६. असा रंगारी श्रावण

असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो

सृष्टीचा गा चित्रकार हिर्वा देखावा रेखितो

 कलावंत हा साजिरा काय त्याची कलागत

जागोजागी चित्रांचीच त्यानं मांडली पंगत

 नाचे दरी डोंगरात झिम्मा खेळतो नदीशी

रिमझिम पहाळीचं गाणं बोलतो झाडांशी

 वेण्या गुंफितो वेलींच्या वेली लाजल्या लाजल्या

पाना-फुलांचे पातळ थेंबाथेंबांनी सजल्या

 झुले पोरींना झुलाया असे टांगतो झाडाला

देतो झुलता झुलता लय पोरींच्या गाण्याला

 पोरांमध्ये खेळायला होतो श्रावण खेळगा

दहीहंडीच्या संगती चिंब गोपाळ अवघा

पावसाचं घर कसं लख्ख उन्हात बांधतो

 खोडी काढून खट्याळ झाडाआड तो लपतो

इंद्रधनुष्याचा बांध असा नभाला घालतो

 रंगीबेरंगी फुलांची नक्षी रानात गांेदतो

 असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो

 हिर्व्या सृष्टीच्या मळ्यात खोपा करून राहतो