६. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास

मनाला विरंगुळा मिळवून देणाऱ्या गोष्टी म्हणजे मनोरंजनाची साधने होत. निरनिराळे छंद, खेळ, नाटक-चित्रपटादी करमणुकीची साधने, लेखन[1]वाचनादी सवयी इत्यादींचा अंतर्भाव मनोरंजनात होतो.

६.१ मनोरंजनाची आवश्यकता

उत्तम प्रतीचे निखळ मनोरंजन व्यक्तीच्या निकोप वाढीसाठी महत्त्वाचे असते. चाकोरीबद्ध जगण्यातील कंटाळा दूर करून मनाला चैतन्य, ताजेपणा, शरीराला उत्साह व कार्यशक्ती मिळवून देण्याचे काम मनोरंजन करते. छंद वा खेळांची जोपासना केल्याने व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. भारतात प्राचीन व मध्ययुगीन काळात उत्सव, सण-सोहळे, खेळ, नाच-गाणे इत्यादी मनोरंजनाची साधने होती. आधुनिक काळात मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध आहेत.

यादी करूया.

मनोरंजनाचे विविध प्रकार सांगून त्यांचे वर्गीकरण करा.

मनोरंजनाचे दोन प्रकारांत वर्गीकरण करता येते. कृतिशील आणि अकृतिशील. कृतिशील रंजन म्हणजे एखाद्या क्रियेमध्ये त्या व्यक्तीचा प्रत्यक्ष शारीरिक[1]मानसिक सहभाग होय. हस्तव्यवसाय, खेळ ही कृतिशील मनोरंजनाची उदाहरणे आहेत.

आपण जेव्हा खेळाचा सामना पाहतो, संगीत ऐकतो, चित्रपट पाहतो तेव्हा ते मनोरंजन अकृतिशील पातळीवर असते. आपण त्यामध्ये फक्त प्रेक्षक असतो.

करून पहा.

इतिहास विषयाशी निगडित कृतिशील आणि अकृतिशील मनोरंजनाचा तक्ता तयार करा.

६.२ लोकनाट्य

कठपुतळ्यांचा प्रयोग : मोहेंजोदडो, हडप्पा, ग्रीस व इजिप्त येथील उत्खननात मातीच्या बाहुल्यांचे अवशेष सापडले अाहेत. त्या कठपुतळ्याप्रमाणे वापरल्या असण्याची शक्यता आहे. यावरून हा खेळ प्राचीन आहे हे समजते. पंचतंत्र व महाभारतात या खेळाचा उल्लेख आहे.

प्राचीन भारतात या बाहुल्या बनवण्यासाठी लाकूड, लोकर, कातडे, शिंगे व हस्तिदंत यांचा वापर करत असत. या खेळाच्या राजस्थानी व दाक्षिणात्य अशा दोन पद्धती आहेत. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, आसाम, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ या राज्यांत कठपुतळीचे प्रयोग करणारे कलावंत आहेत. कठपुतळीचा प्रयोग रंगण्यासाठी सूत्रधाराचे कौशल्य अत्यंत महत्त्वाचे असते. लहान रंगमंच, प्रकाश व ध्वनी यांचा सूचक उपयोग यात करतात. छाया-बाहुली, हात-बाहुली, काठी-बाहुली आणि सूत्र-बाहुली असे याचे प्रकार आहेत.

 दशावतारी नाटके : दशावतारी नाटके हा महाराष्ट्रातील लोकनाट्याचा एक प्रकार आहे. सुगीनंतर कोकण आणि गोवा येथे दशावतारी नाटकांचे प्रयोग होतात. दशावतारी नाटके मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध व कल्की या दहा अवतारांवर आधारित असतात. सर्वप्रथम सूत्रधार विघ्नहर्ता गणपतीला आवाहन करतो.

