५ . कुटुंबातील मूल्ये

निर्णय घेण्यात सहभाग
कुटुंबात आपण सर्वजण एकत्र राहतो. प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. विचार आणि मतेही भिन्न असू शकतात. आपणही इतरांपेक्षा वेगळे असतो. असे असले, तरी अनेक बाबतींत आपले विचार आणि मते इतरांशी जुळू शकतात. आपल्याला एकमेकांविषयी प्रेम व आपुलकी असते. आपण परस्परांची काळजी घेतो, विचारपूस करतो. घरातील कोणतीही गोष्ट ठरवताना एकमेकांना विचारतो. परस्परांशी बोलून सर्वांना पटतील असे निर्णय घेतो. अशा पद्धतीने आपण सर्वजण कुटुंबातील निर्णय घेण्यात सहभागी होतो.

निर्णय घेण्यात सहभागी होता आल्याने काय होते ?
• आपल्याला काय वाटते, हे सांगण्याची प्रत्येकाला संधी मिळते.
•  एकमेकांना विचारून निर्णय घेतल्याने त्या विषयावर चर्चा होऊन सर्व बाजू समजतात.
• घरात आपल्या मताला महत्त्व दिले जात आहे, हे पाहून आपल्याला कुटुंबाबद्दल अधिक जवळीक वाटू लागते.
आपल्या कुटुंबातील काही निर्णयांत जसा आपला सहभाग असतो, तसाच तो आपल्या सार्वजनिक प्रश्नांबाबतही असतो. वृत्तपत्रांत आपण लोकसहभागाच्या काही बातम्या वाचतो. अशा काही प्रातिनिधिक बातम्यांचा सारांश खाली दिला आहे. त्यांतील सार्वजनिक प्रश्न कोणता व त्यासाठी लोकांनी कसा सहभाग घेतला याची वर्गात चर्चा करा.

    आपल्या परिसरात अनेक छोटे छोटे बदल व्हावेत, असे आपल्याला वाटत असते. परिसरातील बदलांविषयीचे निर्णय सर्वांनी मिळून घेणे हिताचे असते. आपण निवडून दिलेले सरकार सार्वजनिक प्रश्नांबाबतचा निर्णय घेते. सरकारने घेतलेला एखादा निर्णय अयोग्य वाटल्यास त्याबाबत आपण आपले मत नोंदवू शकतो. अशा प्रकारे निर्णयप्रक्रियेत आपण सहभागी होऊ शकतो.

प्रामाणिकपणा व अप्रामाणिकपणाचे परिणाम
आपल्या हातून बऱ्यावाईट गोष्टी घडत असतात. कधी चुकाही होतात. एखादी चूक झाल्याचे लक्षात आल्यास त्याविषयी आईवडिलांशी, भावंडांशी व मित्रमैत्रिणींशी मोकळेपणाने बोलावे. त्यातून आपल्याला झालेली चूक सुधारण्याची संधी मिळते आणि आपला प्रामाणिकपणा दिसून येतो. त्याचबरोबर आपले काम सचोटीने करणेही आवश्यक आहे. नात्यांमधील परस्पर विश्वास कसोशीने जपणे व कोणाचीही फसवणूक न करणे हे सुद्धा प्रामाणिकपणाचे लक्षण आहे. प्रामाणिकपणा आपल्याला निर्भय बनवतो. याउलट अप्रामाणिकपणे वागल्यास आपला आत्मविश्वास कमी होतो. कुटुंबात तसेच आपल्या सार्वजनिक जीवनातही आपण प्रामाणिकपणे वागले पाहिजे. प्रामाणिक व्यक्तींबद्दल सर्वांनाच आदर वाटतो. प्रामाणिकपणा ही आपली ताकद असते.

