६. सागरजलाचे गुणधर्म

तापमान :

भौगोलिक स्पष्टीकरण

तापमान हा सागरजलाचा महत्त्वाचा गुणधर्म आहे. सागरजलाचे पृष्ठीय तापमान सर्वत्र समान नसते. सागरजलाच्या तापमानाची ही भिन्नता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून असते.

अक्षवृत्तीयदृष्ट्या विचार केल्यास सागरजलाचे पृष्ठीय तापमान विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे कमी कमी होत जाते. विषुववृत्तीय प्रदेशात सरासरी तापमान २५° से., मध्य अक्षवृत्तीय प्रदेशात १६° से., तर ध्रुवीय प्रदेशात २° से. पर्यंत असते.

याशिवाय सागरजलाच्या पृष्ठीय तापमानावर चक्रीवादळे, पर्जन्यमान, सागरी लाटा, प्रवाह, क्षारता, प्रदूषण, अभिसरण प्रवाह, ॠतू इत्यादींचाही परिणाम दिसून येतो.

सागरी प्रवाहाचासुद्धा सागरजलाच्या तापमानावर परिणाम होतो. ज्या भागातून थंड सागरी प्रवाह वाहतात, त्या भागात सागरजलाचे पृष्ठीय तापमान कमी असते, तर उष्ण प्रवाहामुळे  सागरजलाचे पृ ष्ठीय तापमान वाढते.

भौगोलिक स्पष्टीकरण

सागरपृष्ठावरून बहुतांश सूर्यकिरणे परावर्तित होतात, तर काही प्रमाणात सूर्यकिरणे सागराच्या ठरावीक खोलीपर्यंत पाण्यात शिरकाव करू शकतात. परिणामी, वाढत्या खोलीनुसार सूर्याच्या उष्णतेची तीव्रता कमी होत जाते, त्यामुळे सागरजलाच्या तापमानात २००० मीटर खोलीपर्यंत घट होत जाते. २००० मीटर खोलीनंतर सागरजलाचे तापमान सर्वत्र सारखे आढळते. ध्रुवीय प्रदेशापासून विषुववृत्तीय प्रदेशापर्यंत ते सर्वत्र सुमारे ४° से. असते. खोलीनुसार सागरजलाचे तापमान सुमारे ४° से. पर्यंतच कमी होते, त्यामुळे जास्त खोलीवरील सागरजल कधीही गोठत नाही.

विषुववृत्ताजवळ सागरजलाच्या तापमानात खोलीनुसार जास्त बदल होतो, तर ध्रुवीय प्रदेशात, तापमानातील फरक कमी असतो.

भूवेष्टित समुद्र व खुल्या सागरजलाच्या तापमानांत भिन्नता अाढळते. भूवेष्टित समुद्राची क्षारता जास्त असल्याने या समुद्रजलाचे तापमान खुल्या समुद्रजलापेक्षा जास्त असते. अशी परिस्थिती निम्न अक्षवृत्तीय भागात असते.

क्षारता :

भौगोलिक स्पष्टीकरण

आपण जे अन्न खातो त्यामध्येमिठाचा वापर केलेला असतो. विविध रसायने आणि औषधे तयार करण्यासाठीही मिठाचा वापर केला जातो. शिवाय पदार्थ जास्त दिवस टिकावेत म्हणूनही मीठ वापरले जाते. मिठाचा वापर बर्फतयार करण्याच्या कारखान्यातही करतात. (पाठ पाचमधील प्रयोगात तुम्ही मिठाचा वापर कशासाठी केला होता?) मिठागराच्या माध्यमातून आपण सागरजलातील क्षार गोळा करत असतो.

क्षारतेमुळे सागरजलाची उद्‌धरण क्षमता वाढते. त्याचा फायदा जलवाहतुकीसाठी होतो. जर सागरजलाची क्षारता प्रमाणापेक्षा जास्त असेल, तर त्या पाण्यातील जीवसृष्टी नष्ट होते.

भौगोलिक स्पष्टीकरण

पृथ्वीवरील तापमान वितरणातील असमानता, गोड्या पाण्याचा पुरवठा व त्यातील असमानता इत्यादी बाबी सागरजलाच्या क्षारतेवर परिणाम करतात.

उष्ण कटिबंधात तापमान जास्त असते. तेथे बाष्पीभवनाचा वेगही जास्त असतो, त्यामुळे सागरजलाची क्षारताही जास्त असते.

विषुववृत्तापासून साधारण ५° उत्तर व ५° दक्षिण अक्षवृत्तांदरम्यानच्या शांत पट्ट्यात आकाश जास्त काळ ढगाळ असते व दररोज आरोह प्रकारचा पाऊस पडतो. उष्ण कटिबंधातील कांगो व ॲमेझॉनसारख्या मोठ्या नद्या महासागराला मिळतात, त्यामुळे गोड्या पाण्याचा पुरवठाही जास्त होत असतो; परंतु अधिक तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो. परिणामी, या प्रदेशात क्षारतेचे प्रमाण मध्यम असते.

