६. माहेर

तापीकाठची चिकण माती,
ओटा तरी बांधू ग बाई.

असा ओटा चांगला तर,
जातं तरी मांडू ग बाई.

असं जातं चांगलं तर,
सोजी तरी दळू ग बाई.

अशी सोजी चांगली तर,
लाडू तरी बांधू ग बाई.

असे लाडू चांगले तर,
शेल्याच्या पदरी बांधू ग बाई.

असा शेला चांगला तर,
भाऊराया भेटू ग बाई.

असा भाऊ चांगला तर,
दारी रथ आणील ग बाई.

असा रथ चांगला तर,
नंदी तरी जुंपिन ग बाई.

असा नंदी चांगला तर,
माहेराला जाऊ ग बाई.

असं माहेर चांगलं तर,
धिंगामस्ती करू ग बाई!

सदाशिव माळी