सार्वजनिक जीवनातील प्रामाणिकपणा
सार्वजनिक जीवनातही प्रामाणिकपणा असल्यास सार्वजनिक सेवा-सुविधा आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे मिळतील. बस किंवा रेल्वेने विनातिकीट प्रवास केल्याने काय होईल? आपली वाहतूकव्यवस्था तोट्यात चालेल आणि काही दिवसांनी बंद पडू शकेल. प्रामाणिकपणे प्रत्येकाने तिकीट काढल्यास ही समस्या निर्माण होणार नाही.
प्रामाणिकपणामुळे सार्वजनिक जीवनातील कार्यक्षमता वाढवता येते. प्रामाणिकपणाचे भान आपल्या सार्वजनिक जीवनातील शिस्त व कार्यक्षमता वाढवण्यास उपयुक्त ठरते.

सहकार्याचा फायदा
कुटुंबात आपण एकमेकांना सहकार्य करत असतो. तसेच सांघिक खेळ खेळताना खेळाडूंमध्ये जितके सहकार्य जास्त तितका त्यांचा खेळ चांगला होतो. खेळातील सहकार्याची भावना खेळापुरती मर्यादित न ठेवता ती आपल्या सामाजिक जीवनात आणली पाहिजे. सामाजिक जीवनात सर्वांना सहकार्याची गरज असते. आपल्यालाही इतरांच्या मदतीची गरज लागते. गाव किंवा शहरातील जत्रा, उरूस, मेळावे इत्यादी कार्यक्रम एकमेकांच्या सहकार्यानेच यशस्वीपणे पार पडतात.

सहिष्णू वृत्ती
आपणां सर्वांमध्ये काही गुण-दोष असतात.. पालकांच्या, मित्रमैत्रिणींच्या मदतीने आपल्यातील दोष दूर करता येतात. एकमेकांचे विचार प्रत्येक वेळी एकमेकांना पटतील असे नाही. आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये कधीकधी मतभेद होतात. अशा वेळी आपलेच म्हणणे खरे आहे, असे न मानता इतरांचे म्हणणेही समजून घेतले पाहिजे. प्रसंगी दुसऱ्याचेही ऐकले पाहिजे. यातून सहिष्णुतेची भावना निर्माण होते व तिची जोपासना करता येते. आपल्यापेक्षा वेगळ्या मतांचा आदर करणे म्हणजे सहिष्णुता.
आपल्या देशात सहिष्णू वृत्तीला विशेष महत्त्व आहे. विविध धर्म, पंथ, परंपरा आणि रीतीरिवाज पाळणारे अनेक लोक इथे राहतात. त्यामुळे सर्वांनी सहिष्णुता बाळगण्याची आवश्यकता आहे. विविधतेचे जतन सहिष्णुतेमुळे होते. विविधता आपले सामाजिक जीवन समृद्ध करते. सहिष्णुता ही सामाजिक सलोख्याची पहिली पायरी आहे. ती आपल्याला इतरांचाही विचार सहानुभूतीने करायला लावते.आपल्या परिसरातील समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न आपण सहिष्णुतेमुळे करतो.
स्त्री-पुरुष समानता
माणूस म्हणून मुलगा-मुलगी किंवा स्त्री-पुरुष समान असतात. त्यांचा दर्जा समान असतो. मुलगा आणि मुलगी असा भेदभाव न करता दोघांनाही समान मानणे म्हणजे स्त्री-पुरुष समानता होय. मुलांनी व मुलींनी एकमेकांचा आदर केला पाहिजे. आपल्या मित्रमैत्रिणींच्या सहवासात आपण सगळे एकमेकांना सारखेच मानतो. ही समानतेची भावना पुढे आपण नागरिक म्हणूनही कायम ठेवली पाहिजे.
समानतेची भावना वाढीस लागल्यामुळे सर्वांना प्रगती करता येते, सर्वांना शिकता येते. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या स्त्री-पुरुषांच्या समान गरजा आहेत. समानतेसाठी या गरजांची सारखीच पूर्तता झाली पाहिजे. अशा सोईसुविधांवर स्त्री-पुरुषांचा समान अधिकार असतो. तसेच सर्व स्त्री-पुरुषांना प्रगतीची समान संधी मिळाली पाहिजे.

• स्त्री-पुरुष समान असतात, या विषयावर घोषवाक्ये तयार करा.