दशावतारी नाटकातील पात्रांचा अभिनय, रंगभूषा, वेशभूषा, परंपरागत असते. नाटकातील बहुतेक भाग पद्यमय असताे. काही संवाद पात्रे स्वयंस्फूर्तीने बोलतात. देवांसाठी लाकडी मुखवटे वापरतात. नाटकाचा शेवट हंडी फोडून दहीकाला वाटणे व आरती करणे या कृतीने होतो.

१८ व्या शतकात श्यामजी नाईक काळे यांनी दशावतारी खेळ दाखवणारा एक फड स्थापन केला होता. तो फड घेऊन ते महाराष्ट्रभर फिरत असत.

विष्णुदास भावे यांनी दशावतारी नाट्यतंत्राचे संस्करण करून आपली पौराणिक नाटके सादर केली.यामुळे मराठी नाटकाची पूर्वपीठिका दशावतारी नाटकांपर्यंत जाते.

भजन : टाळ, मृदंग किंवा पखवाज इत्यादी वाद्यांच्या साथीत ईश्वरगुणवर्णनपर व नामस्मरणपर काव्यरचना गाणे यास भजन म्हणतात. भजनाचे चक्री भजन आणि सोंगी भजन हे दोन प्रकार आहेत.

चक्री भजन : न थांबता चक्राकार फिरत भजने म्हणणे.

सोंगी भजन : देवभक्ताची भूमिका घेऊन संवादस्वरूपात भजने म्हणणे. अलीकडच्या काळात संत तुकडोजी महाराजांनी ‘खंजिरी भजन’ लोकप्रिय केले. उत्तर भारतात संत तुलसीदास, महाकवी सूरदास, संत मीराबाई आणि संत कबीर यांची भजने प्रसिद्ध आहेत.

करून पहा.

तुलसीदास, सूरदास, मीराबाई आणि कबीर या संतांची भजने ऐका व ती संगीत शिक्षकांच्या किंवा जाणकारांच्या मदतीने समजून घ्या.

कर्नाटकात पुरंदरदास, कनकदास, विजयदास, बोधेंद्रगुरूस्वामी, त्यागराज आदींच्या रचना भजनामध्ये गायल्या जातात.

गुजरातमध्ये संत नरसी मेहता यांनी भक्ती संप्रदायास चालना दिली. महाराष्ट्रात संत नामदेवांनी वारकरी पंथाच्या माध्यमातून भजन-कीर्तनास प्रोत्साहन दिले. वारकरी संप्रदायाने नामस्मरणाचा प्रकार म्हणून भजनास वैभव प्राप्त करून दिले.

कीर्तन : परंपरेनुसार कीर्तनपरंपरेचे आद्य प्रवर्तक नारदमुनी होत असे मानले जाते. संत नामदेवांना महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार मानतात. त्यांच्यानंतर अन्य संतांनी या परंपरेचा प्रसार केला. कीर्तनकारास हरिदास किंवा कथेकरीबुवा म्हणतात. कीर्तन करणाऱ्यास पोशाख, विद्वत्ता, वक्तृत्व, गायन, वादन, नृत्य, विनोद यांकडे लक्ष द्यावे लागते. त्याच्या अंगी बहुश्रुतता असावी लागते. कीर्तन मंदिरात किंवा मंदिराच्या परिसरात केले जाते.

माहीत करून घ्या.

कीर्तनाच्या नारदीय अथवा हरिदासी आणि वारकरी या दोन मुख्य परंपरा आहेत. हरिदासी कीर्तन एकपात्री प्रयोगासारखे असते. या कीर्तनात ‘पूर्वरंग’ व ‘उत्तररंग’ असतात. नमन, निरूपणाचा अभंग व निरूपण याला पूर्वरंग आणि उदाहरणादाखल एखादे अाख्यान सांगणे याला उत्तररंग म्हणतात. वारकरी कीर्तनात सामूहिकतेवर भर असतो. कीर्तनकारांबरोबर टाळकऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा असतो. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात राष्ट्रीय कीर्तन नावाचा नवा प्रकार पुढे आला. हे कीर्तन नारदीय कीर्तनाप्रमाणेच सादर केले जाते. त्यामध्ये स्वातंत्र्य चळवळीतील नेते, शास्त्रज्ञ, समाजसुधारक अशा थोर लोकांच्या चरित्राच्या आधारे समाजप्रबोधन करण्यावर भर असतो. त्याची सुरुवात वाईचे दत्तोपंत पटवर्धन यांनी केली.

