५. नैसर्गिक वनस्पती व प्राणी

भौगोलिक स्पष्टीकरण

ब्राझील- वनस्पती :

भूरचनेमुळे ब्राझीलच्या पर्जन्यात फरक पडतो. विषववु ृत्तीय प्रदेशात बहुतांश भागात वरभर पाऊस पडतो. ्ष विषववु ृत्तापासून जसजसे दूर जावे तसतसे वर्षादिनांचा कालावधी आणि पर्जन्यमान कमी होत जाते, त्यामुळे या प्रदेशात वनस्पतींचा जीवनकाळ देखील कमी होतो.

ज्या प्रदेशात पाऊस वर्षभर असतो त्या ठिकाणी सदाहरित वने आढळतात. ज्या प्रदेशात पाऊस ठरावीक काळात पडतो त्या ठिकाणी वृक्षांची घनता कमी होत जाते. वनांच्या ऐवजी विविध प्रकारचे गवत, खुरटी झुडपे, काटेरी वनस्पती इत्यादी आढळतात. ब्राझीलमध्ये जगातील सर्वाधिक वनस्पतींच्या प्रजाती आहेत. यामध्ये सदाहरित, निमसदाहरित, शुष्क इत्यादी वनस्पतींचा समावेश होतो. येथे पाऊ ब्रासील, रबर, महोगनी, रोझवुड, इत्यादी वृक्ष व आमर (ऑर्किड) वनस्पतीच्या अनेक प्रजाती आढळतात. ब्राझीलमधील सदाहरित वर्षावनांमुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात प्राणवायू उपलब्ध होतो. कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी होण्यास त्यामुळे मदत होते; म्हणूनच या वर्षावनांना ‘जगाची फुफ्फुसे’ असे संबोधतात.

भारत- वनस्पती :

भौगोलिक स्पष्टीकरण

भारतात वनांचे खालील प्रकार आढळतात. भारतात सरासरी २००० मिमीपेक्षा जास्त पर्जन्य, भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या भागांत सदाहरित वने आढळतात. या वनांतील वृक्षांची पाने रुंद व हिरवीगार असतात. या झाडांच लाकूड कठीण, जड व टिकाऊ असते. उदा., महोगनी, शिसव, रबर इत्यादी. या वनांत अनेक प्रकारच्या वेली आहेत. या वनांत सर्वाधिक जैवविविधता आढळते.

भारतात १००० ते २००० मिमी पर्जन्याच्या प्रदेशात पानझडीची वने आढळतात. कोरड्या ॠतूत बाष्पीभवनाने पाणी कमी होऊ नये म्हणून वनस्पतीची पाने गळतात. उदा., साग, बांबू, वड पिंपळ इत्यादी वनस्पती या वनांत आढळतात. भारतात ज्या भागात दीर्घकाळ कोरडा उन्हाळा व ५०० मिमीपेक्षा कमी पर्जन्य होतो, अशा प्रदेशात काटेरी व झुडपी वने आढळतात. वनस्पतींची पाने आकाराने लहान असतात उदा., खैर, बाभूळ, खेजडी, तसेच कोरफड, घायपात इत्यादी निवडुंगाचे प्रकार देखील आढळतात. किनाऱ्यालगत दलदलीच्या प्रदेशात, खाड्या व खाजणांचा भाग असतो तेथे क्षारयुक्त मृदा व दमट हवामान असते, अशा ठिकाणी समुद्रकाठची वने आढळतात. त्यांना सुंद्रीची वनेकिंवा खारफुटीची वने म्हणतात. या वनस्पतींचे लाकूड तेलकट, हलके आणि टिकाऊ असते.

भारतीय हिमालयात उंचीनुसार वनांचे तीन प्रकार पडतात. अतिउंच प्रदेशात हंगामी फुलझाडे असणारी वने, मध्यम उंचीवरील प्रदेशात पाईन, देवदार, फर अशा सूचिपर्णी वृक्षांची वने व पायथ्यालगतची मिश्र वने आढळतात. त्यांमध्ये सूचिपर्णी तसेच पानझडी वृक्ष असतात. या वनांत साल वृक्षाचे प्रमाण जास्त आहे.

ब्राझील वन्य जीवन :

जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा ब्राझीलमध्ये वन्य जीवनाची विविधता अधिक आढळते. पॅँटानल या दलदलीच्या प्रदेशात महाकाय ॲनाकोंडा आढळतात. ब्राझीलमध्ये मोठे गिनीपिग व मगरी, सुसरी, माकडे, प्युमा, बिबट्या इत्यादी प्राणी आढळतात. माशांच्या प्रजातींमध्ये समुद्रातील स्वार्ड फिश तसेच नदीतील पिऱ्हाना व गुलाबी डॉल्फिन हे मासे येथील वैशिष्ट्य आहेत. कोंडोर हा खूप उंचावर उडणारा मोठ्या आकाराचा पक्षी, विविध प्रकारचे पोपट, मकाव, फ्लेमिंगो या पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात. लक्षावधी प्रकारचे कीटक हेसुद्धा येथील वैशिष्ट्य आहेत. अशा विविधतेमुळे ब्राझीलमधील वन्य जीवन अतिशय समृद्ध आहे. वन्य प्राण्यांची बेकायदेशीर तस्करी, स्थलांतरित शेती

(रोका), निर्वनीकरण, प्रदूषण इत्यादींमुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास अशा समस्या ब्राझीलसमोर आहेत, त्यामुळे अनेक स्थानिक वन्य प्रजाती नामशेष होत आह

भारत – वन्य जीवन :

वन्य प्राण्यांच्या बाबतीत भारतातही प्रचंड विविधता आढळते. भारतात वन्य प्राण्यांच्या अनेक प्रजाती आहेत. भारतातील उष्ण व आर्द्र वनांमध्ये हत्ती आढळतात. आसामच्या दलदलीच्या प्रदेशात एकशिंगी गेंडा आढळतो. वाळवंटी प्रदेशात रानटी गाढवे व उंट आहेत. हिमालयातील बर्फाळ प्रदेशात हिमचित्ते, याक आढळतात. द्‌विपकल्पीय प्रदेशात भारतीय गवा, अनेक प्रकारची हरणे, काळवीट, माकड इत्यादी प्राणी आढळतात. वाघ आणि सिंह हे दोन्ही प्राणी असणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे. नद्या, खाड्या व किनाऱ्यावरील प्रदेशात कासव, मगर, सुसर इत्यादी प्राणी आढळतात. वनप्रदेशात मोर, खंड्या, तितर, कबुतरे, विविधरंगी पोपट, पाणथळ जागी बदके, बगळे व गवताळ प्रदेशात माळढोकसारखे पक्षी आढळतात.

भारत हा वैशिष्ट्यपूर्ण वन्य प्राणी असलेला देश म्हणून ओळखला जातो. प्रदूषण, तस्करी व निर्वनीकरण यांमुळे वन्यप्राण्यांच्या अनेक प्रजाती भारतातून नष्ट झाल्या आहेत. उदा., चित्ता. वन्य प्राण्यांचे संरक्षण व वनांचे संवर्धन व्हावे या दृष्टीने भारत सरकारने अनेक ठिकाणी राष्ट्रीय उद्याने, वन्य प्राण्यांची तसेच पक्ष्यांची अभयारण्ये व राखीव वने यांचे जतन केले आहे