५. सामाजिक व धार्मिक प्रबोधन

इंग्रजी शिक्षणाच्या प्रसाराबरोबर नवे विचार, नवीन कल्पना, नवीन तत्त्वज्ञान यांचा प्रसार झाला. तसेच पाश्चिमात्य विचार, संस्कृती याची भारतीयांना ओळख झाली. यामुळे भारतीय समाजाच्या सामाजिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रांत बदल झाले.

भारतीय समाजाचे मागासलेपण त्यांच्या अंधश्रद्‍धा, रूढिप्रियता, जातिभेद, उच्च-नीचतेच्या भ्रामक कल्पना, चौकस व चिकित्सक वृत्तीचा अभाव यांत आहे, याची जाणीव सुशिक्षित समाजाला होऊ लागली. देश प्रगतिपथावर नेण्यासाठी भारतीय समाजातील दोष व अनिष्ट प्रवृत्तींचे निर्मूलन करून मानवता, समता, बंधुता या तत्त्वांवर आधारित नवसमाज निर्माण करण्याची आवश्यकता होती. भारतीय समाजातील विविध प्रश्न दूर करण्यासाठी सुशिक्षित विचारवंत आपल्या लेखणीद्‍वारे जनजागृती करू लागले. तत्कालीन भारतात सुरू झालेल्या या वैचारिक जागृतीला ‘भारतीय प्रबोधन’ असे म्हणतात.

धर्मसुधारणा व समाजसुधारणेचे पर्व

ब्राह्मो समाज : राजा राममोहन रॉय यांनी इ.स.१८२८ मध्ये बंगाल प्रांतात ब्राह्मो समाजाची स्थापना केली. त्यांनी अनेक भाषा व धर्मांचा अभ्यास केला होता. यातूनच त्यांची अद्वैतवादी विचारसरणी विकसित झाली. एकेश्वरवाद, उच्च[1]नीच असा भेदभाव न पाळणे, कर्मकांडास विरोध, प्रार्थनेचा मार्ग अनुसरणे ही ब्राह्मो समाजाची तत्त्वे होती. राजा राममोहन रॉय यांनी सती प्रथा, बालविवाह, पडदा पद्‍धती यांना विरोध केला. विधवा विवाह, स्त्रियांचे शिक्षण याचे समर्थन केले. कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना केली. त्याचप्रमाणे ‘संवाद कौमुदी’ या वृत्तपत्राद्‍वारे जनजागृती केली.

प्रार्थना समाज : दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी इ.स.१८४८ साली मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना केली. पुढे परमहंस सभा विसर्जित झाल्यानंतर तिच्याच काही सभासदांनी प्रार्थना समाज स्थापन केला. दादाेबांचे बंधू डॉ.आत्माराम पांडुरंग हे प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते. या संस्थेस मुंबई विद्यापीठातील तरुण पदवीधर मिळाल्यामुळे त्याची प्रतिष्ठा वाढली.

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, डॉ.रा. गो. भांडारकर यांनी प्रार्थना समाजाचे कार्य पुढे चालवले. मूर्तिपूजेला विरोध, एकेश्वरवाद, कर्मकांडाला विरोध ही प्रार्थना समाजाची तत्त्वे होती. उपासना व प्रार्थनेवर त्यांचा भर होता. प्रार्थना समाजाने सामाजिक सुधारणेसाठी अनाथालये, स्त्री शिक्षणसंस्था, कामगारांसाठी रात्रशाळा, दलितांसाठी संस्था सुरू केल्या. प्रार्थना समाजाचे सदस्य महर्षी विठ्‍ठल रामजी शिंदे यांनी ‘डिप्रेस्ड क्लासेस मिशन’ स्थापन करून त्या माध्यमातून सामाजिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला.

