फाल्गुन, चैत्र आणि वैशाख हे तीन महिने वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह ल्यालेले असे महिने आहेत. एक दुसऱ्यात मिसळला आहे. तरी पण चैत्र हा खरा वसंतात्मा आहे, मधुमास आहे. या ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने वर्णन केले आहे :
जैसे ऋतुपतीचे द्वार । वनश्री निरंतर
वोळगे फळभार लावण्येसी ।।
ऋतुपतीच्या द्वारी वनश्रीचे म्हणजे नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरून गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन. हे दर्शन तर फाल्गुनातच घडते. मग मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे? या महिन्यात ते सारे सौंदर्य तर आहेच; पण फळांचेही रूप दृष्ट लागेलसे असते. फुलांतून, फळांतून मधुरस वाहत असतो.
चैत्रातल्या पालवीचे रूप कुठेही मोठे मनोहर; पण ही पिंपळाची झाडे पाहा, कशी गहिऱ्या गुलाबी पानांच्या रेशमी पताका नाचवत उभी आहेत ती. जुनी पाने गळता गळता नवी येत होती म्हणून शिरीषासारखी ही पालवी पहिल्याने डोळ्यांत भरत नव्हती; पण सारी नवी पाने आल्यावर खरोखरच उन्हात जेव्हा ही भडक गुलाबी पाने चमकतात, तेव्हा जणूकाही सुंदर पुष्पांचे गेंदच या झाडावर फुलले आहेत असे वाटते. इतर झाडांची पालवी फार लहान असल्याने फार हलत नाही; पण या पानांची सारखी सळसळ. त्यातल्या त्यात आमच्या घराजवळ एक पिंपळाचे झाड आहे, ते तर फारच बहारीचे दिसते. त्याच्यावर मधुमालतीची प्रचंड वेल चढली आहे. चारी बाजूंनी अगदी मध्यापर्यंत त्या झाडाला तिने वेढून टाकले आहे आणि आता ही मधुमालती गुलाबी गेंदांनी खच्चून भरली आहे. आता फुलायला आणखी जागा नाही, अशी दाटी पिंपळाच्या तांबूस पानांची आणि या गुच्छांची झाली आहे आणि नुसती पालवीच नाही तर हिरवी फळेही इतर झाडांप्रमाणे यांच्या फांदीफांदीला ओळीने चिकटून बसली आहेत.
सर्व फुलांत अतिशय हिरिरीने कोणी नटले असेल तर ही उग्रगंधी घाणेरी, किती शोभिवंत आणि दुरंगी फुलांच्या गुच्छांनी ती भरली आहे. गुलाबी फुलांत एखादे पिवळे, पिवळ्यांत एखादे गुलाबी, शेंदरी व पिवळा, पिवळा आणि जांभळा, लाल आणि पांढरा, जांभळा आणि गुलाबी, शेंदरी आणि जांभळा, किती म्हणून या झाडाच्या दुरंगी फुलांच्या रंगांचे वर्णन करावे? वास्तविक हे कुठलेच दोन रंग स्वाभाविकपणे एकमेकांच्या शेजारी एरवी शोभणारे नाहीत; पण निसर्गाच्या दुनियेत कुठलेही भडक व एरवी विसंगत वाटणारे रंग विशोभित दिसत नाहीत, उलट एकमेकांची शोभा
