६.पण थोडा उशीर झाला…

कारगील, काश्मीर सरहद्दीवरील हिमालयातील अतिशय खडतर हवामानाच्यादुर्गम प्रदेशातील ठिकाण. या ठिकाणी सेवा बजावणे हे कोणत्याही सैनिकाच्या आयुष्यातील प्रचंड अवघड काम. अतिशय थंड हवामान आणि सतत धगधगणारी तणावपूर्ण सीमा; पण अशा प्रतिकूल परिस्थितीलाही पुरून उरणार नाही तो जवान कसला? इथला पावसाळा आणि हिवाळा जेवढा जीवघेणा, तेवढाच उन्हाळा सुखावह आणि आल्हाददायी. उन्हाळ्यात पहाडावरील बर्फ वितळून पर्वतरांगा हिरव्याकंच रंगाने नटून जातात. जमीन अशी दिसतच नाही; जणू वसुधेने हिरवागार शालू परिधान केला आहे. असा रमणीय निसर्ग आमचे मन उल्हसित करायचा.

मार्च महिन्याचे दिवस होते. बटालियनमध्ये आठ[1]पंधरा दिवसांतून एकदा पोस्टमन येत असे. पोस्टमन आला, की अक्षरशः इथं झुंबड उडे. सगळी बटालियन त्याच्यावर तुटून पडे. आपल्याला आलेलं पत्र वाचताना पोलादी छातीच्या सैनिकाचं मन चंद्रमण्यासारखं पाझरून कधी वाहू लागायचं ते समजायचं नाही. एकमेकांच्या पाठीवर आधाराची थाप पडायची आणि गावाकडच्या आठवणींना उजाळा देत पुन्हा नव्या जोशात आम्ही कामावर खडे व्हायचो.

 बायकोनं पाठवलेलं अंतर्देशीय पत्र घेऊन मी बंकरकडे वळलो. पत्रावर तिच्या आसवांच्या सुकलेल्या डागांशिवाय काहीच लिहिलेलं नव्हतं. पत्रात काही लिहिलं नसलं तरी ते बोलकं पत्र बराच वेळ मी वाचत बसलो होतो. इथून गावाकडे जाण्यातच सुट्टीतले आठ-दहा दिवस जायचे. गावाकडं गेल्यावर पाव्हण्यारावळ्यांकडे जाणं-येणं आलंच. त्यातच बहिणींचे रक्षाबंधन, भाऊबीज त्यांच्या गावी जाऊन साजरी करणं, हे सगळं करता करता परतीचा दिवस कधी उगवायचा हेच उमगायचं नाही. तसं कारगीलसारख्या दुर्गम ठिकाणी कुटुंब आणणं कोणत्याही सैनिकाला शक्य नव्हतं. पत्नीची कधीच तक्रार नसायची. मी बजावत असलेल्या देशसेवेची तिला जाणीव होती.

माझ्या बाबांनाही माझा खूप अभिमान वाटायचा. मी सुट्टीत आलो, की ते कडकडून मिठीत घ्यायचे. मी येताना आणलेली मिठाई साऱ्या गावात वाटायचे. माझी आई खूप हळवी. माझ्यापाठीवरचा बंदुकीच्या गोळीचा व्रण बघून, तिनं जे अंथरूण धरलं, ते सोडलंच नाही. मी सगळ्यांत धाकटा, म्हणून सगळ्यांचा जीव माझ्यासाठी तीळ तीळ तुटत असे. या हळव्या माउलीच्या व प्रेमळ बांधवांच्या आठवणी फेर धरायच्या; पण भारतमातेच्या संरक्षणाची जबाबदारीही मला तितकीच महत्त्वाची वाटायची. मला वाटायचं, ‘भारतमातेसाठी लढताना बलिदान द्यावं लागलं, तर माझ्या अंगावर तिरंगा मानाने ठेवला जाईल. ते पाहताना माझ्या घरच्यांचा ऊर अभिमानाने फुलून येईल.’ काल सकाळीच गावाकडून आलेल्या सुखदेवने गावाकडचा सांगावा सांगितला. माझ्या आईचं दुखणं वाढलं होतं. आईने त्याच्यासोबत निरोप पाठवला होता. तिचा प्रत्येक शब्द माझ्या अंतरंगाचा ठाव घेत होता. ‘मी आजारी आहे; पण तू माझी काळजी करू नको. घरातले सगळे माझी नीट काळजी घेतात, मला जपतात. तू आपल्या भारतमातेला जप, तिचं रक्षण कर, तिची काळजी घे.’ माझं मन ढसढसा रडत होतं. डोळ्यांतलं पाणी हटेना. जीव घाबराघुबरा होऊ लागला. मन सैरभैर झालं. तसा मी उठलो, थेट मेजरसाहेबांच्या पुढ्यात जाऊन उभा राहिलो. माझी अवस्था पाहून त्यांचंही मन हेलावलं. त्यांनी माझी रजा तात्काळ मंजूर केली.

 कसाबसा सामानाचा पसारा आवरून गावच्या वाटेला लागलो. आठ-दहा दिवसांचा प्रवास, वेळ सरता सरत नव्हता, रस्ता कटता कटत नव्हता. कधी एकदाचा आईला पाहीन असं झालं होतं. आईचे तखडबडीत हात आपल्या गालांवरून फिरावेत, ‘आलं माझं लेकरू,’ असं म्हणत आईनं कुशीत घ्यावं अन् मीही आसुसल्या मनाने तिच्याकडून लाड करून घ्यावेत असं विचारांचं काहूर डोक्यांत माजलं होतं.

 गावाच्या वेशीवर आलो, तसं जो तो हातातलं काम सोडून कावराबावरा होऊन माझ्याकडं पाहू लागला. गावातल्या पाराजवळ पोहोचलो, तसं काहीतरी विपरीत घडलंय हे मी ताडलं. हातातल्या जाडजूड ट्रंका तिथंच टाकून घराच्या दिशेनं धावत सुटलो. गावच्या वेशीपासून माझ्यामागून येणारे गावकरीही धावू लागले. मी वाड्याच्या दरवाजातून आत पाऊल टाकताच बहिणी माझ्या गळ्यात पडून रडू लागल्या. भाऊबंद पडवीत ठिक्याच्या तळवटावर खाली माना घालून बसले होते. माझी नजर मात्र घरभर फिरत होती. माझी आई कुठे दिसते का? माझी आई कुठून येते का? ‘माझं लेकरू आलं’, या तिच्या आवाजातल्या शब्दांचा कानोसा मी घेत होतो. तिच्या त्या थरथरत्या स्पर्शाला माझं मन आतुरलं होतं; पण यापुढं माझी आई मला कधीच दिसणार नव्हती. मी तिला भेटायला आलो होतो; पण थोडा उशीर झाला…