५.बाकी वीस रुपयांचं काय?

‘मी आत येऊ शकतो का सर?’ हातातल्या फाइली सावरत विकासने विचारले. साहेब कुठलीतरी फाइल पाहत होते. त्यांनी मानेनेच हो म्हटले.

आवाजावरून त्यांनी विकास आत आल्याचे वर न पाहताच ओळखले अन् तक्रारीच्या सुरात बोलले, ‘विकाससर, कालच्या त्या मुलानं मला ऐंशी रुपयांना फसवलं. तुमच्यामुळं हे सारं घडलं. ही मुलं महाबिलंदर असतात. तुम्हांला त्याचा कसा पुळका आला तेच मला कळत नाही. शंभराची नोट घेऊन गेला. एकदा गेला तो गेलाच! बघा, त्याची पाण्याची बाटली मला शंभर रुपयांत पडली.’ एका दमात साहेबांनी मनातली नाराजी

व्यक्त केली. क्षणभर विकासला वाटले, आपण आपल्या खिशातून साहेबांना ऐंशी रुपये काढून द्यावे; पण त्याने तसे केले नाही. तो साहेबांच्या समाधानासाठी म्हणाला, ‘तसं नसेल सर, काही अडचण आली असेल त्याला म्हणून…’ ‘काही सांगू नका, यानंतर असली मुलं कार्यालयात आलेली मला चालणार नाहीत. समजले?’ साहेब म्हणाले. नाइलाजाने विकासने ‘हो’ म्हटले. साहेब म्हणतात ते सत्य होते, तरी ते संपूर्ण सत्य नसावे, असे विकासचे मन त्याला सारखे सांगत होते. राजू हा मुलगा फसवाफसवी करणारा वाटत नव्हता. मागच्या महिन्यापासून विकास त्याला ओळखत होता. विकासची मेहुणी टाटा कॅन्सर सेंटरच्या ‘बी’ विंगमध्येदाखल झाली होती. विकास सकाळ-संध्याकाळ त्यांना भेटायला आणि डबा पोहोचवायला जात असे. टाटा कॅन्सर सेंटरच्या शेजारीच त्याचे कार्यालय होते. तिथला त्याचा वावर नित्याचा झाला होता.

एक दिवस एका मुलाने त्याचे लक्ष वेधून घेतले. फार तर दहा-अकरा वर्षांचा मुलगा असावा. त्याच्या गळ्यात एक पाटी अडकवलेली होती. त्यावर त्याने ‘उरलेले अन्न’ देण्याचे आवाहन केले होते. त्याच्या हातात एक पिशवी होती. ती पाहून त्यात काही अन असावे असे वाटत होते. त्याला पाहून विकासची उत्सुकता फारच वाढली. त्याने एक दिवस त्याला बाजूला घेतले अन् बरेच काही विचारले, ‘तुझं नाव काय? तू कुठला? येथे का आलास? कोणत्या इयत्तेत शिकतोस? वगैरे. साहेब ज्या मुलाविषयी बोलले होते तोच हा राजू. तो वाशिम जिल्ह्यातल्या एका खेडेगावचा. पाचवी इयत्तेत शिकणारा. त्याची आई पोटाच्या कर्करोगाने आजारी असल्याने एक महिन्यापासून टाटा कॅन्सर सेंटरच्या ‘बी’ विंगमध्ये भरती झालेली होती.

