६. नियम सर्वांसाठी

     वाहतूक सुरळीत चालावी म्हणून काही नियम असतात व आपण ते पाळतो. तसेच सामाजिक जीवनात प्रत्येकाने काय काम करायचे यासाठी काही नियम असतात. प्रत्येकाची जबाबदारी व कर्तव्ये काय आहेत हे कळावे, यासाठी नियम तयार करावे लागतात. नियमांच्या पालनाने आपल्या व्यवहारात शिस्त निर्माण होते. आपण अधिक कार्यक्षमतेने काम करू शकतो.
नियम सर्वांसाठी असतात. ते सर्वांना सारखेच लागू होतात. नियमांपुढे कोणीच श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसते. नियमांचे पालन न केल्यास शिक्षा होते. नियम मोडल्याबद्दल शिक्षा देताना कोणताही भेदभाव केला जात नाही. अशा प्रकारे ‘समानता’ हा नियमांचा आधार असतो.

समाजासाठी असणाऱ्या नियमात होणारे बदल
आपले सामाजिक जीवन नियमांच्या आधारे चालते. हे नियम आपणच तयार करतो. ते सर्वांच्या हिताचे असतात म्हणून आपण त्यांचे पालन करतो. समाजासाठी असणाऱ्या या नियमांमध्ये योग्य ते बदल करावे लागतात. समाज नियमनासाठी केले जाणारे नियम व निसर्गाचे नियम यांत फरक आहे.
निसर्गाचे व्यवहार निसर्गाच्या नियमांनुसार चालतात. निसर्गाचे नियम आपण बदलू शकत नाही.
सूर्याचे उगवणे व मावळणे किंवा ऋतुचक्रातील बदल कधीच थांबत नाही. गुरुत्वाकर्षणाचा नियम बदलत नाही. समुद्राची भरती-ओहोटी, चंद्राच्या बदलणाऱ्या कला या सर्व गोष्टी निसर्गनियमानुसार चालू असतात. निसर्गातील नियम हे अधिक स्थिर व निश्चित असतात, ते कालबाह्य होत नाहीत; परंतु माणसांसाठी असणाऱ्या नियमात परिस्थितीनुसार बदल करावे लागतात. आपला देश ब्रिटिशांच्या राजवटीखाली होता, तेव्हाचे नियम वेगळे होते. आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर परिस्थिती बदलली आणि त्यानुसार समूहजीवनाचे नियम बदलले. उदा., स्वातंत्र्य मिळाले तेव्हा २१ वर्षांवरील नागरिकांना मतदानाचा हक्क होता. १९८८ नंतर मतदानाचा हक्क व्यक्तीस १८ वर्षे पूर्ण झाल्यावर देण्यात आला.

     मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करणे अयोग्य आहे. मुलींना अन्न कमी देणे किंवा त्यांना शाळेत न पाठवणे हे त्यांच्यावर अन्याय करणारे आहे. असा अन्याय समाजातल्या अन्य घटकांवरही होताना दिसतो.

या चित्रांमध्ये कोणता अन्याय होत आहे असे तुम्हांला वाटते ?

कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये म्हणून नियम करावे लागतात.

     आपल्या जीवनात आपण अनेक रूढी, परंपरांचेही पालन करत असतो. आपले आई, वडील, आजी, आजोबा, नातेवाईक यांचे पाहून आपण त्या परंपरा पाळतो. आपल्या समाजात अनेक चांगल्या रूढी आणि परंपरा आहेत. आपण सण-समारंभांचा

     एकत्रित आनंद घेतो. घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करून त्यांचा सन्मान करतो. पर्यावरणाचे संतुलन राखणाऱ्या अनेक रीती आपण परंपरेने पाळतो. प्राण्यांविषयी प्रेम व कृतज्ञता व्यक्त करतो. अहिंसा आणि शांतता ही मूल्ये प्राचीन काळापासून आपल्या सामाजिक जीवनात आहेत.
असे असले, तरी काही रूढी व परंपरा मात्र अयोग्य आहेत. त्या आपल्या समाजाच्या फायदयाच्या नाहीत. उदाहरणार्थ, जातिभेद. यामुळे समाजात उच्च-नीच अशी दरी निर्माण झाली. विषमता वाढली. अस्पृश्यता ही एक अमानुष आणि अन्यायकारक प्रथा होती. स्वतंत्र भारताच्या संविधानाने अस्पृश्यतेची प्रथा नष्ट केली.
कित्येक वेळा कायदे करून अनिष्ट रुढींचे निर्मूलन करावे लागते. आपल्या देशात सती, बालविवाह यांसारख्या रुढींवर कायदा करून बंदी घालण्यात आली. जादूटोणा करून लोकांना फसवण्यावर बंदी घालणारा कायदा सर्वप्रथम महाराष्ट्रात करण्यात आला. लग्नात हुंडा घेण्याच्या प्रथेला कायद्याने बंदी घातली आहे.

चुकीच्या रूढी-परंपरांमुळे समाजातल्या काही लोकांच्या वाट्याला उपेक्षा येते. त्यांना शिक्षण घेता येत नाही. प्रगतीच्या संधी मिळत नाहीत. रोजगार मिळत नाही, त्यामुळे गरिबी वाट्याला येते. गरिबी आणि शिक्षणाचा अभाव या आपल्या सामाजिक जीवनातील मोठ्या अडचणी आहेत. त्या दूर केल्या पाहिजेत, तरच आपण सर्वजण एकत्रितपणे पुढे जाऊ शकतो.
पर्यावरण रक्षण
समाजात समता व न्याय प्रस्थापित करण्यासाठी जसे कायदे आवश्यक असतात, तसेच पर्यावरणाच्या रक्षणासाठीही कायदयांची गरज असते. आपण अनेक बाबतींत निसर्गावर अवलंबून असतो. आपल्या अनेक गरजांची पूर्तता निसर्गामुळे होते. आपल्यानंतर येणाऱ्या पिढ्यांनाही नैसर्गिक साधनसंपत्ती पुरली पाहिजे. त्यासाठी आपण या साधनसंपत्तीचे जतन केले पाहिजे. ती काळजीपूर्वक वापरली पाहिजे.