याशिवाय महात्मा जोतीराव फुले प्रणित सत्यशोधक समाजानेही कीर्तनाच्या माध्यमातून समाजजागृतीचे कार्य केले. संत गाडगे महाराजांची कीर्तने सत्यशोधकी कीर्तनाशी नाते सांगणारी होती. जातिभेद निर्मूलन, स्वच्छता, व्यसनमुक्ती यांसारख्या विषयांवर ते त्यांच्या कीर्तनातून प्रबोधन करत असत.

लळित : महाराष्ट्रातील मनोरंजनाचा एक जुना प्रकार म्हणजे लळित. नारदीय कीर्तन परंपरेत या प्रकाराचा समावेश होतो. कोकण आणि गोवा भागात याचे महत्त्व खूप आहे. लळिताच्या सादरीकरणामध् धा ये र्मिक उत्सवप्रसंगी उत्सवदेवता सिंहासनावर बसली आहे असे मानून तिच्यासमोर मागणे मागतात. ‘ज्याला जे हवे असेल त्याला ते मिळो । सगळा गाव आनंदाने पुढच्या लळितापर्यंत नांदो । आपापसांतले कलह लळितात मिटोत । कोणाच्याही मनात किल्मिष न उरो । निकोप मनाने व्यवहार चालोत । सदाचरणाने समाज वागो ।’ अशा प्रकारचे हे मागणे असते.

नाट्यप्रवेशाप्रमाणे लळित सादर केले जाते. त्यामध्ये कृष्ण व रामकथा आणि भक्तांच्या कथा सांगतात. काही लळिते हिंदी भाषेतही आहेत. आधुनिक मराठी रंगभूमीला लळिताची पार्श्वभूमी आहे.

भारुड : आध्यात्मिक व नैतिक शिकवण देणारे मराठीतील रूपकात्मक गीत म्हणजे भारुड होय. पथनाट्याप्रमाणे भारुड प्रयोगशील असते. महाराष्ट्रात संत एकनाथांची भारुडे विविधता, नाट्यात्मता, विनोद आणि गेयता यांमुळे लोकप्रिय झाली. लोकशिक्षण हा संत एकनाथांचा भारुडे रचण्याचा उद्देश होता.

तमाशा : ‘तमाशा’ हा शब्द मुळात पर्शियन भाषेतील आहे. चित्ताला प्रसन्नता देणारे दृश्य असा याचा अर्थ आहे. विविध लोककला आणि अभिजात कलांचे प्रवाह सामावून घेत अठराव्या शतकापर्यंत तमाशा विकसित झाला. पारंपरिक तमाशाचे दोन प्रकार आहेत – संगीत बारी आणि ढोलकीचा फड. संगीत बारीमध्ये नाट्यापेक्षा नृत्य आणि संगीतावर अधिक भर असतो. प्राधान्याने नृत्य-संगीताचा समावेश असलेल्या तमाशात कालांतराने ‘वग’ या नाट्यरूपाचा समावेश केला गेला. उत्स्फूर्त विनोदाच्या आधाराने वग रंगत जातो. तमाशाच्या सुरुवातीला ‘गण’ म्हणजे गणेशवंदना गायली जाते. त्यानंतर ‘गवळण’ सादर केली जाते. तमाशाच्या दुसऱ्या भागात मुख्य नाटक म्हणजे ‘वग’ सादर केला जातो. ‘विच्छा माझी पुरी करा’ आणि ‘गाढवाचे लग्न’

यांसारखे मराठी रंगभूमीवर गाजलेले प्रयोग हे तमाशाचे आधुनिक स्वरूप दर्शवतात.