सत्यशोधक समाज : महात्मा जोतीराव फुले यांनी इ.स.१८७३ मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समतेच्या तत्त्वावर आधारित समाजनिर्मितीसाठी सत्यशोधक समाजाने कार्य केले. त्यांनी स्पृश्यास्पृश्यतेला विरोध केला. त्याचबरोबर बहुजन समाजाच्या शिक्षणाचा पुरस्कार,         स्त्री-शिक्षणाचा पुरस्कार केला. महात्मा जोतीराव फुले यांनी ‘ब्राह्मणांचे कसब’, ‘गुलामगिरी’, ‘शेतकऱ्याचा आसूड’, ‘सार्वजनिक सत्यधर्म’ अशा पुस्तकांच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले. स्त्री- पुरुष अथवा माणसा- माणसांमध्ये भेद निर्माण करणाऱ्या चालीरितींवर कडक टीका केली.

आर्य समाज : स्वामी दयानंद सरस्वती यांनी इ. स. १८७५ मध्ये आर्य समाजाची स्थापना केली. ‘सत्यार्थ प्रकाश’ हा वेदांवर भाष्य करणारा ग्रंथ लिहिला. प्राचीन वैदिक धर्म हाच खरा धर्म असून त्यात जातीपातींना स्थान नव्हते. स्त्री-पुरुष समानता होती, असे प्रतिपादन केले. ‘वेदांकडे परत चला’ असे आर्य समाजाचे ब्रीदवाक्य होते. आर्य समाजाच्या भारतभर शाखा उघडल्या. आर्य समाजाच्या माध्यमातून ठिकठिकाणी शिक्षण संस्था उघडल्या.

रामकृष्ण मिशन : रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांनी इ.स.१८९७ मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली. रामकृष्ण मिशनने लोकसेवेची कार्ये केली. दुष्काळग्रस्तांना मदत, रोगी, दीनदुबळ्यांना औषधोपचार, स्त्रीशिक्षण, आध्यात्मिक उन्नती या क्षेत्रांत मिशनने कार्य केले व आजही करत आहे. स्वामी विवेकानंद उत्तम वक् होते. त ते ्यांनी इ.स.१८९३ मध्ये अमेरिकेतील शिकागो येथील विश्वधर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले. भारतातील तरुणांना ‘उठा, जागे व्हा व ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका’ हा संदेश त्यांनी दिला.

शीख समाजातील सुधारणा : शिखांमधील धर्मसुधारणेसाठी अमृतसर येथे ‘सिंगसभा’ स्थापन झाली. या संस्थेने शीख समाजात शिक्षणप्रसार व आधुनिकीकरण घडवून आणले. पुढे ‘अकाली चळवळी’ने शीख समाजातील सुधारणावादी परंपरा चालू ठेवली.

स्त्रीविषयक सुधारणा : ब्रिटिश सत्तेचा भारतात विस्तार झाला, त्याकाळात भारतातील स्त्रियांची परिस्थिती दयनीय होती. त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. समानतेची वागणूक दिली जात नव्हती. बालविवाह, जरठ-कुमारी विवाह, हुंडा पद्धती, सती प्रथा, केशवपन, विधवा विवाह अशा प्रथा समाजात होत्या. तत्कालीन गर्व्हनर लॉर्ड बेंटिंक याला सतीबंदीचा कायदा करण्यासाठी राजा राममोहन रॉय यांसारख्या समाजसुधारकांनी मदत केली. गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी यांनी शतपत्रातून स्त्री- पुरुष समानतेचा पुरस्कार केला.

