५. भांड्यांच्या दुनियेत

उन्हाळ्याची सुट्टी सुरू होताच अरुण व अादिती आजीआजोबांकडे गावी पाेहोचले. तिथे मामांची मुले त्यांची आतुरतेने वाट पाहत होती. आता काय, मुलांची नुसती धमाल! आंबे, कलिंगडे, ऊस खाणे आणि विहिरीत पोहणे असा मुलांचा कार्यक्रम निश्चित असायचा. उन्हामुळे आजी त्यांना दुपारी घराबाहेर जाऊ द्यायची नाही. दुपारी मुले घरातच काही ना काही खेळ खेळायची. अशाच एका दुपारी मुले लपाछपी खेळत होती. माधववर राज्य होते. अादिती कोठीच्या खोलीत लपायला गेली. तेवढ्यात तिचे लक्ष कोपऱ्यात ठेवलेल्या जात्याकडे गेले. तिने पहिल्यांदाच जाते पाहिले होते. ‘हे काय आहे?’ असे पुटपुटत तिने आपल्या भावंडांना कोठीच्या खोलीत बोलावले अन जाते ् दाखवले. त्यांच्याकडे पाहून जात्याने स्मितहास्य केले.

जाते : काय मुलांनो! ओळखलं का मला ? मी जातं.

अरुण : तू इथे काय करतोस ? जाते : काय सांगू तुम्हांला, आजकाल लोक माझा फक्त लग्नाची हळद दळण्यासाठीच उपयोग करतात अन् नंतर असं कोपऱ्यात ठेवून देतात. अाता काय! माझे नवे मित्र, सगेसोयरे स्वयंपाकघरात विराजमान झाले आहेत.

अादिती : तुझे मित्र, सगेसोयरे? कोण ते अाम्हांला नाही समजलं.

 जाते : तुम्हांला काहीच माहीत नाही आमच्याबद्दल?

सांगूया का आपण यांना, आपला जन्म, विकास आणि आपल्यात होत गेलेल्या बदलांबद्दलची माहिती? (कोठीतील जुन्या प्रकारची सर्व भांडी माना डोलावतात.)

दगडी पाटा : थांब, मी सांगतो त्यांना आपला इतिहास. बरं का मुलांनो! मानव जसा शेती करू लागला, स्थिर जीवन जगू लागला तशी त्याला अन्न शिजवणं, अन्न साठवणं यासाठी भांड्यांची आवश्यकता वाटू लागली. या गरजेपोटी त्यानं मातीपासून मडकी, पसरट

ताटल्या, वाडगे, पराती, रांजण, घडे अशी नित्योपयोगी भांडी बनवली.

माधव : अरे पण, आम्ही आजही मातीच्या माठातलं थंडगार पाणी पितो. छोट्या छोट्या मडक्यांत दही लावतो; पण काय रे, माणसानं फक्त मातीचीच भांडी बनवली का ?

सुरई : नाही, तसं नाही. मातीच्या भांड्यांबरोबरच दगडी, लाकडी, चामड्याची भांडीही मानवानं तयार केली. तुम्ही चामडी बुधले, वाळलेल्या भाेपळ्यापासून बनवलेले तुंबे कधी पाहिले अाहेत का?

मंदा : हो हो! मी आंतरजालावर अशा भांड्यांची खूप चित्रं पाहिली आहेत. अजूनही अादिवासी भागातील लोक अशा वस्तूंचा उपयोग करतात, हेही वाचलं आहे.

खलबत्ता : मुलांनो, लाकडापासून बनवलेली, भिंतीलगत ठेवलेली ही काठवट पाहा. गव्हाचं, बाजरीचं, ज्वारीचं अशी पिठं मळण्यासाठी, भाकरी थापण्यासाठी तिचा उपयोग केला जायचा. आजही ग्रामीण भागांत

काही घरांतून तिचा वापर होताना दिसतो. (काठवटही न राहवून बोलू लागली.)

काठवट : अगं मंदा, तुला आठवतं का? तुझ्या आजीला आमचा नवा मित्र-मिक्सरची खूप भीती वाटायची. दाण्याचा कूट, मिरच्या, हळद, धने असं काहीबाही कुटण्यासाठी उखळ-मुसळ, दगडी खल किंवा हा खलबत्ता आजी वापरायची. पाटा-वरवंटा वापरायची. आता तुम्हीच सांगा मुलांनो, आज उखळीमध्ये कोण पदार्थ कुटत बसतंय? लावला मिक्सर, की झालं काम. वेळ वाचतो अन् श्रमही वाचतात. पूर्वी पिठाच्या, मसाल्याच्या गिरण्या नव्हत्या. गृहिणी जात्यावर धान्य दळायच्या. धान्य पाखडायला सूप असायचं.