पोवाडा : हा एक गद्यपद्यमिश्रित सादरीकरणाचा प्रकार आहे. पोवाड्यामध्ये शूर स्त्री-पुरुषांच्या पराक्रमाचे आवेशयुक्त व स्फूर्तिदायक भाषेत कथन केले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अज्ञानदास या कवीने अफझलखान वधाविषयी रचलेला आणि तुळशीदासाने रचलेला सिंहगडच्या लढाईचा पोवाडा प्रसिद्ध आहे.

ब्रिटिशांच्या काळात उमाजी नाईक, चापेकर बंधू, महात्मा गांधी यांच्यावर पोवाडे रचले गेले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात अमर शेख, अण्णाभाऊ साठे आणि गवाणकर या शाहिरांनी रचलेल्या पोवाड्यांनी महाराष्ट्र गाजवला आणि पोवाड्यांच्या माध्यमातून जागृती करण्यात आली.

६.३ मराठी रंगभूमी

ललित कला व्यक्तीने किंवा समुदायाने सादर करण्याचे स्थान म्हणजे रंगभूमी. ललित कलेमध्ये कलावंत आणि प्रेक्षक या दोहोंचा सहभाग आवश्यक असतो. नाट्यसंहिता, नाट्यदिग्दर्शक, कलावंत, रंगभूषा, वेशभूषा, रंगमंच, नेपथ्य, प्रकाशयोजना, नाट्यप्रयोगाचा प्रेक्षक आणि समीक्षक असे अनेक घटक रंगभूमीशी संबंधित असतात. नृत्य आणि संगीत यांचाही समावेश नाटकामध्ये असू शकतो. नाटक हे बहुतेक वेळा संवादांद्वारे सादर केले जाते. परंतु काही नाटकांमध्ये मूकाभिनय सुद्धा असतो. या प्रकाराला मूकनाट्य असे म्हणतात.

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडित नाटकांची माहिती मिळवा.

तंजावरच्या भोसले राजवंशाने मराठी व दाक्षिणात्य भाषांमध्ये नाटकांना उत्तेजन दिले. त्या राजवंशातील राजांनी स्वतः नाटके लिहिली तसेच संस्कृत नाटकांची भाषांतरे केली.

महाराष्ट्रातील रंगभूमीच्या विकासात १९व्या शतकाचे स्थान महत्त्वाचे आहे. विष्णुदास भावे मराठी रंगभूमीचे जनक म्हणून ओळखले जातात. ‘सीतास्वयंवर’ हे त्यांनी रंगभूमीवर आणलेले पहिले नाटक होय. विष्णुदास भाव्यांनी लिहिलेल्या नाटकांनंतर महाराष्ट्रात ऐतिहासिक, पौराणिक नाटकांबरोबरच हलक्याफुलक्या पद्धतीची प्रहसन प्रकारातील नाटकेही रंगभूमीवर अाली. त्यामध्ये विनोदी पद्धतीने सामाजिक विषय सादर केले जात.

सुरुवातीच्या नाटकांच्या संहिता लिखित स्वरूपात नसत. बऱ्याचदा त्यातील गीते लिहिलेली असली तरी गद्य संवाद उत्स्फूर्त स्वरूपाचे असत. मुद्रित स्वरूपात संहिता उपलब्ध असणारे पहिले नाटक वि.ज.कीर्तने यांनी १८६१ साली लिहिलेले ‘थोरले माधवराव पेशवे’ हे होय. या नाटकामुळे संपूर्ण लिखित संहिता असलेल्या नाटकांची नवी परंपरा सुरू झाली.