वसंतहृदय चैत्र दुर्गा भागवत (१९१०-२००२) : लोकसाहित्य, समाजशास्त्र, बौद्ध वाङ्मय यांच्या अभ्यासक, ललित लेखिका. गाढा व्यासंग, सूक्ष्म निरीक्षणशक्ती, भावोत्कटता, चिंतनशीलता आणि संवेदनाप्रधान भाषा ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये होत. ‘ऋतुचक्र’, ‘व्यासपर्व’ आणि साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ‘पैस’ ही दुर्गाबाईंच्या ललित लेखनाची शिखरे होत. ‘लोकसाहित्याची रूपरेखा’ हा लोकसाहित्य या विषयावरील ग्रंथ, ‘राजारामशास्त्री भागवत : व्यक्ति आणि वाङ्मय’, ‘केतकरी कादंबरी’ हे त्यांचे महत्त्वपूर्ण ग्रंथ आहेत. ‘सिद्धार्थजातका’च्या सात खंडांचे अनुवाद हे दुर्गाबाईंचे बहुमोल कार्य आहे. प्रत्येक ऋतूचा आपापला स्वभाव असतो. हा स्वभाव निसर्गाच्या विविध रूपांतून प्रतिबिंबित होतो. या पाठातून वसंत ऋतूतील चैत्राचे मनोज्ञ दर्शन घडते. वसंत ऋतूची चाहूलच खरी मनोहारी! त्यातून चैत्रातील निसर्ग अनुभवणे, हा सर्वार्थाने आनंदानुभव! निसर्गातील घटकांचे सूक्ष्म निरीक्षण आणि ते शब्दांत मांडण्याचे लेखिकेचे कसब यांमुळे ‘वसंतहृदय चैत्र’ हुबेहूब डोळ्यांसमोर उभा राहतो. 12 वाढवतात. गुजरातेत बऱ्याच भागांत वृक्षवनस्पतींचा दुष्काळ. तिथे या झाडाला भलतेच महत्त्व आहे. आपण तुच्छतेने घाणेरी म्हणतो तिला आणि तिच्या अतुलनीय रंगसौंदर्याला उपेक्षून पुढे जातो; पण गुजरातीत ‘चुनडी’ असे सुंदर व यथार्थ नामाभिधान या झाडाला दिलेले आहे आणि या फुलाचे हे नाव ऐकल्यावर काठेवाडी व राजपुतान्यातल्या चुनड्यांच्या भडक रंगांचे रहस्य मला उमगले. भडक विशाेभित रंग म्हणून त्यांची पुष्कळदा कुचेष्टा केली जाते. जी रंगाची मिश्रणे आम्ही आमच्या वस्त्राभरणात कटाक्षाने टाळतो, तीच या लोकांनी शतकानुशतके निसर्गाच्या प्रेरणेप्रमाणे शिरोधार्य मानली. भारतीय रंगाभिरुचीचे मूळ प्रादेशिक वातावरणात आणि नैसर्गिक आविष्कारात असलेले पाहून मोठे नवल वाटते.
तशीच ही माडाची आणि सुरमाडाची झाडे पाहा. माडाची झाडे बारमहा हिरवी आणि फळांनी भरलेली दिसतात. पल्लवांचा नखरा त्यांना माहीतच नाही जसा; पण फाल्गुन लागला, की त्यांच्या माथ्यावर अधिक फिक्या रंगाचे जावळ भुरभुरल्यासारखे वाटते. त्यांच्या पानांच्या गाभ्यातून वाढलेल्या नारळांच्या लंगरांच्या वर होडीच्या आकाराचे पेव फुटते आणि त्या सुक्या कळकट पेवातून वेताच्या रंगाच्या फुलांच्या लोंब्या बाहेर पडतात. चैत्राच्या मध्यापर्यंत या लोंब्या दिसतात. नारळाची फुले निर्गंध आणि टणक; पण झाडाखाली पडलेल्या फुलांच्या राशीतून चार-दोन फुले उचलून घेऊन जरा निरखून पाहा. त्यांचा तो टणकपणा तुम्हांला बोचणार नाही. पाकळ्यांच्या गुळगुळीत स्पर्शाने बोटे सुखावतात. तीन पाकळ्यांची फिक्या पिवळ्या रंगांची ही फुले. आत तशाच रंगांच्या केसरांची दाटी. तीन पाकळ्यांचा हा फुलांचा पेला पाहून, त्यांच्या आकाराचे सौंदर्य पाहून तुम्ही मुग्ध झाल्याखेरीज राहणार नाही. प्रचंड नारळाचे हे नखाएवढे फूल पाहून मोठी गंमत वाटते!
