५. वृष्टी

भौगोलिक स्पष्टीकरण

पृथ्वीचा ७०.८% भाग जलयुक्त आहे. पृथ्वीवरील या जलसाठ्याचे वितरण असमान आहे. काही ठिकाणी जलसाठे मर्यादित आहेत, तर काही ठिकाणी ते मुबलक आहेत. वरील चित्रांत व आकृती ५.१ मध्ये दाखवल्याप्रमाणे विविध प्रकारचे जलाविष्कार आपण अनुभवत असतो. वातावरणातील बाष्पामुळे हे अाविष्कार घडत असतात.

हवामानात होणाऱ्या बदलानुसार पुढील अाविष्कार आढळतात. हिवाळ्यात सकाळी दव पडते. जास्त उंचीवरील प्रदेशांत हिम पडते, तसेच कोठे कोठे पाऊस पडतो. काही प्रदेशांत दाट धुके पडत असते, तर काही प्रदेशांत अचानक गारा पडून पिकांचे नुकसान होते.

वृष्टी ः

ढगातून जमिनीकडे द्रवरूपात किंवा घनरूपात पाण्याचा वर्षाव होतो. हिम, गारा, पाऊस (पर्जन्य) ही वृष्टीची प्रमुख रूपे आहेत. अाकृती ५.१ मधील छायाचित्रे पहा.

हिम ः

वातावरणातील हवेचे तापमान जेव्हा गोठणबिंदूखाली जाते, तेव्हा हवेतील बाष्पाचे थेट हिमकणांत रूपांतर होते. या क्रियेस संप्लवन म्हणतात. या क्रियेत वायुरूपातील बाष्प घनरूपात रूपांतरित होते. अशा घनरूपातील वृष्टीला हिमवृष्टी म्हणतात. उच्च अक्षवृत्तीय प्रदेशात व समशीतोष्ण प्रदेशात समुद्रसपाटीपर्यंत हिमवृष्टी होते, तर उष्ण कटिबंधात सुमारे ५००० मी पेक्षा जास्त उंचीवर हिमवृष्टी हाेते.

हिम घनस्वरूपात असल्याने ते पाण्याप्रमाणे वाहून जात नाही. त्याचे थरावर थर साचतात. हिम मोठ्या प्रमाणावर साचल्यामुळे अनेक वेळा त्या प्रदेशातील वाहतूक व संदेशवहन सेवा कोलमडून पडते. हिमप्रदेशात लोकांना हिमदाह होण्यापासून सतत काळजी घ्यावी लागते. हिम वितळल्यावर त्यापासून या प्रदेशाला पाणी मिळते.

गारा ः

भूपृष्ठावर जास्त उष्णता असताना ऊर्ध्वगामी हवेचा प्रवाह जाेरात वाहतो. या ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे हवेचे तापमान कमी होऊन हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन घडून येते. त्यापासून गडद रंगाचे ढग तयार होतात. भूपृष्ठाकडून येणाऱ्या हवेच्या ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे जलकण उंचावर जातात. त्या ठिकाणी जलकणांचे घनीभवन होऊन गारांची निर्मिती होते.

गारा जड असल्याने त्या भूपृष्ठाकडे येऊ लागतात; परंतु हवेच्या जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे त्या पुन्हा वर नेल्या जातात. तेथे गारांवर हिमाचे नवीन थर साचतात. असे अनेक वेळा घडते, त्यामुळे गारा आकाराने मोठ्या होत असताना त्यांच्यामध्ये अनेक समकेंद्री थर तयार होतात. या मोठ्या झालेल्या गारा गुरुत्वाकर्षणामुळे वेगाने जमिनीवर येतात. गारांच्या या वृष्टीला आपण गारपीट म्हणतो. गारपिटीमुळे अनेकदा पिकांचे अतोनात नुकसान होते, तसेच जीवित व वित्तहानी होते.

भारत, आफ्रिका, आग्नेय आशियाच्या काही भागांत उन्हाळ्यात गारा पडतात. विषुववृत्‍त्‍ाावर वातावरणातील उष्णतेमुळे गारा पडत नाहीत, तर शीत कटिबंधात ऊर्ध्वगामी प्रवाह नसल्याने गारा पडत नाहीत.

भौगोलिक स्पष्टीकरण

बरणीतील गरम पाण्याची वाफ हलकी असल्याने ऊर्ध्वगामी दिशेने जाते. बरणीला धातूचे झाकण घट्ट बसवल्याने पाण्याची वाफ बरणीच्या बाहेर जात नाही. बरणीच्या झाकणावर बर्फ ठेवल्यामुळे पाण्याच्या वाफेचे सांद्रीभवन होते. परिणामी, वाफेतून तयार झालेले जलकण झाकणाच्या आतील बाजूस जमा होतात. धातूच्या झाकणावर केलेल्या टोच्यांमुळे हे जलकण तेथे एकत्र येऊन थेंबांच्या रूपात खाली पडतात. पर्जन्यवृष्टीच्या वेळी अशा प्रकारची क्रिया वातावरणात मोठ्या प्रमाणावर घडते.