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या पर्वात उत्तर हिंदुस्थानातील ख्याल संगीत महाराष्ट्रात रुजवण्याचे काम बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांनी केले. त्यांच्यानंतर उस्ताद अल्लादियाँ खाँ, उस्ताद अब्दुल करीम खाँ आणि उस्ताद रहिमत खाँ यांनी महाराष्ट्रातील रसिकांमध्ये संगीताची आवड निर्माण केली. त्याचा परिणाम होऊन संगीत रंगभूमीचा उदय झाला. किर्लोस्कर मंडळी या नाटक कंपनीची संगीत नाटके लोकप्रिय झाली. त्यामध्ये ‘संगीत शाकंुतल’ हे अण्णासाहेब किर्लोस्करांनी लिहिलेले नाटक अतिशय गाजले. संगीत नाटकांमध्ये गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेले ‘संगीत शारदा’ हे नाटक अत्यंत महत्त्वाचे आहे. या नाटकात जरठकुमारी विवाह या तत्कालीन अनिष्ठ प्रथेवर विनोदी पद्धतीने परंतु मार्मिक टीका केली आहे. याखेरीज श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे ‘मूकनायक’, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे ‘संगीत मानापमान’, राम गणेश गडकरी यांचे ‘एकच प्याला’ ही नाटके रंगभूमीच्या इतिहासात महत्त्वाची आहेत.

माहीत आहे का तुम्हांला?

महाभारत या महाकाव्यातील घटना घेऊन तत्कालीन ब्रिटिश साम्राज्यशाहीवर सूचक टीका करणारे ‘कीचकवध’ हे नाटक खाडिलकर यांनी लिहिले. कीचकवधातील द्रौपदी म्हणजे असहाय्य भारतमाता, युधिष्ठिर म्हणजे मवाळ पक्ष, भीम म्हणजे जहाल पक्ष आणि कीचक म्हणजे सत्तांध व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन अशा रूपकात प्रेक्षक हे नाटक पाहत आणि त्यांच्या मनात ब्रिटिश साम्राज्यशाहीबद्दल चीड निर्माण होई.

मराठी रंगभूमीच्या पडत्या काळात आचार्य अत्रे यांच्या ‘साष्टांग नमस्कार’, ‘उद्याचा संसार’, ‘घराबाहेर’ यांसारख्या लोकप्रिय नाटकांनी रंगभूमीला सावरण्यास मदत केली. अलीकडच्या काळात झालेली वसंत कानेटकर यांचे ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘इथे ओशाळला मृत्यू’, विजय तेंडुलकर यांचे ‘घाशीराम कोतवाल’, विश्राम बेडेकर यांचे ‘टिळक आणि आगरकर’ इत्यादी नव्या धर्तीची नाटके प्रसिद्ध आहेत. \

विविध विषयांवरील नाटके व नाट्यप्रकारांच्या आविष्कारांमुळे मराठी रंगभूमी समृद्ध झाली. नाट्यकलावंत म्हणून गणपतराव जोशी, बालगंधर्व तथा नारायणराव राजहंस, केशवराव भोसले, चिंतामणराव कोल्हटकर, गणपतराव बोडस इत्यादींची नावे अग्रक्रमाने घेतली जातात. त्यांची मराठी नाटके मोकळ्या पटांगणात होत असत. ब्रिटिशांनी प्रथम मुंबईत ‘प्ले हाऊस’, ‘रिपन’, ‘व्हिक्टोरिया’ ही नाट्यगृहे बांधली. त्यानंतर हळूहळू मराठी नाटकांचे प्रयोगही बंदिस्त नाट्यगृहांत होऊ लागले.

माहीत आहे का तुम्हांला?

ख्यातनाम साहित्यकार वि.वा.शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांनी शेक्सपिअरच्या ‘किंग लिअर’ नाटकाच्या धर्तीवर लिहिलेले ‘नटसम्राट’ हे नाटक खूप गाजले. या नाटकातील शोकात्म नायक गणपतराव बेलवलकर हे पात्र शिरवाडकरांनी पूर्वीच्या काळी गाजलेले गणपतराव जोशी आणि नानासाहेब फाटक या नटश्रेष्ठांच्या व्यक्तिमत्त्वामधील रंगछटांची सरमिसळ करून निर्माण केले होते.