मध्य अक्षवृत्तीय पट्ट्यात (२५° ते ३५° उत्तर व दक्षिण) पर्जन्यमान कमी असते व नद्यांतून येणारा गोड्या पाण्याचा पुरवठाही कमी असतो. या पट्ट्यामध्ये वाळवंटी प्रदेश आहेत, त्यामुळे तेथील सागरजलाच्या क्षारतेत वाढ झालेली आढळते.

समशीतोष्ण कटिबंधामध्ये सूर्यकिरणे तिरपी पडत असल्याने तापमान कमी असते, तसेच बर्फ वितळल्यामुळे गोड्या पाण्याचा पुरवठादेखील जास्त असतो; म्हणून या कटिबंधात वाढत्या अक्षांशानुसार सागरजलक्षारता कमी होत जाते.

ध्रुवाकडे तापमान खूप कमी असते. ध्रुवीय प्रदेशात बाष्पीभवनाचा वेगही कमी असतो, त्यामुळे सागरजलाची क्षारता कमी असते.

भूवेष्टित समुद्राची क्षारता जास्त असते, तर खुल्या समुद्राची क्षारता त्यामानाने कमी आढळते, कारण भूवेष्टित समुद्रात बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो. तसेच मोठ्या नद्यांकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा अभाव असतो, त्यामुळे भूवेष्टित समुद्र व खुल्या समुद्रातील क्षारतेत भिन्नता आढळते. उदा., भूमध्य समुद्राची सरासरी क्षारता सुमारे ३९‰ आहे, तर महासागरांपैकी क्षारतेचे प्रमाण जास्त असलेल्या अटलांटिक महासागराची सरासरी क्षारता सुमारे ३५‰ इतकी आहे.

घनता :

सागरी जलाचे तापमान आणि क्षारता हे दोन गुणधर्म सागरी जलाची घनता नियंत्रित करतात, म्हणजेच तापमान कमी झाले, की पाण्याची घनता वाढते. थंड पाण्याची घनता जास्त असते, तसेच अधिक क्षारता असणाऱ्या पाण्याची घनताही जास्त असते. क्षारतेपेक्षा तापमान हा गुणधर्म घनतेवर अधिक परिणाम करतो, त्यामुळे काही वेळा जास्त क्षारता असलेल्या पाण्याच्या थराचे तापमान कमी असले, तरीही त्या जलाची घनता इतर जलाच्या घनतेपेक्षा जास्त असते. याउलट जास्त तापमान व कमी क्षारता असलेल्या सागरी जलाची घनता कमी असू शकते.

क्षारतेवर अवलंबून असते हे तुम्हांला माहीत आहे. या तीनही आलेखांचे निरीक्षण केले असता असे लक्षात येईल, की एका विशिष्ट खोलीनंतर या तीनही घटकांमध्ये खोलीनुसार फरक पडत नाही. सागरपृष्ठापासून साधारणतः ५०० मीटरपर्यंत यामध्ये फरक दिसतो. आलेखाच्या वक्रांचे उतार या भागात तीनही घटकांसाठी कमी-अधिक असल्याचे लक्षात येते; परंतु १००० मीटरनंतर या तीनही घटकांचे प्रमाण फारसे बदलत नाही.

साधारणतः ५०० मीटर खोलीपर्यंतच्या सागरजलास पृष्ठीय सागरजल असे म्हणता येईल. या जलावर वारे, सूर्यप्रकाश यांचा परिणाम दिसून येतो.

आकृती ६.१० पहा. त्यातील क्षारता, तापमान व घनता यांचे सरासरी प्रमाण सागरजलाच्या खोलीसंदर्भात आलेखात दिलेले आहे. सागरजलाची घनता ही तापमान व हालचाली सागरी प्रवाहाच्या स्वरूपात पाहायला मिळतात. जास्त खोलीवर वारे, सूर्यप्रकाश व सागरजलाचे प्रवाह यांचा परिणाम होत नाही, त्यामुळे सागरजलाच्या या तीनही घटकांमध्ये १००० मीटर खोलीनंतर फरक पडत नाही.

सागरी प्रवाहांची निर्मित ी ही सागरी पाण्याच्या गुणधर्मांतील भिन्नतेमुळे होत असते. सागरी प्रवाह हे जागतिक तापमानाचे नियंत्रक म्हणून कार्य करतात. सागरी प्रवाहांमुळे तापमानाचे नियंत्रण होत असते. प्रादेशिक हवामानावर सागरी प्रवाहांचा परिणाम होत असतो.