पाऊस (पर्जन्य) ः

आपल्याला पाणी मुख्यतः पावसाच्या स्वरूपात उपलब्ध होते. बाष्पयुक्त हवा उंच गेल्यावर या हवेचे तापमान कमी होते. हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते, त्यामुळे तयार झालेले जलकण व हवेतील धूलिकण एकत्र येऊन ढग तयार होतात. ढगांमधील जलकण आकाराने मोठे होऊ लागतात. हे मोठे जलकण हवेत तरंगू न शकल्याने जलकणांची पावसाच्या स्वरूपात वृष्टी होते. पावसाचे प्रामुख्याने तीन प्रकार केले जातात.

अारोह किंवा अभिसरण पाऊस ः विषुववृत्तीय प्रदेशात सूर्याच्या उष्णतेमुळे भूपृष्ठ तापते व त्यालगतची हवा तापते. हवा तापल्याने प्रसरण पावून हलकी होते व ती वर जाऊ लागते. उंच गेल्यावर ही हवा थंड होते. थंड हवेची बाष्पधारणक्षमता कमी असते, त्यामुळे हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन जलकण बनतात व त्यापासून पाऊस पडतो. विषुववृत्तीय प्रदेशात असा पाऊस बहुधा दररोज दुपारनंतर पडतो. अशा प्रकारच्या पावसात विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट होतो. आफ्रिकेतील कांगो नदीचे खोरे व द. अमेरिकेतील अॅमेझॉन नदीखोऱ्याच्या विषुववृत्‍तीय भागामध्ये आरोह प्रकारचा पाऊस पडतो. या प्रकारच्या पावसाचा प्रदेश पृथ्वीवर खूपच मर्यादित आहे.

प्रतिराेध पाऊस समुद्रावरून किंवा मोठ्या जलाशयावरून येणारे वारे बाष्पयुक्त असतात. त्यांच्या मार्गात येणाऱ्या उंच पर्वतरांगांमुळे ते अडवले जातात. पर्वताला अनुसरून ते ऊर्ध्वदिशेने जाऊ लागतात. परिणामी हवेचे तापमान कमी होते व त्यातील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन पाऊस पडतो. पर्वतरांगांच्या अडथळ्यांमुळे प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. पर्वताच्या वाऱ्याकडील बाजूवर जास्त प्रमाणात पाऊस पडतो. पर्वत ओलांडल्यावर वाऱ्यातील बाष्पाचे प्रमाण कमी होते, तसेच हवेची बाष्पधारणक्षमता वाढते. वाऱ्याच्या विरुद्‌ध दिशेकडील पर्वताच्या बाजूस पावसाचे प्रमाण कमी होत जाते, त्यामुळे हा प्रदेश पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. आकृती ५.५ (अ) व (ब) पहा.

भारतीय उपखंडाचा विचार करता मोसमी पावसाचा परिणाम मोठा असतो, याविषयी आपण मागील इयत्तांमध्ये शिकलो आहोत. या वाऱ्यांपासून भारतात पडणारा पाऊस हा प्रतिरोध प्रकारचा आहे.

आवर्त पाऊस ः आवर्त म्हणजे एखाद्या ठिकाणी हवेचा दाब अासपासच्या प्रदेशापेक्षा कमी होऊन त्यातून हवेची विशिष्ट रचना तयार होते. या रचनेस आवर्त असे संबोधतात. आवर्ताच्या केंद्रभागाकडे आसपासच्या प्रदेशातून हवा चक्राकार पद्‌धतीने येऊ लागते व केंद्रभागातील हवा वर जाऊ लागते. ही हवा उंच गेल्यावर तिचे तापमान कमी होऊन हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते व पाऊस पडतो.

आवर्त ज्या प्रदेशावरून जातात तेथे पाऊस पडतो. आवर्त पाऊस समशीतोष्ण कटिबंधात जास्त प्रमाणात पडतो. त्याचे क्षेत्रदेखील विस्तीर्ण असते. त्यामानाने उष्ण कटिबंधात पडणारा आवर्त पाऊस मर्यादित क्षेत्रावर पडतो व तो वादळी स्वरूपाचा असतो.

प्रतिरोध प्रकारचा पर्जन्य जगात सर्वांत जास्त भागांत पडतो. आरोह पर्जन्य हा प्रादेशिक स्वरूपाचा पर्जन्य आहे. विषुववृत्तीय भागात पडणाऱ्या आरोह पर्जन्यामध्ये बरीच निश्चितता असते. त्यामानाने प्रतिरोध व आवर्त पर्जन्यात निश्चितता कमी असते, त्यामुळे या प्रकारच्या पर्जन्यक्षेत्रांना काही वेळेस अतिवृष्टी, पूर, तर काही वेळा अवर्षणासारख्या आपत्तींना तोंड द्यावे लागते.