६.४ भारतीय चित्रपटसृष्टी

चित्रपट : चित्रपट हे कलात्मकता व तंत्रज्ञान यांचा संगम असलेले माध्यम आहे. चलत्‌चित्रणाचा शोध लागल्यावर चित्रपटकलेचा जन्म झाला. यातून मूकपटांचे युग निर्माण झाले. पुढे ध्वनिमुद्रण शक्य झाले आणि बोलपटांचे युग आले.

भारतात पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट तयार करण्याचा आणि प्रदर्शित करण्याचा मान महाराष्ट्राकडे जातो. ‘भारतीय चित्रपटांची जननी’ अशी महाराष्ट्राची ख्याती आहे. भारतीय चित्रपटांच्या विकासात मदनराव माधवराव पितळे, कल्याणचे पटवर्धन कुटंुबीय आणि हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर उर्फ सावेदादा यांचे योगदान आहे.

पुढे दिग्दर्शक गोपाळ रामचंद्र तथा दादासाहेब तोरणे आणि अ.प.करंदीकर, एस.एन.पाटणकर, व्ही. पी.दिवेकर यांनी परदेशी तंत्रज्ञांचे साहाय्य घेऊन ‘पुंडलिक’ हा कथापट १९१२ मध्ये मुंबईत दाखवला. १९१३ मध्ये दादासाहेब फाळके यांनी स्वतः दिग्दर्शित केलेला आणि सर्व प्रक्रिया भारतात पूर्ण केलेला ‘राजा हरिश्चंद्र’ हा चित्रपट मुंबई येथे प्रदर्शित केला. त्यापाठोपाठ मोहिनी- भस्मासूर, सावित्री- सत्यवान हे मूकपट आणि वेरूळची लेणी व नाशिक आणि त्र्यंबकेश्वर ही तीर्थक्षेत्रे यांवर फाळके यांनी अनुबोधपट तयार केले. येथून पुढे ऐतिहासिक आणि पौराणिक विषयांवरचे चित्रपट तयार करण्याची परंपरा सुरू झाली.

पुढे भारतात पहिला सिने-कॅमेरा तयार करणारे आनंदराव पेंटर यांनी चित्रपट निर्मितीत रस दाखवला. त्यांचे मावस बंधू बाबुराव पेंटर तथा मिस्त्री यांनी १९१८ मध्ये ‘सैरंध्री’ चित्रपट काढला. ‘सिंहगड’ हा पहिला ऐतिहासिक मूकपट, कल्याणचा खजिना, बाजीप्रभू देशपांडे, नेताजी पालकर हे ऐतिहासिक चित्रपट त्यांनी काढले. त्याखेरीज ‘सावकारी पाश’ हा पहिला वास्तववादी चित्रपटही त्यांनी काढला. १९२५ मध्ये ‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपट काढणाऱ्या भालजी पेंढारकरांच्या ऐतिहासिक चित्रपटांमधून राष्ट्रीय विचारसरणीचा प्रसार होत आहे हे लक्षात आल्यावर ब्रिटिशांनी त्यावर निर्बंध घातले.

माहीत करून घ्या.

पूर्वी चित्रपटगृहात चित्रपट सुरू होण्यापूर्वी अनुबोधपट व वृत्तपट दाखवले जात असत. त्यांच्या निर्मितीसाठी भारत सरकारने ‘फिल्म्‌स डिव्हिजन’ची स्थापना केली. या अनुबोधपट आणि वृत्तपटांचा उपयोग लोकांच्या समाजप्रबोधनासाठी होई. त्याची माहिती करून घ्या.