तो आणि त्याची आई याशिवाय घरी तिसरे कोणी नव्हते. एका झोपडीवजा घराशिवाय त्यांच्याकडे काही नव्हते. दवाखान्यात आईजवळ सतत बसून राहण्याचा त्याला कंटाळा येई. आईला विचारून तो इकडेतिकडे फिरे. आईने त्याला सांगितले होते, ‘जास्त लांब जाऊ नको. कोणाच्या वस्तूला हात लावू नको.’ तो तिथंच बाहेर फिरायचा, तेव्हा त्याच्या लक्षात आले, की पेशंटसोबत आलेले अनेक गोरगरीब भुकेने व्याकूळ होऊन इथे पैशांसाठी, अन्नासाठी दुसऱ्यांसमोर हात पसरतात. दुसरीकडे बरेच लोक जेवून शिल्लक राहिलेले अन्न कचराकुंडीत फेकून देतात. ते अन्न जर या गरजूंना मिळाले तर….? त्याने एक पुठ्ठा घेतला. त्यावर लिहिले – ‘उरलेलं अन्न फेकू नका, मले द्या. मी ते उपाशी लोकायले देतो.’ राजूने पुठ्ठ्याला दोरी बांधून ती गळ्यात अडकवली. राजूच्या गळ्यातली पाटी वाचून लोक राहिलेले अन्न त्याला देऊ लागले. बरेच अन्न जमा होऊ लागले. ते जमा झालेले अन्न तो गरजूंना द्यायचा. त्यांच्या डोळ्यांतले समाधान पाहून त्याला हायसे वाटायचे. दवाखान्यातील पेशंटच्या नातेवाइकांना बाहेरून काही आणून द्यायचे असेल, तर राजू पळत जाऊन आणून द्यायचा. एखाद्या पेशंटचा जवळचा नातेवाईक कुठे बाहेर जाणार असला, तर तो ‘राजू ध्यान दे माझ्या पेशंटकडे, मी जरा जाऊन येतो.’ म्हणून बिनधास्त निघून जायचा. ‘बी’ विंगमधल्या सर्वांना त्याचे भारी कौतुक होते.

कार्यालयाच्या बाहेर असलेल्या हॉटेलमधून विकास रोज पाण्याची बाटली घेत असे; पण एक दिवस त्याला कार्यालयामध्येपोहोचायला उशीर झाला, म्हणून त्याने राजूला पाण्याची बाटली कार्यालयामध्ये पोहोचवायला सांगितले. पाण्याच्या बाटलीचे पैसेही त्याच्याजवळ दिले. राजू अधूनमधून विकासला पाण्याची बाटली पोहोचवू लागला. हे काम राजू आनंदाने करी. विकासच्या साहेबांनी राजूला बऱ्याच वेळा विकाससाठी पाण्याची बाटली कार्यालयामध्ये आणून देताना पाहिले होते.

असाच काल सकाळी तो कार्यालयामध्ये विकाससाठी पाण्याची बाटली घेऊन आला होता. त्याने एक पाण्याची बाटली विकासच्या साहेबांनाही दिली. त्या वेळी साहेब म्हणाले, ‘वीस रुपये सुट्टे नाहीत. शंभराची नोट आहे.’ त्यावर राजू म्हणाला, ‘सर, द्या ती नोट. मी ऐंशी रुपये आपल्याले आणून देतो.’ साहेबांची शंभर रुपयांची नोट घेऊन राजू गेला तो अद्याप आलाच नाही. राजूने साहेबांना खरंच फसवले असेल का? काय झाले असेल नक्की? विकास विचारात गढला. तेवढ्यात ‘सर, आत येऊ का?’ राजूच्याच वयाचा एक मुलगा दारात उभा राहून विचारत होता. साहेब आणि विकासने आधी त्या मुलाकडे अन् मग एकमेकांकडे पाहिले. मग साहेब म्हणाले, ‘ये, बोल. काय काम आहे?’

 ‘सर, मी इरफान. राजूचा मित्र.’ बोलता बोलता त्याने खिशातून शंभराची नोट काढली. ती नोट साहेबांसमोर धरत इरफान म्हणाला, ‘सर, ही नोट राजूने तुम्हांला द्यायला सांगितली आहे.’ विकास आणि साहेब दोघेही चकित झाले. ‘राजू कुठंय?’ विकासने विचारले, ‘सर, तो कालच गावाला गेला.’ साहेब म्हणाले, ‘का?’ ‘त्याच्या आईची दवाखान्यातून सुट्टी झाली. गावी जाण्याआधी त्याने ही नोट मला तुम्हांला द्यायला सांगितली होती.’ असे म्हणत इरफान आला तसा बाहेर पडला.

विकास आणि साहेब दोघेही थोडावेळ स्तब्ध झाले. मग साहेब म्हणाले, ‘विकास, मला माफ करा. माणसं ओळखण्यातला तुमचा अधिकार मोठा आहे. त्यामानाने मी फार अनुभवशून्य आहे. या नोटेतले ऐंशी रुपयेच माझे आहेत; पण बाकी वीस रुपयांचं काय?’ यावर विकासही निरुत्तर झाला.