५. सागरी प्रवाह

प्रयोग करताना तुमच्या असे लक्षात येईल, जसजसे पाण्याचे तापमान वाढू लागले तसतसे पाण्यातील टिकल्या/ चकत्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे जाऊ लागल्या. तापमान जसे वाढते तशी पाण्याची घनता कमी होते. त्यामुळे कमी तापमान असलेले पाणी जास्त तापमान असलेल्या पाण्याची जागा घेते. काही वेळाने तर टिकल्या/ चकत्या वर्तुळाकार दिशेत प्रवाहित होतात. पाण्याच्या प्रवाहामुळे या चकत्यांची हालचाल होते.

भौगोलिक स्पष्टीकरण

सागरी जलाचे हालचालींच्या आधारे दोन भाग केले जातात.

(१) समुद्रसपाटीपासून -५०० मीटर,

(२) -५०० पेक्षा जास्त खोल.

समुद्रसपाटीपासून ५०० मी. खोलीपर्यंत भाग हा वरचा थर मानला जातो. या खोलीपर्यंत सूर्यकिरणांची उष्णता पोहोचू शकते. या विभागातील सागरी जलाची हालचाल मुख्यतः तापमान व क्षारता यांमुळे होते. ग्रहीय वाऱ्यांमुळे सागरजलाला गती प्राप्त होते.

क्षितिज समांतर (पृष्ठीय) सागरी प्रवाह :

पृष्ठभागांवरील प्रवाहांतून महासागरातील दहा टक्के पाणी वाहते. सागरपृष्ठापासून ५०० मीटरपर्यंतचे प्रवाह पृष्ठभागावरील किंवा पृष्ठीय प्रवाह समजले जातात. या प्रवाहातून होणारा पाण्याचा विसर्ग स्वेर्ड्रप या एककाने माेजला जातो. एक स्वेर्ड्रप म्हणजे १०६ घनमीटर प्रतिसेकंद वि सर्गअसतो. सागरजलाची क्षितिज समांतर हालचाल ही उष्ण आणि शीत प्रवाहांच्या स्वरूपात होते. विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे व ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे हे प्रवाह वाहतात. हे प्रवाह मोठ्या प्रमाणावर ग्रहीय वाऱ्यांमुळे दूर अंतरापर्यंत ढकलले जातात. त्यामुळे महासागराचे पाणी विषुववृत्ताकडून दोन्ही ध्रुवांकडे व तेथून पुन्हा विषुववृत्ताकडे असे प्रवाहित होते. आकृती ५.४ मधील नकाशाचा अभ्यास तुम्ही यापूर्वी केला आहे. हा नकाशा पुन्हा अभ्यासा व पुढील प्रश्नांची उत्तरे द्या.

सागरी प्रवाह प्रामुख्याने सागरजलाचे तापमान, क्षारता व घनता तसेच ग्रहीय वारे यांमुळे निर्माण होतात हे आपण अभ्यासले आहे. याबरोबरच पुढील काही कारणेही सागरी प्रवाहांच्या वाहण्याची दिशा व त्यांचा वेग याला कारणीभूत ठरतात

माहीत आहे का तुम्हांला ?

हिंदी महासागरातील प्रवाह : पॅसिफिक व अटलांटिक महासागरांतील प्रवाह प्रणालीत सारखेपणा आहे, तथापि हिंदी महासागरातील प्रवाहचक्र वेगळे आहे. हिंदी महासागर उत्तरेकडे भूवेष्टित आहे. या महासागराचे विषुववृत्तामुळे उत्तर व दक्षिण असे दोन भाग होतात. या महासागरावर मान्सून वाऱ्यांचा मोठा प्रभाव आहे. हे वारे हंगामानुसार दिशा बदलतात. त्यामुळे उन्हाळ्यात उत्तर हिंदी महासागरात सागर प्रवाह घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहतात, तर हिवाळ्यात ते विरुद्ध दिशेने वाहतात.

पृथ्वीचे परिवलन :

पृथ्वीच्या परिवलनामुळे उत्तर गोलार्धात सागरी प्रवाह घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने फिरतात, तर दक्षिण गोलार्धात ते घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतात.

भूखंड रचना :

किनारपट्टीच्या रचनेनुसार सागरी प्रवाहांच्या दिशा बदलतात. सागरी प्रवाहांचा साधारण वेग ताशी २ ते १० किमी असतो. सागरी प्रवाह उष्ण व शीत अशा दोन प्रकारांत विभागता येतात.

सागरी प्रवाहांचे मानवी जीवनावरील परिणाम :