१८४८ मध्ये महात्मा फुले यांनी पुणे येथील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. त्यात त्यांना त्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांची साथ लाभली. समाजातील कर्मठ लोकांनी केलेली टीका, निंदा पत्करूनही सावित्रीबाईंनी शिक्षणाचे कार्य सुरू ठेवले. महात्मा फुले यांनी स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. केशवपनाची पद्‍धत बंद व्हावी म्हणून नाभिकांचा संप घडवून आणला. विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी पं. ईश्वरचंद्र विद्यासागर, विष्णुशास्त्री पंडित व वीरेशलिंगम पंतलु यांनी विशेष प्रयत्न केले. गोपाळ गणेश आगरकर यांनी आपल्या सुधारक या वृत्तपत्रातून बालविवाह, संमतीवयाचा कायदा यावर परखड मते मांडली. महर्षी विठ्‍ठल रामजी शिंदे यांनी मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्‍ध परिषद भरवली. ताराबाई शिंदे यांनी ‘स्त्री-पुरुष तुलना’ या ग्रंथातून अत्यंत जहाल भाषेत स्त्रियांच्या हक्कांचा पुरस्कार केला. महर्षी धोंडाे केशव कर्वे यांनी पुण्यात ‘अनाथ बालिकाश्रम’ सुरू केला. विधवा, परित्यक्ता यांच्यासह सर्वच महिलांना शिक्षण घेऊन पायावर उभे राहता यावे हा त्यांचा हेतू होता. त्यांच्या प्रयत्नांमधूनच विसाव्या शतकातील भारतातील पहिले महिला विद्यापीठ उभे राहिले. पंडिता रमाबाईंनी ‘शारदासदन’ संस्थेची स्थापना करून दिव्यांग मुले, मुली, स्त्रिया यांच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली. रमाबाई रानडे यांनी ‘सेवासदन’ संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांसाठी परिचारिका अभ्यासक्रम सुरू केला. त्यांनी स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून सरकारकडे मागणी केली. स्त्रियांवरील अन्यायाला डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लेखनातून वाचा फोडली. महात्मा गांधींनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. स्त्रियांनी स्वातंत्र्य चळवळी दरम्यान मोलाचे योगदान दिले आहे.

स्त्री सुधारणा चळवळींमुळे समाजातील अन्यायकारक प्रथा बंद पडण्यास मदत झाली. स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फुटली. स्त्रिया स्वतःचे विचार लेखनातून मांडू लागल्या. शिक्षणामुळे जीवनाच्या सर्व क्षेत्रांत त्यांचे कर्तृत्व फुलून यायला लागले.

मुस्लीम समाजातील सुधारणा चळवळ : अब्दुल लतीफ यांनी मुस्लीम समाजातील धर्मसुधारणेला सुरुवात केली. त्यांनी बंगाल प्रांतात ‘द मोहम्मदन लिटररी सोसायटी’ या संस्थेची स्थापना केली. सर सय्यद अहमद खान यांनी ‘मोहम्मदन अँग्लो- ओरिएंटल कॉलेज’ स्थापन केले. पुढे याचेच अलिगढ मुस्लीम विद्यापीठात रूपांतर झाले. त्यांनी पाश्चिमात्य विज्ञान व तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला. पाश्चात्त्य शिक्षण आणि विज्ञान यांचा अंगीकार मुस्लीम समाजाने केल्याशिवाय त्याची प्रगती होणार नाही, असे त्यांचे ठाम मत होते.

हिंदू समाजातील चळवळ : हिंदू समाजाला सन्मानाचे स्थान मिळावे म्हणून १९१५ साली ‘हिंदूमहासभा’ या संघटनेची स्थापना झाली. पं. मदन मोहन मालवीय यांनी ‘बनारस हिंदू विद्यापीठा’ची पायाभरणी केली. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी १९२५ साली ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’ची नागपूर येथे स्थापना केली. हिंदुत्ववादी तरुणांची शिस्तबद्ध व चारित्र्यसंपन्न संघटना उभारणे हे त्यांचे ध्येय होते.

स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांनी रत्नागिरी येथे हिंदू धर्मातील सर्व जातींना मुक्त प्रवेश असणाऱ्या पतित पावन मंदिराची निर्मिती केली. सहभोजनादी कार्यक्रम राबवले. आधुनिक भारताच्या इतिहासात प्रबोधनाचा हा आविष्कार महत्त्वाचा आहे. स्वातंत्र्य, समता, राष्ट्रवाद या कल्पनांनी भारलेल्या सुधारकांनी राजकीय क्षेत्रात राष्ट्रव्यापी चळवळ उभी केली. तिचा अभ्यास आपण पुढील पाठात करणार आहोत.