पर्जन्यमापक ः

पाऊस मोजण्यासाठी जे उपकरण वापरतात, त्यास पर्जन्यमापक असे म्हणतात. आकृती ५.८ पहा. पर्जन्यमापकासाठी वापरलेले नरसाळे विशिष्ट व्यासाचे असते. या नरसाळ्यावर पडलेल्या पावसाचे पाणी पर्जन्यमापकात बसवलेल्या बाटलीत जमा होते. हे जमा झालेले पाणी मोजपात्राच्या साहाय्याने मोजले जाते. जास्त पावसाच्या प्रदेशात पर्जन्याची दर तीन तासांनी नोंद घेतली जाते. या मोजपात्रावर मिलिमीटरच्या खुणा केलेल्या असतात. पाऊस मोजण्यासाठी पर्जन्यमापक उघड्या जमिनीवर ३० सेमी उंचीचा सपाट चौथरा बांधून त्यावर ठेवतात, त्यामुळे पावसाचे पाणी कोणतीही बाधा न येता जमा करता येते. आकृती ५.८ पहा.

धुके, दव आणि दहिवर ः

 वातावरणातील बाष्पाचे सांद्रीभवन अथवा घनीभवन जेव्हा भूपृष्ठालगत होते, तेव्हा धुके, दव आणि दहिवर पाहायला मिळते.

भूपृष्ठालगतच्या हवेच्या थरांचे तापमान कमी होते. तापमान कमी झाल्यावर भूपृष्ठालगतच्या हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते. या क्रियेत बाष्पाचे सूक्ष्म जलकणांत रूपांतर होऊन हे जलकण वातावरणात तरंगतात. या तरंगत्या जलकणांची हवेतील घनता वाढल्यावर धुके तयार होते.

भूपृष्ठावरील बाष्पयुक्त हवेचा संपर्क अतिथंड वस्तूंशी आल्यास हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होते. बाष्पाचे सूक्ष्म जलबिंदूंत रूपांतर होते. असे जलबिंदू थंड वस्तूंच्या पृष्ठभागावर चिकटतात. यालाच दवबिंदू म्हणतात.

हवेचे तापमान ०° से. पेक्षा कमी झाल्यास वस्तूंच्या पृष्ठभागावर चिकटलेले दवबिंदू गोठतात. या गोठलेल्या दवबिंदूंना दहिवर असे म्हणतात. हिवाळ्यात दव व दहिवराची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होते.

वृष्टीचे परिणाम : पृथ्वीवर उपलब्ध होणाऱ्या जलाचा मुख्य स्रोत वृष्टी आहे. अतिवृष्टी जशी हानिकारक आहे, तशीच कमी वृष्टीदेखील हानिकारक असते. अतिवृष्टीमुळे (ओला दुष्काळ) महापूर येतात, त्यामुळे जीवित व वित्तहानी होते. पाऊस पडला नाही, तर अवर्षण (कोरडा दुष्काळ) स्थिती उत्पन्न होते, त्यामुळे अन्नधान्याची कमतरता निर्माण होते. अन्नधान्य आयात करावे लागते. शेतकऱ्यांची परिस्थिती हलाखीची होते. देशाच्या अर्थव्यवस्थेवर ताण पडतो.

भारतासारख्या कृषिप्रधान देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असते. भारतातील शेती, मोठ्या प्रमाणावर मोसमी पावसावर अवलंबून आहे, त्यामुळे भारतात होणारा पाऊस संपूर्ण देशासाठी महत्त्वाचा ठरतो. योग्य वेळी योग्य प्रमाणात पडणारा पाऊस शेतीचे उत्पन्न वाढवतो, तर अवकाळी पाऊस शेतीचे नुकसान करतो. भारतातील पाऊस बराचसा अनिश्चित स्वरूपाचा आहे.

अतिशय दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी होते. रस्ते, लोहमार्ग, जलमार्ग व हवाईमार्गयांवर याचा विपरीत परिणाम होतो. अनेक वेळा अपघात होण्याची परिस्थिती निर्माण होते. गाड्या, विमाने इत्यादी वाहतूक सेवा रद्द कराव्या लागतात.

दहिवर पिकांना मारक ठरते, तसेच रस्त्यावर पसरल्यास अपघात होण्याची शक्यता असते. दव आणि धुक्याने रोगराई पसरून शेतीतील काही पिकांचे नुकसान होते, तर काही पिकांसाठी दव उपयुक्त ठरते.

आम्ल पाऊस : औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणामुळे हवेत विविध वायू मिसळले जातात. या वायूंची हवेतील बाष्पाशी रासायनिक क्रिया होऊन वेगवेगळी आम्लेतयार होतात. उदा., नायट्रिक आम्ल, सल्फ्युरिक आम्ल इत्यादी. पावसाच्या पाण्यात विरघळलेली आम्ले पावसासोबत खाली पडतात. या आम्लासह पडणाऱ्या पावसास आम्ल पर्जन्य म्हणतात. असा पाऊस सर्व सजीव व निर्जीव यांच्यासाठी हानिकारक असतो.