शेजारचे कडुनिंबाचे झाड निळसर फुलांच्या तुऱ्यांनी भरून गेले आहे. त्यांचा सुगंध रात्रीच्या वेळी अतिशय मनोरम वाटतो. त्याच्या शेजारीच कडवट उग्र वासाचे करंजाचे झाडही सबंध फुलले आहे. करंजाच्या फुलांचे रूप अलौकिक असते. अगदी नखाएवढी कळी; करंजीच्याच आकाराची, पांढरी, हिरवी; पण फूल उमलले की किती निराळे दिसते. आत एक निळी-जांभळी नाजूक सुंदर कळी आणि तिच्या डोकीवर अर्धवर्तुळ अशी पांढरी टोपी. जणूकाही टोपडे घातलेला बाल घनश्यामच या फुलांच्या रूपात अवतरला आहे. रस्त्यावर पडलेला या फुलांचा खच फार रमणीय दिसतो. चैत्रातल्या पर्णशोभेचे आणि फळशोभेचे वर्णन आंब्या-फणसाशिवाय पूर्ण होणार नाही. वसंताशी पौषाअखेरीपासूनच मोहोरून सहकार करणारे हे आंब्याचे झाड.
लांबलचक देठांना लागलेले कैऱ्यांचे हिरवे गोळे वाऱ्याबरोबर झोके घेत असताना किंवा पोपट किंवा कावळे त्या पाडाला लागल्या आहेत की नाहीत ते पाहण्याकरिता त्यांना चोचींनी प्रहार करतात, तेव्हा मोठी मौज दिसते. गावाबाहेरच्या झाडांतून कोकिळांचे कूजनही बहुधा याच झाडांवर चालत असते. कैऱ्या जून झालेल्या असतानाच एकीकडे पाने झडत असतात; पण झाड रूक्ष असे कधीच दिसत नाही. चैत्रात याही झाडाला पालवीचे घोसच्या घोस लागतात आणि कैऱ्यांबरोबर तेही झोके घेतात. माघातले मोहोरांच्या झुबक्यांनी भरलेले व सुगंधाने दरवळलेले झाड सुंदर की आताचे, हे सांगणे कठीण आहे.
आणि फणस? त्याला नजरेत भरण्यासारखी पालवी नसली तरी तेही टवटवीत दिसते आहे आणि त्याची फळे पायापासून डोकीपर्यंत लादली गेलेली नजरेत भरताहेत. फणसाला फुले धरत नाहीत तर पौष-माघात त्याला हिरवे कोके येतात. फुगीर मिरचीसारखे. मग एकेक कोका दुभंगतो. वरचे टरफल तपकिरी होऊन गळते. आतला हिरवा फणस गुळगुळीत, तुकतुकीत असतो. मग काही दिवसांनी त्यावर खसखशीसारखे बारके दाणे दिसू लागतात. ते दाणे वाढून पांढऱ्या किडीसारखे तंतू बनतात. त्यांच्या खालून काटे वाढतात अाणि ते तंतू गळले, की संपूर्ण अवयवांनी युक्त पण आकाराने मुसुंब्याएवढा फणस तयार होतो. अगदी बंुध्यापासून ते धरतात. कधी कधी फळ अर्धे मातीत पण गाडले जाते
रूपरसगंधमय अशा या चैत्र मासाची शोभा झाडावरच्या काही बांधल्या जाणाऱ्या आणि काही बांधल्या गेलेल्या पक्ष्यांच्या घरट्यांनी पूर्णत्वाला येते. ठिकठिकाणी काही लोंबत्या आकाराची, तर काही वाटोळी चेंडूसारखी, तर काही पसरट गोल, अशी ही काळीकबरी घरटी म्हणजे वसंताच्या चित्रलिपीतली सुंदर विरामचिन्हे वाटतात मला. माधुर्याचा हा थेंब अभिरुचीला पुरेसा वाटतो आणि म्हणूनच निसर्गाच्या विराट चित्रलिपीचा शोध घेण्यापेक्षा मला या स्थूल विरामचिन्हांकडेच पाहायला जास्त आवडते.
(ऋतुचक्र)