 सागरसान्निध्य असलेल्या प्रदेशातील हवामानावर सागरी प्रवाहांचा विशेष परिणाम होतो. उष्ण सागरी प्रवाह थंड प्रदेशात ज्या किनारपट्टीजवळून वाहतात, तेथे हवामान उबदार बनते. काही प्रदेशांत पावसाचे प्रमाण वाढते. उदा., पश्चिम युरोप, दक्षिण अलास्का व जपानच्या किनाऱ्याजवळून वाहणाऱ्या उष्ण प्रवाहांमुळे तेथील थंडीची तीव्रता कमी होऊन हवामान उबदार बनले आहे. त्यामुळे तेथील बंदरे हिवाळ्यातही गोठत नाहीत. सागरी प्रवाह नसते तर समुद्र व महासागरांतील पाणी संचित राहिले असते. अशा पाण्यात सजीवांना आवश्यक खाद्याचा पुरवठा झाला नसता. परिणामतः सागरी जीवसृष्टी व तेथील परिसंस्था मर्यादित राहिल्या असत्या. उष्ण व शीत प्रवाह जेथे एकत्र येऊन मिळतात, त्या भागात वनस्पती, शेवाळ, प्लवंक इत्यादींची वाढ होते. हे माशांचे खाद्य असते. त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणावर मासे येतात, त्यांचे प्रजनन होते. म्हणून अशा भागात मोठी मत्स्यक्षेत्रे निर्माण झालेली आहेत. अटलांटिक महासागरातील उत्तर अमेरिका खंडाजवळील ग्रँड बँक, युरोप खंडाजवळील डॉगर बँक ही त्यांची काही उदाहरणे आहेत.

उष्ण आणि शीत प्रवाह जेथे एकत्र येतात, त्या भागात दाट धुके निर्माण होते. असे धुके वाहतुकीस बाधा आणते. न्यूफाउंडलँड बेटाजवळ गल्फ उष्ण प्रवाह आणि लॅब्राडोर शीत प्रवाह एकमेकांना मिळतात. त्यामुळे दाट धुके निर्माण होते. शीत सागरी प्रवाहांमुळे ध्रुवीय प्रदेशांकडून हिमनग वाहत येतात. असे हिमनग सागरी वाहतूक मार्गांवर आले तर जहाजांना ते धोकादायक ठरतात. सागरी प्रवाह जलवाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. सागरी प्रवाहाला अनुसरून जलवाहतूक केली असता जहाजाचा वेग वाढून वेळेची तसेच इंधनाचीही बचत होते. वाहतूक कमी खर्चिक होते. शीत सागरी प्रवाहालगतच्या किनारपट्टीवर पर्जन्याचे प्रमाण कमी असते. उदा., पेरू, चिली व Z¡G© Ë` आफ्रिका येथील ओसाड वाळवंटी प्रदेश.

 खोलवर वाहणारे सागरी प्रवाह :

५०० मीटरपेक्षा खोलीवरील जलात देखील प्रवाह असतात. त्यांना खोल पाण्यातील प्रवाह म्हणतात. खोलवर वाहणारे हे प्रवाह सहसा महासागरातील वेगवेगळ्य भागांतील पाण्याच्या तापमान व घनतेतील तफावतीमुळे तयार होतात. याला उष्णता-क्षारता अभिसरण म्हटले जाते. हे प्रामुख्याने महासागराच्या तळापर्यंत वाहणारे प्रवाह आहेत. हे सागरजलाच्या पृष्ठभागाखाली नद्यांप्रमाणे सतत वाहत असतात. आकृती ५.५ पहा.

वेगवेगळ्या भागांतील पाण्याचे तापमान हेही खोल सागरी प्रवाहांमागचे मोठे कारण आहे. गरम झालेल्या पाण्याची क्षारता कमी असते व पर्यायाने घनताही कमी असते. असे पाणी पृष्ठभागावर येते, तर गार पाण्याची घनता जास्त असल्याने ते खाली जाते. या हालचालींमुळे प्रवाह निर्माण होतात. साधारणतः ग्रीनलँड व युरोपीय खंड यांमधील भागात पृष्ठीय जल जास्त खोलीकडे वाहत जाते. हे जल खोलीवरूनच अंटार्क्टिका खंडापर्यंत जाते. ते तेथून पुढे या जलाचे उद्धरण होत सागरपृष्ठाकडे होते. अशा तऱ्हेने संपूर्ण सागरजलाचे पुनर्वितरण घडत असते. असे पुनर्वितरण घडण्यास पाचशे वर्षांचा कालावधी लागतो. या तऱ्हेच्या हालचालीस वाहतूक पट्ट्यावरून होणारी हालचाल असेही संबोधले जाते.

खोल सागरी प्रवाहांचे महत्त्व :

उष्णता व क्षारता यांनी प्रेरित झालेल्या अभिसरणामुळे सागरी जलाची प्रचंड मोठ्या प्रमाणात हालचाल होत असते. या अभिसरणातून संपूर्ण सागरी जल पृष्ठभागापासून तळाकडे व तळाकडून पृष्ठाकडे हलवले जाते. पृष्ठीय भागातील उष्ण जल तळाकडे तर तळाकडील पोषक द्रव्यांनी समृद्ध व शीत जल पृष्ठाकडे नेले जाते.

माहीत आहे का तुम्हांला ?

अटलांटिक महासागरातील सर्गासो समुद्र हा एक सागरी प्रवाहाच्या चक्रीय आकृतिबंधामुळे तयार झालेला भाग आहे. याच्या सीमांवर जमिनीचा भाग नसून केवळ वेगवेगळ्या प्रवाहांनी हा सीमित झालेला आहे. सागरी प्रवाहांच्या चक्रीय आकृतिबंधामुळे महासागरांच्या काही भागांत अशी वैशिष्ट्यपूर्णस्थिती निर्माण होते. अशा क्षेत्रांना ग्वायर्स म्हणतात. सर्गासुम नावाच्या सागरी गवतामुळे या भागास सर्गासो असे नाव मिळाले आहे. येथे सागरी जल स्थिर असते. हा समुद्र ११०० किमी रुंद व ३२०० किमी लांब आहे.