 मंदा : हे सगळं खरं आहे; पण आज ही सर्व कामं करायला वेळ कोणाकडे आहे? जाते : मातीच्या व लाकडाच्या भांड्यांपाठोपाठ माणसानं तांबं, लोखंड या धातूंचा शोध लावला आणि मग भांडी बनवण्यासाठी त्यांचा वापर होऊ लागला; पण या धातूंच्या शोधामुळे भांडीसंस्कृती अधिक प्रगल्भ आणि विकसित होत गेली बरं का !

अरुण : म्हणजे फक्त भांडी बनवण्यासाठी या धातूंचा खूप उपयोग होऊ लागला, असंच तुला म्हणायचंय का? पण जातेभाऊ, आम्ही लोखंड आणि तांबं या धातूंच्या भांड्यांबरोबर चांदीचीदेखील भांडी पाहिली आहेत.

जाते : पलंग, खुर्ची, टेबल, कपाट, दारं- िखिडक्या, मोठे दरवाजे यांसारख्या लोखंडापासून तयार होणाऱ्या वस्तू तुम्ही पाहिलेल्या आहेत. त्याचबरोबर स्वयंपाकासाठी लोखंडी कढई, तवा यांसारख्या भांड्यांचा वापर होतानाही तुम्ही पाहिलं आहे.

तांबं आणि लोखंड या धातूंच्या जोडीला चांदी, शिसं या धातूंचाही वापर सुरू झाला. धातूंच्या पाठोपाठ काचेपासून वस्तू बनू लागल्या. तांबं अाणि चांदीला पर्याय म्हणून संमिश्र धातू, पितळ, कांसे यांपासून भांडी बनवली जाऊ लागली.

प्रशांत : मग स्टेनलेस स्टीलची भांडी वापरात कधी आली?

सुरई : पितळी व तांब्याच्या भांड्यांची जागा ॲल्युमिनिअम, हिंडालियम आण स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांनी घेतली. सध्या सगळीकडे स्टेनलेस स्टीलची भांडी बघायला मिळतात.

जाते : पूर्वी अंघोळीसाठी घंगाळं, पाणी तापवायला बंब, पाणी साठवायला कळशी, घागर, तपेले, हंडा असायचा; पण आता सर्रास प्लॅस्टिकच्या बादल्या, टब दिसतात

अरुण : काय रे जातेभाऊ, जेवणाच्या पंगतीत ताट म्हणून केळीची पानं, पत्रावळी, तसेच वाट्यांसाठी द्रोण असायचे. हात धुवायला तस्त असायचं. होय ना?

जाते : अरुण, तुला बरंच माहीत आहे की! गाई-म्हशींच्या दुधासाठी कासंडी किंवा चरवी, ताकासाठी कावळा, लोण्याचा वाडगा, तुपाची बुधली, बुडकुली, ओगराळी, पळी, तसराळी, कुंडा अशा कितीतरी नावांची भांडी स्वयंपाकघरात वावरत असायची. आता स्वयंपाकघरात गॅसची शेगडी वापरत असल्यानं, चूल व त्यावर स्वयंपाक करण्याचं प्रमाणही कमी होत आहे.

मंदा : पण या काळात मातीपासून तयार होणारी भांडी बंद झाली का?

उखळ : नाही, तसंनाही. या धातूंच्या शोधामुळे मातीची भांडी बनवणं बंद झालं, असं मुळीच नाही. उलट आज, भांडी तयार करण्यासाठी माती वापरण्याची परंपरा म्हणजे भांडी संस्कृतीचा पाया मानला जातो.

जाते : आज मोठ्या प्रमाणावर चिनी माती किंवा सिरॅमिक्स यांचा वापर करून विविध भांडी व वस्तू तयार होत आहेत. झाकणाच्या भांड्यांचा प्रसार झाला. किटलीचा रंग, आकार, त्यावरील नक्षीकाम, तसंच रत्नजडित सुरया अशा कलात्मक गोष्टी भांड्यांमध्ये येऊ लागल्या.

अादिती : हो हो, हे अगदी खरं आहे. आमच्या घरी स्टेनलेस स्टील, नाॅनस्टिक व कोटेड मेटलची भांडी आहेत.

खलबत्ता : प्रत्येकजण स्वत:च्या खिशाला परवडणारी, सहजपणे उपलब्ध होणारी आणि वापरण्यास सोपी असणारी भांडी खरेदी करण्याचा प्रयत्न करतो.

प्रशांत : एकूण काय, तर भांडी हे मानवी संस्कृतीचं अविभाज्य अंग आहे. गरजेनुसार भांड्यांमध्ये विविधता येत गेली असली, तरी जिथे जिथे मानवी समाज, तिथे तिथे भांडी असणारच.

अादिती: आज आम्हांला तुम्हां सर्वांबरोबर खूप मजा आली. आम्ही तुम्हां सगळ्यांचे खूप आभार मानतो, कारण तुम्ही आम्हांला भांड्यांच्या दुनियेची सफरच घडवून आणली!