनी केल्या. एकाच वेळेला अनेक प्रयोग, असेही त्यांच्या कामाचं स्वरूप होतं. त्यामुळेच केवळ देशातील नव्हे, तर परदेशांतील संस्था आणि शिक्षणक्षेत्रातील कार्यकर्त्यांना कोसबाडच्या टेकडीचं सातत्यानं आकर्षण राहिलं. शिक्षणक्षेत्रात आणि त्यासाठी आदिवासी क्षेत्र निवडून काम करणं हे अतिशय अवघड असतं. ज्यांच्यासाठी शिक्षणाचं व्रत चालवायचं त्यांचाही अशा कामाला प्राथमिक अवस्थेत विरोध होतो. रूढी, परंपरा, अज्ञान आणि अंधश्रद्धा ही त्यामागची कारणं असतात. शिवाय स्थितिशील समाजही या कार्यात वारंवार अडथळे आणत असतो. या सर्व गोष्टींवर मात करून ज्ञानाचा दिवा जपण्याचं आणि अनेकांच्या मनांतील विविध प्रकारचा अंधार दूर करण्याचं काम अनुताईंनी निरपेक्ष वृत्तीनं केलं. स्वतःच्या बळावर त्यांनी शिक्षणक्षेत्रात एक सुरेख स्वप्न पाहिलं. ते प्रत्यक्षात उतरवलं. कधी झाडाखाली, कधी गोठ्यात, कधी बोडक्या माळावर, तर कधी झोपडीत वर्ग चालवून त्यांनी मोठ्या जिद्दीनं ज्ञानप्रसार केला. ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा, असा प्रचार कधी त्यांनी केला नाही, तर स्वतःलाच दिवा बनवल. त्यात आपल्या श्रमाचं तेल ओतलं, कर्तृत्वानं तो पेटवला आणि आयुष्यभर तो तेवतच ठेवला. पाच-सहा तपांच्या अविरत धडपडीनंतर कोसबाडच्या टेकडीवरील ही समई आता विझली आहे. त्यामुळे अवघी टेकडी हळहळली असेल, आदिवासींचे डोळे पाणावले असतील, तर या सर्वांनी अनुताईंच्या पाऊलखुणा जपून ठेवणं हीच त्यांना आदरांजली ठरेल.