कमलाबाई मंगरूळकर या मराठीतील पहिल्या स्त्री चित्रपटनिर्मात्या. त्यांनी ‘सावळ्या तांडेल’ आणि ‘पन्नादाई’ (हिंदी) हे बोलपट तयार केले. १९४४ मध्ये प्रभात कंपनीने काढलेला ‘रामशास्त्री’ चित्रपट गाजला. स्वातंत्र्योत्तर काळात आचार्य अत्रेयांनी ‘महात्मा फुले’ यांच्या जीवनावर, विश्राम बेडेकर यांनी वासुदेव बळवंत फडके यांच्या जीवनावर चित्रपट काढला. दिनकर द. पाटील यांनी ‘धन्य ते संताजी धनाजी’ हा चित्रपट काढला. प्रभाकर पेंढारकर यांचा ‘बाल शिवाजी’ हा चित्रपट महत्त्वाचा होय.

भारतीय चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवून देणारा पहिला चित्रपट म्हणजे संत तुकाराम. हा चित्रपट पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला. या चित्रपटात विष्णपुंत पागनीस यांनी संत तुकारामांची भूमिका केली होती.

चला शोधूयात.

या पाठात उल्लेख नसलेले परंतु इतिहासाशी संबंधित असणाऱ्या चित्रपटांची यादी आंतरजालाच्या मदतीने तयार करा.

मराठी भाषेमध्ये ज्याप्रमाणे ऐतिहासिक चित्रपट बनवले गेले त्याचप्रमाणे हिंदी भाषेतही अनेक ऐतिहासिक चित्रपट बनवले गेले. स्वातंत्र्यपूर्वकाळात बनवलेल्या हिंदी चित्रपटांपैकी सिकंदर, तानसेन, सम्राट चंद्रगुप्त, पृथ्वीवल्लभ, मुघल-ए-आझम, इत्यादी चित्रपट इतिहासाचा आधार घेऊन बनवले होते. ‘डॉ.कोटणीस की अमर कहानी’ हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित होता. स्वातंत्र्य चळवळीवर आधारित ‘आंदोलन’, ‘झाँसी की रानी’ हे चित्रपट महत्त्वाचे होत.

बॉम्बे टॉकिज, फिल्मीस्तान, राजकमल प्रॉडक्शन्स, आर.के.स्टुडिओज, नवकेतन, इत्यादी कंपन्यांनी चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात भरीव कामगिरी केली.

६.५ मनोरंजन क्षेत्रातील व्यावसायिक संधी

रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रांमध्ये इतिहासाच्या विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध आहेत.

नाटक : (१) नेपथ्य, वेशभूषा, केशभूषा, रंगभूषा इत्यादींचे तपशील अचूक असण्यासाठी संबंधित ऐतिहासिक काळातील चित्रकला, शिल्पकला, स्थापत्य या विषयांचा सखोल अभ्यास असणाऱ्या जाणकारांना कलादिग्दर्शनाचे नियोजन करता येते किंवा त्यासाठी सल्लागार म्हणून काम करता येते.

(२) संवादलेखनाच्या प्रक्रियेत लेखक आणि लेखकांचे सल्लागार म्हणून भाषा आणि संस्कृतीच्या इतिहासाच्या जाणकारांची आवश्यकता असते.

चित्रपट : (१) चित्रपटांमध्ये कथेशी संबंधित काळाच्या वातावरण निर्मितीचे तसेच पात्रांच्या वेशभूषा, केशभूषा, रंगभूषा इत्यादींचे नियोजन करण्याचे काम कलादिग्दर्शक करतात. या क्षेत्रातही इतिहासाच्या जाणकारांना प्रत्यक्ष कलादिग्दर्शक किंवा कलादिग्दर्शनासाठी सल्लागार म्हणून काम करता येते.

(२) चित्रपटाच्या संवादलेखनासाठी भाषा व संस्कृतीच्या जाणकारांची आवश्यकता असते.